‘माती’शी जोडला गेलेला ‘ग्लोबल’ तालसम्राट! (स्वप्नील जोगी)

स्वप्नील जोगी jogs.neil@gmail.com
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

सत्तरी पार केल्याच्या अनेक खुणा त्यांच्याकडं पाहिल्यावर जाणवतात...पण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली, की ती एकेक खूण नाहीशी होत जाऊन पुढ्यात उरतं ते एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्त्व. हे व्यक्तिमत्त्व एरवी मितभाषी असलं, तरी ‘घटम्‌’बद्दल बोलू लागलं की अगदी भरभरून बोलणारं.

सत्तरी पार केल्याच्या अनेक खुणा त्यांच्याकडं पाहिल्यावर जाणवतात...पण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली, की ती एकेक खूण नाहीशी होत जाऊन पुढ्यात उरतं ते एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्त्व. हे व्यक्तिमत्त्व एरवी मितभाषी असलं, तरी ‘घटम्‌’बद्दल बोलू लागलं की अगदी भरभरून बोलणारं. मग अशा वेळी त्यांच्याशी बोलणाऱ्याला तमीळ येत नसणं आणि त्यांना स्वतःला हिंदी-मराठी येत नसणं या मर्यादाही धूसर होऊन जातात...आणि सुरू होतो तो त्यांच्या घटम्‌साधनेचा संवाद...कधी त्यांच्या तोडक्‍यामोडक्‍या इंग्लिशमधून, कधी ‘दुभाषा’ म्हणून त्यांच्या नातवानं केलेल्या मदतीतून, तर कधी त्यांच्या कडक झालेल्या अन्‌ वाजवून वाजवून चिरा पडलेल्या बोटांच्या पेरांमधून! विक्कु विनायकराम आपला घटम्‌सोबतचा प्रदीर्घ प्रवास असा शब्दांसह आणि शब्दांवाचूनही उलगडत जातात.

विक्कु विनायकराम. थेटाकुडी हरिहर विनायकराम असं मूळ नाव असणारा हा कलाकार ओळखला मात्र जातो ते त्याच्या ‘विक्कु’ या ‘स्टेजनेम’नंच. अभिजात भारतीय संगीतपरंपरेतलं आणि कर्नाटकी शैलीतलं प्राचीन तालवाद्य घटम्‌ हे आज जगभरात ज्यांच्या नावानं ओळखलं जातं, ते वादक म्हणजे विक्कुजी. एरवी लोकप्रिय असणाऱ्या इतर तालवाद्यांच्या तुलनेत शिकायला अन्‌ वाजवायलाही कठीण असणारं, मातीपासून बनलेलं घटम्‌ विक्कुजींनी वयाच्या दहाव्या वर्षी जे हातात घेतलं, ते थेट आजपर्यंत! आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासातून त्यांनी या वाद्याला शब्दशः ग्लोबल व्यासपीठ तर मिळवून दिलंच; पण आजची भारतातली घटम्‌वादकांची जवळपास सगळी पिढीही त्यांच्याच प्रेरणेतून तयार झाली आहे...

‘‘संगीतसाधनाच करायची होती, तर घटम्‌सारखं त्या काळी फारसं प्रचलित नसणारं वाद्यच का निवडलं तुम्ही?’’ या प्रश्नाचं उत्तर क्षणाचाही विलंब न लावता ‘आप्पांमुळं’ असं देऊन विक्कुजी मोकळे होतात. त्याचं कारणही तसंच आहे. लहानग्या विक्कु याला घटम्‌सारख्या वाद्याची बाराखडी त्यांच्या आप्पांनी अर्थात वडिलांनी (हरिहर शर्मा) यांनीच तर बोट धरून शिकवली होती. ‘‘मी अस्सल भारतीय मातीतलं घटम्‌ वाजवावं आणि तेवढ्यावरच न थांबता त्याला जगभरातल्या लोकांपर्यंत न्यावं, त्याचा प्रसार करावा, असं माझ्या आप्पांचं स्वप्न होतं. पुढं पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलासोबत बाबांचं हे स्वप्न मी मनात अधिकाधिक दृढ करत गेलो आणि घटम्‌ शक्‍य तेवढ्या लोकांपर्यंत नेत राहिलो...’’ विक्कु सांगतात.
स्वतः एक उत्तम संगीतज्ञ अन्‌ निष्णात मृदंगवादक असणारे हरिहर यांना त्यांची बोटं एका अपघातात गमवावी लागली, त्या वेळी विक्कु केवळ १० वर्षांचे होते. हरिहर यांच्या वादनातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. आता वादनच थांबलं म्हटल्यावर पुढं काय, हा मोठाच प्रश्न होता. आणि याच वेळी घरातला ‘कर्ता’ म्हणून लहानगा विक्कु मोठ्या निर्धारानं पुढं आला. पुढची काही वर्षं त्याची शाळाही बंद झाली; पण हरिहर यांनी आपल्या मुलाला मृदंगासह घटम्‌वादनातही पारंगत केलं. कुणी वाजवत नसलेलंच वाद्य आपल्या मुलानं निवडावं, या इच्छेतून त्यांनी विक्कुला घटम्‌कडं वळवलं... आणि या निर्णयातून एकीकडं त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ तर सुरू झालाच; पण दुसरीकडं भारतातल्या एका अनन्यसाधारण घटम्‌साधकाचा उदयही त्याच वेळी होत होता...

