'मी प्राण्यांमधली "माणुसकी' दाखवतो'! (सुनील माळी)

सुनील माळी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

एस. नल्लामुथ्थू हे वन्यजीव-चित्रपटक्षेत्रातलं नाणावलेलं नाव.
आशियात आणि त्यातही विशेषतः भारतातल्या अनेक जंगलांच्या कानाकोपऱ्यात त्यांचा कॅमेरा गेली अनेक वर्षं फिरतोय अन्‌ जंगलातल्या प्राण्यांच्या नैसर्गिक प्रेरणा टिपतोय... त्यांच्या हालचालींतून डोकावणाऱ्या हृदयस्पर्शी भाव-भावना टिपतोय.
या क्षेत्रातला त्यांचा प्रवास उलगडणारी ही बातचीत...

एस. नल्लामुथ्थू हे वन्यजीव-चित्रपटक्षेत्रातलं नाणावलेलं नाव.
आशियात आणि त्यातही विशेषतः भारतातल्या अनेक जंगलांच्या कानाकोपऱ्यात त्यांचा कॅमेरा गेली अनेक वर्षं फिरतोय अन्‌ जंगलातल्या प्राण्यांच्या नैसर्गिक प्रेरणा टिपतोय... त्यांच्या हालचालींतून डोकावणाऱ्या हृदयस्पर्शी भाव-भावना टिपतोय.
या क्षेत्रातला त्यांचा प्रवास उलगडणारी ही बातचीत...

"शिकाऱ्यांकडून वाघांची हत्या होण्याचं प्रमाण आता घटलंय; पण वाघांपुढच्या संकटाचं मुख्य कारण आहे ते म्हणजे माणूस-वन्यजीव संघर्ष. जंगल वाचवण्यासाठी मूळ आदिवासींना जंगलाबाहेर काढून चालणार नाही. वनसंपदेबरोबर त्यांचं सहजीवन असायलाच हवं. हजारो वर्षं ही मंडळी वन्यजीवांबरोबर राहत आहेत. त्यांना गरज आहे ती फक्त योग्य दिशा देण्याची...'' एस. नल्लामुथ्थू त्यांचं चिंतन-मंथन नोंदवतात.
एस. नल्लामुथ्थू हे वन्यजीव-चित्रपटक्षेत्रातलं नाणावलेलं नाव. आशियात आणि त्यातही विशेषतः भारतातल्या अनेक जंगलांच्या कानाकोपऱ्यात त्यांचा कॅमेरा गेली अनेक वर्षं फिरतोय अन्‌ जंगलातल्या प्राण्यांच्या केवळ नैसर्गिक प्रेरणाच नव्हे, तर त्यांच्या हालचालींतून डोकावणाऱ्या हृदयस्पर्शी भाव-भावना टिपतोय. त्यामुळंच वनसंपदेबरोबरच्या आदिवासींच्या सहजीवनाची त्यांनी जी गरज व्यक्त केली आहे, तिच्याविषयी गंभीरपणे विचार होण्याची आवश्‍यकता आहे.

नल्लामुथ्थूंशी बोलताना जाणवत राहतात त्यांची प्रांजळ, ठाम मतं. एका बाजूनं व्यवसायाचं भान बाळगत दुसऱ्या बाजूनं निर्भीडपणे व्यक्त होत जाणारा हा कलावंत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून तयार झालेली त्यांची मतं वनसंवर्धनासाछी मोलाची ठरतात, तसंच त्यांतून त्यांचा जीवनप्रवासही समोर येत जातो.

रणथंभोरमधल्या मछली वाघिणीनं आपल्या बछड्यांना मोठं करण्यासाठी केलेला सलग नऊ वर्षांचा जीवनसंघर्ष त्यांनी कॅमेराबद्ध केला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी तिची अखेरची घरघरही दाखवली.

