अद्वितीय वास्तुकलेचा नमुना - बनेश्‍वर मंदिर

अद्वितीय वास्तुकलेचा नमुना - बनेश्‍वर मंदिर

वीकएंड पर्यटन
पुणे परिसरातल्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे बनेश्‍वर. पुण्यापासून अवघ्या ३६ किलोमीटरवर भोर तालुक्‍यातल्या नसरापूर गावालगत असलेलं हे स्थळ. पेशवेकालीन मंदिरासाठी आणि मंदिराशी संलग्न असलेल्या उपवनामुळे अधिकच लोकप्रिय झालं आहे. या मंदिराची उभारणी पहिल्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव नानासाहेबांनी १७४९ ते १७५५ या काळामध्ये केल्याचा उल्लेख आहे. या मंदिरासाठी एकूण ११,४२६ रुपये ८ आणे आणि ६ पैसे खर्च झाल्याचाही उल्लेख आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी सभागृहाबाहेरच्या ओवरीतील प्रचंड घंटा लक्ष वेधून घेते. बनावटीवरूनच ती पाश्‍चात्त्य बनावटीची असल्याचं स्पष्ट लक्षात येतं. पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या बसीनच्या (सध्याची वसई) युद्धात चिमाजीअप्पांनी ही घंटा एका पोर्तुगीज चर्चमधून मिळवली आणि ती विजयाच प्रतीक म्हणून बनेश्‍वर देवालयाला अर्पण केली. घंटेवर १८८३ असा स्पष्ट उल्लेख असून, ख्रिस्ती धर्माचं प्रतीक असलेला क्रूसही आहे. बन म्हणजे जंगल आणि ईश्‍वर म्हणजे देव. जंगलातला देव म्हणून बनेश्‍वर. या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्राकाराभोवती तटबंदी होती. प्राकारात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं. तिथं पाण्याचे चार कुंड आहेत. त्यापैकी दोन पायऱ्या उतरल्यानंतर लगेच दिसतात. तिसरे डाव्या हाताला आणि चौथे उजव्या बाजूला आणि गाभाऱ्याजवळ आहे. मंदिराची रचना हेमाडपंती पद्धतीनं काळ्या दगडांत केली आहे. बांधकामामध्ये लाकडाचा वापर अजिबात केलेला नाही. सभागृहाबाहेरच्या स्तंभांवर कोरीवकाम केलं आहे. मंदिराचा डोलारा सांभाळण्यासाठी पायातल्या दगडांना मधोमध छिद्र पाडून त्यात लोखंडी गजांच्या साह्यानं मजबुती दिली आहे. शंकराच्या अनेक मंदिरांप्रमाणंच बनेश्‍वरमध्येही गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावं लागतं. नित्य पूजेतल्या पिंडीखाली छोटं तळघर आहे आणि त्यात पाच शिवलिंग आहेत.

मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभागृहाच्या इमारतीला लागून पाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गिका केल्या आहेत. त्यांचा आकार मृत्युंजय यंत्रासारखा आहे. या मार्गिकेच्या दगडांची रचनाही आगळी आहे. समोरचे दोन आणि डावीकडचा एक, असे तीन कुंड परस्परांशी जोडले आहेत. प्रत्येक कुंडाला दोन आरपार छिद्र आहेत. त्यापैकी खालचं छिद्र छोटं आणि वरचं मोठं आहे. पहिल्या कुंडातल्या पाण्याची पातळी सम राहावी म्हणून ही योजना होती. पहिल्या कुंडातलं पाणी दुसऱ्या कुंडात आणि त्यातून तिसऱ्या कुंडात जातं. तिसऱ्या कुंडातील अतिरिक्त पाणी परस्पर मंदिराच्या प्राकाराबाहेर जातं. या व्यवस्थेमुळे तिन्ही कुंडांमध्ये पाण्याची पातळी समान राहते. या सर्व कुंडांमध्ये जिवंत झरे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गायमुख आहेत. ते जमिनीच्या पातळीखाली आहे. त्याच्या शेजारीच चौथं कुंड आहे. या कुंडातल्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर ते अंतर्गत वाहिनीद्वारे गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर पडतं. पाण्याच्या या अद्वितीय व्यवस्थापनामुळे या मंदिराला जलमंदिरही म्हणतात. मंदिराला लागून वन खात्यानं उपवन विकसित केलं आहे. मंदिराच्या आवारात सभागृहासमोर नंदी आहे. त्याला लागून पहिला कुंड आणि त्यामागं गणेश मंदिर आहे. 

कसे जाल? : पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूरच्या टोल नाक्‍यानंतर थोड्याच अंतरावर नसरापूरचा फाटा लागतो. गाव संपल्यानंतर उजवीकडं जाणाऱ्या रस्त्यानं बनेश्‍वर अवघ्या एका किलोमीटरवर आहे. स्वारगेटहून राज्य परिवहन खात्याच्या बसनंही जाता येतं. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com