विनोदवीर बनण्याचा प्रवास (स्वागत पाटणकर)

swagat patankar
swagat patankar

स्टॅंड-अप कॉमेडी हा प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असला, तरी त्यामागचे कष्ट आणि प्रक्रिया दाखवणारी भन्नाट वेब सिरीज म्हणजे "मार्व्हलस मिसेस मिजेल.' पतीच्या एका निर्णयामुळं तिच्यातला हा गुण दिसतो आणि त्यातून तिचा प्रवास सुरू होतो. हा विलक्षण प्रवास भावनांनी भरलेला आहे आणि खदाखदा हसवणाराही आहे. जुन्या काळातल्या न्यूयॉर्कचं दर्शन घडवण्यापासून माणसांचेही स्वभाव दाखवणाऱ्या या विलक्षण वेब सिरीजविषयी...

आजकाल आपल्याकडे "स्टॅंड-अप' कॉमेडीचा मोठा ट्रेंड सुरू झालाय. पूर्वी हे स्टॅंड-अप कॉमेडिअन्स आपल्याला फेमस बार/लाउंजमध्ये, पार्टी हॉलमध्ये किंवा अगदी उच्चभ्रूंच्या लग्न समारंभात परफॉर्म करताना दिसायचे; पण आता ट्रेंड म्हणून असेल, पॅशन असेल किंवा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्ह्यूज मिळून ग्लॅमरस व्हायचा प्रयत्न करणारे स्टॅंड-अप कॉमेडीयन्स आपल्याला ऑनलाइन चॅनेल्सवर भरपूर दिसायला लागले आहेत. अशा सगळ्या आजकालच्या स्टॅंड-अप कॉमेडिअन्सनी, कॉमेडियन होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांनी आणि या कलाकारांवर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या सर्व रसिक प्रेक्षकांनी बघायलाच हवी अशी मालिका ऍमेझॉन प्राइम घेऊन आलंय. 1960सारख्या जुन्या काळात घडणारी, एका स्टॅंड-अप कॉमेडिअनची गोष्ट सांगणारी "मार्व्हलस मिसेस मिजेल!'
ही गोष्ट आहे न्यूयॉर्कमध्ये उच्च मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या "मिरिअम मिजेल'ची. तिच्या आयुष्यात खरं तर कमी कशाचीच नाही. बिझनेसमॅन असलेला; पण साइड बाय साइड स्टॅंड-अप कॉमेडियन बनायचं स्वप्न बघणारा पती, दोन लहान मुलं, सर्व सुखसोयींनी भरलेलं घर आणि खुशीत चाललेला संसार. म्हणजे बघायला गेलं तर 1958च्या काळातल्या अपेक्षांनुसार सर्व काही असणारी नायिका मिरिअम मिजेल. एखाद्या गुणी गृहिणीसारखं हिचं आयुष्य सुरू असतं. सगळ्यांचा ब्रेकफास्ट- लंच- डिनर बघण्यापासून ते पतीला त्याच्या कॉमेडी शोज मॅनेज करण्यापर्यंत सगळी कामं ती व्यवस्थित बजावत असते.

मात्र, एक दिवस असा येतो, की तिचा पती जॉईलला त्याचं स्टॅंड-अप कॉमेडियन व्हायचं स्वप्न हे अवघड, अशक्‍य वाटू लागतं आणि एका चुकलेल्या परफॉर्मन्सचा सगळं दोष मिरिअमवर टाकून, त्याचं ऑफिसमधल्या सेक्रेटरीबरोबर अफेअर सुरू असल्याचं सांगून तो घर सोडून जातो. प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या मिरिअमची सुरू होते स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड. मानसिक धक्‍क्‍यात गेल्यावर, रागाच्या भरात प्रचंड दारूच्या नशेत असताना ती जॉईल जिकडे कॉमेडी परफॉर्म करतो त्याच ठिकाणी जाऊन डायरेक्‍ट स्टेजवर उभी राहून, माइक हातात घेऊन बोलायला लागते. पतीवरचा सगळा राग माइकवर काढते; पण त्या सगळ्या रागामध्ये एक विनोदी स्वभाव लपलेला असतो. समोर बसलेल्या लोकांना तो पोट धरून हसायला भाग पाडतो. त्याच बारमध्ये काम करणारी कॉमेडी मॅनेजर सुजीची नजर मिरिअमवर पडते. तिचं भाषण कौशल्य, तिचा कॉन्फिडन्स बघून सुजी भलतीच खूश होते. तिच्या डोक्‍यात वेगळीच चक्रं सुरू होतात. तिला मिरिअममध्ये एक यशस्वी आणि सुपरहिट कॉमेडियन दिसते. मिरिअमला आपला प्लॅन पटवण्यात सुजी बरेच प्रयत्न करते. सुरवातीला मिरिअमला काही पटत नाही; पण पुढं काही घटना घडतात ज्यात तिला लोकांना हसवणं आपल्यात भिनलंय आणि हेच आपल्याला खऱ्या अर्थानं इंडिपेंडंट बनवेल याची खात्री होते... आणि मग सुरू होतो पत्नी, मुलगी, आई असलेल्या गृहिणीचा एक प्रवास. स्टॅंड-अप कॉमेडियन होण्याचा! हा प्रवास म्हणजेच "मार्व्हलस मिसेस मिजेल'चा सीझन!

