...तर भारतीयांना पाकचा पंतप्रधान चालेल का?

Tusahar Gandhi
Tusahar Gandhi

सकाळ माध्यमसमूहाच्या साप्ताहिक सकाळच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यानिमित्त उपस्थित राहता आले आणि त्यांना ऐकता आले. त्यांचे व्याख्यान हे खरंच खुप अविस्मरणीय होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडलेली आजच्या समाजाची परिस्थिती ही भयाण वास्तवता दर्शवणारी होती. त्यांच्या व्याख्यानाचा धावता आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून केला आहे.

भारत-पाकिस्तान मुद्यांवर प्रश्नोत्तरांच्यावेळी त्यांनी खास उत्तर दिले ते म्हणजे भारत-पाकिस्तान हे नेहमी एक असावेत असे महात्मा गांधीना वाटायचे. परंतु, ते आता शक्य नाही. पण दोन्ही देशांमधली सीमा नष्ट होऊन दोन्ही देश जर एक झाले तर भारतीयांना पाकिस्तानचा पंतप्रधान चालेल का? तर ते चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

व्याख्यानाच्या सुरुवातीलाच बोलताना तुषार गांधी म्हणाले की, पुण्यासोबत तसे पाहिले तर माझे संबंध हे थोडेसे दुःखद आहेत. बांचा (कस्तुरबा गांधीं) मृत्यू पुण्यात झाला आणि बापूंच्या हत्येचा कटही पुण्यातूनच रचला गेला. पुढे ते त्यांनी बापूंविषयी म्हणजेच महात्मा गांधींविषयी बोलताना म्हटले आहे की, बापूंची छत्र छाया ही विशाल होती. बापूंच्या नंतर अब्दुल कलाम यांना सोडलं तर असा कुठलाही महापुरुष नाही ज्यांचा भारतातील लोकांना आदर्श घेता यावा. सध्या इथली प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी कारणांमुळे लाचार झालेली पहायला मिळत आहे. बापूंनी घालून दिलेले आदर्श जपणे हे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे. समाज बदलायचा असल्यास स्वत:च्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

आजही बापूंच्या स्वप्नातील स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले नाही. बापूंनी देशासाठी पूर्ण स्वातंत्र्याचा विचार केला होता. बापूंची हत्या झाली हे दुर्दैव होते त्यावेळी बापूंची हत्या झाली नसती तर आज त्यांच्या स्वप्नातील वेगळाच भारत आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जर तरच्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकरारचा अर्थ नसतो. म्हणूनच आज आपलं दुर्दैव आहे की आज आपल्याला काल्पनिक गोष्टीत अडकवून ठेवले जात आहे. वास्तविकता पाहण्याची आज कोणालाच इच्छा दिसत नाही. सार्वजनिक जिवनात आज आपण आदर्श मानावे असे कोणीच आपल्याला आपल्या आजूबाजूला भेटत नाही हे खरे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आदर्श मानण्यासारखे खूप लोक आपल्याला मिळत होते. पुरंतु, ७० वर्षात सगळी परिस्थिती बदलली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांसारखे आपण बनण्याचा प्रयत्न करत नाही, त्याची आवश्यकता आपल्याला वाटत नाही. परंतु, आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्यपूर्व काळात बापूंना लोकांची साथ मिळाली होती हे हे खूप महत्वाचे होते. बापूंना त्यावेळी सगळीच लोकं मानत होती असे नाही परंतु, त्यांना न मानणाऱ्या लोकांनीही आपलं आपलं काम त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने केले म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत हे लक्षात घ्यायला हवं.

