तिचा आगळा ‘हनिमून!’

kangana ranaut
kangana ranaut

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक 
दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबातल्या राणी मेहरा या मुलीची अन्‌ तिच्या आगळ्या हनिमूनची ही गोष्ट. वडील मिठाईचे व्यापारी आणि धंद्यासोबत घरातही सुबत्ता.

घरातलं वातावरण पारंपरिक. साहजिकच राणीचं लग्न ठरतं तेव्हा उत्साहाला उधाण येतं. नियोजित वर विजय दिल्लीतल्या उच्चभ्रू पंजाबी कुटुंबातला. खरं तर काही काळापूर्वी त्यानंच तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं. तिलाही तो आवडलेला.

लग्न तोंडावर येतं तेव्हा मंडप, रोषणाई, नातलगांची वर्दळ, मेहंदी, संगीत असा माहोल तयार होतो. लग्नानंतर फ्रान्सला हनिमूनसाठी जायचा त्या दोघांचा बेत असतो आणि त्याची तिकिटंही तिनं काढून ठेवलेली. एवढी जय्यत तयारी असताना विवाहाच्या आदल्याच दिवशी तो तिला बाहेर भेटायला बोलावतो अन्‌ सांगतो, ‘हे लग्न होऊ शकणार नाही.’ राणी हे ऐकून सुन्न होते. मधल्या काळात तो परदेशात जाऊन आल्यानं त्याची जीवनशैली आणि विचार बदललेले असतात. ‘आपला दोघांचा संसार सुखाचा होणार नाही, त्यापेक्षा आपण एकमेकांचे चांगले मित्र होऊन राहू या...’ हे त्याचे शब्द आणि ती कोलमडून, उन्मळून पडलेली. ‘माझं काही चुकलं का? तू नर्व्हस तर झाला नाहीयेस ना?’ ती विचारते. ‘हे लग्न मोडलं तर माझ्या बाबांना तो धक्का सहन होणार नाही...’ ती अजीजीनं सांगते, पण त्याचा ठाम निर्णय झालेला असतो. रडवेल्या अवस्थेतच ती घरी येते. स्वत:ला खोलीमध्ये कोंडून घेते. या अनपेक्षित संकटानं कुटुंबावर जणू शोककळा पसरते. राणीनं जिवाचं बरं-वाईट करून घेऊ नये, एवढीच तिच्या माता-पित्याची अपेक्षा असते. पण राणी सावरते. हनिमूनचं तिकीट वाया जाणार हे ठरलेलं असतानाच ती एक धाडसी निर्णय घेते. एकटीनं फ्रान्सला जाण्याचा!

आई-वडील चकित होतात, पण तिचा निर्धार बघून संमती देतात. काही दिवस फिरून आल्यास तिला विरंगुळा मिळेल, या विचारानं ते तिला निरोप देतात. राणी परदेश प्रवासाला निघते. एका संपूर्ण वेगळ्या अनुभवाला सामोरी जाण्यास सज्ज होते. पहिला मुक्काम असतो पॅरिसमधला. त्या अवाढव्य, नवख्या शहरात एकट्यानं वावरताना ती अक्षरश: बावचळून जाते, पण हळूहळू ती रुळते. ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विजयालक्ष्मी नामक महिलेशी तिची ओळख होते. एका इंडो-स्पॅनिश दांपत्याची ही मुलगी. अतिशय बेबंद, मुक्त नि स्वैर विचारसरणी असलेल्या, ‘लीव्ह इन रिलेशनशिप’मधून एका मुलाला जन्म देणाऱ्या विजयाची ती भन्नाट जीवनशैली पाहून बुजऱ्या स्वभावाची राणी हादरून जाते. पण विजयामुळंच ती एक-दोनदा संकटातून वाचल्यामुळं त्या दोघींची मैत्री जमते. विजयाच्या मुक्त जीवनशैलीशी जुळवून घेत राणी मद्यपानही करते नि त्याच धुंदीत रात्री रस्त्यावर नाचगाणं करीत आपल्या अस्वस्थतेला वाट करून देते. (साखरपुड्याप्रसंगी इतरांसोबत राणीदेखील नाचली त्याबद्दल विजय तिला टाकून बोलला होता हे तिला आठवतं. त्याचा ‘वचपा’ ती अशा प्रकारे काढते.) 

