किनारपट्टीस काटकोन केल्यानं... (संदीप वासलेकर)

किनारपट्टीस काटकोन केल्यानं... (संदीप वासलेकर)

किनाऱ्यास समांतर विचार करणं सोपं असतं. काटकोन करून मार्गक्रमण केलं तर अनपेक्षित धोके समोर येतात; परंतु तसं केलं तरच नवीन मार्गही सापडतात. शालेय शिक्षणापासून ते महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबतची राज्यकर्त्यांची निर्णयप्रक्रिया अशा सगळ्याच स्तरांवर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. कोलंबसला अमेरिका सापडली... आपल्याला नवीन भारत शोधायचा आहे व घडवायचाही आहे!

पंधराव्या शतकात युरोपातले खलाशी भारताचा शोध घेण्यासाठी युरोपातल्या पश्‍चिम किनारपट्टीवरच्या बंदरातून निघत असत. आपला मार्ग चुकू नये म्हणून ते नेहमी समुद्रकिनाऱ्याला समांतर अशा मार्गानं प्रवास करत व आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या दिशेनं येत.

एका खलाशानं किनारपट्टीला समांतर जाण्याऐवजी काटकोन करून प्रयाण केलं. त्याला अमेरिकेचा शोध लागला. त्या खलाशाचं नाव होतं ख्रिस्तोफर कोलंबस. अमेरिकेचा शोध कोलंबसानं लावला, हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं; परंतु किनारपट्टीला काटकोन केल्यानंच कोलंबस हे करू शकला, हे मात्र शिकवलं जात नाही. ‘कुणी कोणता शोध लावला, अशी केवळ माहिती देणं म्हणजे शिक्षण’ ही कल्पना सोडून जर ‘काटकोनी विचार’ कसा करावा, हे लहानपणापासून आपण विद्यार्थ्यांना शिकवलं, तर त्याचा निश्‍चितच सुपरिणाम होईल.

‘भारतीय युवक कल्पक आहेत,’ असं मी एका लेखात म्हटलं होतं. त्यावर काही वाचकांनी प्रश्न विचारला ः ‘जर भारतीय युवकांमध्ये कल्पकता आहे तर विज्ञान, रोजगारनिर्मिती, दारिद्य्रनिर्मूलन अशा अनेक आघाड्यांवर देश मागं का?’ हा प्रश्न योग्यच होता. या प्रश्नाचं उत्तर आपल्या शिक्षणपद्धतीत सापडेल. आपण घोकंपट्टीच्या कलेलाच शिक्षण समजतो. मूलभूत विचार कसा करायचा, प्रस्थापित विचारांना आव्हान कसं द्यायचं व किनारपट्टीस वैचारिक काटकोन करून मानसिक व बौद्धिक प्रवास कसा करायचा, हे आपण शाळेत अथवा कॉलेजमध्ये शिकवत नही. परिणामी, आपले युवक भारतात चमकत नाहीत; परंतु अमेरिकेत अथवा युरोपमध्ये गेल्यावर मात्र तिथं प्रभाव टाकतात.

आज भारताला जगात महत्त्वाचं स्थान आहे ते अणुऊर्जा व अवकाशशास्त्र यांत आपण केलेल्या प्रगतीमुळं. या दोन्ही क्षेत्रांत राज्यकर्त्यांनी ‘काटकोनी’ विचार केल्यामुळंच आपल्याला आघाडी घेणं शक्‍य झालं.

सन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली आर्थिक स्थिती तशी बिकटच होती. अशा परिस्थितीत मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणं आवश्‍यक होतं आणि त्यामुळं आधुनिक विज्ञानाकडं दुर्लक्ष होणंही साहजिकच होतं; परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व काही शास्त्रज्ञ यांच्या दूरदृष्टीमुळं १९५४ मध्ये सरकारनं अणुऊर्जानिर्मितीसाठीचा खास विभाग स्थापन केला. स्वातंत्र्यानंतर एक दशक पूर्ण होण्याआधीच भारतानं हिंमत करून हे पाऊल उचललं. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अवकाश-संशोधनासाठी १९६९ मध्ये ‘इस्रो’ची स्थापना केली. वास्तविक, १९६६ ते ६९ काळात भारतात प्रचंड दुष्काळ पडला होता. आर्थिक प्रगतीचा वेग खुंटलेला होता. तरीही एक वेगळा विचार करून अवकाश-संशोधनमोहिमेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती.

