पुरामुळे उघडले डोळे (उज्ज्वला दिघे)

ujjawala dighe
ujjawala dighe

"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस...
तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?''

धो धो पाऊस पडत होता. "आज ड्यूटीवर नको जायला' असं सुंगधाला वाटतं होतं; पण काही महत्त्वाची कागदपत्रं तिच्या टेबलवर होती व त्यांच्यावर सह्या करून ती पुढच्या प्रक्रियेसाठी तातडीनं पाठवून द्यायची होती.
ठाणे ते वसई हा तिचा रोजचाच प्रवास. ती मंत्रालयात कामाला होती. सकाळचे सात वाजले होते. तिची कन्या मुग्धाही शाळेत गेली होती. मुग्धा आठवीत होती. तिची स्कूलबस दारापाशीच थांबायची. त्यामुळे काही प्रश्‍न नव्हता.
नवरा प्रभाकर याचं त्याच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीशी काहीतरी प्रकरण असल्याच्या संशयावरून त्याच्याशी घटस्फोटाचा निर्णय सुगंधानं घेतला होता आणि तशी नोटीसही त्याला बजावली होती. त्या मैत्रिणीवरून दोघांमध्ये सतत भांडण चालायची. दोघांच्या बेबनावात मुग्धाची किती परवड होत होती, हे काही सुगंधाच्या ध्यानी येत नव्हतं...कदाचित येतही असेल पण...संशयात्मा!
प्रभाकरनं सुगंधाला खूप वेळा समजावून सांगितलं होतं.
'अगं, ऑफिसमधली एक मैत्रिण या नात्यानं मी तिच्याशी वागतो. आपली मुग्धा आता 13 वर्षांची आहे. ती मोठी होतेय...असं असताना मी असं काही प्रेमप्रकरण करेन असं तुला का वाटतं? प्रेमात पडण्याचं आता माझं वय तरी राहिलं आहे का?'' असं तो तिला वारंवार सांगत असे, तरीसुद्धा सुगंधा तिचा हेका काही सोडत नसे.
एकदा असाच वाद सुरू असताना ती त्याला म्हणाली ः 'मग तू ही नोकरी सोड आणि दुसरीकडं कामाला लाग.''
'वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस...
तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी? बरं, तुझ्या आई-वडिलांना सांगायला जावं तर तेही तुझीच बाजू घेणार. जसा काही मीच खरा गुन्हेगार आहे. माझंच सगळं चुकतंय जसं काही...'' तिला असं समजावताना प्रभाकरची अवस्था अगदी दयनीय होऊन गेली.
'हे बघ प्रभाकर, तुला नोकरी सोडायची नसेल तर मी घटस्फोट घेते. मात्र, हा राहता ब्लॉक मी काही सोडणार नाही. मी मुग्धाला घेऊन इथंच राहीन. तुला कुठं राहायचंय तिकडं तू राहा...'' सुगंधानं नेहमीप्रमाणे तिचा हेका सुरूच ठेवला.
प्रभाकरच्या डोळ्यांत पाणी आलं. आधीच बिचाऱ्याला जवळचे कुणी नातेवाईक नव्हते. त्याचे आई-वडील लहानपणीच वारले होते. मोठ्या धीरानं प्रभाकर म्हणाला ः 'माझ्या लेकीसाठी मी हा ब्लॉक मागणार नाही. तुम्ही दोघी खुशाल राहा इथं. मी आपलं भाड्याचं दुसरं घर बघतो.''
आणि खरोखर प्रभाकरनं ठाण्यातच दुसरं घर बघितलं आणि तो तिथं एकटा राहू लागला. आता मात्र घराची सगळी जबाबदारी सुगंधावर येऊन पडली. शिवाय, ऑफिसमधून ती येईपर्यंत सात वाजायचे.
तोपर्यंत मुग्धा घरात एकटीच असायची. पाहता पाहता एक वर्ष झालं आणि नंतर सुगंधानं घटस्फोटासाठीची नोटीस बजावली. मुग्धाला मात्र बाबांची आठवण यायची. नकळत तिचे डोळे पाणावायचे. रोज संध्याकाळी तिच्यासाठी खाऊ घेऊन येणारे बाबा तिला आठवायचे. मनातल्या मनात तिला आईचा खूप राग यायचा. तिला वाटायचं, असं भांडायचं होतं तर मग हिनं लग्न तरी कशाला केलं बाबांशी?
