सत्तरच्या दशकातली धमाल (स्वागत पाटणकर)

swagat patankar
swagat patankar

अमेरिकेत सत्तर-ऐंशीच्या दशकात टीनेजर्स मंडळीच्या भावविश्‍वात काय घडत होतं याचा अतिशय सुरेख करणारी मालिका म्हणजे "दॅट सेव्हंटीज्‌ शो.' "फ्रेंड्‌स'सारखीच ही मालिका सहा मित्रांची गोष्ट सांगते. या मित्रमंडळींच्या कट्ट्यावरच्या घडामोडी बघताना सगळ्याच वयातले लोक एकदम फ्रेश होतात, हसून हसून पुरेवाट होते. आपला ताण हलका करणाऱ्या, जुन्या दिवसांत घेऊन जाणाऱ्या या मालिकेविषयी...

नाटक, चित्रपट किंवा टीव्ही मालिका असो, प्रेक्षकांना एखाद्या विशिष्ट शैलीतल्या कलाकृती आवडायला लागल्या, की त्याच शैलीच्या जवळपास जाणाऱ्या कलाकृतींचा ट्रेंड सुरू होतो. सगळ्याच यशस्वी होतात असं नाही; पण काही काही निवडक कलाकृती त्या ट्रेंडमधल्या असतात; पण गरजेप्रमाणं विशिष्ट बदल करून आपलं वेगळेपण टिकवतात आणि यशस्वी होतात. साधारण 1994 मध्ये आलेल्या, न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या सहा वर्किंग-बॅचलर मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या "फ्रेंड्‌स' मालिकेनं जगभर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तब्बल दहा वर्षं ही मालिका लोकांच्या मनात घर करून राहिली होती. प्रेक्षकांचा हा कल बघून "मित्र-मैत्रिणींची' कहाणी सांगणाऱ्या मालिका-सिनेमांचा ट्रेंडच सुरू झाला; पण "फ्रेंड्‌स'सारखी लोकप्रियता फार कमी जणांच्या वाट्याला आली. अशीच सहा मित्रांची गोष्ट सांगणारी, प्रेक्षकांना हसवणारी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे "दॅट सेव्हंटीज्‌ शो!'
1998मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचा प्लॉट "फ्रेंड्‌स'सारखाच सहा मित्रांच्या गमतीजमती दाखवणारा असला, तरी यशस्वी होण्यामागं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मालिकेनं केलेले काही बदल. "फ्रेंड्‌स'मध्ये "तरुण' मित्र होतं, तर या या मालिकेत मात्र मुख्य पात्रं टीनेजर्स होती. मालिका घडते तो काळ त्यांनी वीस वर्षांनी मागं नेला होता, तसंच न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात नाही, तर विस्कॉन्सिनमधल्या छोट्या गावात ही गोष्ट घडते. सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे सहा मित्रांइतकीच महत्त्वाची असणारी पात्रं -आई आणि बाबा. अशा महत्त्वाच्या पात्रांभोवती फिरणारी ही "दॅट सेव्हंटीज्‌ शो' आपल्याला आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देते, खदाखदा हसवते आणि एकदम फ्रेश स्माईल आपल्या चेहऱ्यावर आणते.

