International Student Day : अफगाणिस्तानची फरझाना!

Afghanistan- Farzana
Afghanistan- Farzana

सगळ्यांशी गप्पा चालू होत्या इतक्यात, जरा बुटकी, मध्यम बांधा, खांद्यापर्यंत जेमतेम पोचतील एवढे नीटनेटके ठेवलेले केस, गळ्याशी स्कार्फ गुंडाळलेली ‘फरझाना’ वर्गात थोडी उशीराच दाखल झाली. गोरा वर्ण असलेल्या फरझानाने चेहऱ्यावर हलकासा मेकअप चढवला होता. ट्राऊजर आणि त्यावर साजेशे टीशर्ट घातले होते. हसतमुख चेहऱ्याने ती वर्गात आली. सगळे बोलत असताना ती एकदम शांत होती. पण तिच्या शांततेमागे असलेला तिचा बोलका चेहरा आणि हसरे भाव लपत नव्हते. 

फरझाना मूळ अफगाणिस्तानची! पुण्यात येऊन तिला फक्त ४ महिनेच झाले होते. बीबीएच्या आभ्यासक्रमासाठी ती खास भारतात आली आहे. पण या ४ महिन्यात तिला भारताने आणि विशेषतः पुण्याने चांगलाच लळा लावला. 

फरझाना भारताबद्दल बोलताना म्हणाली, ‘‘मी तशी दुबई, तुर्की अशा अनेक ठिकाणी राहिली आहे. पण का कोणास ठाऊक दुबईसारख्या देशापेक्षा मला पुणे सर्वाधिक आवडले. इथले लोक किती साधे आहेत. आमच्या इथे (अफगाणिस्तान) प्रत्येक स्त्रियांना मेकअप करण्यात रस असतो. किंबहुना तो त्यांच्या दैनंदिनीचाच एक भाग आहे. पण इथे मात्र तसे नाही. महिलाही किती साध्या राहतात. ते जसे साधे राहतात, तसेच ते स्वभावानेदेखील साधे आहेत. इथले लोक खूप सहजपणे इतरांना मदत करतात. तुर्कीमध्ये असे होत नाही. मला तर वाटते, देशाने कशी प्रगती केली आहे त्यापेक्षा तिथली माणसे कशी आहेत यावर त्या देशाची ओळख ठरते.’’ 

इथे आल्यावर अगदी वातवरणापासून ते भाषेपर्यंत अनेक गोष्टींसाठी तिला तडजोड करावी लागली. भाषेचे क्लास, रोज असणारे बीबीएचे क्लास त्याव्यतिरिक्त रोजच्या असाईनमेंट यातून सुटीच्या दिवशी मात्र फरझाना वेळ काढते. सुटीच्या दिवशी अफगाणिस्तानातले लोक राहणाऱ्या सोसायटीला ती भेट देऊन आली. ती म्हणते, ‘इथे एक खास गोष्ट आहे, ती म्हणेज सुरक्षितता. विशेषतः महिलांची सुरक्षितता! त्यामुळे मला कुठे फिरताना फार भीती वाटत नाही. इथे महिलांना खूपच स्वतंत्र आहे. सर्व क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. ही किती छान गोष्ट आहे.’ गळ्यातला स्कार्फ सावरत ती म्हणत होती. 

ती म्हणाली, ‘इथे आल्यावर मला इथल्या खूप गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असल्याने मी फरत असते. बरेचदा मी स्थानिकांना माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत काही प्रश्‍न विचारते. ते ही त्याच्यावर जमेल तशा इंग्रजीत उत्तरे देतात. अशावेळी आम्ही मनाने जोडले जातो, त्यामुळे भाषा हा अडसर माझ्यासाठी तरी राहत नाही. माझ्याबरोबर अन्य काही देशाचेदेखील विद्यार्थी आहेत. यासर्वांमुळे आपण कुठल्याही देशाचे आहोत यापेक्षा माणूस म्हणून कसे आहोत, हे कळते आणि माझ्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.’ 

गणपती, दिवाळी यासारखे सण एकत्र येऊन साजरे करण्याची पद्धत तिला विशेष आवडली. त्यातच सर्व सण साजरे करण्याची पद्धत निराळी आहे, याचे तिला फारच कौतुक वाटले. 
सध्या इथल्या स्ट्रीटफूडची ती मोठी चाहती झाली आहे. अड्यांचे नुडल्स, पिझ्झा, शोरमा, पास्ता हे पदार्थ तिच्या पसंतीस उतरले. अजूनही बरेच काही टेस्ट करण्याची तिची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com