ज्या काळात विक्कुजींनी विविध गायकांच्या साथीला घटम्‌वादन करायला सुरवात केली, त्या काळात स्त्री-कलाकाराला साथ करणारे आणि पुरुष-कलाकाराला साथ करणारे असे संगतकार वेगवेगळे असत आणि ते ठरलेले असत. विक्कुंचं वेगळेपण मात्र त्यातही असं, की त्यांनी स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही गायकांसोबत घटम्‌ची साथ द्यायला सुरवात केली. एम. एस. अम्मा (सुब्बलक्ष्मी), एल. शंकर, लालगुडी जयराम, सेम्मगुडी श्रीनिवास अय्यर अशा अनेक गायक-वादक कलाकारांसोबत घटम्‌ची संगत केल्यानंतर एकल वादनात आणि उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय संगीतपरंपरेतल्या अन्‌ परदेशी कलाकारांसोबतच्या अनेक जुगलबंदींमध्ये विक्कुजींचा सहभाह अपरिहार्य झाला. या सगळ्या आठवणी एखाद्या कॅलिडोस्कोपसारख्या ते एकापाठोपाठ एक उलगडत गेले.

इतर तालवाद्यांच्या तुलनेत घटम्‌वादन कठीण असण्याचं मुख्य कारण म्हणजे हे वाद्य ‘ट्यून’ करता न येण्याची त्याची मर्यादा. एकदा हे वाद्य घडवलं गेलं की त्यात पुन्हा कसलाही बदल करता येण्याची शक्‍यता नसते. माती आणि काही धातूंच्या मिश्रणातून तयार होणारं हे वाद्य. झालंच तर पाणी भरून सुरावटी बदलता येण्याचीच तेवढी शक्‍यता...पण प्रत्येक वाद्य दुसऱ्यापेक्षा वेगळं. वेगवेगळ्या स्वरमिश्रणांचं. विक्कुजी सांगतात ः ‘मैफलीत वादन करताना चार वेगवेगळ्या घटम्‌चं सादरीकरण करताना विशेष काळजी घ्यावी लागते. प्रसंगानुरूप वादनशैलीत बदलही करावे लागतात; पण योग्य वेळ साधून अन्‌ नियंत्रितपणे वाजवलं, तर हे वाद्य एक सर्वोत्तम अनुभूती नक्कीच देऊ शकतं...’

विशीच्याही आत असताना अम्मा अर्थात साक्षात्‌ एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यासोबत त्यांना साथसंगत करणारा एक सहकलाकार म्हणून पहिल्यांदा देशाबाहेर कला सादर करण्याची संधी विक्कुजींना मिळाली. पुढं ते घटम्‌मधला ‘अंतिम शब्द’ जेव्हा झाले, तेव्हा आपल्या सोलो सादरीकरणासाठीही ते वेगवेगळ्या देशांत जात राहिले, आजही जातात. मात्र, आपली अस्सल भारतीय मातीशी जुळलेली नाळ त्यांनी तशीच ठेवली. पुढं संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण अन्‌ पाठोपाठ ‘ग्रॅमी’सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान करण्यात आला. संपताना त्यांनी सांगितलेले विचार म्हणूनच मनात घर करून जातात. ते म्हणाले ः ‘‘आप्पांनी जो दिवा माझ्या घटम्‌रियाजाच्या वेळी घरातल्या अंधाऱ्या खोलीत उजळलेला असायचा, तो तेव्हा माझ्या हृदयातही उजळला गेला असावा कदाचित...आज त्या दिव्याच्या ज्योतीमुळंच माझी साधना फलद्रूप होऊ शकली आणि मी आप्पांचं स्वप्न पूर्ण करू शकलो...’’