या मालिकेला विशिष्ट अशी काही गोष्ट नाही, काही कथानक नाही. पंधरा ते वीस वर्षं वय असणाऱ्या मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीजमती, त्यांचं ते "कूल' लाइफ दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा हा सगळा मामला. विस्कॉन्सिनमध्ये राहणारे, एकाच कॉलेजमधले मित्र एरीक, डोना, केल्सो, जॅकी, फेझ आणि हाइड या सहा मित्रांभवती फिरणारी ही मालिका. हे सहा जण म्हणजे अक्षरशः वल्लीच. त्यांचे ते विक्षिप्त स्वभाव, त्या वयातली ती चंचल मनोवृत्ती, बदलत जाणारी स्वप्नं, बिनधास्त स्वभाव, फ्लर्टिंग, रिलेशनशिप्स, ऍडल्ट जोक्‍स, लपून प्यायली जाणारी बिअर, पार्ट्या थोडक्‍यात काय तर त्यांचं ते चिंता नसणारं आयुष्य हे सर्व म्हणजे "दॅट सेव्हंटीज्‌ शो.' या मुलांच्या आयुष्यातली अफेअर्स, ब्रेक-अप, पैसे कमावणं, लपून गाडी चालवणं, आई-वडिलांशी वेगळ्या प्रकारचं मैत्रीचं नातं, त्यांच्याशी मतभेद, मुलांचे करियर प्लॅन्स अशा वेगवेगळ्या छोट्या गोष्टी घेऊन या मालिकेचा 22 मिनिटांचा एक-एक एपिसोड छोटीशी आणि वेगळी गोष्ट घेऊन आपल्यासमोर येतो.
बारीक शरीरयष्टीचा, विनोदी स्वभावाचा, स्मार्ट, काहीसा गोंधळलेला, ज्याचे आई-वडील आता नाहीत अशा हाईड नावाच्या मित्राला आपल्या घरी कायमच राहायला आणण्यासाठी स्वतःच्या आई-बाबांना समजवणारा असा "एरिक.' एरिकच्या शेजारच्या घरात राहणारी, एकदम टॅलेंटेड आणि एरिकची लहानपणापासूनची जवळची मैत्रीण आणि सध्याची गर्लफ्रेंड "डोना.' आई-वडील नसल्यामुळं एरिकच्याच घरी शिफ्ट झालेला, एरिकला भाऊ मानणारा, उपरोधात्मक बोलायची सवय असलेला "हाईड.' दिसायला सुंदर; पण अक्कल बाजूला ठेवल्यासारखं वागणारा, स्वतःला "किंग' म्हणवून घेणारा "केल्सो' आणि केल्सोच्या स्वभावाला शोभणारी, केल्सोची गर्लफ्रेंड, अविचारी सल्ले देणारी, ग्रुपमधली सगळ्यांत छोटी अशी "जॅकी' आणि मेक्‍सिकोमधून शिकायला आलेला, भोळा असा "फेझ'.... या सहा लोकांनी केलेला त्यांच्या अफाट टायमिंगनं केलेला कल्ला आपल्याला त्यांच्या ग्रुपचाच भाग बनवतो.

एरिकच्या घरचं बेसमेंट म्हणजे या सहा मुलांचा कट्टा. कॉलेज सुटल्यावर, सुट्टी सुरू असताना, रोज या बेसमेंटमध्ये भेटून टाईमपास करणं, एकमेकांची खेचणं, विविध विषयावर वायफळ चर्चा करणं, फसणारे प्लॅन्स करणं, गॉसिप्स करणं अशा विविध गोष्टी म्हणजे या मुलांचे छंद. सहाही जणांची केमिस्ट्री तुफान जमून आली असल्यामुळं आपल्यालासुद्धा त्यांचा तो कल्ला बघायला खूप आवडतो, एक वेगळाच आनंद देतो. मालिका बघत असताना "अरे हे आपणसुद्धा केलंय त्या दिवसांत' असं आपल्याला वाटून जातं. हेच या मालिकेचं यश आहे.

या सहा जणांबरोबर मालिकेचे महत्त्वाचे भाग आहेत "रेड आणि किटी' म्हणजेच एरिकचे आई-वडील. मुलांची काळजी करणाऱ्या, त्यांच्या मजा-मस्तीवर हळूच लक्ष ठेवणाऱ्या तमाम पालक वर्गाचं रेड-किटी प्रतिनिधित्व करतात. अर्थात मालिका विनोदी असल्यामुळे त्यांची ती काळजी, भीती, राग, एकमेकांमधले वाद हे सगळं गमतीदार स्वरूपात प्रेक्षकांसमोर येतं आणि त्यामुळंच ते सर्व आपल्याला हसवतं आणि मनापासून पटून जातं. अगदी आपल्या घरात सुरू असलेल्या गोष्टी पडद्यावर पाहिल्याचा भास होतो. रेड-किटी यांच्या प्रत्येक संवादातून आपल्याला "तिकडच्या' फॅमिली व्हॅल्यूजचं दर्शन होत राहतं. तिकडे आपल्यासारखं नसतं, असं समजणाऱ्यांसाठी तो एक चांगला धडा असतो. "हॅंगिंग आऊट डाऊन द स्ट्रीट... द सेम ओल्ड थिंग वुई डिड लास्ट वीक' या मालिकेच्या शीर्षक गीतातच संपूर्ण मालिकेचा गाभा दडल्यासारखा आहे. जो खरं तर आपण सर्वांनी आपापल्या आयुष्यात अनुभवलाय. असेही काही दिवस असतात, जेव्हा आपल्या आयुष्यात काही घडत नसतं अशा वेळेस आपल्या मित्रांनाच भेटणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हेच आपलं एक महत्त्वाचं काम असतं. "दॅट सेव्हंटीज्‌ शो'मुळं आपल्याला अशाच एका हॅंगआऊटची गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते.

