निसर्गाच्या कोंदणातला रामदरा 

ramdara
ramdara

वीकएंड पर्यटन 

शहरांमधील कॉंक्रिटच्या जंगलात घुसमटलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी वीकएंडला वर्दळीपासून दूर जाण्याची निकड अनेकांना भासते. एकांत मिळेल, निसर्गाचं सान्निध्य अनुभवता येईल, ही त्यामागची भावना. अशी एक जागा पुणे शहराजवळच आहे, हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरवर असं एक स्थळ आहे. त्याचं नाव रामदरा. अगदी निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. 

प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, अशी कथा सांगितली जाते. एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचं मंदिर आहे. भाविकांना मंदिरात जाता यावं, यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाच्या परिसर वृक्ष आणि लता-पल्लवांनी सुशोभित झाला आहे. तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकंही आहेत. काही वृक्षांभोवती बसण्यासाठी पार बांधले आहेत. 

या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली. त्यानंतर थेट 1970मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर. तथापि, सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम-लक्ष्मण आणि सीता, तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता. मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो. 

मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत. भगवान शंकर तांडवनृत्य करत असलेलेही एक शिल्प आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. पुणे-सोलापूर महामार्गानं अवघ्या एका तासात या ठिकाणी पोचता येतं. मंदिर परिसरात स्थानिकांतर्फे चालवण्यात येणाऱ्या उपाहारगृहात चांगले आणि रुचकर पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही इथं सोय होऊ शकते. 

कसे जाल? : पुण्यापासून 26 किलोमीटरवर. पुण्याहून सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडं एक छोटा रस्ता गेला आहे. या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर. स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि पीएमपीएमलच्या बसही मिळू शकतात. बसनं आल्यास रामदऱ्याकडे रिक्षानं जावं लागतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com