असे काय झाले की, आपण सात दशकांमध्ये सगळे काही विसरलो आहोत. देशासाठी आज कोणाकडेच वेळ नाही हे कीती मोठे दुर्दैव आहे. थोडाफार वेळ तरी देशासाठी आपण देशासाठी द्यायला नको का? पण आज देशासाठी वेळ द्यायला कोणी तयार नाही. 
प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडायला हवी, पण आपण ती जबाबदारी पार पाडत नाही. पंतप्रधानानी किंवा अन्य कोणीतरी म्हणून देश स्वच्छ होणार नाही. आपल्या देशाला स्वछतेची जाणीव करून द्यावी लागते हे दुर्दैव नाही का...? ही जबाबदारी म्हणून आपण प्रत्येकाने काम करायला हवे. 

लोकशाहीबद्दल बोलताना ते म्हणाले की, पाच वर्षात एकदा मतदान केल्याने देश प्रजासत्ताक राहत नसतो. बाबासाहेबांनी 15 वर्षात सगळे बरोबर येतील असा विचार केला, आणि काही महत्वाच्या तरतुदी केल्या, पण आज 70 वर्षानंतर देखील परिस्थिती भयाण आहे. आज आपल्या देशातच आपण प्रश्न विचारले तर आपल्यालाच देशद्रोही ठरवले जाते, अशी परिस्थिती आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, म्हणून आपण लोकशाही देशात प्रश्न विचारायला शिकले पाहिजे.

बापू खेड्याकडे चला म्हणायचे, पण आज सगळी परिस्थिती उलट दिशेने चालू आहे. शहरांच्या अधीन झालेली खेडी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खेडी पूर्णतः शहरांवर विसंबू राहत आहेत. 
बापूंच्या स्वप्नातील भारत आपल्याला पाहायला मिळत नाही. भारत सुपरपॉवर आहे हे आपणच ठरवलं आहे. मुळात भारत सुपरपॉवर नाही. गावातील लोकांच्या लाचारीची चेष्टा करण्याचे काम आपल्या देशात सध्या चालू आहे. पाण्याची सोय नसल्यामुळे संडास वापरता येणे शक्य नाही, आधी खेड्यांमध्ये पाणी पोहचणे जास्त गरजेचे वाटते. पण त्यावर कोण बोलताना काम करताना दिसत नाही. प्रत्येकवेळी नवीन योजना आणली जाते, परंतु तिच्यात खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी असतात. 
आजची सरकारे फक्त अहंकारी बनत चालली आहेत. त्याचबरोर, आज आपण खाणे पिणे आणि जाती धर्मावर एकमेकांचा द्वेष करायला लागलो आहोत. आपली आस्था दुसऱ्यावरती थोपणे म्हणजे आस्था नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या गोष्टी दुसऱ्यावर थोपणे गरजेचे नाही.

आर्थिक विकासाची निती असायला हवी, म्हणून आज आपण पारंपरिक गोष्टींना विसरता कामा नये हे लक्षात घ्यायला हवे. बापूंनी दिलेली स्वदेशीची घोषणा आपण विसरत चाललो आहोत. एक दिवस असा येईल की खादी सुद्धा परदेशातून येईल. हे खुप मोठे दुर्दैव असेल हे लक्षात घ्या. स्वदेशी व्यवसायाला आपण चालना द्यायला हवी. आपल्याला चांगले नेतृत्व मिळत नाही हेच याबाबतीत आपले खरे दुर्दैव आहे. हिंसक लोकांच्या विरोधात कोणी कोणी उभा राहू शकत नाही हे त्यांना माहीत आहे, म्हणूनच हिंसक ताकद डोकं वर काढत आहे. या सर्व गोष्टींसाठी आपणच जबाबदार आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

आपल्याला सांगितलं जाते की, इंग्रजांनी आपलं विभाजन केलं, पण खरंतर आपल्याच लोकांनी आपलं विभाजन केलं आहे. आपण आपल्याच देशातील लोकांना जाती धर्मावरून आणि विभागावरून भांडत असतो हेच खरे आहे. आपल्याच देशातील लोकांना कुठल्यातरी कराणांवरून मारहाण करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. ते कुठले बाहेरचे नाहीत ते आपल्याच देशातील आहे हे लक्षात ठेवायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com