कुमार वयातल्या मुलांचं आयुष्य वेगळ्या ढंगानं आपल्यासमोर आणतानाच ही मालिका अमेरिकेतलं "ऑइल क्रायसिस', 1970 मधली मंदी, व्यसनाधीन कुमारवर्ग, अमेरिकेत परदेशातून स्थायिक होणाऱ्या लोकांबद्दलची मतं, फॅमिली व्हॅल्यूज, दोन पिढ्यांमधल्या विचारांमधली दरी हे असे काही 1970 मधले अमेरिकी सामाजिक मुद्देही आपल्यासमोर आणते..अर्थात विनोदी ढंगात. जुनी मासिकं, जुन्या चित्रपटांचे संदर्भ, व्हीसीआर, टेप अशा काही गोष्टींमधून आपल्याला सतत सत्तर-ऐंशीच्या दशकाची आठवण करून देते.

ही सारी पात्रं साकारणाऱ्या या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी विनोदाचं जबरदस्त टायमिंग दाखवलं आहेच; पण हा अभिनय कुठंही कृत्रिम वाटणार नाही, याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतलीये. आठ वर्षं आपण साकारत असलेलं पात्र त्याच बेअरिंगमध्ये जिवंत ठेवण्याचं अवघड काम या सर्वांनी लीलया पेललंय आणि त्यामुळंच वर्षभर सुरू राहील अशा विचारांनी सुरू केलेली ही मालिका तब्बल आठ वर्षं सुरू राहिली; पण चांगल्या गोष्टींना अंत असतोच. या सहाही मित्रांच्या भूमिका साकारणारे सर्व जण तेव्हा खऱ्या आयुष्यातदेखील वयानं लहानच होते. प्रचंड मॅच्युरिटी दाखवून केलेल्या या भूमिकांमुळं त्यांच्या करिअरलासुद्धा लहानपणीच चांगलं वळण लागलं. अर्थातच त्यांना जास्त मोठ्या आणि चॅलेंजिंग ऑफर्स यायला लागल्या. त्यामुळंच मालिका सुरू झाल्यानंतर सहा वर्षानंतर म्हणजेच सात सीझन्स झाल्यावर मात्र यातल्या एरिक आणि केल्सो (टॉफर ग्रेस आणि एशटन कुचर) या दोघांनी करिअरमध्ये नवीन संधी मिळाल्यामुळं ही मालिका सोडली. आठवा सीझन या दोघांशिवाय पूर्ण केला गेला; पण पहिल्या सात सीझन्ससारखी मजा आठव्यामध्ये आली नव्हती. निर्मात्यांनी आठ सीझन्सनंतर मात्र ही मालिका बंद करायचा निर्णय घेतला. 1998 मध्ये सुरू झालेला हा कट्टा 2005च्या सुमारास बंद झाला कायमचा.
परदेशी वेब सिरीज बघताना नेहमीच क्राइम किंवा साय-फाय सिरीज बघायला पाहिजेत असं नाही. आपल्याला हसवणारा, वातावरण हलका करणारा, जुन्या कॉलेजच्या दिवसात घेऊन जाणारा, ऑफिसमधून घरी आल्यावर, रात्री झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी लोकलमधून घरी येताना सेव्हंटीज्‌ शोचा 22 मिनिटांचा कल्ला बघून चेहऱ्यावर फ्रेश स्माईल आणायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com