सुजी आणि मिरिअमचा हा प्रवास अर्थातच सोप्पा नसतो. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसमोर ऍक्‍ट सादर करताना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांच्या अनपेक्षित प्रतिक्रिया, दुसऱ्या लेखकाकडून लिहून आणलेलं स्किट, स्वतःचा मूड सांभाळत परफॉर्मन्स करताना आलेले नाकी नऊ, स्वतःकडून वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं हाती पडलेली निराशा... असे अनेक अदृश्‍य अडथळे त्यांना अनपेक्षितपणे धक्के देत असतात. काही गोष्टी हाताबाहेर गेल्यामुळं अगदी जेल-कोर्टपर्यंत त्यांना जावं लागतं. हे सगळं सोडून द्यायचा विचारदेखील त्यांच्या मनात येतो. ते तसं ठरवतातदेखील; पण पुन्हा आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, त्यामुळं कॉमेडियन बनणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे हे त्यांना उमगतं आणि त्या पुन्हा जोमानं कामाला लागतात.

"गिल्मोर गर्ल्स'सारखी सुपरडुपर हिट मालिका लिहिणाऱ्या ऍमी शेरमन- पॅलॅडिनो यांनी "मार्वलस'च्या रूपात पुन्हा एकदा आपल्या लेखनातली जादू दाखवली आहे. मालिकेमधली सर्व पात्रं, त्यांचे स्वभाव, त्यांची एकमेकांमधली रिलेशनशिप हे सगळं आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातं. कुठंही काहीही फिल्मी न दाखवता, आपल्या घरात जसं घडतं तसंच स्क्रीनवर दाखवलं जातं. मात्र, तरीसुद्धा कुठलाही सीन, एपिसोड कंटाळवाणा होत नाही. उलट त्यांचे स्वभावच इतके नैसर्गिक आणि तऱ्हेवाईक दाखवल्यामुळं मालिकेच्या गंभीर वातावरणातसुद्धा प्रेक्षकाला हसू फुटतं. कुठलीही विनोदनिर्मिती करताना विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. संवादातूनच विनोद निर्माण होत राहतात. अर्थात कॉमेडियन या विषयावरची मालिका असली, तरी ही फक्त विनोदी मालिका नाही.

पती-पत्नीमधले वादविवाद, त्यांच्यातले गंभीर प्रसंग, लग्नानंतर आई-बाबांकडं परत आल्यावर सहन करावी लागणारी वडिलांची सक्ती, त्यातून होणारी मुलीची चिडचिड, आई-बाबांना मुलीबद्दल- तिच्या संसाराबद्दल वाटणारी काळजी, कॉमेडियन बनायचं की नाही या गोंधळापासून आपण काही कॉमेडियन बनू शकत नाही असा मिरिअमचा तो संघर्ष, मिरिअमला संधी देण्यासाठी केलेले खूप वेगवेगळे प्रयत्न आणि त्यातून सुजीला येणारं फ्रस्ट्रेशन-चिडचिड अशा विविध भावनांचा प्रवास आपण बघत बसतो आणि आपण त्यात पूर्णपणे गुंगून जातो. एखाद्या प्रॉब्लेमला धीरानं मात करून पुढं जाणाऱ्या मिरिअमचा पुढचा परफॉर्मन्स तुफान हिट होवो असंच आपल्याला मनापासून वाटू लागतं. इतकी "मिस मिरिअम मिजेल' आपल्या जवळची झालेली असते. लेखक- दिग्दर्शिका ऍमीनं प्रेक्षकांवर ही एक प्रकारची केलेली जादूच आहे.
अर्थात ऍमीनं अक्षरशः स्क्रिप्टवरच जिवंत केलेली ही पात्रं जशीच्या तशी पडद्यावर उतरवणं खूप महत्त्वाचं आणि अवघड काम होतं. अंगविक्षेप असलेले विनोद नाहीत, गरजेशिवाय ऍडल्ट विनोद नाहीत, इमोशनल संभाषणात कुठंही भावनांचा उद्रेक नाही, नाटकीपणा नाही.... सगळं कसं एकदम नैसर्गिक दाखवायची किमया सर्व कलाकारांनी साधली आहे. विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे मिरिअम मिजेलचे वडील झालेले टोनी शॉलहूब, सुजी झालेली ऍलेक्‍स बोरस्टेन आणि स्वतः मिरिअम मिजेल म्हणजेच रिचेल ब्रॉस्नहन या तिघांचं.