पश्‍चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेचं दर्शन त्यांच्या कॅमेऱ्यामुळं सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकलं. अशा कामगिरीमुळं त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले अन्‌ "आशियातली जंगलसृष्टी सर्वसामान्यांपर्यंत नेणारा विख्यात चित्रपटदिग्दर्शक' म्हणून ते ख्यातकीर्त झाले. वन्यजीवांचं प्रत्ययकारी चित्रण नल्लामुथ्थू करत असले तरी त्यांची सुरवात मात्र या क्षेत्रापासून झाली नाही. ते मूळ चेन्नईचे. चित्रपटनिर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी चेन्नईपासून जवळच असलेल्या श्रीहरिकोटा इथं सरकारच्या अग्निबाण प्रक्षेपकाच्या म्हणजेच रॉकेटच्या चित्रणाचं काम असलेली नोकरी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काम केलं ते माहिती आणि प्रसारण विभागात. अर्थात या सरकारी नोकरीचा त्यांना थोड्याच दिवसांतच कंटाळा आला. त्यांची निसर्गाची मूळ आवड त्यांना गप्प बसू देईना. मग त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं. निसर्गाचं दर्शन घडवण्याबरोबरच त्याच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकणारी "लिव्हिंग ऑन द एज' ही 52 भागांची दूरदर्शन-मालिका त्यांनी सन 1992 मध्ये निर्माण केली. प्रदूषित औद्योगिक केंद्रांचं, पर्यावरणरक्षणाचं, वृक्षारोपणाच्या महत्त्वाचं प्रभावी चित्रण त्यांनी या मालिकेतून दाखवलं.

" "वाईल्ड लाईफ'साठी काहीतरी करायचं मनात होतं. त्या आवडीतून या मालिकेचा जन्म झाला,'' नल्लामुथ्थू सांगतात. या मालिकेला पांडा पुरस्कार मिळालेला आहे.
" या क्षेत्रातल्या पाश्‍चात्य चित्रपटकारांकडून, त्यांच्या दृष्टिकोनातून मला खूप काही शिकायला मिळालं,'' असं स्पष्ट करून नल्लामुथ्थू म्हणतात ः "" "प्रदूषण करू नका' असं केवळ म्हणून चालत नाही, ते ठसवण्यासाठी उच्च दर्जाचं चित्रीकरण हवं असतं, तसंच गोष्टीच्या स्वरूपात तुमचं म्हणणं तुम्हाला सांगावं लागतं. या बाबी मी शिकलो ते बीबीसीमध्ये कॅमेरामन म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवातून. गोष्टीतून मुद्दे सांगत गेल्यास ते लोकांना लवकर कळतात आणि पटतात, ही शिकवण मला त्यातून मिळाली.''

त्या बहुमोल अनुभवानंतर नल्लामुथ्थू यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. अर्थात कंपनी सुरू केली म्हणजे सर्व काही आलबेल झालं असं नव्हतं. ते सांगतात ः ""एका चित्रपटासाठी दोनदोनशे दिवस चित्रीकरण करावं लागतं. त्यासाठी किमान एक कोटी रुपये लागतात म्हणून गुंतवणूकदारही शोधावे लागतात. दर दोन वर्षांनी चित्रीकरणाचं तंत्र बदलतं, त्यामुळं कॅमेरे बदलावे लागतात. चित्रपट करून मिळालेले पैसे त्यासाठी मोजावे लागतात. एकूणच जोखीम मोठी असते.''
अशा सगळ्या धडपडीतून त्यांनी चित्रपटनिर्मितीला सुरवात केली.
नल्लामुथ्थू यांनी प्रामुख्यानं आशियातल्या जंगलांमध्ये काम केलं आहे. आशियातल्या जंगलांबाबतची आपली निरीक्षणं त्यांनी नोंदवली ः""आफ्रिकेपेक्षा मोठी संधी आशियात आहे. आफ्रिकेत गवताळ प्रदेश मोठा असल्यानं चित्रीकरण सोपं होतं, तसंच त्यातून बहुतांश वेळा प्राण्यांच्या जगण्याच्या गोष्टी मिळतात. तिथं एका वर्षात दहा चित्रपट सहजी करता येतात. तिथं चित्रीकरणाला खूप मोकळीक आहे. याउलट भारतातली स्थिती आहे. आपल्याकडची भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी डोंगराळ भाग, तर काही ठिकाणी दाट जंगल. त्यामुळं इथं चित्रीकरण करणं हे आव्हानात्मक असतं. शिवाय, इथं चित्रीकरणावर निर्बंधही खूपच आहेत. चित्रनिर्मिती करणाऱ्यांना सवलती मिळायला हव्यात.''

