मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...

तुषार दामगुडे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कोट्यावधींच्या संख्येने रस्त्यावर येत आपापल्या जातीसमुदायाला काही मागण्यांऐवजी तेवढ्याच संख्येने एकत्र येत "देशाला आपण काय देऊ शकतो" यावर विचार विनीमय करायला हवा. इतिहासात रमण्याऐवजी वैश्विक भाषा असणाऱ्या विज्ञान गणिताची कास धरत जगाच्या रंगमंचावर काय नवीन मांडता येतेय याच्यावर उहापोह करायला हवा. दोन कोटी लोकसंख्या असलेला ज्यु समुदाय मानाचे तब्बल १८५ नोबेल पारितोषिक मिरवत असताना, संख्येने त्यांच्या दुप्पट असलेल्या मराठ्यांकडे अद्याप एकही नोबेल पारितोषिक कसे नाही यावर खल करायला हवा. बुकर, ऑस्कर, नोबेल पारितोषिकं मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची आणि संख्येची आवश्यकता नसून कर्तृत्व व कष्टांचीच आवश्यकता भासणार आहे आणि याच का तर प्रत्येक क्षेत्रात मुलतः याच गुणांची कसोटी लागणार आहे याचा विचार करायला हवा

महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा." 

या मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच कौतुकाचा वर्षाव झाला आहेच जो यथायोग्यही आहे. परंतु नेत्रदिपक गर्दी आणि कौतुकाच्या वर्षावात या सगळ्या घडामोडींचा शांतपणे आढावा घेणेही आवश्यक आहे. 

सोशल मिडीया नावाचे साधन आपल्या हातात आल्यापासून सामान्य नागरिक आपापल्या परीने लेख,बातम्या,माहिती यांचा वर्षाव एकमेकांवर करत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर ज्याला जशी बुद्धी आणि इच्छा तो त्याप्रमाणे यथाशक्ति करत आहे. या सगळ्या digital परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर सध्या आपल्या पुढे येणारी सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे गावाच्या चावडीपुरती दबकत चालणारी जातियता digital साधनं वापरत समाजात जोमाने हातपाय पसरू लागली आहे. 

यामागच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या गावीदेखील नसलेले दिनविशेष, तिथी, शुभेच्छा यांचा चौफेर मारा आपल्यावर सुरू आहे. गेल्या काही वर्षांतच आपल्या सगळ्यांना इतिहास आणि त्यातील पात्रांविषयी जरा जास्तच उमाळा दाटून आला आहे. त्या उमाळ्यापोटी कोण अधिक कट्टर मराठा, बौद्ध, ब्राह्मण, धनगर याच्या स्पर्धा सुरु आहेत आणि वेगवेगळ्या अस्मिता व संघर्षाचे पेव फुटले आहे.

काही काळापुर्वी नगर येथे कौंटूबिक वादातून घडलेल्या हत्याकांडाचे वृत्तांकन काही वृत्तपत्रं आणि वाहिन्यांवर 'दलित हत्याकांड' अशी झाल्यावर आंबेडकरी समाजात रोष उफाळून आला. महाराष्ट्रभर याच्या विरोधात गर्दी जमवून मोर्चे निघाले, निषेध व्यक्त केले गेले. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होतीच पण मोर्चातील गर्दी पाहून दर्दी होणाऱ्या राजकारण्यांकडून वेळोवेळी केले जाणारे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन (?) आणि अॅट्रोसीटी कायद्याच्या काही ठिकाणी घडलेल्या गैरवापरामुळे याविषयी रोष बाळगून असलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषाला ठिणगी देणारी ठरली.

या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले ते कोपर्डी येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर. योगायोगाने सदर घटनेतील आरोपी मागासवर्गीय समाजातील होते. सुरवातीला ही बातमी मुख्य धारेतील मिडीयाकडून पुरेसे वृत्तांकन न मिळालेली असली तरी फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित झाली. सरकार, प्रसारमाध्यमं घटना दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप करत त्याच्या निषेधार्थ म्हणून पहिला मराठा मोर्चा निघाला. पुढे या मोर्चाने व्यापक रूप धारण केले व अखेर तो प्रवास परवाच्या मुंबईतील अतिविराट अशा मोर्चा पर्यंत येऊन थांबला. मोर्चाच्या या प्रवासात "कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे" ही प्रमुख मागणी स्वतःला अनेक डबे जोडत "अॅट्रोसीटी कायद्यात बदल ते मराठ्यांना आरक्षण" अशा आणखी काही मागण्यांच्या अंतिम स्वरुपात सर्वांच्या समोर कधी व कशी आली ते कुणालाच कळले नाही.