विचित्र वागणारा; पण मनानं भावनाशील असणारा बाप कसा असतो हे टोनीनं तंतोतंत दाखवलंय. त्याचं ते रॅंडम वागणं बघताना हसूनहसून पुरेवाट होते. मिरिअमचं टॅलेंट ओळखणारी सुजी ही कथेची खरी हिरो. मिरिअमचा परफॉर्मन्स बघून झालेला आनंद, तिचे निर्णय ऐकून आलेलं फ्रस्टेशन आणि मिरिअमच्या पतीबद्दल असलेली चिडचिड सुजी अक्षरशः डोळ्यातून दाखवते. "काही नाही तर प्लीज सुजीसाठी तरी चांगला परफॉर्मन्स दे,' असं आपल्याला वाटत राहतं. हेच सुजी म्हणजे ऍलेक्‍स बोरस्टेन हिचं मोठं यश आहे. मिरिअम म्हणजे रिचेल ब्रॉस्नहनबद्दल काय बोलायचं?.... जादूगारासारखी येते आणि आपला कितीही वाईट मूड असला तरी मन प्रसन्न करून जाते. संवादफेकीतून जिंकतेच; पण बऱ्याच वेळा एकही संवाद नसूनसुद्धा ती अनेक सीन्समध्ये बाजी मारून जाते. तिचं चालणं, बोलणं, नाचणं, खूश होणं सगळ्यांतच एक प्रकारची ऊर्जा आपल्याला दिसते, त्यामुळंच सीझनच्या शेवटच्या एपिसोडच्या शेवटच्या सीननंतर आपल्याला मिस मिजेलला अजून बघायची इच्छा होते; पण थांबण्याशिवाय पर्याय नसतो.

कलाकार, लेखक, दिग्दर्शकांबरोबरच या मालिकेची भावलेली गोष्ट म्हणजे मालिकेसाठी उभं केलेलं 1960चं न्यूयॉर्क. तेव्हासारखे रस्ते, इमारती, गाड्या, लोकांची बोलण्याची स्टाईल, हॉटेल्स, घरं, फर्निचर आणि सर्व पात्रांनी घातलेले कपडे 1960चा काळ अगदी जशाचा तशा उभा करतात. सहसा गजबजलेलं दिसणारं न्यूयॉर्क आपल्याला एकदम क्‍यूट वाटायला लागतं.

हसवण्याचा व्यवसाय असलेले हे कॉमेडियन्स, त्यांची बॅकग्राउंड, त्यांना सहन करावी लागणारी आव्हानं हे सगळं आपल्याला या मालिकेमुळं बघायला मिळतं. अशी ही आपलंसं करणारी, हसवणारी, मन प्रसन्न करणारी मिस मिजेल लोकांच्या पसंतीस तर पडलीच; पण त्याचबरोबर या वर्षीच्या एमी अवॉर्डसमध्ये तब्बल सहा पुरस्कारही या मालिकेनं पटकावले आहेत. अफाट मनोरंजन करणाऱ्या, स्वतःच्या "पायावर उभं' राहण्यासाठी "स्टॅंड-अप कॉमेडी'चा पर्याय निवडणाऱ्या मार्व्हलस मिस मिजेलला आपल्याकडून "स्टॅंडिंग ओव्हेशन!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com