अमेरिकी गावाकडची माती (स्वागत पाटणकर)

swagat patankar write article in saptarang
swagat patankar write article in saptarang

शहरी माणसांनाही ग्रामीण जीवनशैलीचं प्रचंड आकर्षण असतं. अमेरिकेतही ते आहेच. तिकडच्या गावाकडची माती अनुभवण्याची संधी देणारी लोकप्रिय मालिका म्हणजे "द रॅंच.' बेनेट कुटुंबाभोवती फिरणारी ही मालिका आपल्याला हसवते आणि वेगळा दृष्टिकोनही देऊन जाते.

"खास चुलीवरचं चिकन अथवा पिठलं-भाकरी मिळेल...' असे बोर्ड असलेली बरीच हॉटेल्स आपल्याला तुफान गर्दीत सुरू असताना दिसतात. साहजिकच आहे. शहरी जीवनशैलीत आपल्याला नेहमीच चुलीवरचा स्वयंपाक, शेतामध्ये जेवण या अशा गावाकडच्या गोष्टींबद्दल ओढ असते किंवा ते अनुभवायची इच्छा असते. फक्त आपल्याकडंच नाही, तर अमेरिकेतसुद्धा असंच असावं.... न्यूयॉर्क, शिकागोसारख्या शहरी, बिझी, चकचकीत आणि ट्रॅफिक जॅममध्ये आयुष्य घालवणाऱ्यांना नेहमीच रुरल एरियाबद्दल अपूर्वाई असते. साधारण हाच विचार, प्रेक्षकांची हीच इच्छा बरोबर हेरून नेटफ्लिक्‍सनं 2016 मध्ये "द रॅंच' ही मालिका सुरू केली! प्रेक्षकांबद्दल त्यांनी बांधलेला अंदाज हा तंतोतंत बरोबर ठरला आणि अमेरिकी नागरिकांनी "रॅंच'ला डोक्‍यावर घेतलं. दोन वर्षांत या मालिकेचे चार सीझन्स आले आणि तिनं अक्षरशः प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवला आहे.

"द रॅंच'... भरपूर पसरलेल्या अमेरिकेच्या मधोमध असणाऱ्या कोलोरॅडो स्टेटमधल्या गनीसन नावाच्या छोट्या खेड्यातली ही गोष्ट. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या गावात राहणारे बहुधा सर्व जण "रॅंचर्स.' मोठी शेतं, फार्म हाऊसमध्ये घोडे, बकरी आणि गायी यांना पाळायचं, त्यांना वाढवायचं आणि मग विकायचं हाच त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम. अशाच रॅंचर्समधला एक वयस्कर रॅंचर "बो बेनेट' याच्या रॅंचमध्ये घडणारी ही टीव्ही मालिका. तसं गोष्ट म्हणायला गेलं, तर त्यात काही विशेष फिल्मीपण नाही, ड्रामा नाही. अगदी कुणाच्याही आयुष्यात येतील अशा छोट्याछोट्या प्रसंगांची गुंफण करून तयार झालेली गोष्ट म्हणजेच "द रॅंच.' मात्र, तिची खुसखुशीत मांडणी, ठाशीव व्यक्तिरेखा आणि उत्तम संवादांमुळं प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतात.
बो, कोल्ट, रुस्टर, मॅगी आणि एबी या "बेनेट' कुटुंबीयांच्या भोवती फिरणारं मालिकेचं कथानक. अमेरिकी चकचकीतपणा, लॅव्हिश आयुष्य याच्याशी काडीचाही संबंध नसलेला बो बेनेट. तरुणपणी व्हिएतनाममध्ये युद्धावर गेलेला आणि त्यानंतर वडिलोपार्जित रॅंच, तिथली जमीन आणि त्याच्या गायी हेच सर्वस्व मानणारा. आपल्यानंतर आपली पोरं रॅंच नीट सांभाळणार का एवढाच त्याचा विचार. भावना वगैरे काहीही नसतं असं दाखवणारा; पण मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी हळवा असलेला "बो' आपल्याकडच्या कोकणातल्या माणसांची आठवण करून देतो. रुस्टर आणि कोल्ट ही त्याची मुलं. आजच्या जनरेशनची; पण त्याची मनं रॅंचसाठीच अडकलेली. फुटबॉलमध्ये करिअर बनवण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेला; पण त्यात अपयशी होऊन पुन्हा घरी परतलेला कोल्ट. त्याला त्याचं अपयश टोचतंय आणि आता त्याच्यासमोर एकच लक्ष्य आहे ते म्हणजे आपला प्रामाणिकपणा वडिलांना सिद्ध करून दाखवायचा आणि रॅंचसाठी मनापासून काम करायचं. याच्या उलट त्याचा मोठा भाऊ म्हणजे रुस्टर. वडिलांनी सांगितलेलं काम करायचं आणि बाकीच्या वेळेत उनाडक्‍या करायच्या, हेच त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट. एकदम दिलखुलास; पण आई-बाबांसाठी वाट्टेल ते करायला तयार असलेला. दोन्ही भावांचे स्वभाव भिन्न असले, तरी एकमेकांबरोबरचं नातं एकदम घट्ट. प्रत्येक वेळी एकमेकांची चेष्टा करतात, टिंगल करतात; पण एकमेकांना न सोडणारे असे हे भाऊ. बेनेट कुटुंबातल्या या तीन पुरुषांपासून वेगळी होऊनसुद्धा त्यांच्याबरोबरच असणारी त्यांची आई म्हणजे मॅगी. बो आणि मॅगी एकत्र राहत नाहीत; पण म्हणून त्यांनी संबंध तोडलेले नाहीत. मॅगीचा बार याच गावात असल्यामुळं तिकडं जाऊन फुकटात पार्ट्या करणारे कोल्ट आणि रुस्टर, प्रेम असूनही वेगळं राहणारे बो- मॅगी असं हे वेगळंच कुटुंब आहे. या चार व्यक्तिरेखांबरोबर आणखी एक व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे एबी. कोल्टच्या शाळेतली, अतिशय क्‍युट चेहऱ्याची मैत्रीण. या पाच जणांच्या भोवती ही मालिका फिरत राहते आणि प्रेक्षकांना त्यात ओढत राहते. इतरही पात्रं मध्येमध्ये येत कहाणीला वळणं देत मजा आणतात.

