काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनो किमान बालेकिल्ले तरी वाचवा!

ज्ञानेश्‍वर बिजले 
Friday, 26 July 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची होणारी पडझड थोपवून धरतानाच विरोधकांना निवडणुकीची तयारी करावयाची असल्याने, त्यांनी आघाडीचा निर्णय लवकर घेतला पाहिजे.

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सत्तारूढ पक्षाचे नेते लागले असताना, विरोधी पक्षातील आमदारांची सत्तारुढ पक्षात प्रवेश करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. पक्षाची होणारी पडझड थोपवून धरतानाच विरोधकांना निवडणुकीची तयारी करावयाची असल्याने, त्यांनी आघाडीचा निर्णय लवकर घेतला पाहिजे. जिंकण्याची शक्‍यता असलेला, चांगला लढाऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविताना त्याचा पक्ष न पाहता, संबंधिताला जागा सोडण्याची तयारी नेत्यांनी दाखविल्यास आघाडी तग धरू शकेल. 

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या तीन ठिकाणी विरोधी पक्षांचे मुख्यत्वे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व जाणवते. या तीन प्रदेशातील आमदारच सध्या सत्तारूढ पक्षाची वाट धरू लागले आहेत. विशेषतः साखर कारखानदार हे कारखान्याचा कारभार सुरळित ठेवण्यासाठी सत्तारूढ पक्षात जाऊ लागले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापाठोपाठ आणखी काही नेते सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी चर्चा करू लागले आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पूर्वीश्रमीचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचेच नेते आता सत्तारुढ पक्षाकडून लढल्याचे दिसून येते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत लोकसभा निवडणुकीत ते जाणवले. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांची विरोधात बसण्याची मानसिकता नसल्याने, सध्या अनेक नेते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षांतही त्या मतदारसंघात नवीन कार्यकर्ता तयार करता आला नाही, हेही प्रकर्षाने दिसून येते. त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांतही चलबिचल सुरू होणार आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत 2014 मध्ये तत्कालिन कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात लोकांत राग होता. तरीदेखील कॉंग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले. त्यातील दहा-पंधराजणांनी जरी पक्ष सोडला, तरी किमान सत्तर आमदार त्यांच्याकडे आहेत. उर्वरीत किमान दोनशे जागा उमेदवारी देण्यासाठी त्यांच्याकडे शिल्लक राहतात. तेथे फ्रेश तरूण चेहऱ्यांना संधी दिल्यास, अनेक मतदारसंघांत चित्र बदलू शकेल. गेल्यावेळी भाजप-शिवसेनेकडे फ्रेश चेहरे होते. यावेळी ती संधी विरोधकांना मिळणार आहे. 

कॉंग्रेस पक्षात दिल्लीत नेतृत्वावरून गोंधळाची स्थिती असली, तरी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. कार्याध्यक्षपदी पाचजणांची नियुक्ती झाली. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात स्थानिक नेत्याला संधी देतानाच, सामुहिकरित्या पक्षाची बांधणी करता येणार आहे. प्रदेश पातळीवर मोठे नेतृत्व नसल्याने, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या भागातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्यास, त्यांना लढाई लढणे तुलनेने सोपे जाईल. विदर्भात गेल्यावेळी भाजपसमोर कॉंग्रेसच उभा ठाकला होता. तेथे कॉंग्रेसचे दहा आमदार आहेत. मात्र, भाजप-शिवसेना युती झाल्यास, किमान पंधरा मतदारसंघात त्यांना शिवसेनेला तोंड द्यावे लागेल. वंचित बहुजन आघाडीही अनेक मतदारसंघांत मतविभाजन करणार असून, निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची बलस्थाने लक्षात घेतल्यावरच तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसणार ते स्पष्ट होईल. त्यामुळे, कॉंग्रेस उमेदवारांची निवड कशी करणार, त्यावर बरेचसे अवलंबून राहील. 

balasaheb thorat

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रात 19, तर मराठवाडा व कोकणात प्रत्येकी आठ आमदार आहेत. मुंबई व विदर्भात त्यांचे स्थान नगण्य आहे. त्यांचे चार खासदार पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाचे प्रतिनिधीत्व करतात. याच भागातच त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल. या भागातील काही आमदारांनी जरी सत्तारूढ पक्षाची वाट धरली असली, तरी तेथे निवडणूक लढविण्याची तयारी असलेले अनेक कार्यकर्ते कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षांत आहेत. त्या नव्या कार्यकर्त्यांना बळ दिल्यास, ते तुल्यबळ लढत देऊ शकतील. 

ajit pawar

शिवसेनेतून अनेकजणांनी पूर्वी सत्तारुढ पक्षांत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे शिवसेना संपली नाही. ती वाढतच गेली. तसेच काहीजण निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेल्याने, त्या त्या भागात तत्कालिन फटका बसला, तरी नवीन नेतृत्व वाढीला लागल्यास, पक्षाला बळकटी येते. 
ते लक्षात घेत, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा निर्णय लवकर घेतला पाहिजे. त्यांचे जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर अन्य मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत विचार करता येईल. पक्षाच्या उमेदवारांची संख्या जास्त ठेवण्यापेक्षा जिंकून येण्याची शक्‍यता असलेल्या जागांवर लक्ष केंद्रीत केल्यासच विरोधी पक्ष मैदानात टिकून राहू शकतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: try to keep hold on key places by NCP and Congress