हे सगळे पाहिल्यावर एक मराठा म्हणून मला काही मांडावे वाटते; कारण एक कुलकर्णी किंवा एक कांबळे मराठा मोर्चाविषयी त्याचं मत मांडू लागला तर त्यांचा आवाज ते परजातिय असल्यामुळे आधीच दाबला जाईल. सध्याच्या पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या विषयावर बोलण्यासाठी आधी त्या जाती धर्माचा असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. 

माझ्या मराठा बांधवांनो आपल्याला हवे असलेले आरक्षण, अॅट्रोसीटी कायद्यामध्ये बदल या व इतर मागण्या किती योग्य आणि किती शक्य यावर अनेक तज्ञ मंडळी त्यांचे मत प्रदर्शित करत आहेतच परंतु आपण कुठेतरी शांत बसून सध्याच्या या सगळ्याच घडामोडींवर विचार केला पाहिजे आणि आपणच केला पाहिजे कारण विषय फक्त मागण्यांचा नाही तर बहुसंख्याक मराठ्यांच्या मानसिकतेचा आहे. 

आपल्या सगळ्या मराठा समाजावर इतिहासाचे फार मोठे जोखड आहे आणि त्याच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस आपण वाकतच चाललो आहोत. गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांना पाटील, देशमुख, सरदार, राजे या भुलभुलैय्याची कावीळ झाली आहे. त्या कावीळीमुळे अनावश्यक फुगीरी आणि टोकाच्या अस्मितांचा अतिरेक आपल्याकडून कळत नकळत होतो आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या पराक्रमी पुर्वजांचा अभिमान असणे ठिक आहे; परंतु त्या अभिमानाचा आता माज होत असल्याचे दिसू लागले आहे. (अपवाद क्षमस्व)

याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना होणारी अटक. या संपूर्ण नाट्यात प्रत्यक्ष आरोपी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर वर्तन किंवा वक्तव्य करत नसताना ते मराठा आणि भोसले कुटुंबाचे वंशज असल्यामुळे त्यांची वकिली करणे म्हणजे आपले कर्तव्यच आहे अशा थाटात कित्येक जण वागू बोलू लागले. "शिवाजी महाराजांच्या वंशजाला अटक करणारे पेशवाई सरकार" या जातीयवादी उल्लेखा पासुन ते "उदयनराजेंना अटक केल्यास महाराष्ट्र पेटवून टाकू" अशी कायद्यालाच आव्हान देण्यापर्यंत आपली मजल गेली. भारत देश २६ जानेवारी १९५० साली प्रजासत्ताक झाला आणि इथे सर्वांनाच समान कायदा आणि न्याय व्यवस्था लागू झाल्याचे आपल्या मेंदुपर्यंत पोहचल्याचे दिसत नाही असे समजावे काय?  

कोण कुठल्या जातीचा आहे? कोण किती लोक गोळा करू शकतो? कोण किती प्रमाणात महाराष्ट्र पेटवू शकतो यावर आता न्याय दिला जावा काय? मराठा समाज महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त लोक जमा करण्याची त्यांची ताकददेखील आहे मग यापुढे मराठा समाजाला न्यायसंस्थेपुढे विशेष सवलत दिली जावी का? आपण मराठे कायदा श्रेष्ठ असे म्हणत भर दरबारात स्वतःच्या मुलाला आरोपी म्हणून साखळदंडात पेश करणाऱ्या शिवछत्रपतींचे वारसदार आहोत याचा आपल्याला विसर पडला काय?

कोपर्डी असो वा निर्भया, बलात्कार हा बलात्कार असतो. एक वासनांध पुरुष जेव्हा अबला स्त्री वर बलात्कार करतो तेव्हा त्याला तिची जात दिसत नसते तर फक्त स्त्री दिसत असते. पुरोगामी महाराष्ट्रात बलात्कार मराठा मुलीवर झाला म्हणून निंदनीय आणि दलित मुलीवर झाला म्हणून शोभनीय असे आहे का?

कोपर्डी घटनेनंतर कोट्यावधींच्या संख्येने मोर्चात सामील होताना झेंडा आणि टी शर्ट वर शिवछत्रपतींचे चित्रं छापण्याआधी बलात्कार करणाऱ्या स्वजातीय रांझ्यांच्या पाटलाचा चौरंगा करणारे शिवाजी महाराज आणि जिजाऊ आपल्याला आठवल्या नाहीत काय? गुन्हेगाराला शासन करण्याआधी त्या मुलीची जात शिवछत्रपतींनी विचारली असेल काय? कोपर्डी घटनेवर बोलणाऱ्या मराठा समाजाने महाराष्ट्रातच काय तर देशात होणाऱ्या प्रत्येक बलात्कार पिडीतेसाठी न्याय मागणे आपल्या सगळ्यांसाठी अधिक अभिमानास्पद नसेल काय ?