***

त्या दिवशी सुंगधा कशीबशी ऑफिसला पोचली. पावसामुळे गाड्या उशिराच धावत होत्या. त्यामुळं तिलाही उशीर झाला होता. तिनं कामाला सुरवात केली. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. आता संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यांच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं. तेवढ्यात देशपांडे साहेब तिच्या टेबलजवळ आले आणि म्हणाले ः 'मॅडम, आज घरी जाता येईल, असं वाटत नाही.''
'का? काय झालं?'' सुगंधानं मान वर न करताच विचारलं.
'पाऊस काय भयंकर पडतोय बाहेर, मॅडम. पाणी आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यापर्यंत आलंय. मी आत्ताच बातमी ऐकली की रेल्वे ट्रॅकमध्येही खूप पाणी भरलंय. त्यामुळे रेल्वेगाड्या बंद आहेत.''
'बाप रे! मला तर कुठल्याही परिस्थितीत घरी जायलाच हवं. माझी मुलगी एकटी आहे ना घरी.''
'अहो, पण जाणार कशा? पाणीच एवढं आहे की तुम्हीच काय कुणीही उतरून खालीसुद्धा जाऊ शकणार नाही.''
त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच वीजही गेली. मुग्धाला फोन करायला सुंगधानं मोबाईल हातात घेतला; पण त्याचीही बॅटरी संपली होती. ऑफिसमधल्या इतर लोकांच्या फोनवरून तिनं प्रयत्न केला; पण फोन लागतच नव्हता. मुग्धा एकटी काय करेल, या विचारानं सुंगधा अगदी रडवेली होऊन गेली. तेव्हा देशपांडे साहेब म्हणाले ः 'रडू नका. सर्व काही ठीक होईल आणि तुमची मुग्धा आता अगदी लहानही नाहीय. ती दार बंद करून झोपून जाईल.''
***

रात्रीचे अकरा वाजले होते. टेबलवर एक मेणबत्ती होती. तीही खूप जोरात वारा आला की विझायची. आज ऑफिसमधल्या प्रत्येकालाच ऑफिसमध्ये थांबण्याची शिक्षा पावसानं दिली होती.
टेबलवर डोकं ठेवून सुगंधा आठवतील तेवढ्या देवांची नावं घेत राहिली व "माझ्या मुलीला सोबत करा' म्हणून त्यांना विनवत राहिली. अगदी रडवेली होऊन गेली ती.
वसईमध्ये खूप पूर आला आहे आणि रेल्वेसेवा कोलमडून पडल्याची बातमी प्रभाकरनं ऐकली आणि तो धास्तावलाच. त्यानं रात्री आठ वाजता मुग्धाला फोन केला. सुदैवानं फोन लागला.
'मुग्धा बेटा, मी तुझा बाबा बोलतोय. आई घरी आली का?''
'नाही आली, बाबा.''
'तिचा काही फोन वगैरे आला होता का?''
'नाही आला, बाबा. आणि मी लावतेय; पण फोन लागतच नाही.''
'तू जेवलीस का?''
'नाही जेवले.''
'घाबरू नकोस. मी तुझ्या सोबतीला येतो. येताना काहीतरी खायलाही घेऊन येतो. मी अर्ध्या तासात येईन. इतर कुणी आलं तर दार उघडू नकोस.''
बरोबर अर्ध्या तासानं प्रभाकर पुरी-भाजी, इडली घेऊन आला. त्यानं बेल वाजवली. "आपले बाबाच आहेत ना,' हे आयहोलमधून पाहून खात्री झाल्यावर मुग्धानं दार उघडलं.
बाबा दिसताच त्यांना मिठी मारून ती रडू लागली.
'बेटा, रडू नकोस. मी आलोय ना आता. आई बहुतेक ऑफिसमध्येच असेल. कारण, तिचं ऑफिस सुटायच्या आधीच पूर आलाय. म्हणजे तिला खाली उतरताच आलं नसेल.''
