संतुलनाचा धावा

हवामानबदलाचे चटके जगभरातील सर्वच देशांना बसताहेत. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर जगभरातील सत्ताधारीही खडबडून जागे झाले आहेत.
संतुलनाचा धावा
Summary

हवामानबदलाचे चटके जगभरातील सर्वच देशांना बसताहेत. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर जगभरातील सत्ताधारीही खडबडून जागे झाले आहेत.

- सुरेश पाटणकर snpatankar@rediffmail.com

हवामानबदलाचे चटके जगभरातील सर्वच देशांना बसताहेत. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर जगभरातील सत्ताधारीही खडबडून जागे झाले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या परिषदा होत आहेत. त्यात उपाययोजना आखल्या जात आहेत. विकास व्हावा, पण पर्यावरणाचा समतोल साधला जावा, यावर भर दिला जात आहे. त्यासाठी हरित शहरांची निर्मिती करणे सुरू आहे. नैसर्गिक हवेची प्रत कमी होऊ नये, तापमानात वाढ होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

‘जी २०’च्या चर्चासत्रात ‘आधी विकास करू आणि नंतर पर्यावरणाचे बघू’ ही भूमिका कशी अंगलट आली, याचे दाखले दिले गेले. त्यात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेतून बहुतांश देशांनी विचार करून काही पावले उचललेली दिसतात. त्यातूनच हरित शहरांची निर्मिती, अपारंपरिक ऊर्जास्रोतांसाठीचे नियोजन, जल नियोजन, विविध प्रकारच्या प्रदूषणावर उपाय, नैसर्गिक हवेची प्रत कमी होऊ नये, तापमानात वाढ होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश आहे. पर्यावरणासाठी हे देश करत असलेली कामे इतरांना पथदर्शी ठरणारे आहेत.

संतुलन म्हणजे पर्यावरणातील निरनिराळे घटक जे असमतोल निर्माण करतात, त्यांची पातळी स्वीकारार्ह ठेवणे. संतुलनाची सांगड अर्थातच, उपलब्धता किती आहे, त्याचा विचार करून साधने आणि साध्ये ठरवावी लागतात. प्राणी संतुलन आणि जैवविविधता याचा विचार करता, जनुकीय जाती, परिसंस्था, त्याच्यातील विविधता यांचा अभ्यास करून त्याच्यात बदल होणार नाही, याची काळजी घेणे. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करण्यासाठी हवेची गुणवत्ता, जल शुद्धीकरण, परागकण वाढवणे, झीज प्रतिबंधक करणे, मृदा सुपीक करणे आणि रसायनांचे नियमन करणे अपेक्षित आहे. या सगळ्याचा अभ्यास करून योग्य ती प्रणाली निर्माण करणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींचे साकल्याने नियोजन केले, तरच प्राणी आणि जैवविविधतेतील संतुलन आणि सातत्य मिळवू शकू.

पाण्याची उपलब्धता प्रादेशिक तुटवड्याशी जास्त संबंधित आहे. ते पाणी मानव, इतर प्राण्यांसाठी आणि इतर गोष्टींसाठी पोहोचवणे आणि त्याला येणारी किंमत आणि सातत्य याच्यावर लक्ष केंद्रित करून जलसंतुलन साधणे गरजेचे आहे. अर्थातच पाण्याचा साठा, नियोजन, उपलब्धता, प्रादेशिक नियोजन, लोकसंख्येचा विचार आणि पायाभूत सुविधा यांच्याकडे लक्ष दिले, तरच संतुलन आणि सातत्य मिळवू शकू.

अन्नधान्य संतुलनाचा विचार केला, तर जगातील बरीच लोकसंख्या अपुऱ्या अन्नामुळे योग्य त्या पोषणाला वंचित आहे. अजूनही काही प्रगत देश याबाबत अलिप्तपणा दाखवतात. देशांर्तगत सांमजस्यातून अन्नाचे आदानप्रदान करणे काही देशांना न परवडणाऱ्या परिस्थितीमुळे, त्यांच्या लोकसंख्येला अन्न पुरवू शकत नाहीत. असे होऊ नये म्हणून अन्न उत्पादनाची किंमत आणि वाहतूक व्यवस्था यामध्येसुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे.

या प्रमुख गोष्टी अन्नधान्याचे संतुलन साधण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. तांत्रिक बाजू सुधारून ऊर्जेचा योग्य वापर ही या माध्यमाची खरी गरज आहे. शेतीतून मिळणारे आणि मासेमारीतून मिळणारे अन्न याचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर अन्नाची किंमत आणि पुरवठ्यातील उपलब्धता यातून अपेक्षित असलेले अन्नधान्याचे पुरवठ्यातील संतुलन साध्य होऊ शकणार नाही.

वनसंतुलन महत्त्वाचे आहे. घरांसाठी लागणारे लाकूड, सरपण, इंधन, कागद बनवणे यासाठी वनांचा ऱ्हास कमीत कमी व्हावा. त्याचप्रमाणे जंगली प्राण्यांचे निवास किंवा आसरा, खासगी आणि सरकारी जंगले यांचा समन्वय साधणे कमीत कमी ३० टक्के तरी भूभाग जंगलासाठी राखीव असणे, हे सगळे दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. तसे न केल्यास वनसंतुलन अस्तित्वात येणे शक्य नाही.