आरक्षण किंवा सरकारी सवलती या विषयावर विचार करताना असे सुचवावेसे वाटते की मराठा जातीला आरक्षण मिळाले तरी मराठा समाजातील धनाढ्य आणि प्रस्थापित वर्गाने आपल्या जातीच्या आर्थिक दुर्बल बांधवासाठी आरक्षणाने मिळणारे लाभ सोडुन देऊन इतर जातींपुढे आदर्श घालुन दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी आहे काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. 
 
त्याशिवाय नुसते आरक्षण दिल्यामुळे आपल्या सर्व समस्या सुटणार आहेत काय? तर अजिबात नाही कारण विषय सवलती सुविधांचा तर आहेच पण विषय आपल्या लढाऊ वृत्तीचा आणि जिद्दीचादेखील आहे. मराठ्यांच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश बिहार येथील आलेले परप्रांतिय तर सोडा पण नेपाळसारख्या परदेशातून हजारोंच्या संख्येने आलेले नेपाळी आपले पोट व्यवस्थित भरत आहेत. परंतु इथला भुमिपुत्रं मात्र आपल्या अपयशाला कारणं शोधण्यात आणि इतरांना दोष देण्यात मग्न आहे. या परप्रांतिय, परदेशी लोकांना कुठलेही आरक्षण, सवलत, मदत मिळत नाही तरी यातील कित्येक लोकांनी इथेच अब्जावधी रूपये कमावले आहेत. इतकेच कशाला खुद्द मराठा समाजातदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कोट्याधीश, अब्जाधीश झालेल्या लोकांची संख्या कमी नाही. 

म्हणजेच तुमच्यामध्ये प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी, सचोटी, जिद्द , कल्पकता आणि व्यावसायिकता असेल तर आजही या महाराष्ट्रात कुणीही यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी कुठल्या तरी जातीची किंवा आरक्षणाच्या संरक्षणाची गरज नाही.

संख्येच्या आधारावर मोठा भाऊ म्हणून असलेल्या मराठा समाजाने त्या शब्दाचा अर्थ आता अधिक व्यापक करत "महाराष्ट्र व मराठी वर प्रेम करतो तो प्रत्येक जण मराठा" असा करायला हवा. इथे असणाऱ्या प्रत्येक पददलित, पिडीत, शोषितासाठी आपण आवाज उठवायला हवा. देशभरात जातियतेवर आधारित जाट, गुज्जर आरक्षणांच्या मागण्या सुरू असताना महाराष्ट्रातील मराठ्यांनी महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक पददलितांसाठी आवाज बुलंद करत देशाला आदर्श घालून द्यायला हवा. 

कोट्यावधींच्या संख्येने रस्त्यावर येत आपापल्या जातीसमुदायाला काही मागण्यांऐवजी तेवढ्याच संख्येने एकत्र येत "देशाला आपण काय देऊ शकतो" यावर विचार विनीमय करायला हवा. इतिहासात रमण्याऐवजी वैश्विक भाषा असणाऱ्या विज्ञान गणिताची कास धरत जगाच्या रंगमंचावर काय नवीन मांडता येतेय याच्यावर उहापोह करायला हवा. दोन कोटी लोकसंख्या असलेला ज्यु समुदाय मानाचे तब्बल १८५ नोबेल पारितोषिक मिरवत असताना, संख्येने त्यांच्या दुप्पट असलेल्या मराठ्यांकडे अद्याप एकही नोबेल पारितोषिक कसे नाही यावर खल करायला हवा. बुकर, ऑस्कर, नोबेल पारितोषिकं मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची आणि संख्येची आवश्यकता नसून कर्तृत्व व कष्टांचीच आवश्यकता भासणार आहे आणि याच का तर प्रत्येक क्षेत्रात मुलतः याच गुणांची कसोटी लागणार आहे याचा विचार करायला हवा. 

महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व काळापासुन देशाला सकारात्मक दिशा दिली आहे त्याचे भान ठेवत आपल्या पूर्वजांना काळीमा फासला जाणार नाही याची काळजी आता आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. अमुक एक व्यक्ती माझ्या जातीची आहे म्हणून मुख्यमंत्री व्हावी इथपासून ते अमुक एक मुख्यमंत्री परजातीचा आहे म्हणून त्याचे हेलिकॉप्टर कोसळले पाहिजे अशा विचारांच्या विषवल्ली पसरवणाऱ्यांना आपण जागेवरच खडसावले पाहिजे. या जातीयतेच्या भिंती तोडून आपण आपल्या समाजातील गोरगरींबासाठी रस्त्यावर येऊन झटू तेव्हा खऱ्या अर्थाने "एक मराठा लाख मराठा" या घोषणेला अर्थ येईल व महाराष्ट्राला तथा देशाला गौरव प्राप्त होईल.
 
जय हिंद जय महाराष्ट्र 

Web Title: Tushar Damugade writes about Maratha Kranti Morcha