दुर्लक्ष करण्याचे फायदे (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात ‘दुर्लक्ष-धोरण’ मी नेहमी वापरतो; अर्थात, कोणत्याही धोरणाचा विपर्यास केला, तर ते परिणामकारक होत नाही, याची जाणीव ठेवूनच! आणि दुर्लक्ष करणं म्हणजे सदोदित अन्याय सहन करणं असंही नव्हे. प्रत्येक प्रसंगात तारतम्य बाळगून वागलं पाहिजे. जेव्हा योग्य असेल तेव्हा न्याय व हक्क यांचा पाठपुरावा केला पाहिजे. आयुष्यात योग्य व अयोग्य यादरम्यान रेषा कुठं ओढायची, हे कळलं तर आणि अयोग्य व अनावश्‍यक बाबींकडं दुर्लक्ष करण्याची कला प्राप्त झाली, तर सुख-समाधान मिळतं, असा माझा अनुभव आहे.

व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात ‘दुर्लक्ष-धोरण’ मी नेहमी वापरतो; अर्थात, कोणत्याही धोरणाचा विपर्यास केला, तर ते परिणामकारक होत नाही, याची जाणीव ठेवूनच! आणि दुर्लक्ष करणं म्हणजे सदोदित अन्याय सहन करणं असंही नव्हे. प्रत्येक प्रसंगात तारतम्य बाळगून वागलं पाहिजे. जेव्हा योग्य असेल तेव्हा न्याय व हक्क यांचा पाठपुरावा केला पाहिजे. आयुष्यात योग्य व अयोग्य यादरम्यान रेषा कुठं ओढायची, हे कळलं तर आणि अयोग्य व अनावश्‍यक बाबींकडं दुर्लक्ष करण्याची कला प्राप्त झाली, तर सुख-समाधान मिळतं, असा माझा अनुभव आहे.

सातवी-आठवीत असताना मला हे कसं सुचलं ते आठवत नाही. डोंबिवलीतल्या आमच्या घरापासून शाळेचा रस्ता सरळ होता. त्याच रस्त्यावर राहणाऱ्या; पण दुसऱ्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलाशी माझी मैत्री झाली. त्या वेळी मी एका पडक्‍या चाळीत राहत होतो आणि त्या मित्राच्या मालकीची इमारत होती. आर्थिक परिस्थितीमुळं असेल अथवा इतर काही कारणांमुळं असेल, आपल्याला सगळ्यांनी महत्त्व दिलंच पाहिजे, असं त्याला वाटत असे. एकदा आमचं भांडण झाले. त्यानंतर त्यानं मला सतावण्यास सुरवात केली. मी शाळेत जाताना तो अचानक येत असे व मला जोरात टपली मारून पळून जात असे. कधी पायात पाय घालून मला पाडतही असे व मी पडल्यामुळं माझा शर्ट मळला की टाळ्या वाजवून आनंद घेत असे. एके दिवशी मी त्याच्या घरी जाऊन तक्रारही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं मला इमारतीच्या अंगणातच गाठलं व मारलं.

नंतर मी तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यानं शाळेत जायला लागलो. कधी अन्य मित्र बरोबर असले तर मी नेहमीच्या रस्त्यानं जाई. तो समोर दिसला की त्याच्याकडं दुर्लक्ष करत असे. माझ्याबरोबर इतर मुलं असली तर तो त्रास देत नसे. मी एकटाच असलो की मग मी लांबच्या रस्त्यानं जाई.
अकरावीची परीक्षा जवळ आली आणि मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान, ‘तो’ मुलगा आता गल्लीतला ‘दादा’ झाला होता. त्यानं पुन्हा माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण मी दुर्लक्ष केलं व त्याला विसरून गेलो.

काही वर्षांनी मी ऑक्‍सफर्ड विद्यापीठात पूर्ण शिष्यवृत्ती मिळवून पुढच्या शिक्षणासाठी गेलो. दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय परिषदांत भारताचा युवा प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. या सगळ्याचं कौतुक काही मराठी वर्तमानपत्रांना वाटलं व माझ्याबद्दल अधूनमधून छोट्या बातम्या येऊ लागल्या.
एकदा मी डोंबिवलीला वडिलांना भेटायला गेलो होतो. दुपारी दोन-अडीचची वेळ होती. रस्त्याचं डांबर वितळलेलं होतं. अचानक तो समोर दिसला. मी लहानपणीच्या सवयीप्रमाणे वाट बदलून जाण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या मागं धावत आला व गरम डांबराच्या रस्त्यावर लोळण घेऊन त्यानं मला साष्टांग नमस्कार केला! मी गोंधळलो व त्याला उभं राहण्यास सांगितलं.

त्यानं खिशातून पाकीट काढलं. मराठी वृत्तपत्रात माझ्याबद्दल आलेल्या बातम्यांची कात्रणं त्या पाकिटात होती. तो मला म्हणाला ः ‘‘लहानपणी मी तसा वागत असताना तू मला कानफटात का नाही मारलीस? तू माझ्याकडं दुर्लक्ष केलंस व मला वाटायला लागलं, की मी आता ‘दादा’ झालो. मग मी हळूहळू सगळ्या प्रकारची दादागिरी करायला लागलो. मी एकदा एका दुकानात तोडफोड केली. मला पकडण्यात आलं व मी दोन रात्री तुरुंगात काढल्या. मी तुरुंगातून बाहेर आलो. त्यानंतर माझ्या वडिलांनी, ही सुरवात कशी झाली, याची आठवण मला करून दिली. माझ्या वडिलांचं वाक्‍य होतंः ‘तो ऑक्‍सफर्डला गेला आणि तू तुरुंगात गेलास!’ त्यानंतर मी सुधारायचं ठरवलं; पण उरात खंत होतीच...तू डोंबिवलीला कधीतरी येशील व मग मी तुझी माफी मागेन, अशी आशा मी या काळात बाळगून होतो... ’’
* * *
या प्रसंगानंतर अनेक वर्षांनी मला भारतातले एक प्रथितयश उद्योजक भेटले. त्यांनी मला एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तिथं त्यांच्या मोठ्या बंधूंशी ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू खूप शांत वाटले. काही बोलले नाहीत. मला थोडं विचित्र वाटलं.

एकदा मी धाडस करून उद्योजकमित्राला यासंबंधी विचारलं. ते म्हणालेः ‘‘हा उद्योग आमच्या वडिलांनी सुरू केला. त्यांनी मोठे बंधू व मी अशी समान विभागणी केली व त्यांच्या एका मित्राला काही बाबतींत ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दिली व आम्हा दोघांना मार्गदर्शन करावं, असं त्यांना सांगितलं. वडिलांचं अकाली निधन झालं. वडिलांच्या मित्राचं मन फिरलं. त्यांनी बंधू व मी अशा दोघांच्या उद्योगातून बरीच मोठी रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा केली आणि पलायन केलं. या अन्यायाचा सूड घेण्याचं मोठ्या बंधूंनी ठरवलं. कोर्ट-कचेऱ्या केल्या. त्यात बंधूंची उरलेली संपत्ती पण हळूहळू कमी होत राहिली. मी त्या फसवणुकीकडं दुर्लक्ष केलं व उरलेल्या संपत्तीनं सुरवात करून व्यवसाय कसा वाढवता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं. खूप मेहनत केली. नवीन कल्पनांचा विचार केला व आज संपूर्ण देशात माझी ओळख आहे. जर मी फसवणुकीकडं दुर्लक्ष केलं नसतं, तर माझी माझ्या बंधूंप्रमाणेच स्थिती झाली असती व तुझ्याशी ओळख होण्याचा प्रसंग आला नसता.’’

* * *
काही वर्षांनी मी लेबाननची राजधानी बैरुत इथं गेलो होतो. ‘भारताचं जगातलं स्थान व भवितव्य’ या विषयावर तिथं माझं व्याख्यान होतं. व्याख्यानाला खूप लोक आले होते. तिथं पाकिस्तानच्या राजदूत (महिला) व भारताचे राजदूतही आलेले होते. माझं पाऊण तासाचं भाषण संपल्यावर प्रश्‍नोत्तरं सुरू झाली. लेबाननच्या एका प्राध्यापकानं मला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुम्ही भाषणात पाकिस्तानचा उल्लेखही केला नाहीत, याचे स्पष्टीकरण द्याल का?’’ उत्तर दिलं ः ‘‘पाकिस्तान हे आमच्या शेजारी-राष्ट्रांपैकी एक आहे. त्याच्याशी संबंध कसे ठेवायचे, हे ठरवण्यास भारत सरकार समर्थ आहे. माझा विषय ‘भारत, जग आणि भवितव्य’ हा होता. अशा महत्त्वाच्या प्रश्‍नावर बोलताना मला लहानसहान गोष्टींबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही. पुढचा प्रश्‍न?’’
रात्री भारताच्या राजदूतांनी माझ्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजिला होता. मी त्यांच्या घरी पोचल्यावर त्यांनी माझं स्वागत केलं व ते जोरजोरात हसू लागले. ते म्हणाले ः ‘‘अरे, त्या पाकिस्तानच्या राजदूत तुझ्याशी वाद घालण्याच्या तयारीनंच आल्या होत्या. तू पाकिस्तानचं नावही घेतलं नाहीस, हे पाहिल्यावर त्यांनी त्या प्राध्यापकाला तुला प्रश्‍न विचारायला सांगितलं. तुझं उत्तर ऐकल्यावर त्या रागानं निघून गेल्या. जाताना मला भेटल्या व ‘पुन्हा भेटून, या व्याख्यानाबद्दल बोलू या,’ असं रागात म्हणाल्या.’’

मी भारताच्या राजदूतांना म्हटलं ः ‘‘माफ करा. मी तुमची पंचाईत केली.’’ ते म्हणाले ः ‘‘तुझ्याबद्दल विचारलं तर काय उत्तर द्यायचं, ते मला माहीत आहे; पण तुझं हे ‘दुर्लक्ष-धोरण’ मला तरी खूप आवडलं.’’
* * *

हे ‘दुर्लक्ष-धोरण’ व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात नेहमी वापरतो; अर्थात कोणत्याही धोरणाचा विपर्यास केला तर ते परिणामकारक होत नाही, याची जाणीव ठेवूनच! आणि दुर्लक्ष करणं म्हणजे सदोदित अन्याय सहन करणं असंही नव्हे. प्रत्येक प्रसंगात तारतम्य बाळगून वागलं पाहिजे. जेव्हा योग्य असेल तेव्हा न्याय व हक्क यांचा पाठपुरावा केला पाहिजे; पण अनेकदा आपण सर्वांगीण विचार न करता कशाचा तरी पाठपुरावा- गरज नसतानाही करतो व त्याला ‘न्याय,’ ‘सन्मान,’ ‘स्वाभिमान,’ अशी गोंडस नावं देतो. आयुष्यात योग्य व अयोग्य यादरम्यान रेषा कुठं ओढायची हे कळलं तर व अयोग्य व अनावश्‍यक बाबींकडं दुर्लक्ष करण्याची कला प्राप्त झाली तर सुख-समाधान मिळतं, असा माझा अनुभव आहे.

Web Title: sundeep waslekar's saptarang article

फोटो गॅलरी