तांत्रिकतेमध्येसुद्धा संतुलन मिळवणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध असलेले स्रोत कमी होणे, त्यांचा योग्य वापर करणे, लोकसंख्या किती वर्षांनी वाढवण्याची प्रक्रिया थांबेल याचा अंदाज घेणे, त्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याचा लेखाजोखा करणे, साधनसामुग्रीचा योग्य उपयोग करणे या गोष्टी तांत्रिकतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्याचा विचार केला नाही, तर अपेक्षित असलेले तांत्रिकतेतील संतुलन मिळू शकणार नाही. मर्यादित साधने पुढील काही वर्षात उपलब्ध होणार नाहीत, याचा विचार करणे जरुरीचे आहे. म्हणूनच तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, युरोनिअम, खनिज पदार्थ या साधनांची सद्यस्थिती अणि भविष्य, याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

संतुलन मिळवण्यासाठी निरनिराळ्या प्रणाली अधोरेखित केल्या आणि प्रत्येक प्रणालीसाठी काय करावे आणि काय करू नये हे बघितले. तसे न केल्यास संतुलन मिळवण्यात अयशस्वी होऊ शकतो, असे निरीक्षण केले गेले. अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टीत करून संतुलन मिळवले आणि यशस्वी वाटचाल केली, अशी परिस्थिती निर्माण केली गेली, असे गृहीत धरूया. या सर्व गोष्टी जर प्रदूषित झाल्या, तर संतुलनात मिळालेले यश नष्ट होईल आणि त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.

आर्थिक फटका बसल्यानंतर ऱ्हास होईल. सामाजिक घडी विस्कटेल आणि प्राणिमात्रांना आणि मानवाला पर्यावरण ऱ्हासाची आणखीन मोठी किंमत मोजावी लागेल. त्याची परिणिती मानव आणि प्राणीमात्र नष्ट होण्यामध्ये होऊ शकेल. ही परिस्थिती येऊ नये म्हणून घडवून आणलेल्या गोष्टी दूषित होणार नाहीत, अबाधित राहतील, प्रणाली अखंडितपणे चालू राहतील, हे घडवून आणणे महत्त्वाचे आहे.

प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काही किंमत मोजावी लागेल. ती मोजणे हे उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून अनिवार्य ठरेल. याचा अर्थ प्रदूषण मुळीच होणार नाही, प्रदूषणविरहित स्रोतांचा वापर, त्याचा शोध चालू ठेवणे याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल.

सध्या तरी असे चिन्ह दिसते, की प्राणीमात्र अजूनही असंतुलित परिस्थितीतून जात आहे. कायदे ज्ञात असले, तरी अंमलबजावणीची फारशी जाणीव झालेली दिसत नाही. संतुलन मिळवल्यानंतर सातत्यासाठी तीन मुख्य स्तंभांचा विचार करावा लागेल. आरोग्यदायी पर्यावरण, आर्थिक सुबत्ता आणि सशक्त सामजिक अपेक्षापूर्ती. हे फक्त एका देशाचे काम नसून, सर्व देशांनी मिळून त्याचा एकत्रित आराखडा तयार करावा. त्यासाठी जी २० सारख्या चळवळींचा चांगला उपयोग करून घ्यावा.

उपाययोजना

  • वायुप्रदूषण कमी करण्याचे जास्तीत जास्त उपाय अंमलात आणणे, सामाजिक आणि स्वास्थ्य या दृष्टिकोनातून ध्वनिप्रदूषणासाठी तयार केलेले कायदे आणि निर्बंध यांचे काटेकोरपणे पालन करणे.

  • मृदाप्रदूषण होऊ नये म्हणून तयार केलेले कायदे, उपाययोजना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे. सर्व तऱ्हेच्या घनकचरा व्यवस्थापनेसाठी तयार केलेल्या पद्धती, प्रक्रिया वगैरेंची अंमलबजावणी करणे.

  • पावसाच्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजना अंमलात आणणे.

  • ऊर्जानिर्मितीसाठी घडून येत असलेले प्रदूषण अपारंपरिक स्रोत वापरून संपूर्णपणे नियंत्रणात येईल अशी परिस्थिती घडवून आणणे.

  • हवामान बदल आणि परिणाम यासाठी अपेक्षित असलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे.

  • पर्यावरणीय हरित शहरांची भविष्यात काही थोड्या अवधतीच निर्मिती करणे.

  • सगळ्या प्रकारच्या जैवविविधतेचा चांगला आराखडा तयार करणे.

  • व्यक्तिगत जबाबदाऱ्यांची जाणीव आणि एकात्मिक समाज व्यवस्था चांगल्या प्रकारे घडवून आणणे.

(लेखक मुख्य अभियंतापदावरून निवृत्त झाले असून, ते मुंबई विकास समितीचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com