स्पर्शातून कळले सारे! (सुरेंद्र पाटसकर)

सुरेंद्र पाटसकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, विश्‍लेषणक्षमता यांच्या जोरावरच जग जिंकणं मानवाला शक्‍य झालं आहे. मानवनिर्मित बुद्धिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक, यंत्रमानव आता मानवाशी स्पर्धा करू लागले आहेत. यात आघाडीवर आहे रोबोटिक्‍स. भविष्यातला यंत्रमानव ‘सजीव’ पंचेंद्रियं असलेला असू शकतो...

बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, विश्‍लेषणक्षमता यांच्या जोरावरच जग जिंकणं मानवाला शक्‍य झालं आहे. मानवनिर्मित बुद्धिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक, यंत्रमानव आता मानवाशी स्पर्धा करू लागले आहेत. यात आघाडीवर आहे रोबोटिक्‍स. भविष्यातला यंत्रमानव ‘सजीव’ पंचेंद्रियं असलेला असू शकतो...

रस-स्पर्श-गंधज्ञान, उपजत बुद्धी आणि बुद्धिमत्ता ही माणसाची वैशिष्ट्यं आहेत. बुद्धिमत्ता आणि बोलण्याची क्षमता या दोन गोष्टी माणसाला प्राण्यांपासून वेगळ्या करतात. माणसानं आपल्याकडच्या बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छोट्या यंत्रांपासून सुरू झालेली ही मालिका संगणक आणि आता रोबो यांच्यापर्यंत येऊन पोचली आहे. रोबोंचा विकास करताना त्यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करता येऊ शकेल का, याचे प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यांना काही प्रमाणात यशही आलं आहे. चालणं, हातानं वस्तू उचलणं, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं, अडथळे पार करणं अशा गोष्टी रोबोंना (यंत्रमानव) ‘शिकवल्या’ गेल्या; पण स्पर्शज्ञान, रसास्वाद, गंधज्ञान हे यंत्रमानवात कसं निर्माण करायचं ही मोठी अडचण आहे. अनेक कृत्रिम अवयव तयार करण्यात यश आलं असलं, तरी कृत्रिम अवयव तयार करणं अद्याप शक्‍य झालेलं नाही. कारण, मेंदूची पूर्ण माहितीच आपल्याला अजून झालेली नाही. पंचेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान यंत्रमानवालाही मिळवता यावा, हे मोठं आव्हान आहे. यातला स्पर्शज्ञानाचा एक अडथळा पार करण्यात काही प्रमाणात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.
ह्यूस्टन विद्यापीठातल्या संशोधकांनी ‘स्ट्रेचेबल इलेक्‍ट्रॉनिक्‍स’च्या साह्यानं कृत्रिम त्वचा तयार करण्यात यश मिळवलं आहे. इतकंच नव्हे तर, ही त्वचा यंत्रमानवाच्या हातावर बसवली व त्याद्वारे यंत्रमानवाला स्पर्शज्ञान उपलब्ध करून दिलं गेलं आहे. या कृत्रिम त्वचेद्वारे गरम आणि गार यांच्यातला फरक यंत्रमानवाला कळू लागला आहे.

मानवी मेंदूत ३० अब्जांहून अधिक पेशी आहेत, त्यांच्यापासून पाठवलेले संदेश ३४० किलोमीटर प्रतिसेकंद एवढ्या वेगानं प्रवास करतात. आपल्या जन्मापासून मेंदू अविरत काम करतो, अगदी झोपेतही त्याचं काम सुरू असतं. आपल्या शरीराला लागणाऱ्या एकूण प्राणवायूपैकी २० टक्के, तर २५ टक्के ग्लुकोज मेंदूसाठी लागते. काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मेंदूत स्वतःच निर्माण करतो. सुमारे दहा वॉटच्या बल्बएवढी ऊर्जा मेंदू वापरतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचं केंद्र मेंदूमध्ये असतं. संगणकासह सर्व शास्त्रीय शोधांचा जनक हा मानवी मेंदूच आहे. मानवी मेंदूतल्या ‘न्यूरल नेटवर्क’सारखी रचना अत्याधुनिक संगणकात केल्यानं त्याचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. मात्र भाव-भावना, अनुभवाधारित निर्णयक्षमता संगणकाला साध्य होऊ शकत नाहीत. आपलं शरीर हे एका वाद्यवृंदासारखं आहे असं गृहीत धरलं, तर त्याचा संचालक मेंदू आहे. संचालकाकडून चुकीच्या सूचना गेल्या तर किंवा संचालकाचा तोल गेला तर संपूर्ण शरीराचा तोल ढासळणारच. शारीरिक क्रियांखेरीज सर्व क्षमता, बुद्धीचे सगळे आविष्कार, विचार, भाव-भावना, स्मरणशक्ती, भाषा या सगळ्यांचा कर्ता-करविता मेंदूच आहे. माणसाचं असामान्यत्व या मेंदूमुळंच आहे. मानवी मेंदूची सगळी वैशिष्ट्यं अजून आपल्याला समजलेली नाहीत. ती समजून घेऊन त्यांच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणं व तिचा वापर यंत्रमानवात किंवा आधुनिक संगणकात करण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आता केवळ स्पर्शाद्वारे कळणारा गार-गरम हा भेद ओळखण्याची कृत्रिम बुद्धिमत्ता ‘सेन्सर’च्या मदतीनं तयार करण्यात यश आलं आहे.