'पण मग फोन का लागत नाही?''
'पावसामुळंच असेल; पण तू काळजी करू नकोस. आता आपण दोघं खाऊन घेऊ,'' असं म्हणत प्रभाकरनं दोन ताटं आणली. दोघांना वाढून घेतलं आणि ते जेवू लागले.
'मुग्धा, आता तू काही काळजी करू नकोस. आरामात झोप. सुगंधा उद्या सकाळीच येईल बघ.''
मुग्धा झोपली; पण प्रभाकरला झोप लागत नव्हती. त्याला सुगंधाची काळजी वाटत होती. मुग्धाच्या काळजीनं ती निघाली असेल आणि पाण्यात कुठं अडकून तर पडली नसेल ना? हजार वाईट विचार त्याला सतावत होते.
***

सकाळचे सहा वाजले होते. मुग्धाही उठली होती.
'बेटा, आज शाळेत जाऊ नकोस. थोड्या वेळातच आई येईल.''
'बाबा, नाही जाणार मी शाळेत. आज मी घरीच थांबणार आहे.''
प्रभाकरनं मुग्धाला चहा दिला. स्वतः घेतला. मुग्धाला शिरा आवडतो म्हणून त्यानं शिराही केला.
शिरा खाताना मुग्धा म्हणाली ः 'बाबा, तुम्ही आज जाऊ नका ना ड्यूटीवर. प्लीज, माझ्यासाठी घरी थांबा. हवं असेल तर आई आल्यावर जा.''
'बरं, घाबरू नकोस. थांबतो.''
बरोबर नऊ वाजता सुगंधा आली आणि मुग्धानं तिला मिठीच मारली व ती रडायला लागली. प्रभाकरनं बूट घातले आणि तो निघूनही गेला.
'मुग्धा, आता मी आले आहे ना बेटा. आता तू रडू नकोस.''
'आई, पण रात्रभर कुठं होतीस तू? आणि तुझा फोनही लागत नव्हता.''
'रात्रभर मी ऑफिसमध्येच होते. खाली उतरणंच शक्‍य नव्हतं. पुराचं पाणी जवळजवळ पहिल्या मजल्यापर्यंत आलं होतं. त्यात वीजही गेली आणि माझ्या मोबाईलची बॅटरीही उतरली होती. बरं, इतर सहकाऱ्यांच्या फोनवरून तुला फोन लावायचा प्रयत्न केला; पण फोन लागतच नव्हता.''
'आई, आपली बाबांना किती काळजी आहे, तुला ठाऊक आहे का? त्यांनी काल आठ वाजता मला फोन केला. तू आली आहेस का, म्हणून विचारलं. मी "नाही आली' म्हटल्यावर ते माझ्यासाठी जेवणाचं पार्सल घेऊन आले. मला जेवू घातलं. रात्रभर इथंच थांबले. ते आले म्हणून मला किती धीर आला. बाबा मला म्हणाले, "काळजी करू नकोस. आई येईलच. तिला बहुतेक पुरामुळे ऑफिसमध्येच थांबावं लागलं असेल.' त्यांनी तुलाही खूप वेळा फोन लावला; पण तुझा फोन लागतच नव्हता. तू आलेली पाहिल्यावर बाबा बघ कसे निमूटपणे निघून गेले. तू यायच्या आधी सकाळी मला त्यांनी दूध दिलं. माझ्यासाठी शिराही केला. बाबा असल्यावर घर कसं भरल्यासारख वाटतं, आई.''
मुग्धा बोलत होती. तिच्या बोलण्यात खोटं काहीच नव्हतं. फक्त प्रभाकरच्या एका मैत्रिणीमुळे सुगंधा त्याचा तिरस्कार करत होती. त्याला "वाईट' म्हणत होती. त्याच्याशी अबोला धरत होती. भांडत होती आणि घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत तिची मजल गेली होती.
आपण किती अविचारीपणा करत होतो, हे आज सुगंधाच्या लक्षात आलं.
कारण, कालच्या प्रसंगामुळे तिचे डोळे उघडले होते. ऑफिसमध्ये देशपांडे साहेबांपासून ते इतर सर्वच पुरुष सहकाऱ्यांनी तिला काल मदत केली होती. धीर दिला होता.
खूप विचार करून करून सुगंधा दमली होती. मात्र, तिनं मनात काही तरी निश्‍चितपणे ठरवलं आणि प्रभाकरला फोन केला. ती त्याला म्हणाली ः 'प्रभाकर, आज मला भेटायला येशील का संध्याकाळी? आपल्या घरी?''
'ठीक आहे, येईन'' असं म्हणून प्रभाकरनं फोन बंद केला.
ठरल्याप्रमाणे प्रभाकर आला. तेव्हा त्याला पाणी व चहा देऊन सुगंधानं बोलायला सुरवात केली.
'प्रभाकर, खरंच मी चुकले. मला माफ कर. तुझं माझ्यावर आणि मुग्धावर किती प्रेम आहे हे मला आता समजलंय. आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिला. तुझ्या मैत्रिणीवरून रात्र रात्र नाहक भांडले मी तुझ्याशी. तुला घरातून घालवूनही दिलं. एवढं सगळं होऊनही, कालच्या पुराच्या परिस्थितीत मुग्धा घरी एकटी असेल म्हणून तू तिच्या सोबतीसाठी घरी आलास. मी पुरात अडकले असणार म्हणून मलाही फोन करण्याचा प्रयत्न तू केलास. माझा फोन बंद असल्यामुळं फोन लागला नाही. तुझी किंमत मला आता समजली. मी तुझ्याशी किती अहंपणाने वागत होते, हे मला आता समजलंय. तू पुन्हा इथं राहायला ये. मी घटस्फोटाची नोटीस रद्द करते. माझ्या मनातल्या संशयाच्या भुतानं हा घात केला होता...''
'खरं सांगू का सुगंधा... आता पुन्हा इथं राहायला येण्याची माझी अजिबात इच्छा नाही.''
'मग मी जाऊ का दुसरीकडं कुठंतरी राहायला? तू आणि मुग्धा इथं राहा. कारण, तुझ्यावाचून मुग्धाही राहू शकत नाही.''
'हे तुला आत्ता समजलं?''
'नाही. तू इथून गेल्यानंतरच ते माझ्या लक्षात आलं. तुझं नाव सतत तिच्या तोंडात असायचं. तू म्हणजे त्रिकोणाचा तिसरा कोन आहेस. दोन कोनांनी त्रिकोण पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा निदान मुग्धासाठी तरी इथं राहायला ये, प्रभाकर''
'ठीक आहे. मुग्धासाठी मी सगळं काही विसरायला तयार आहे; पण माझ्या मैत्रिणीचं नाव तू कधीही घ्यायचं नाहीस. आणि पुन्हा सांगतो, की आमचे कुठलेही प्रेमसंबंध नाहीत. निखळ मैत्री आहे आमची आणि आपल्याला जे मदत करतात, ते आपले मित्र किंवा मैत्रिणी असतात. त्यात शारीरिक आकर्षण नसतं.''
'होय, ते मला कालच कळलं. पूर आला ती रात्र मी ऑफिसमध्येच काढली आणि त्या वेळी ऑफिसमधल्या सर्व पुरुष सहकाऱ्यांनी मला मित्रत्वाच्या नात्यानं मदत केली. त्यामुळे तुझ्या मैत्रिणीचं नाव मी पुन्हा कधीच घेणार नाही.''
सुगंधानं मुग्धाला हाक मारली. मुग्धा धावत आली. सुगंधा म्हणाली ः'मुग्धा, आता बाबा पूर्वीप्रमाणे आपल्या जवळच राहणार आहेत...''
आनंदानं ओरडत मुग्धानं प्रभाकरचा हात पकडला आणि म्हणाली ः 'होय बाबा?''
'होय, उद्यापासून पुन्हा माझा मुक्काम इथं.''
हे ऐकून मुग्धाचा चेहरा खुलला. ती म्हणाली ः 'चला, शेवटी माझे बाबा मला मिळाले.''
'तुझे बाबा तुला मिळाले...पण कुणामुळे ठाऊक आहे का?'
'कुणामुळे?'' मुग्धानं विचारलं.
'काल आलेल्या पुरामुळे,'' सुगंधा हसत हसत म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com