आपण अणुऊर्जा व अवकाशशास्त्र या विषयांत काटकोनी मार्गानं जो विचार केला, तसा विचार समाजाच्या व देशाच्या इतर अंगांबद्दल केला असता, तर आज आपण एक वेगळी परिस्थिती अनुभवली असती; पण आता उशिरा का होईना, काटकोनी विचार करण्याची सुरवात आपण यापुढं तरी केली पाहिजे.

जर विचार केला तर सर्व काही साध्य होऊ शकतं, याचं एक छोटंसं उदाहरण अलीकडंच माझ्या दृष्टीस पडलं. उच्च शिक्षणात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ अथवा ‘आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यास’ हा एक महत्त्वाचा विषय असतो. त्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोकरी मिळेल याची हमी नाही; पण त्यामुळं आपली विचारशक्ती प्रगल्भ होते, जगाचा कारभार कसा चालतो याचं ज्ञान मिळतं व कोणत्याही क्षेत्रात एक नवीन दृष्टिकोन बाळगून काम करण्याची क्षमता प्राप्त होते.

गेली ६०-७० वर्षं हा विषय फक्त दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त शिकवला जात असे. नंतर बडोद्याचं ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठ’ व कोलकता इथलं ‘जादवपूर विद्यापीठ’ इथं हा विषय शिकवायला सुरवात झाली; परंतु त्या सगळ्या ठिकाणी हा विषय केवळ भारतीय परराष्ट्रनीतीच्या काही अंगांचा मर्यादित विचार करूनच शिकवला जातो. परिणामी, या विद्यापीठांतून पदवी मिळवणाऱ्या युवकांना काश्‍मीर व पाकसंबंधांपलीकडं फारसा विचार करता येत नाही.

अलीकडं पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठानं हा अभ्यासक्रम सुरू केला व पारंपरिक ‘दिल्ली-विचारसरणी’ला काटकोन करून एक नवीन जागतिक दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची आखणी केली. परिणामी, हा अभ्यासक्रम भारतातला सर्वोत्कृष्ट तर झाला आहेच; शिवाय इंग्लंडमधलं ‘ऑक्‍सफर्ड’, ‘केम्ब्रिज’ व ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स’ सोडलं, तर इतर सगळ्या विद्यापीठांमधल्या अभ्यासक्रमांपेक्षा चांगल्या दर्जाचा आहे. जर विद्यापीठानं हा दर्जा असाच ठेवला व वाढवत नेला, तर येत्या काही वर्षांत भारतातलं जगातलं स्थान ठरवण्यासाठी दिल्लीपेक्षा पुण्यातून प्रामुख्यानं वैचारिक मार्गदर्शन होईल.

एकदा भारताचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे पुण्यात एका भोजनाला गेले होते. तिथं मीही उपस्थित होतो. तिथं अनेक विद्यार्थ्यांचे पालक येऊन त्यांना भेटले व आपल्या मुलांना अमेरिकेत कसं पाठवता येईल, याबद्दल सल्ला विचारू लागले. - मुळे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं ः ‘जागतिक विद्यार्थी भारतात कसे येतील, याचा विचार आपण केला पाहिजे.’ असा विचार करणारे अधिकारी जर प्रशासनात मोठ्या संख्येनं तयार झाले, तरच भारताचा कायापालट होऊ शकेल.
किनाऱ्यास समांतर विचार करणं सोपं असतं. काटकोन करून मार्गक्रमण केलं तर अनपेक्षित धोके समोर येतात; परंतु तसं केलं तरच नवीन मार्गही सापडतात. शालेय शिक्षणापासून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबतची राज्यकर्त्यांची निर्णयप्रक्रिया अशा सगळ्याच स्तरांवर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. कोलंबसाला अमेरिका सापडली...आपल्याला नवीन भारत शोधायचा आहे व घडवायचाही आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com