तामिळनाडूच्या चिनम्मा शशिकला यांचा राजकीय प्रवास

तामिळनाडूच्या चिनम्मा शशिकला यांचा राजकीय प्रवास
तामिळनाडूच्या चिनम्मा शशिकला यांचा राजकीय प्रवास

अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर आता अपेक्षेप्रमाणे राज्याच्या चिनम्मा शशिकला या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.  शशिकला यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्याच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते. मंगळवारी तमिळनाडूत घडलेल्या काही राजकीय घडामोडीनंतर ओ. पनीरसेल्वम यांना पदावरून हटविण्यात आले आहे. यामुळे एका नव्या वादाला वळण मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शशिकला यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहणे आवश्‍यक आहे.

शशिकला यांच्यासाठी राजकारण नवे नसले, तरीसुद्धा अण्णा द्रमुक एकसंध ठेवत विरोधकांना गप्प करण्याचे दुहेरी आव्हान त्यांना पेलावे लागेल. जयललिता यांची सावली म्हणून वावरलेल्या शशिकला यांचा राजकीय प्रवास देखील अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे.

सत्ताकेंद्र
जयललिता आणि शशिकला यांची भेट 1980 मध्ये झाली होती, त्या वेळी शशिकला यांच्याकडे पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी होती. पुढे जयललिता या जेव्हा "अण्णा द्रमुक'च्या प्रमुख बनल्या तेव्हा शशिकला यांचा खास मर्जीतील लोकांमध्ये समावेश झाला. मागील दोन ते तीन दशके जयललिता आणि शशिकला या दोघी मैत्रिणी तमिळनाडूचे सत्ताकेंद्र बनल्या होत्या.

कटाचा आरोप
जयललिता यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप शशिकलांवर झाल्यानंतर 2011 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, शशिकला यांनी आपले पती नटराजन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जयललिता यांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर शशिकला यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर जयललिता यांनी त्यांचे निलंबन रद्द केले होते.

आणीबाणीत मदत
अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांचे 1987 मध्ये निधन झाल्यानंतर जयललिता यांना अत्यंत अवमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले होते. या आणीबाणीच्याप्रसंगी जी मोजकी मंडळी जयललिता यांच्या बाजूने उभी होती, त्यांमध्ये शशिकला यांचाही समावेश होता. जयललिता पक्ष आणि राज्याच्या प्रमुख बनल्यानंतर शशिकला यादेखील पोएस गार्डन या त्यांच्या निवासस्थानी राहायला गेल्या.

सुधाकरनचे शाही लग्न
शशिकला यांचा मुलगा सुधाकरनला जयललिता या मानसपुत्र समजत असत. सुधाकरनच्या 1996 मध्ये झालेल्या विवाह समारंभासाठी जयललिता यांनी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. विरोधकांनी यावरून अम्मांविरोधात राज्यभर रान पेटविले होते. त्याची मोठी किंमत जयललिता यांना त्याचवर्षी झालेल्या निवडणुकीत मोजावी लागली होती. याप्रकरणी शशिकलांना अटक झाल्यानंतर मात्र दोघींमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला होता; पण तोही फारकाळ टिकला नाही.

दीपा माधवनचा विरोध
जयललिता यांची भाची दीपा माधवन हिने मात्र शशिकला यांच्याहाती सत्ता सोपविण्यास विरोध केला आहे. ज्या पद्धतीने लष्करी राजवटीमध्ये बदल होतो, तसाच काहीसा बदल येथे झाला आहे. राज्यातील जनता हा निर्णय कधी स्वीकारणार नाही. शशिकला या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नाहीत, असे तिने म्हटले आहे. याविरोधात दीपा न्यायालयातही धाव घेऊ शकते.

विरोधकांची टीका
राज्यातील या सत्तांतरास आता विरोधी पक्ष द्रमुकनेही आक्षेप घेतला आहे. राज्यातील जनतेने जे. जयललिता यांच्या बाजूने कौल दिला होता, हा कौल जयललिता यांच्या नातेवाइकांच्या बाजूने नव्हता किंवा तो पनीरसेल्वम यांनाही नव्हता. आता राज्यातील सरकार हे लोकांनी निवडून दिलेले सरकार राहिलेले नाही, असा घणाघाती आरोप द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com