""पाहणाऱ्यांना माझ्या चित्रपटांतून निसर्गसंवर्धनाचा संदेश मिळतो की नाही ते मला माहीत नाही; पण प्राण्यांमधल्या "माणुसकी'चं दर्शन घडवण्यावर माझा कटाक्ष असतो,'' असं सांगून नल्लामुथ्थू म्हणतात ः ""प्रेक्षकांना मछली आवडली याचं कारण ती प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली होती. माझे चित्रपट सर्वसामान्यांसाठी असतात. वाघाचं महत्त्व आधीपासूनच माहीत असणाऱ्या शिकलेल्या मंडळींसाठी किंवा पर्यावरणवाद्यांसाठी ते नसतात. वाघामधल्या "माणुसकी'चं दर्शन घडवण्याचा माझा प्रयत्न असतो! मी वाघाची शिकार दाखवली तर ती ग्रामस्थाला आवडत नाही. ग्रामस्थापुढं वाघाची चांगली प्रतिमा उभी करायची असताना तो किती ताकदवान आहे, तो समोरच्याला ठार करतो, असं दाखवणं चुकीचं ठरेल. वाघ हा मैत्री करण्यायोग्य प्राणी आहे आणि त्याला आपण इजा करता कामा नये, हे मी दाखवतो. वाघाच्या जोडीचं मीलन किती वेळा होतं, वाघिणीचा गर्भ किती काळ राहतो, या माहितीची सर्वसामान्यांना गरज नसते. "आमच्या म्हशी मारल्या जाता कामा नयेत, त्या वाचवल्या पाहिजेत,' अशी शेतकऱ्याची भावना असते. त्यादृष्टीनं पाहता, मी केलेले चित्रपट हे "निसर्गसंवर्धनाचे चित्रपट' म्हणून मानले जात नाहीत. परिणामी, माझ्या चित्रपटांना चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळत नाहीत. कारण, असे बहुतेक महोत्सव पर्यावरणवाद्यांनी पुरस्कृत केलेले असतात!''

""निसर्गसंवर्धन हे काही केवळ जंगलात जाऊन होत नसतं, ते स्वयंपाकघरातही करता येऊ शकतं! ओला आणि कोरडा कचरा वेगळा केल्यानंही ते होत असतं. निसर्गसंवर्धन म्हणजे केवळ वाघ वाचवणं नव्हे. देशात जेवढे वाघ आहेत, त्यापेक्षा अधिक संख्येनं पर्यावरणवादी संस्था आहेत. एकेका संस्थेनं एकेक वाघ दत्तक घेतला तरी सगळे वाघ वाचतील! व्यावसायिक कलाकारांची मदत घेऊन प्रेक्षकांना आवाहन केलं तर चांगला प्रतिसाद मिळतो. "पॅडमॅन'मध्ये अक्षयकुमारनं केलेलं सॅनिटरी नॅपकिनबाबतचं प्रबोधन परिणामकारक ठरलं. त्याच धर्तीवर अमिताभ बच्चन किंना आमिर खान यांनी निसर्गसंवर्धनाबाबत आवाहन केलं, तर त्याची मदत होईल,'' असं नल्लामुथ्थू सांगतात.

""केवळ वाघांवरच चित्रपट तयार करण्याकडं चित्रपटनिर्मात्यांचा कल का असतो?'' या प्रश्‍नावर नल्लामुथ्थू म्हणतात ः ""अनेक प्राण्यांवर चित्रपट झालेलेच नाहीत. चित्रपटनिर्मात्यांचं वाघांकडं अधिक लक्ष अधिक असतं, ही बाब खरी आहे. तरीही मी "सिंहपुच्छ वानर' (लायन-टेल मकाक), लाजाळू (स्लेंडर लॉरिस), पर्पल फ्रॉग, धनेश (मलबार हॉर्नबिल) यांच्यावर चित्रपट केले आहेत. वन्यजीव चित्रपटनिर्माते-दिग्दर्शकांनी आसामातल्या आणि पश्‍चिम घाटातल्या जीवसृष्टीकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. या भागांतलं जंगल जैववैविध्यानं नटलेलं आहे.

नल्लामुथ्थू त्यांचा पुढचा चित्रपट ताडोबामध्ये चित्रित करणार आहेत. ताडोबामधल्या माया-माधुरी वाघिणींची गोष्ट ते त्यातून सांगणार आहेत. त्यांनी या चित्रपटाचं काम नुकतंच सुरू केलं असून, दोन वर्षांत ते पूर्ण होईल.
-महाराष्ट्राबाबतचं निरीक्षण नोंदवताना "महाराष्ट्रात जंगलापेक्षा जंगलाबाहेर अधिक वाघ आहेत,' असा शेरा नल्लामुथ्थू यांनी मारला! महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी अनेकदा पाहिलेलं ताडोबाचं जंगल आता नल्लामुथ्थू यांच्या नजरेतून समोर येणार आहे. चित्ररसिकांना त्याची उत्सुकता आहे...

Web Title: sunil mali write article in saptarang