चरखा, चप्पल आणि चेंजमेकर! (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 17 जून 2018

भारतापुढच्या आर्थिक आव्हानांचा विचार करताना आपल्याला अनेक मार्गांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध विषयांत मूलभूत संशोधन, ग्रामोद्योग व शेतीमालाची निर्यात या तीन क्षेत्रांत प्रचंड वाव आहे व सध्या तरी स्पर्धा कमी आहे.

आईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध प्रकारचं मीठ देतात. ब्राझील असो की व्हिएतनाम, कॅनडा असो की दक्षिण आफ्रिका...जगातले अनेक देश तिथल्या पारंपरिक पदार्थांना व वस्तूंना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतातही अलीकडं योग व आयुर्वेद यांचा जगभर प्रसार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत; परंतु आपल्याकडच्या इतर अनेक पारंपरिक वस्तू आपण आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करू शकतो.

कोल्हापुरी चप्पल हे एक साधं उदाहरण. आमच्या लहानपणी आम्ही ती प्रामुख्यानं वापरायचो. आता कोल्हापुरी चप्पल कुठं मिळेल, याची चौकशी करावी लागते. पाश्‍चिमात्य देशात उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरण्याचं, वाळूत बागडण्याचं खूप वेड आहे. लोकांना बाग-बगिच्यात फिरण्याचीही आवड आहे. असे सर्व ग्राहक डोळ्यापुढं ठेवून जगभर व भारतातही कोल्हापुरी चप्पल मोठ्या प्रमाणात विकता येणं शक्‍य आहे; परंतु त्यासाठी वस्तू जरी पारंपरिक असली तरी तिचं मार्केटिंग मात्र आधुनिक पद्धतीनं केलं पाहिजे. तसं झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळू शकेल.

बेल्जियममधला माझा एक मित्र संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बॅंक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांत मोठ्या पदांवर काम करून गेल्या वर्षी निवृत्त झाला. त्याचा मुलगा उच्चशिक्षाविभूषित आहे. मुलानंही आपल्यासारखंच ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात प्रावीण्य मिळवावं, अशी वडिलांची इच्छा होती; पण मुलानं एकदा काही मित्रांच्या सांगण्यावरून इंटरनेटद्वारा चपला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला काही अनुभव नव्हता. केवळ काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. तीन वर्षांत त्यानं चपला विकून एवढी संपत्ती निर्माण केली, की ती वडिलांनी ३० वर्षं आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काम करून जी बचत केली होती, तिच्या दुप्पट होती!

महाराष्ट्रातही जर काही अभिनव पद्धतीनं विचार करणारे व धडाडी असणारे युवक पुढं आले तर कोल्हापुरी चप्पल ही जागतिक बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवू शकेल. आता अशा युवकांना राज्य सरकारकडून समर्थन मिळण्याचीही शक्‍यता आहे.

दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारनं राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचा सभापती म्हणून विशाल चोरडिया या युवकाची नेमणूक केली. त्याला औद्योगिक पार्श्‍वभूमी होती व ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण उद्योग सुरू करण्याची त्याची इच्छा होती.

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडं काही जागतिक नेते व दहशतवादाला प्रतिकार करण्यासंबंधी तज्ज्ञ असलेले विद्वान आले होते. ही माहिती विशालला कुठून तरी मिळाली. त्यानं त्या पाहुण्यांना भेटून महाराष्ट्रातल्या ग्रामोद्योगावर माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. ज्या कारणासाठी ते सर्व विद्वान भारतात आले होते व विशालला त्यांना जे सांगायचं होतं त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता; पण मी अखेर त्याचा आग्रह मानून त्याला बरोबर पाच मिनिटांचा वेळ दिला. त्या वेळात त्यानं पाहुण्यांना मसाले आदी भारतीय पदार्थांचे अनेक नमुने दिले. गमतीची गोष्ट म्हणजे, हे सर्व लोक भारतीय मसाल्यांचे व इतर पदार्थांचे फॅन बनले आहेत, असा निरोप महिन्याभरात मला जगभरातून यायला लागला व राजकीय वर्तुळात भारतीय मसाल्यांबद्दल अनेक ठिकाणी चर्चा झाली. हे विशालनं केवळ पाच मिनिटांत साध्य केलं होतं. आता त्यानं कोल्हापुरी चपला, मध, खादी, बांबू आदींना देशभर व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 

बिहारमध्ये सौरशक्तीवर चालणारा चरखा कुणीतरी तयार केला आहे, असं त्याला कळलं. त्यानं आता महाराष्ट्रात परंपरागत चरख्याऐवजी सौरशक्तीवरचा चरखा ग्रामीण महिलांना वाटून कमी मेहनतीत जास्त खादी-उत्पादन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एकदा मी त्याला फोन करून आकडेवारी विचारली तेव्हा त्यानं विदर्भात व पश्‍चिम महाराष्ट्रात ४००-५०० सौरचरखे वितरित केल्याची माहिती दिली. हा आकडा दर आठवड्याला वाढत जात आहे.

विशालच्या कार्याची आता महाराष्ट्राबाहेर व देशाबाहेरही दखल घेतली जात आहे. या महिन्यात स्पेनमध्ये होणाऱ्या सुप्रसिद्ध होरासिस बैठकीत भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव व विशाल चोरडिया यांना विशेष अतिथी म्हणून भारताच्या भवितव्यासंबंधी काही सकारात्मक कल्पना आंतरराष्ट्रीय समुदायापुढं मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

ग्रामीण भारतात समाजसेवा करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्या विविध क्षेत्रांत अनमोल योगदान देत असतात; परंतु ग्रामीण भागातली नैसर्गिक संपदा ओळखून ती वृद्धिंगत करून जगात एक मानाचं स्थान निर्माण करायचं व त्याचबरोबर खेड्यांत व छोट्या शहरांत रोजगार निर्माण करायचा असे उपक्रम मला खूप कौतुकास्पद वाटतात.

विशालनं हे ध्येय गाठण्यासाठी सरकारी महामंडळाचा सर्जनशील उपयोग केला आहे. पूर्वी या सदरातून ओळख करून दिलेल्या नीलेश निमकर यानं ‘क्वेस्ट’ या शैक्षणिक प्रतिष्ठानचा उपयोग करून शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्माण केला आहे. मनोज हाडवळे यानं कृषी पर्यटनक्षेत्र विकसित करण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग निवडला आहे. त्यानं जुन्नरला ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून सरकारी मान्यता मिळवून देण्यात प्रामुख्यानं हातभार लावला आहे. मुंबई, पुणे व नाशिक अशा तिन्ही शहरांपासून दूर असलेल्या  त्याच्या या ग्रामीण पर्यटनकेंद्रात गेल्या काही वर्षांत हजार ते पंधराशे परदेशी पर्यटक व पाच हजार ते सहा हजार भारतीय पर्यटक येऊन गेले आहेत. या सगळ्यांना मी ‘खरे चेंजमेकर’ मानतो. आज आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात किमान १०-१५, म्हणजे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात नावीन्यपूर्ण रोजगार निर्माण करणाऱ्या ५०० चेंजमेकर युवकांची गरज आहे.

मी जेव्हा युवकांशी संवाद साधतो तेव्हा निवडणुका जिंकण्याची, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वरच्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याची व सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन अमेरिकेत स्थायिक होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले अनेक युवक भेटतात. शहरी व ग्रामीण भागात समाजसेवा करणारे युवकही भेटतात; पण ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी व रोजगार निर्मिती करण्याचे उपक्रम राबवावेत असं वाटणाऱ्या युवकांची संख्या तुलनेनं कमी असते. 

विशालनं आता खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातल्या कृषी व ग्रामीण विभागात चेंजमेकर तयार करण्याचा उपक्रम आखला पाहिजे. त्याला सरकारनं तर मदत केलीच पाहिजे; शिवाय ‘सकाळ समूहा’चं ‘यिन’ (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) हे लोकाभिमुख युवकांचं राज्यव्यापी नेटवर्क, ‘रोटरी’सारख्या सामाजिक संस्था, औद्योगिक संघटना व समाजाच्या इतर घटकांनीदेखील योगदान दिलं पाहिजे, असं मला वाटतं. सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर परिवर्तन होणं नक्कीच शक्‍य आहे.

भारतापुढच्या आर्थिक आव्हानांचा विचार करताना आपल्याला अनेक मार्गांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध विषयांत मूलभूत संशोधन, ग्रामोद्योग व शेतीमालाची निर्यात या तीन क्षेत्रांत प्रचंड वाव आहे व सध्या तरी स्पर्धा कमी आहे. जर आईसलंडसारख्या तीन लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या देशातले ग्रामीण उद्योजक जगभर कोलंबीच्या कवचाचं मलम लोकप्रिय करू शकतात, तर आपल्या युवकांना कोल्हापुरी चप्पल, सौरचरख्यानं केलेली उच्च दर्जाची खादी, आंबा-केळीच्या प्रक्रियेतून केलेले पदार्थ, नाचणीचे लाडू अशा अनेक वस्तू आणि पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेणं आणि त्यांचं तिथं बस्तान बसवणं सहज शक्‍य झालं पाहिजे. जर काही युवकांनी हे मनावर घेतलं तर ग्रामीण महाराष्ट्रात आपण नक्कीच समृद्धी आणू शकतो.

'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा

Web Title: Though provoking article by sundeep waslekar