अनासक्त योगिनी

sunil-deshpande
sunil-deshpande

चौकटीतली ‘ती’  - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक 
घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे...
सूने मंदिर दीया जला के आसन से मत डोल रे, तोहे पिया मिलेंगे... 

छोट्याशा गावातल्या त्या मंदिरात कुणी एक योगिनी एकतारी हाती धरून तन्मयतेनं गाते आहे. तिचं नाव कुणाला ठाऊक नाही, पण अंगावरली योगिनीची वस्त्रं आणि भक्तिभावनेनं ओथंबलेलं तिचं रूप पाहून लोक तिला मीरादेवीचा अवतार मानताहेत. कधी या गावात तर कधी त्या, अशी ती हितोपदेश करत फिरते आहे. तिच्या भजनाचे आर्त सूर नदीकाठी उभ्या असलेल्या एका तरुणाचं लक्ष वेधून घेतात. विजय त्याचं नाव. वृत्तीनं नास्तिक! पण या भजनानं मात्र त्याची पावलं मंदिराकडं वळतात. पायरी चढताना त्याची पावलं अडखळतात खरी, पण धाडस करून तो आत शिरतो.

आडोशाला उभा राहून भजन ऐकू लागतो. त्या आर्त भजनानं तो अंतर्मुख होतो. त्याला जणू भुरळ पडलेली असते. कशाची? त्या आर्त भजनाची की ते भजन गाणारीची? त्याला कळत नाही. दुपारी पुन्हा तो मंदिरात जातो. पुन्हा तिचं भजन ऐकतो. प्रवचन संपल्यावर लोक निघून जातात. त्याची पावलं तिथंच घोटाळत असतात. तिच्यापाशी जाऊन तो बोलायचा प्रयत्न करतो.

अखेर तीच बोलते, नवीन आलेले दिसताय. दुपारच्या हरिपाठात पुरुषांना मज्जाव आहे, माहीत नाही वाटतं? कथा ऐकायला आलात? तो उत्तर देतो, ‘नाही, तुमच्याशी बोलायला.’ ‘पुरुषांशी मी बोलत नाही. पण बोला, काय विचारायचंय तुम्हाला?’ ती तुटकपणे विचारते. तो धीटपणे विचारतो, ‘एवढ्या लहान वयात वैराग्य धारण करण्यामागचं कारण? कारण हे जग नश्‍वर आहे,’ तिचं पुन्हा तुटक उत्तर. ‘माफ करा, पण साधुसंतांच्या सांगण्यावरून तुम्ही वैराग्य पत्करलं असेल यावर माझा विश्‍वास बसत नाही.

तुम्ही म्हणाल, कशावरून, तर मी म्हणेन, तुमच्या डोळ्यांतली वेदनाच हे सांगते आहे...’ त्याचे उद्‍गार ऐकून ती क्षणभर डोळे मिटून घेते. आज चूक केलीत, पण पुन्हा ही चूक करू नका. एवढं त्याला सुनावत ती मंदिराच्या गाभाऱ्यात जाते. दार आतून लावून घेते. 

तिच्या पहिल्या भेटीनं विजय अस्वस्थ होतो. रात्र तळमळत काढतो. मधूनच त्याचं अंतर्मन त्याला बजावतं, तू नास्तिक आहेस हे मान्य, पण जिचं भजन ऐकून लोक भक्तिभावनेत लीन होतात तिच्याकडं तू त्या नजरेनं पाहतोस.

एवढा तू पापी कसा? पण ते तेवढ्यापुरतंच. तो पुन्हा-पुन्हा मंदिरात जात राहतो. तिला पाहत राहतो. बोलायचा प्रयत्न करतो. केवळ तोच नव्हे, त्याच्या बोलण्यानं तीसुद्धा अस्वस्थ होते. या मोहमायेला झटकून टाकायचा निर्धार ती करते. त्याला वारंवार तिथून निघून जायला सांगते. इथं आला नाहीत तर उपकार होतील, अशी विनवणीदेखील करून पाहते. बरं, त्याच्याही वागण्यात छचोरपणा अजिबात नसतो. तिचं भजन ऐकण्यास, तिच्याशी चर्चा करण्यास तो आसुसलेला असतो. दररोज मंदिरात जाऊन तिच्या दारापाशी एक फूल ठेवून तो येत असतो. त्याचं सारखं तिथं येणं तिच्या साधनेत बाधा ठरू पाहतं. त्याच्याशी चर्चा करण्यात तिला मुळीच स्वारस्य नसतं. दर वेळी तिची तीच आर्जवं आणि दरवेळी त्याचा तोच निर्धार!

मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी तिला निदान नामस्मरणाचा तरी आधार असतो. त्याला तर तोही मार्ग नसतो. याच भेटींमधून एकदा तो तिचा पूर्वेतिहास जाणून घेतो. मुळात ती असते एका जमीनदाराची मुलगी. सुरभी तिचं नाव. लहानपण खेळण्या-बागडण्यात, निसर्गाच्या सान्निध्यात गेलेलं.

कविता आणि गाणं यांचं तिला अपार वेड. दुर्दैवानं वडिलांची जहागिरी कर्जात बुडते न् थोरला भाऊ व्यसनाधीन होतो. यातून सुटण्याचा मार्ग म्हणून तिचा भाऊ एका धनाढ्य वृद्धाशी तिचं लग्न ठरवतो. सुरभी त्याला विरोध करते. पण, आपलं काहीएक चालत नाही, हे दिसताच ती घरातून पळून जाते. एका साध्वीच्या आश्रमात जाऊन संन्यास घेते. गावोगावी प्रवचनं देणं, भजन गाणं यात स्वत:ला बुडवून घेते. 

तिची कहाणी ऐकून विजय आणखी अस्वस्थ होतो. मीरादेवीची अवस्था तर आणखी कठीण होते. ती आजारी पडते. अखेर या पाशातून मुक्त होण्यासाठी ती गाव सोडून साध्वीच्या आश्रमात परत जाते. मोहमायेत गुंतल्याबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून ती आमरण उपवास धरते. शेवटी त्यातच प्राणत्याग करते. जग सोडण्यापूर्वी आपल्याकडची धार्मिक ग्रंथाची प्रत विजयच्या हाती पडेल अशी व्यवस्था करते. तिच्या निर्वाणाचं वृत्त कळताच विजय तिच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो. 

आस्तिक-नास्तिक, आसक्ती-अनासक्ती यांसारख्या गहन विषयाच्या पार्श्‍वभूमीवरची प्रेमकहाणी सांगणाऱ्या जोगन (१९५०) या चित्रपटातली ही आगळी नायिका साकारली होती नर्गिसनं. मदर इंडियामधल्या राधापुढं नर्गिसच्या ज्या अनेक भूमिका झाकोळल्या गेल्या त्यातलीच ही जोगन. केदार शर्मा या प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शकाची अजोड कामगिरी म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. चित्रपट बहुतांशानं तात्त्विक चर्चेकडे झुकणारा असला तरी, तो रुक्ष वाटला नाही, याचं श्रेय दिग्दर्शकाप्रमाणेच नर्गिस आणि दिलीप कुमार यांच्या संयत अभिनयाला आणि गीता दत्तच्या आवाजातल्या एकाहून एक उत्कट अशा गाण्यांना द्यावं लागतं. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत कथा या शब्दासमोर केवळ प्रश्‍नचिन्ह टाकलं होतं. काही जणांच्या मते निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनीच हे कथाबीज दिलं होतं. केदार शर्मा यांच्या पटकथा-संवादांनी ही तरल प्रेमकहाणी व तिची आगळी नायिका स्मरणात राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com