चमेलीजानचं शल्य!

vahida rehman
vahida rehman

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक
चमेलीजान! तिचं नाव हीच तिची खरी ओळख. दूरदूरवर जिची कीर्ती पसरलीय अशी एक तवायफ. अशा स्त्रीची वेगळी ओळख जगाला नसते. तिची आई कोण हे फार तर ठाऊक असतं. पण पिता कोण हे ठाऊक नसतं. ते जाणून घ्यायची गरजही कुणाला नसते. अशा स्त्रीच्या नशिबात लग्न, नवरा, मुलं-बाळं या गोष्टी कुठून असायला? चमेलीच्या वाट्याला या गोष्टी काही काळापुरत्या येतात खऱ्या; पण त्या स्वप्नवत ठरतात...

देशाला स्वातंत्र्य मिळून काळ लोटला असला तरी चोर, दरोडेखोरांचा उपद्रव अद्याप कायम असतो. चंबळ खोऱ्यातला कुख्यात डाकू ठाकूर जरनैल सिंह याची दहशत अजूनही संपलेली नसते. दरोडे घालून धनिकांना लुटणं, जे आडवे येतील त्यांना गोळ्या घालून संपवणं हाच त्याचा धंदा. त्यातही आधी निरोप धाडून दरोडा घालायला जाणं हा तर त्याचा उसूल! यातून कुणी पोलिसांना खबर दिलीच तर त्याचा खात्मा ठरलेला. तर असा हा ठाकूर जरनैल सिंह एका धनाढ्य माणसाच्या मुलीच्या लग्नात दरोडा घालायला गेला असता तिथं ‘मुजरा’ सादर करायला आलेल्या चमेलीजानचं दिव्य सौंदर्य पाहून तिच्यावर कमालीचा भाळतो. तिला बंदुकीच्या धाकानं चक्क पळवून नेतो. आपल्या अड्ड्यावर तिनं नाच-गाणं करावं ही त्याची इच्छा.

पण करारी स्वभावाची चमेली त्याची ही मागणी धुडकावून लावते. तो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. पण ती बाणेदारपणे त्याला सुनावते, ‘होय, मी आहे तवायफ. स्वत:ची इज्जत पायदळी तुडवून धनिकांना खुश ठेवणं हा माझा पेशा. त्यांना आनंद देणं हा माझा धर्म. पण तू? आपल्या आनंदाखातर इतरांची इज्जत धुळीला मिळवणं हाच तुझा धर्म. संपत्तीसाठी अनेकांचे संसार तू उद्‌ध्वस्त केलेस, अनेक स्त्रियांचं कुंकू पुसलंस, किती तरी बालकांना अनाथ बनवलंस. तुझ्यासारख्या सैतानासमोर मी कदापि नाचणार नाही.’ तिचा हा रुद्रावतार पाहून ठाकूर तिचं अन्नपाणी बंद करतो. पण तिचा निर्धार ढळत नाही. अखेर तो कुठं तरी मनातून हलतो. ‘माझ्याशी लग्न करशील?’ त्याचा प्रश्‍न ऐकून ती थक्क होते. तिच्यावर आशक झालेला ठाकूर तिच्याशी थेट लग्न करायला तयार होतो. तीही विरघळते. आपल्याशी कुणी लग्न करायला तयार होतोय, या भावनेनंच ती सुखावते. इतर दरोडेखोरांच्या साक्षीनं ठाकूर आणि चमेलीचं लग्न लागतं. ठाकूरच्या गैरहजेरीत त्याचा उजवा हात समजला जाणारा उलट्या काळजाचा कृपाल चमेलीवर बळजबरी करू पाहतो. पण ऐनवेळी तिथं आलेला ठाकूर तिला वाचवतो. कृपालवर बंदूक चालवायला निघालेल्या ठाकूरला ती रोखते. कुणाचीही हत्या करणार नाही, असं तिला वचन देऊन बसलेला ठाकूर नाइलाजानं कृपालला सोडून देतो.

कृपाल पळून जाऊन वेगळी टोळी बनवतो. ठाकूर-चमेलीचा संसार आनंदात सुरू असला तरी पोलिसांचा ससेमिरा सुरूच असतो. त्याच्याबरोबर तिलाही रानोमाळ भटकावं लागतं. लग्नानंतर एका मुलाचा पिता झालेला ठाकूर कालांतरानं मवाळ होतो. निरपराधांच्या हत्येबाबत पश्‍चात्ताप झाल्यानं तो पोलिसांपुढं शरणागती पत्करण्याच्या निर्णयाला येतो. त्याचं हृदयपरिवर्तन झाल्याचं पाहून चमेली हर्षभरित होते. ठाकूर पोलिसांना शरण जाणार हे कळताच कृपाल ऐनवेळी तिथं जाऊन ठाकूरवर गोळीबार करतो. त्या चकमकीत कृपाल आणि ठाकूर या दोघांचाही अंत होतो. चमेली आणि तिचा मुलगा निराधार होतात...

सुनील दत्त निर्मित ‘मुझे जीने दो’ (१९६३) या गाजलेल्या चित्रपटात चमेलीजान साकारली होती वहिदा रहमान हिनं. गुरुदत्तच्या चित्रपटांखेरीज अन्यत्र ज्या उल्लेखनीय भूमिका वहिदाच्या वाट्याला आल्या त्यातली ही एक. (गुरुदत्तच्या ‘प्यासा’मधली तिची व्यक्तिरेखाही एका वेश्‍येचीच होती. पण त्या भूमिकेची आठवण होणार नाही एवढा वेगळा रंग वहिदानं चमेलीजानच्या व्यक्तिरेखेला दिला. अर्थात याचं श्रेय जेवढं वहिदाला, तेवढंच एकेकाळी बिमल रॉय यांचे सहायक म्हणून काम केलेले दिग्दर्शक मोनी भट्टाचार्य आणि लेखक आगा जानी कश्‍मिरी यांनासुद्धा! साध्या नेत्रकटाक्षानं समोरच्या पुरुषाला घायाळ करणारी गणिका, पळवून आणणाऱ्या दरोडेखोराची निर्भत्सना करत, मुजरा करायला नकार देणारी स्वाभिमानी तवायफ, डाकू असूनही ठाकूर मनानं दिलदार आहे याची जाणीव झाल्यानंतर विरघळणारी कोमल हृदयाची प्रेयसी, त्याचं बरं-वाईट होण्याच्या शक्‍यतेनं भयशंकित होणारी असहाय माता असे या भूमिकेचे विविध पदर वहिदानं प्रभावीपणे उलगडले होते.

आपला मुलगा भविष्यात एका दरोडेखोराचा अन्‌ वेश्‍येचा मुलगा म्हणूनच ओळखला जाईल, या जाणिवेनं व्याकूळ होत चमेलीनं गायलेली ‘तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूँ...’ ही लोरी (कवी : साहिर) तर काळजाला हात घालणारी होती. ‘‘माझ्या बाळा, तुझ्या कपाळी सभ्यतेचा, सुसंस्कृतपणाचा कोणताही शिक्का नाही. प्रेमभरानं घेतलेले काही मुके तेवढे आहेत, पण त्यांचं मोल ते काय असणार? आणि माझ्यासारख्या अभागी मातेच्या ममतेची तरी काय किंमत असणार? पुढल्या काळात आपल्याला कोणाकोणाच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल हे तुला आता काय ठाऊक असणार माझ्या अजाण मुला!’’ चमेलीजानचं हेच शल्य सर्वाधिक बोचत राहतं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com