पॅरिसनंतरचा मुक्काम असतो ॲमस्टरडॅमचा. इथं तर वेगळंच संकट वाढून ठेवलेलं. विजयानं एका होस्टेलवर तिच्यासाठी आरक्षित केलेल्या जागेत आधीपासूनच तीन मुलं राहत असतात. पुरुषांसोबत राहायला नकार देत राणी ती खोली बदलून मागते.

पण ती न मिळाल्यानं नाइलाजापोटी तिला त्याच खोलीत राहावं लागतं. तीन वेगवेगळ्या देशांतून आलेल्या तीन तरुणांसोबत ती सावधपणे राहू लागते, पण अल्पावधीतच त्यांच्याशी तिची मैत्री होते. जिवाभावाचं सख्य जमतं. ॲमस्टरडॅम शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देताना चित्रविचित्र अनुभवांना तिला सामोरं जावं लागतं. पण यातूनच तिच्या अंगी धीटपणा येतो. एक हॉटेलच्या सहयोगानं भारतीय खाद्यपदार्थांचा स्टॉलही ती उघडते. दरम्यानच्या काळात विजयनं एक-दोनदा तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केलेला असतो. पण तिनं त्याला झटकून टाकलेलं असतं. अखेर तो तिचा माग काढत थेट ॲमस्टरडॅमला पोचतो. ‘झालं गेलं विसरून जा, मला क्षमा कर, आपण पुन्हा एकत्र येऊ’, अशी गळ तो तिला घालतो. पण राणी त्याला प्रतिसाद देत नाही. त्याच्या स्वभावात किंचितही बदल झाला नसल्याचं तिला कळून चुकतं. ‘दिल्लीत परतल्यावर भेटेन,’ एवढं सांगून ती त्याचा निरोप घेते. दिल्लीत आल्यानंतर राणी थेट विजयच्या घरी जाते. तिला पाहून तो हर्षभरित झालेला असतानाच साखरपुड्याला मिळालेली अंगठी त्याच्या हातात ठेवत ‘थॅंक्‍यू’ या एका शब्दानं ती त्याचा निरोप घेते. नको असलेल्या एका ओझ्यातून सुटका झाल्याचा असीम आनंद चेहऱ्यावर मिरवत राणी विजयच्या घरातून बाहेर पडते... 

‘क्वीन’ या २०१३मध्ये प्रदर्शित चित्रपटातली ही आगळी-वेगळी राणी कंगना राणावतनं कमालीच्या सहजतेनं - नव्हे, भन्नाटपणे साकारली होती. आपल्याकडच्या चित्रपटात अशीदेखील नायिका असू शकते, असा विलक्षण अनुभव दिग्दर्शक विकास बहलच्या या चित्रपटानं दिला. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक संपताना अवतरलेल्या नवीन दिग्दर्शकांनी एका वेगळ्या जातकुळीचा सिनेमा (आणि नायिका) पडद्यावर आणला, त्याचं ‘क्वीन’हे प्रातिनिधिक रूप. स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद असे शब्द न वापरता, यातल्या नायिकेला ज्या ठाशीवपणे समोर आणलं गेलं, ते खरंच कौतुकास्पद! अस्सल दिल्लीवासी असलेल्या राणीची देहबोली, परदेशात तिची उडणारी तारांबळ, त्यातूनच येणारं धाडस आणि सरतेशेवटी ‘त्या’ला नकार देण्याएवढं अंगी आलेलं धैर्य कंगनानं ज्या सहजतेनं व्यक्त केलं त्याला खरंच तोड नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com