----------------------------------------------------------------------
विक्कुज्‌ थ्री जी!
विक्कु विनायकराम यांचं संपूर्ण कुटुंबच संगीताच्या क्षेत्रात गुंतलेलं. स्वतःप्रमाणेच त्यांनी आपला मुलगा सेल्वगणेश यालाही घटम्‌वादनाकडं वळवलं आणि आज सेल्वगणेश यांचंही या क्षेत्रात मोठं नाव आहे. विक्कुजींच्या नातवानं स्वामिनाथन यानं- मात्र घटम्‌चं सर्व शिक्षण घेऊनही करिअरचा भाग म्हणून निवडलं ते खंजिरा हे वाद्य. कारण काय, तर एकाच हातानं तालवाद्य वाजवण्यातलं आव्हान पेलण्याची मजा काही औरच असल्यामुळं !... आज स्वामी जरी मैफलींमध्ये घटम्‌ वाजवत नसला, तरी आपल्या आजोबांसोबत तो त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात खंजिरावादनाची साथसंगत करत असतो. त्यातही तो काही मिनिटांचं जे स्वतंत्र एकल सादरीकरण करतो, त्यात तो सतत नवनवे प्रयोग करत राहतो. त्यानं स्वतःच्या कल्पनेतून घडवलेलं, दोन वेगवेगळ्या स्वरनिर्मिती करणारं ‘दुहेरी खंजिरा’ हे वाद्य अनेकांची दाद मिळवून जातं. आजोबा-वडील-नातू अशा या तिन्ही पिढ्या एकत्र ‘विक्कुज्‌ थ्री जी’ या नावानं तालवाद्यांच्या सादरीकरणाची आगळीवेगळी मैफलही एकाच मंचावर सादर करतात.
----------------------------------------------------------------------
घटम्‌ माझ्यासाठी आहे बाळासारखं!
‘‘तुमचं घटम्‌शी असणारं नातं काय,’’ या प्रश्‍नावर विक्कुजींनी दिलेलं उत्तर मोठं बोलकं होतं. ते म्हणाले ः ‘‘घटम्‌ म्हणजे माझ्यासाठी माझ्या बाळासारखंच आहे. मला सांगा तुम्ही, दुसरं कोणतं असं वाद्य आहे, जे तुम्ही आपल्या पोटाशी असं घट्ट धरून वाजवता...? नाहीच असं दुसरं वाद्य. घटम्‌ मात्र तसं आहे! ते पोटाशी घेऊन, जवळ घेऊन वाजवताना त्याच्याशी माझं आगळंच नातं तयार होऊन जातं.’’
----------------------------------------------------------------------
आप्पांच्या शिस्तीतलं ते एक वर्ष...
विक्कुजी सांगतात ः ‘‘आप्पा मोठे शिस्तीचे होते. माझ्यासोबत तेही तासन्‌ तास सरावाच्या वेळी थांबून असायचे. शिकायला सुरवात केल्यानंतर वर्षभरातच त्यांनी मला एखाद्या तयारीच्या वादकासारखं बऱ्याच प्रमाणात घडवलं. पहाटे चार वाजता माझा दिवस सुरू होत असे. आमच्या घरातल्या एका अंधाऱ्या खोलीत ते एक दिवा तेवत ठेवायचे. ‘हा दिवा विझेपर्यंत तुझा रियाज सुरू राहिलाच पाहिजे,’’ अशी त्यांची कडक सूचना मला असायची. एकेक धडा याच वेळापत्रकातून आम्ही संपवला; पण खरं सांगू का- त्या वर्षभरात जे ‘तालनिधान’ मला मिळालं, त्या ‘तालनिधाना’च्या बळावरच मी ही आतापर्यंतची वाट चालू शकलो आहे...!’’

----------------------------------------------------------------------

Web Title: swapnil jogi's saptarang article

फोटो गॅलरी