हा खेळ महत्त्वाकांक्षांचा! (तेजल राऊत)

tejal raut
tejal raut

भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे आणि या "खेळा'विषयीही क्रिकेटप्रमाणेच खूप बोललंही जातं. अर्थात हा "खेळ' खेळलाही जातोच जातो...या खेळाचं नाव आहे पॉलिटिक्‍स! Politics really ticks Indians!
तेव्हा आज अशाच एका वेबसिरीजवर लिहीत आहे...तिचं नाव आहे "हाऊस ऑफ कार्डस'. अमेरिकी राजकारणावर आधारित ही सिरीज आहे. या सिरीजमध्ये दोन मध्यवर्ती पात्रं आहेत. फ्रॅंक अंडरवूड आणि क्‍लेअर अंडरवूड. ही नवरा-बायकोची जोडी आहे. केविन स्पेसीनं फ्रॅंक साकारला आहे आणि रॉबिन राईटनं क्‍लेअर.
फ्रॅंक हा डेमोक्रॅटिक पक्षातला कॉंग्रेसमन आणि व्हिप आहे. सभागृहात जी विधेयकं संमत होतात त्यासाठी लागणाऱ्या मतांसाठी सदस्यांचा पाठपुरावा करणं, कधीकधी त्यासाठी बळाचा वापर करणं अशी त्याची कार्यशैली. त्याची बायको क्‍लेअर ही "क्‍लीन वॉटर इनिशिएटिव्ह' या संस्थेची प्रमुख आहे.

दोघांनाही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत आणि त्यासाठी "काहीही' करण्याची त्यांची तयारी आहे. फ्रॅंकला "सेक्रेटरी ऑफ स्टेट' हे पद देण्याचं आश्‍वासन दिलं गेलेलं असतानाही ते पाळलं जात नाही; त्यामुळे तो चिडून असतो. "रिव्हेंज इज द डिश बेस्ट सर्व्हड्‌ व्हेन कोल्ड' हे तत्त्वज्ञान वापरत तो त्याची खेळी खेळू लागतो. साम-दाम-दंड-भेद सगळं वापरून तो त्याला जे हवं आहे, ते मिळवण्याकडं कशी वाटचाल करतो, ते या सिरीजचं कथानक आहे.

पहिला सीझन, पहिला एपिसोड, पहिला सीन : एका घरासमोरच्या रस्त्यावरून एक गाडी कुत्र्याला उडवून जाते. कुत्रा विव्हळू लागतो. तो आवाज ऐकून त्या घरातून फ्रॅंक धावत खाली येतो. कुत्र्याला पाहून प्रेक्षकांकडं पाहून तो म्हणतो ः "जगात दोन प्रकारची दुःखं/दुखणी असतात... एक, जे तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवतं आणि दुसरं, ज्याचा काहीही उपयोग नसतो आणि त्या दुसऱ्या दुखण्यासाठी माझ्याकडं वेळ नाही.' त्यानंतर मग तो स्वतःच्या हातांनी त्या कुत्र्याचं दुखणं संपवतो (म्हणजे कुत्र्याला संपवतो). इथून फ्रॅंकचं "रूथलेस', निर्दयी, कठोर व्यक्तिमत्त्व हळूहळू समजायला सुरवात होते. केविन स्पेसीनं साकारलेला फ्रॅंक निव्वळ अप्रतिम आहे. फ्रॅंकच्या व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावरचा थंड, शांत, प्रसंगी, मिश्‍किल भाव त्याच्या आत चाललेली खळबळ बेमालूमपणे लपवत बुद्धिबळाचा डाव खेळत राहतो...त्याला स्पेसीनं पुरेपूर न्याय दिलाय. या व्यक्तिरेखेची खासियत अशी, की एखादा सीन सुरू असताना फ्रॅंक अधूनमधून प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो. तो त्या क्षणी जे करतोय, त्याच्या मागं त्याची काय खेळी/विचार आहेत हे तो प्रेक्षकांशी शेअर करतो आणि असं करून तो सीन तो आणखी "इन्टेन्स' करतो. वर म्हटल्यानुसार फ्रॅंक हा साम-दाम-दंड-भेद सगळं वापरतो. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या फ्रॅंकची स्वप्नं खूप मोठी आहेत. त्यासाठी जे करता येईल ते तो करतो आणि त्याबद्दल त्याला खेदही नाही नि खंतही नाही. "अरेरे, एखादी गोष्ट मी अशी करायला नको होती,' हे त्याच्या स्वभावात नाही. कुठल्याही बाबतीत दयामाया नसलेलं ते पात्र आहे. प्रत्येक गोष्ट करण्यामागं त्याचा सुप्त हेतू आहे. फ्रॅंक जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करतो, तेव्हा ती व्यक्ती परतफेड करू शकेल ना आणि कशा प्रकारे करू शकेल, याची व्यूहरचना त्याच्या
डोक्‍यात ठरलेली असते. राजकारणी कुणीही असो...अखेर तीही व्यक्ती भाव-भावना, आशा-अपेक्षा, असणारी असते. अश्‍या राजकारण्यांच्या अंतस्थ भावनांना हात घालणं फ्रॅंकला छान जमतं आणि त्याचा वापर करत त्याची त्याच्या महत्त्वाकांक्षेकडं घोडदौड सुरू राहते...

