आर्थिक चौकट व आर्थिक जाळं (संदीप वासलेकर)

आर्थिक चौकट व आर्थिक जाळं (संदीप वासलेकर)

आयुष्यात आर्थिक चौकट तयार करणं हे महत्त्वाचं असतंच; पण आर्थिक जाळ्यात अडकून न राहणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्या आदर्शवादाची आर्थिक जबाबदारी नातेवाइकांवर अथवा समाजावर टाकणं हा बेजबाबदारपणा होय. ज्याप्रमाणे आर्थिक पाया नसेल व रोजच्या जेवणाची भ्रांत असेल, तर हातून काही निर्मिती होणं अशक्‍य असतं; त्याचप्रमाणे गरजा बेसुमारपणे वाढवत नेऊन आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी केवळ संपत्तीच्याच मागं लागलं, तरीसुद्धा सर्जनशील व नावीन्यपूर्ण असं काही निर्माण करणं अशक्‍य होऊन बसतं.

अलीकडं काही युवक-युवती मला भेटून गेल्या. बहुतेक जण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होते, तर काहींनी नुकतीच पदवी प्राप्त केली होती. त्यातल्या बऱ्याच जणांचा एक प्रश्‍न होता ः ‘देशासाठी, समाजासाठी काही तरी करण्याची आमची इच्छा आहे. अर्थप्राप्ती झाली नाही तरी चालेल; मग आम्ही राष्ट्र निर्माण करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो?’

मी त्यांना स्पष्ट सांगितलं ः ‘‘प्रथम स्वतःचा आर्थिक पाया मजबूत कसा करता येईल ते पाहा. स्वतःला अनुरूप अशी नोकरी, व्यवसाय अथवा उद्योग सुरू करा. जर तुम्ही स्वतः समर्थपणे उभे राहण्यात अपयशी झालात, तर देश समर्थ करण्यासाठी विशेष काही करू शकणार नाहीत.’’

नंतर इतर विषयांवर गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना काही महापुरुषांबद्दल सांगितलं. आईनस्टाईननं सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधला, त्या वेळी ते कारकून होते. त्यांच्याकडं फारसे पैसे नव्हते. स्टीव्ह जॉब्ज्‌ यानं आपल्या सहकाऱ्यांसमवेत ॲपल संगणक विकसित केला, तेव्हा त्याच्याकडंही काही पैसे नव्हते. जे. के. रोलिंग हिनं ‘हॅरी पॉटर’ कथानक एका पबमध्ये बसून लिहिलं होतं. तिची आर्थिक स्थिती एवढी हलाखीची होती, की तिच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता...अशी अनेक उदाहरणं आहेत. यातल्या कुणाचीच निर्मिती पैशाविना थांबली नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत केवळ कल्पकता व परिश्रम यांच्या जोरावर युवकांनी संपूर्ण जगात परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य केलं.
तेव्हा एका विद्यार्थ्यानं मला रोखत विचारलं ः ‘‘काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात, की पैसा मिळवणं आवश्‍यक आहे. आर्थिक पाया भक्कम करा आणि आता म्हणता, की पैशाला काही महत्त्व नाही. आईनस्टाईन, स्टीव्ह जॉब्ज्‌, जे. के. रोलिंग अशा अनेकांनी पैसा नसताना, तसंच आर्थिक प्राप्तीकडं दुर्लक्ष करून संपूर्ण जगाला लाभदायक अशा गोष्टींची निर्मिती केली. तुमच्या या बोलण्यात विरोधाभास जाणवत नाही का?’’

हा संवाद अपवादात्मक नव्हता. मला संवेदनशील युवक नेहमी भेटतात व अनेकांच्या मनात प्रश्‍न असतो, तो हा, की घरची आर्थिक परिस्थिती बेतास बात असेल, तर अर्थार्जन करायला प्राधान्य द्यावं, की अर्थप्राप्तीकडं दुर्लक्ष करून समाजात, देशात, जगात परिवर्तन होईल, असं काही करावं?
या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्यासाठी आर्थिक चौकट व आर्थिक जाळं यातला फरक समजून घेतला पाहिजे. आईनस्टाईननं विज्ञानाला वाहून घेण्यासाठी घरी बसण्याचा निर्णय घेतला नव्हता. जे. के. रोलिंग हिनंही ‘हॅरी पोटर’ कथामालिकेवर काम करताना शिक्षिकेची नोकरी पत्करली होती. आईनस्टाईनच्या पेटंट ऑफिसमधल्या नोकरीवर व जे. के. रोलिंग हिच्या शिक्षिकेच्या तुटपुंज्या पगारावर त्या दोघांचही घर चालत होतं. कुणाकडं हात पसरण्याची त्यांना गरज नव्हती. त्यांनी आपली आर्थिक चौकट नीट बसवूनच बाकीचं काम केलं.

महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत दादा अब्दुल्ला यांच्याकडं नोकरी पत्करली होती. सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन हे माझ्या परिचित कुटुंबातल्या सुतारकामाच्या दुकानात काम करत असत. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम विद्यार्थिदशेत असताना वर्तमानपत्रं विकून अर्थार्जन करत असत. अशा अनेक महान व्यक्तींनी स्वतःचं ओझे कुटुंबावर अथवा समाजावर लादलं नव्हतं;
मात्र एकदा आर्थिक चौकट तयार झाली, निश्‍चित झाली, की ते त्या चौकटीचा विस्तारत करत असत. ‘आर्थिक जाळं’ विणण्यात ही नामवंत मंडळी मग्न झाली नाहीत. त्यांनी आपल्या जीवनाच्या हेतूवरच पूर्ण लक्ष केंद्रित केलं. आता आपल्याला कमावता येतं, तर मग एक बेडरूमचं घर घ्यावं, ते घेतल्यावर मग नंतर दोन बेडरूमचं घर घ्यावं, मग चार बेडरूमचं घर घ्यावं, मग सुटीसाठी निसर्गरम्य अशा ठिकाणी एक वेगळं घर घ्यावं, अशा ‘शर्यती’त यातल्या कुणीही भाग घेतला नाही.

स्टीव्ह जॉब्ज्‌, जे. के. रोलिंग, चित्रकार हुसेन यांना नंतरच्या काळात विपुल संपत्ती मिळाली. ही संपत्ती त्यांच्या मागं मागं आली; पण त्यांनी संपत्तीचा पाठपुरावा कधीही केला नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. आईनस्टाईन, अब्दुल कलाम, महात्मा गांधी यांना विश्‍वभर सन्मान मिळाला; पण त्यांनी सन्मान प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी त्यांचं तन व मन विज्ञान, कला, लेखन, समाजकारण अथवा ज्या कोणत्या क्षेत्रात त्यांना नावीन्यपूर्ण असं काही करण्याची किंवा परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी स्वतःला संपूर्णतः वाहून घेतलं होतं.

आयुष्यात आर्थिक चौकट तयार करणं जसं महत्त्वाचं असतं; तसंच आर्थिक जाळ्यात अडकून न राहणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्या आदर्शवादाची आर्थिक जबाबदारी नातेवाइकांवर अथवा समाजावर टाकणं हा बेजबाबदारपणाच होय. ज्याप्रमाणे आर्थिक पाया नसेल व रोजच्या जेवणाचीही भ्रांत असेल, तर निर्मिती होणं अशक्‍य आहे; त्याप्रमाणेच स्वतःभोवती गरजांचं जाळं विणून केवळ संपत्तीच्या मागं लागलं, तरीसुद्धा सर्जनशील व नावीन्यपूर्ण असं काही निर्माण करणंही अशक्‍य असतं.
विश्‍वात, भारतात, महाराष्ट्रात सर्जनशील शक्ती, कल्पकता, सकारात्मक विचार, नावीन्य यांचा साठा खूप मोठा आहे. त्याचा योग्य वापर झाला, तर कोणत्याही देशाचं अथवा प्रदेशाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. वास्तवात, स्थैर्य व हव्यास यांचं गणित बऱ्याच जणांना सोडवता येत नाही व संभाव्य परिवर्तन प्रत्यक्षात आणता येत नाही.

मी समोर बसलेल्या युवा मित्र-मैत्रिणींना सांगितलं ः ‘‘देशाची नवनिर्मिती केवळ एक सुंदर इच्छा मनात आणून करता येत नाही, त्यासाठी आयुष्यातल्या मूल्यांचं गणित सोडवणं आवश्‍यक आहे. हे गणित समजलं नाही, तर बहुधा आयुष्याच्या अंतिम टप्प्यात खंत वाटेल; पण ते गणित व्यवस्थित सोडवलं, तर तुम्ही आईनस्टाईन, अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ बनू शकाल अथवा स्टीव्ह जॉब्ज्‌सारखे कल्पक उद्योजक बनाल. कोणत्याही क्षेत्रात ताऱ्याप्रमाणे चमकाल.’’
मी त्या युवक-युवतींना शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com