हत्ती रिसाला मिरवणूक जालन्यातली

महाराष्ट्रात सण-उत्सवांना खूप महत्त्व असून, त्या-त्या सणाचं धार्मिकतेसह त्या वातावरणाशी निगडित असं कारण असतं. असा एक उत्सव म्हणजे रंगांची उधळण करणारा धूलिवंदन हा सण.
Jalana Hatti Risala Rally
Jalana Hatti Risala RallySakal
Summary

महाराष्ट्रात सण-उत्सवांना खूप महत्त्व असून, त्या-त्या सणाचं धार्मिकतेसह त्या वातावरणाशी निगडित असं कारण असतं. असा एक उत्सव म्हणजे रंगांची उधळण करणारा धूलिवंदन हा सण.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचं ऐतिहासिकदृष्ट्या वेगवेगळं महत्त्व आहे. शेकडो वर्षांपेक्षा अधिक काळापासून काही परंपरा आजही तिथं जोपासल्या जातात. निजाम तसेच ब्रिटिश राजवटीपासून सुरू झालेल्या विशेष उत्सवांची जपणूक आजपर्यंत कायम आहे. असाच एक उत्सव म्हणजे, निजाम राजवटीपासून जालना शहरात धूलिवंदनाच्या दिवशी हत्ती रिसाला मिरवणूक काढली जाते. या परंपरेत केवळ कोरोनाकाळात खंड पडला होता. मात्र, यंदा कोरोनाचं सावट कमी झाल्याने ही शेकडो वर्षांची परंपरा यंदा होईल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात सण-उत्सवांना खूप महत्त्व असून, त्या-त्या सणाचं धार्मिकतेसह त्या वातावरणाशी निगडित असं कारण असतं. असा एक उत्सव म्हणजे रंगांची उधळण करणारा धूलिवंदन हा सण. मराठवाड्यावर निजामाची सत्ता होती. देश स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाडा हा निजाम राजवटीत होता. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे निजाम राजवटीमध्ये मराठवाड्यातील जालना शहरासह परिसरात वीस दिवसांची होळी खेळली जात होती. परंतु, त्याकाळात रंग नसल्याने त्यांचा वापरही होत नव्हता, त्यामुळे निजाम राजवटीमध्ये होळी खेळताना नाल्यातील पाणी, बैलगाडीसाठी वापरण्यात येणारं वंगण, शेण, चिखल आदींच्या माध्यमातून एकमेकांच्या अंगावर टाकून होळी खेळली जात असे. शिवाय, कपडेही फाडून होळी साजरी होत असे. त्यामुळे वादंग होण्याची शक्यता असे.

शिवाय, होळीला विकृत स्वरूप प्राप्त झालं होतं. नागरिकांनी होळीची परंपरा जपत त्याचा आनंद घेणं अपेक्षित असताना नालीचं पाणी, वंगण, शेण, चिखल हे एकमेकांच्या अंगावर टाकणं, शिव्यांची लाखोली वाहणं, चिखलाचा मारा करून समोरील व्यक्तीला माखून टाकणं, असे भयंकर प्रकार हे इथल्या काही सजग नागरिकांना पटले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी त्याकाळात १५ ते २० जण एकत्र आले. यांत विश्वनाथ आवळे, नरसिंह जाधव, रामभाऊ राऊत, शंकरलाल अग्रवाल, किसनराव गाजरे आदींचा समावेश होता. या सगळ्यांनी एकत्र येऊन यावर विचारमंथन केलं. त्यानंतर वीस दिवस चालणारी होळी, धूलिवंदनातील हा विकृतपणा दूर होऊन, एक आदर्श उत्सव कसा होईल, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. वर्ष १८८९ मध्ये धूलिवंदन सणानिमित्त हत्ती रिसाला मिरवणूक काढण्याचं ठरलं. ही हत्ती रिसाला मिरवणूक काढताना मिरवणुकीत प्रतीकात्मक राजा, प्रधान, सैनिक सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला. धूलिवंदनानिमित्त काढण्यात येणाऱ्या या हत्ती रिसाला मिरवणुकीदरम्यान हत्तीवर बसलेला प्रतीकात्मक राजा रेवड्यांची उधळण करत असे. या रेवड्या प्रसाद म्हणून मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक झेलत असत. वर्ष १८८९ पासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे.

विशेष म्हणजे, मागील १३३ वर्षांपासून या हत्ती रिसाला मिरवणुकीचा मार्ग कायम आहे. या हत्ती रिसाला मिरवणुकीवरही नागरिकांकडून फुलांची उधळण केली जाते. प्रतीकात्मक राजाकडून प्रजेवर फुलांची उधळण, गुलालाची उळधण करत ही होळी-धूलिवंदन साजरे केले जाते.

शहरातील रंगार खिडकी येथून धूलिवंदनाच्या दिवशी या हत्ती रिसाला मिरवणुकीस प्रारंभ होतो. त्यानंतर गोल मशीद, सराफा बाजार, फूल बाजार, नया बाजार, शोला चौक, बडी सडक, राम मंदिर, सुभाष रोड, सावरकर चौक, महावीर चौक, पाणीवेसमार्गे रंगार खिडकी येथे या मिरवणुकीचा समारोप होतो. विशेष म्हणजे, ज्या भागातून हत्ती रिसाला मिरवणूक पुढे गेली, त्या भागातील होळीचा सण संपला असं समजलं जातं. त्यानंतर त्या भागात धूलिवंदन खेळले जात नाही.

या हत्ती रिसाला मिरवणुकीत काळानुसार काही बदलही झाले आहेत. जालना जिल्हा हा दुष्काळी पट्ट्यात मोडतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याची टंचाई असते. त्यामुळे हत्ती रिसाला मिरवणुकीदरम्यान पाण्याची नासाडी न करता फुलांसह कोरडा गुलाल उधळण्याची परंपरा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. यंदा धूलिवंदनानिमित्त निघणाऱ्या हत्ती रिसाला मिरवणुकीचं १३३ वं वर्ष असणार आहे. शंभरावर वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही काही सजग नागरिकांमुळे कायम आहे. यात प्रामुख्याने हत्ती रिसाला समितीचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, ओमप्रकाश भारुका, अंकुश देशमुख आदींच्या पुढाकारामुळे ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे जालना शहरात धूलिवंदन म्हणजे हत्ती रिसाला मिरवणूक असून, या परंपरेमुळे जालना शहरात एक आदर्श होळी-धूलिवंदन उत्सव साजरा करण्याची परंपरा रुजली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com