लहान मुलांचा आधार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanbarwadi Hostels
लहान मुलांचा आधार !

लहान मुलांचा आधार !

समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या, महाराष्ट्र व गोवा राज्यातील स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म नवीन वर्षात सुरू ठेवण्यात येत आहे. ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून ‘समाजभान’ सदरात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात ‘अवनि’ या संस्थेची माहिती ...

बेळगाव जवळच्या एका छोट्या गावातून कोल्हापूर येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासहित आलेले परशराम कांबळे आपला अनुभव सांगत होते, ‘आम्ही गावाहून वर्षातील पाच-सहा महिने वीटभट्टीवर कामासाठी आलो की, अवनि संस्थेचे कर्मचारी आमच्या वस्तीवर येत व मुलांची माहिती घेऊन, त्यांना शाळेत पाठविण्यास सांगत. तसंच, वीटभट्टीवर लहान मुलांना काम करू देऊ नका, असंही कळकळीने सांगत.

काही दिवसांनी आमच्या वस्तीवरच ते मुलांसाठी शाळा सुरू करत. दिवसभर कामाच्या नादात आमची मुलं कुठं आहेत, काय करत आहेत, त्यांनी काही खाल्लं असेल का, या सर्वांचा आम्हाला विसर पडत असे; पण शाळेतच मुलं शिक्षणाबरोबर खेळत होती, पोटभर जेवत होती, हे सर्व पाहून आम्हाला आनंद झाला. तसंच, कोरोना व लॉकडाउनमध्ये आमचं काम बंद झालं आणि आम्ही आमच्या गावी जाऊ शकलो नाही, तेव्हा आम्हाला सुरक्षिततेची सर्व साधनं व जीवनावश्यक वस्तू - अन्नधान्य व इतर सर्व गोष्टी अवनि संस्थेने दिल्या, त्यामुळे आम्ही जगू शकलो. आता आम्ही आमच्या मुलांना शिकवून खूप मोठं करणार आहोत.’’

‘अवनि’ संस्थेची स्थापना सन १९९४ मध्ये सांगली येथे अरुण चव्हाण (आता ते हयात नाहीत) यांनी केली. संस्थेचं कार्य अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वीटभट्टी व ऊसतोडणीकरिता विदर्भ व मराठवाड्यातून असंख्य कुटुंबांचं स्थलांतर होत असतं. स्थलांतरित कामगारांना हंगामानुसार व मिळणाऱ्या कामानुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुटुंबासहित सतत स्थलांतर करावं लागतं. अशा स्थलांतरित कुटुंबांतील लहान मुलांच्या शिक्षणात खंड पडून, ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. यांपैकी बहुसंख्य मुलांना बालकामगार म्हणून काम करावं लागतं. वीटभट्टी व इतर ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांचं प्रमाण फार मोठं असून, परिणामी पुढे ही मुलं व्यसनाधीनतेकडे व गुन्हेगारीकडे वळतात. स्थलांतरित कामगारांच्या मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. अशा मुलांना बालकामगारमधून मुक्त करून, त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणून, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अवनि संस्थेकडून अनेक समाजविधायक उपक्रम राबविले जातात.

अवनि बालगृह : अवनि संस्था गेल्या २८ वर्षांपासून निराधार, वंचित, शाळाबाह्य, एकलपालक, वीटभट्टीवर काम करणारी मुलं, भंगार गोळा करणारी मुलं व कचरावेचक वस्तींमधील मुली यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अवनि बालगृह’ हा प्रकल्प चालवते. या प्रकल्पात मुलामुलींच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व मानसिक आरोग्य या गरजा पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत संस्थेमार्फत अकरा हजार पाचशे मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

वीटभट्टी व साखरशाळा प्रकल्प : अवनि संस्थेमार्फत वीटभट्टी व साखरशाळा उपक्रम राबविले जातात. वीटभट्टी व साखर कारखाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुटुंबं रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. अशा कुटुंबांतील तीन ते पाच वयोगटातील मुलांसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा येथे वीटभट्टी व साखरशाळा प्रकल्प राबविले जातात.

संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड व सातारा या ठिकाणी शाखा असून, आतापर्यंत अवनि संस्थेमार्फत बावन्न हजार बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आहे. तसंच, संस्थेने २८ वर्षांच्या कालावधीमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा येथील कचरावेचक, विधवा, परित्यक्ता, निराधार व गरजू सतरा हजार महिलांचं संघटन करून, त्यांना शासकीय योजना व रोजगार यांची उपलब्धता करून दिली आहे.

सध्यपरिस्थितीत संस्थेचे सांगली व सातारा येथे ३४ डे केअर सेंटर सुरू आहेत. यांमध्ये ३ ते ५ वयोगटातील ११५० बालकांना शिक्षणाची गोडी लावली जाते, तसंच ७ ते १४ वयोगटातील ७५४ बालकांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार देऊन, प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून, त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणलं आहे. संस्थेमार्फत दररोज २७७ बालकांना दुपारचा पोषण आहार दिला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हणबरवाडी येथे वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची इमारत बांधली आहे. येथे सध्या ४५ मुलींचं संगोपन केलं जातं; परंतु जागा अपूर्ण असल्यामुळे दोनशे मुलींचं निवासी वसतिगृह सुरू करण्याकरिता इमारतीचं नवीन बांधकाम करण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. अवनि संस्थेच्या या सामाजिक कार्यांसाठी आपल्या सर्वांच्या सामुदायिक मदतीची गरज आहे.

‘अवनि’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘अवनि’ या संस्थेच्या उपक्रमांची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘अवनि’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Avani Organization Hanbarwadi Hostel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFAsaptarang