‘टेक्’ निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transactions technology Shiv Shankar Menon digital finance political

‘‘आजची निर्णयप्रक्रिया राजकीय इच्छाशक्तीपेक्षा आर्थिक परिणामांवर अधिक अवलंबून आहे.

‘टेक्’ निर्णय

भारताचे माजी परराष्ट्रसचिव शिवशंकर मेनन हे जागतिकीकरणातल्या परराष्ट्रसंबंधांची उकल करताना सांगतातः ‘‘आजची निर्णयप्रक्रिया राजकीय इच्छाशक्तीपेक्षा आर्थिक परिणामांवर अधिक अवलंबून आहे. कुणाशी कसे संबंध असावेत, हा निर्णय घेताना आर्थिक परिणामांचा सर्वाधिक विचार केला जातो. राजकीय इच्छाशक्ती असो वा नसो, आर्थिक परिणामांनुसार संबंधांचा विचार केला जातो.’’

तंत्रज्ञानाच्या हाती व्यवहार

मेनन यांचं आकलन केवळ परराष्ट्रसंबंधांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. देशांतर्गत निर्णयप्रक्रियाही अधिकाधिक आर्थिक परिणामांच्या शक्यतांवर आधारित बनली आहे. विकास या संकल्पनेतही गुंतवणूक, कररचना, रोजगार, व्यापारातील उलाढाल असे घटक प्राधान्यानं विचारात घेतले जात आहेत.

जगाचा हा बदललेला कल देशात आणि आपल्या गावापर्यंतही पोहोचला आहे. राजकारणी असोत किंवा प्रशासकीय अधिकारी; निधी किती आला, आणला यावर भर देऊन बोलतात. एखाद्या कुटुंबाचा स्तर मासिक उत्पन्न, वस्तूंसाठीचा खर्च यावर ठरतो.

लग्नासारखा कुटुंबातला संवेदनशील निर्णय समोरच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून घेणारी कोट्यवधी कुटुंबं आसपास आहेत. एखाद्या देशातील नागरिक आरोग्यसंपन्न आहेत, म्हणून त्या देशाशी संबंध जोडणारी व्यवस्था अस्तित्वात नाही. सारी निर्णयप्रक्रिया आर्थिक निकषांशी जोडली गेली आहे.

डिजिटल गुड्सची संकल्पना

भारताचे परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर नुकतेच पुण्यात येऊन गेले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आजच्या जगातल्या धोरणांची मांडणी करताना, तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं. त्यांच्याशी झालेल्या संवादातलं सार असं होतंः

‘तुम्ही आज स्क्रीनकडे पाहता तेव्हा नवीन काही शिकत असता; पण तुमच्याबद्दलही नवीन कुणीतरी काही शिकत असतं. हे कुणीतरी म्हणजे डिजिटल. प्रत्येक डिजिटल व्यवहार आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये नवी भर घालत असतो.

त्यातून नवीन आव्हानं निर्माण झालीयत आणि ती आहेत डेटाच्या संबंधीची. तुमचा डेटा कोण पाहतं, कोण सांभाळतं, वापरतं कोण आणि त्यांचा तुमच्या निर्णयक्षमतेवर किती प्रभाव आहे...तंत्रज्ञानातल्या क्लिष्टतेतून मार्ग काढताना आपल्याला या प्रश्नांची उत्तरंही शोधावी लागणार आहेत.’

मेनन यांनी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात फक्त सरकार नावाची व्यवस्था उपयोगी पडणार नाहीय. त्यासाठी सरकारची धोरणांची ताकद आणि खासगी कंपन्या, व्यक्तींची बुद्धिमत्ता एकत्र यावी लागणार आहे. त्यातून निर्माण होणारं नवं तंत्रज्ञान ही पुढची दिशा असणार आहे. या साऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांना ‘डिजिटल गुड्स’ असं संबोधलं जातं.

आर्थिक निकषांवर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या आजच्या जगात तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या डिजिटल गुड्सना कमालीचं महत्त्व येत राहणार आहे. ‘यूपीआय’ किंवा आपण सर्रास वापरत असलेली डिजिटल पेमेंट-व्यवस्था हे डिजिटल गुड्सचं उत्तम उदाहरण.