अनोखं यश
कृत्रिम त्वचा तयार करणं ही सोपी गोष्ट नाही. ह्यूस्टन विद्यापीठातले संशोधक कुनजिआंग यू आणि बिल डी. यांनी ताणला जाऊ शकणारा अर्धवाहक (सेमीकंडक्‍टर) तयार केला. त्यासाठी त्यांनी पॉलिडायमिथाईलसिलोक्‍सेन या सिलिकॉनवर आधारित पॉलिमरचा वापर केला. यापासून त्यांनी नॅनोवायर तयार केल्या. या नॅनोवायरच्या जाळ्यातून विद्युतप्रवाहाचं वहन शक्‍य आहे. हा अर्धवाहक यंत्रमानवाच्या हातावर ताणून लावल्यानंतरही तो त्याच्या क्षमतेच्या किमान ५० टक्के काम करू शकतो. पारंपरिक अर्धवाहक हे ठिसूळ असतात. ताणले गेले तर ते तुटतात. त्यांचा वापर यंत्रमानवाच्या हातावर करणं अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरलं असतं. पॉलिडायमिथाईलसिलोक्‍सेनच्या साह्यानं तयार केलेली त्वचा यंत्रमानवाच्या हातावर लावण्यात आली. त्यानंतर यंत्रमानवानं गरम पाण्याचं आणि बर्फ घातलेल्या थंड पाण्याचं तापमान अचूकपणे ओळखलं. संगणकाकडून पाठवण्यात आलेल्या संदेशांचं रूपांतर या अर्धवाहकाद्वारे मुक्‍या-बहिऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या सांकेतिक भाषेतही (अमेरिकन साइन लॅंग्वेज) करण्यात आलं.

इतर क्षेत्रांत वापर शक्‍य
कृत्रिम त्वचा हा पॉलिडायमिथाईलसिलोक्‍सेनद्वारे तयार केलेल्या अर्धवाहकाचा केवळ एक उपयोग आहे. परिधान करता येऊ शकणाऱ्या इलेक्‍ट्रॉमिक वस्तू, आरोग्यचाचण्यांसाठीची उपकरणं, अवयवप्रत्यारोपण, मानव आणि यंत्र यांच्यातला संवाद अशा अनेक गोष्टींसाठी या लवचिक अर्धवाहकाचा उपयोग होऊ शकतो.

यंत्रमानव होणार ‘स्मार्ट’
अमेरिकेत शिकागोमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर नुकतीच परिषद झाली. यंत्रमानव २०२९ पर्यंत मानवापेक्षा स्मार्ट होतील, अशी शक्‍यता त्या परिषदेत व्यक्त करण्यात आली. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रांमध्ये होत असलेला विकासाचा वेग पाहता हे सहज शक्‍य आहे,’ असं मत संगणकक्षेत्रातली आघाडीची एक कंपनी ‘एचपी’चे संशोधन विभागप्रमुख शेन वॉल यांनी व्यक्त केलं. आपल्या वक्तव्याच्या समर्थनासाठी त्यांनी स्वयंचलित मोटार, ड्रोनद्वारे पिझ्झा पोचवणं, हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ देण्यासाठी यंत्रमानव, शस्त्रक्रियेसाठी यंत्रमानवाची मदत, त्रिमितीय छपाई अशी अनेक उदाहरणं सांगितली. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची झेप मानवी बुद्धिमत्तेला २०४० पर्यंत मागं टाकेल,’ असा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा अंदाज आता तब्बल ११ वर्षं अलीकडं आणण्यात आला आहे.

बॅंकांमधल्या नोकऱ्यांवर परिणाम
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला की त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या नोकऱ्यांपैकी ३० टक्के  नोकऱ्यांसाठी यंत्रांचा वापर केला जाईल. याचाच अर्थ नव्या क्षेत्रातल्या ३० टक्के नव्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक संकटाच्या काळात सिटी बॅंकेत काम करणाऱ्या विक्रम पंडित यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत तर ‘अमेरिका, युरोपातल्या ३० टक्के नोकऱ्यांवर येत्या पाच वर्षांत यांत्रिकीकरणामुळं गदा येईल,’ असा अंदाज व्यक्त केला आहे. पासबुक भरणं, खात्यात रक्कम भरणं, वेतन जमा करणं, चेकबुकसाठी मागणी नोंदवणं, विविध प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पैसे देणं अशी कामं यंत्राद्वारे किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्यानंच केली जातात. पारंपरिकरीत्या केल्या जाणाऱ्या बॅंकांमधल्या कामांपैकी ७५ टक्के कामं आता डिजिटल स्वरूपात होऊ लागली आहेत.  परिणामी, ‘आता विशेष कौशल्य असणाऱ्यांनाच बॅंकांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतील,’ असं पंडित यांनी नमूद केलं आहे. भारतातल्या काही बॅंकांनीही इलेक्‍ट्रॉनिक व्हर्च्युअल असिस्टंटच्या (ईव्हीए) चाचण्या सुरू केल्या आहेत.

थोडक्‍यात सांगायच तर, मानवाला आपल्या मेंदूची जसजशी अधिक माहिती होत आहे, तसतसा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास वाढत चालला आहे. या विकासाला सध्या मर्यादा वाटत असल्या, तरी पुढच्या दहा-बारा वर्षांत एक मोठी झेप कृत्रिम बुद्धिमत्तेनं घेतलेली असेल. ...आणि कदाचित त्यातूनच मनुष्यप्राण्याच्या निर्मितीच्या मुळापर्यंतही आपल्याला जाता येईल!

Web Title: surendra pataskar write article in saptarang