"रॅंच' पहिल्यांदा भेटीला आली एप्रिल 2016मध्ये. त्यानंतर एकूण चार सीझन्समध्ये तिनं धमाल केली आहे. खरं तर एकदम सरळ, साधं कथानक असलेल्या या मालिकेला इंटरेस्टिंग बनवतात ते त्यातले संवाद. लेखनातच स्पष्ट झालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे विशिष्ट स्वभाव त्यांच्यातल्या संभाषणांना गोड करतात आणि आपल्याला मनापासून हसवतात. नवरा-बायको, आई-मुलं, बाप-मुलं, भाऊ-भाऊ ही सगळी नाती इतकी वेगळ्या प्रकारे टिपली आहेत, की मजा येते. प्रत्येक नात्याची गंमत एकदम वेगळीच. प्रत्येकाची प्रॉब्लेमकडे बघायची आणि सोल्युशन शोधण्याची वेगळी पद्धत. अमेरिकेतल्या गावाकडचं आयुष्य, तिथल्या लोकांच्या चर्चा, तिथल्या लोकांची जीवनशैली, त्यांच्या अडचणी, उर्वरित अमेरिकेबद्दलची त्यांची मतं हे सगळं या मालिकेला कमालीचं वेगळं बनवतात. यातले विनोद आपोआप घडत जातात. आपलं मनोरंजन होतंच; पण नकळत ती जीवनशैली आवडायला लागते. बहुतांश इनडोअर घडत असलेल्या या मालिकेच्या दिग्दर्शकाचं करावं तेवढं कौतुक कमीच. केवळ प्रसंग- संवादांमध्ये संदर्भ देऊन ते आपल्यासमोर रॅंचच्या अवतीभवती असलेल्या गोष्टींचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतात.

या मालिकेतल्या एपिसोड्‌सना अमेरिकेतल्या "कंट्री म्युझिक'च्या गाण्यांची नावं देण्यात आली आहेत हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. प्रेक्षकांना आकर्षित करणारी अजून एक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेचं शीर्षकगीत. ल्युकस नेल्सन आणि शूटर जेनिंग्स यांनी गायलेलं - "ममा डोंट लेट युअर बेबीज ग्रो अप टू बे काऊबॉयज' या अतिशय प्रसिद्ध गाण्याचं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना एकदम मंत्रमुग्ध करून टाकतं.

साधारण 1975मध्ये एड ब्रूस आणि पॅटसी ब्रूस या जोडप्यानं लिहिलेलं हे गाणं "कंट्री म्युझिक' प्रकारात अतिशय गाजलेलं असं होतं. "ओल्ड ट्रक आणि एकांत (शेतातलं) आयुष्य जगण्यापेक्षा आम्हाला पण डॉक्‍टर, लॉयर वगैरे होऊ द्या..' अशा साधारण अर्थाचं हे गीत काऊबॉईजच्या मुलांचे विचार, त्यांची मतं मांडणाऱ्या "रॅंच'चं शीर्षकगीत म्हणून परफेक्‍ट शोभतं. आपल्यालासुद्धा ते खूप भावतं आणि अर्थातच आपणसुद्धा हे गाणं गुणगुणायला लागतो...

सुंदर दिग्दर्शन आणि अफलातून संवाद याला तेवढीच जोरात साथ मिळाली आहे ती कलाकारांची. सॅम इलियट- एक खूप ज्येष्ठ अभिनेते. एकदम टिपिकल काऊबॉय लूक असलेले. बो बेनेटच्या भूमिकेला एकदम चपखल. डेब्रा आणि अलिशा या दोघी मॅगी-एबीच्या भूमिकांमध्ये धमाल करतात. मात्र, खरी मजा आणतात ते कोल्ट आणि रुस्टर या सख्ख्या भावांच्या भूमिका करणारे ऍश्‍टन कुचर आणि डॅनी मास्टर्सन. साधारण वीस वर्षांपूर्वी गाजलेल्या "दॅट सेव्हंटीज शो' या मालिकेत हे दोघं एकत्र आले होते. आठ वर्षं एकत्र काम केल्यावर आता ते पुन्हा एकमेकांबरोबर आपल्यासमोर आलेत. त्यांच्यातलं ट्युनिंग इतकं कमालीचं आहे, की ते खरी भावंडंच वाटतात. भावांमधलं गंमतिशीर नातं, एकमेकांची खेचायची एकही संधी न सोडणारे; पण तरी एकमेकांच्या खूप जवळचे असे हे भाऊ ते एकदम सहजपणे साकारतात आणि कोल्ट-रुस्टरला जिवंत करतात.

अमेरिकेत राहून टेक्‍नॉलॉजीबद्दल कधीच अपडेट नसलेली, आपलं घर आणि आपलं गाव यांतच सर्व काही मानणारी, डिस्नेलॅंड वगैरे गोष्टींना निरर्थक मानणारी, कधी गालातल्या गालात, तरी कधी पोट धरून हसवणारी, चटकन इमोशनल करणारी अशी ही माणसं. त्यांच्यासाठी आणि अमेरिकी गावची माती अनुभवण्यासाठी "द रॅंच' बघायलाच हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com