कागदी नोटांचा वापर

स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर सिसिलिया स्किंगज्ले यांनी, कागदी पैशाचा अंत जवळ आला आहे, असं विधान मे २०१८ मध्ये केलं होतं. ‘सध्याचा कल पाहता रिक्सबँक (स्वीडनची मध्यवर्ती बँक) २०३० मध्ये शेवटची कागदी नोट स्वीकारेल,’ असं त्या म्हणाल्या होत्या.

ही बँक १६६८ मध्ये स्थापन झाली आहे. जगातला आजचा कागदी नोटांचा व्यवहार ज्या बँकांच्या पुढाकारानं सुरू झाला त्यात ही बँक अग्रणी. स्वीडनसारखीच परिस्थिती चीनमध्ये आहे. चिनी बँकांमधला कागदी नोटांचा व्यवहार घटत चालला आहे.

‘द फ्युचर ऑफ मनी’ या पुस्तकात अर्थतज्ज्ञ ईश्वरप्रसाद म्हणतातः ‘‘कोरोनापूर्वी मी चीनमध्ये कामानिमित्त वारंवार गेलो. प्रत्येक वेळी माझ्या पाकिटामधले कागदी युआन अधिकाधिक कालबाह्य वाटत गेले. एखाद्या कॉफी शॉपमध्ये बिल भरण्यासाठी खिशातून कागदी नोटा काढताना मला पाहणारे चिनी मित्र गोंधळून जायचे. बिल भरण्यासाठी मी मोबाईल का वापरत नाही, हा प्रश्न त्यांना पडायचा.’’

ईश्वरप्रसाद यांच्या चिनी मित्रांना जे वाटायचं, ते आज भारतातल्या अनेक शहरातलं चित्र आहे. भारतात गेल्या पाच वर्षांत विद्युत्-वेगानं डिजिटल पेमेंट-व्यवस्था पसरली आहे. कोरोनामुळं या बदलाला खीळ बसली; तथापि, जग जसं जसं कोरोनानंतरचा काळ स्वीकारतं आहे, तसं डिजिटल-व्यवहारांचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं आहे. त्यामुळे, आज ना उद्या कागदी नोटांचा वापर घटणार आहे हे निश्चित.

बदलाची दिशा

तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक व्यवस्था अस्तित्वात येण्याचा हा काळ आहे. जगाचे संबंध आर्थिक निकषांवर बेतले जात असतानाच हा बदल घडून येत आहे. समाजावर या बदलाचे परिणाम होत राहणार आहेत. समाजातले बदल सूक्ष्म पातळीवर घडत असतात. त्यांचा व्यापक परिणाम दिसण्यास काही काळ जावा लागतो.

सन २००० मध्ये मोबाईल हातात घेण्याचं अप्रूप वाटणारा भारतीय समाज आज मोबाईल केवळ बाळगतच आहे असं नाही तर, नातेसंबंध जपण्यापासून ते प्रत्येक क्षणी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांपर्यंतच्या साऱ्या गोष्टी मोबाईलवर करतो आहे. हा बदल दोन दशकांत झाला. हे लक्षात घेतलं तर, आगामी काळातल्या समाजव्यवहारांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान असेल, याचा अंदाज येईल.

पैसा, त्याची शाश्वती, त्याचं भविष्य साऱ्या निकषांच्या मुळाशी आहेत. गेल्या दशकभरात पैशाचे व्यवहार टप्प्याटप्प्यानं तंत्रज्ञानानं आपल्या हाती घेतले आहेत. तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या, ते वापरणाऱ्या, त्याचं विश्लेषण करणाऱ्या व्यवस्थांच्या ताब्यात पैशाचे व्यवहार आले आहेत. स्वाभाविकपणे कुटुंबापासून ते देशादेशांमधल्या संबंधांपर्यंत सर्व क्षेत्रांतल्या निर्णयप्रक्रियांवर तंत्रज्ञानाचा प्रभाव असल्याचा अनुभव पावलोपावली येतो आहे.

टॅग्स :Financesaptarang