त्याची बायको आहे क्‍लेअर अंडरवूड. एकदम तरतरीत अशी. ऐषोआरामाची, चैनीत राहण्याची तिला सवय. त्याचबरोबर तेवढीच धूर्त आणि रोखठोक, फटकळ. क्‍लेअरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करण्यासाठई शब्दही अपुरे पडावेत! तिचंही स्वतःच एक विश्व आहे, महत्त्वाकांक्षा आहेत. नवऱ्याच्या महत्वाकांक्षेसाठी त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी क्‍लेअर प्रसंगी (तिच्या स्वप्नांना डावललं गेलं म्हणून) त्याच्या पाठीत खंजीर खुपसायलाही कमी करत नाही. त्याबाबतीत ती फ्रॅंकसारखीच निर्दयी आहे. फ्रॅंकच्या "मॅनिप्युलेटिव्ह' स्वभावामुळे तो अप्रिय अनेकांना अप्रिय आहे. अशाच अनेकांमधल्या एकाला ती म्हणते ः "फ्रॅंकनं मला प्रपोज केलं तेव्हा तो मला म्हणाला होता, की एरवीची जोडपी करतात तशी लाडीगोडी मी तुझ्याशी करणार नाही...मी तुला मूल-बाळ देणार नाही...पण तुझ्या आयुष्यातला एकही दिवस कंटाळवाणा जाणार नाही, हे मी पाहीन. मला प्रपोज करणारे बरेचजण होते; पण मला ओळखणारा फ्रॅंक एकटाच होता आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं.''
थोडक्‍यात, फ्रॅंक आणि क्‍लेअर हे दोघं नवरा-बायकोपेक्षाही "पार्टनर्स' अधिक आहेत; त्यातही "पार्टनर्स इन क्राईम' असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. त्यांचा संसार एरवीच्या जोडप्यांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याची उकलही प्रत्येक एपिसोडमागं होत राहते. थोडक्‍यात, गाठ पडली राजकारणातला एक महत्त्वाचा अँगल म्हणजे मीडिया. एखाद्या पत्रकाराची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा एखाद्या देशाचं समीकरण कसं बदलू शकते, मीडियामुळं, खासकरून सोशल मीडियामुळं कसं "नव्हत्याचं होतं' होतं आणि "होत्याचं नव्हतं' होतं, हेही या सिरीजमध्ये पाहायला मिळतं.

फ्रॅंक आणि क्‍लेअर या दोघांव्यतिरिक्त सिरीजमध्ये बरीच पात्रं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं एक पात्र म्हणजे डग स्टॅम्पर. सिरीजच्या सुरवातीला फ्रॅंकचा "चीफ ऑफ स्ट्रॅटेजी' असलेला डग फ्रॅन्कचा उजवा हातही आहे. त्याला फ्रॅंकची सगळी अंडीपिल्ली, गुप्त गोष्टी, रहस्यं माहीत आहेत.यातल्या अनेक "रहस्यां'मध्ये तो स्वतःही सामील आहे आणि ही सारी गुपितं त्याच्याकडं सुरक्षित आहेत. एखादी व्यक्ती एखाद्याशी किती एकनिष्ठ असू शकते त्याचं उदाहरण म्हणजे हा डग स्टॅम्पर. अगदी साधा दिसणारा, खालच्या पट्टीत आणि कमीच बोलणारा...पण आपल्या कामात अगदी चोख. डगची भूमिका मायकल केली यानं सुरेख साकारलीय.

सिरीजमधले संवाद, खासकरून फ्रॅंकच्या तोंडचे संवाद जबरदस्त आहेत. कुठलाही संवाद वाया जाणारा नाही. हे त्याच्या स्वभावाला अनुसरूनच! एकदा फ्रॅंकच्या डोक्‍याला दुखापत होते. खरंतर तो ती मुद्दाम ओढवून घेतो. त्यावर बांधलेली पट्टी पाहून क्‍लेअर विचारते ः Does it hurt?सिगारेटचा झुरका घेत फ्रॅंक म्हणतो ः No. I have a thick skin
छोटा डायलॉग आणि छोटी कोटी; पण त्या "सिच्युएशन'बद्दल ती सगळं काही सांगून जाते. "हाऊस ऑफ कार्डस' ही एक नेटफ्लिक्‍स ओरिजिनल सिरीज आहे, सन 2013 ते 2018 दरम्यान हिचे सहा सीझन्स आहेत, सहावा सीझन शेवटचा आहे. राजकारण, बुद्धिबळाच्या चाली, संवाद, अभिनय यापैकी कशाचीही आवड असेल तर नक्की पाहा "हाऊस ऑफ कार्डस'!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com