हिमालयाची शिकवण

सन २०१६ मध्ये ‘गिरिप्रेमी’नं जगातील सहावं उंच शिखर ‘माऊंट च्यो ओयू’ व जगातील सातवं उंच ‘शिखर माऊंट धौलागिरी’ अशी अष्टहजारी शिखरांवरील जोडमोहीम आयोजिली होती.
हिमालयाची शिकवण

सन २०१६ मध्ये ‘गिरिप्रेमी’नं जगातील सहावं उंच शिखर ‘माऊंट च्यो ओयू’ व जगातील सातवं उंच ‘शिखर माऊंट धौलागिरी’ अशी अष्टहजारी शिखरांवरील जोडमोहीम आयोजिली होती. यातील च्यो ओयू शिखर तिबेटमध्ये आहे, तर धौलागिरी नेपाळमध्ये. नेपाळ-हिमालयाशी माझा जुना ऋणानुबंध आहे. मात्र, तिबेट अगदीच नवीन; त्यामुळे दोन्ही मोहिमांचा नेता असलो तरी मी च्यो ओयूच्या संघाबरोबर तिबेटला गेलो. तिकडे धौलागिरी मोहिमेसाठी एव्हरेस्टवीर आशिष माने, प्रसाद जोशी यांच्या साथीनं तरुण व तगड्या गिर्यारोहकांची फौज धौलागिरी मोहिमेसाठी रवाना झाली. मी या सर्वांशीच फोनवरून संपर्कात होतो.

धौलागिरी मोहिमेतील प्रसाद हा वयानं सर्वात मोठा व एव्हरेस्ट शिखरचढाईचा अनुभव गाठीशी असलेला गिर्यारोहक होता. मात्र, काठमांडूत पोहोचल्यापासूनच प्रसादला पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. शिखरचढाई तर सोडाच; त्याला

नीट चालतादेखील येत नव्हतं. विविध औषधोपचारांच्या मदतीनं शेवटी बेस कॅम्पपर्यंत ट्रेक करण्याइतकी शक्ती प्रसादला मिळाली. शिखरचढाई नाही तर नाही, कमीत कमी बेस कॅम्पवर थांबून मोहिमेची सूत्रं तो सांभाळू शकत होता. मी तिकडे तिबेटमधून प्रसादशी बोलून, धौलागिरी शिखरचढाईची दिशा स्पष्ट करावी या उद्देशानं, प्रसादला त्रास होत असतानादेखील, संघाबरोबर बेस कॅम्पवर जाण्यास सांगितलं.

८१६७ मीटर उंच असलेलं धौलागिरी शिखर हे चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आहे. शिखरचढाईच्या शेवटच्या टप्प्यात असणारी खडी चढण, तीव्र थंडी व जोरानं वाहणारं वारं व प्राणवायूचं हवेतील अतिशय विरळ प्रमाण यांमुळे धौलागिरी चढाई खडतर मानली जाते. दर सहा गिर्यारोहकांमागं एका गिर्यारोहकाचा इथं मृत्यू होतो, अशी नोंद आहे. एव्हरेस्टपेक्षाही हा मृत्युदर जास्त आहे. अशा शिखरावर चढाई करण्यासाठी गिर्यारोहक हा सर्वार्थानं तयार असणं गरजेचं असतं. प्रसादनं जमलं तर शिखरचढाई करावीच, अशी माझी इच्छा होती. प्रसादलादेखील शिखर खुणावत होतं.

‘मामा, मी आता पूर्णपणे फिट आहे, काहीही त्रास नाहीये, मला शिखरचढाई करायची आहे,’’ प्रसादनं मला फोनवर सांगितलं. काही दिवसांपूर्वी इतका त्रासात असणारा प्रसाद आता अगदी आत्मविश्वासानं ‘चढाई करायची’ म्हणतोय म्हटल्यावर मी त्याला अडवण्याचा प्रश्नच नव्हता.

धौलागिरी शिखराची आव्हानंच वेगळी आहेत. तिथलं हवामान तर फारच लहरी. त्यामुळे शिखरचढाईच्या पहिल्या प्रयत्नात संघाला यश आलं नाही. शिखर अगदी दृष्टिक्षेपात आलं असताना खाली परतावं लागलं. पुन्हा एकदा प्रयत्न करू, असं ठरवून ७३०० मीटर उंचीवर असलेल्या ‘कॅम्प-३’ वर संघ परत आला. पुढच्या दिवशी धौलागिरीच्या ओढीनं संघातील दोघांनी पुन्हा शिखरचढाई सुरू केली. मात्र, हवामानानं पुन्हा दगा दिल्यानं ‘कॅम्प-३’ वर परतावं लागलं. आता सात हजार मीटरहून अधिक उंच ठिकाणी दोन मुक्काम झाले होते. त्यात एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू अशा तीन अष्टहजारी शिखरांचा अनुभव असलेल्या आशिषला अती उंचीचा त्रास झाल्यानं मोहीम अर्ध्यावर सोडून खाली जावं लागलंं. त्यात पवन हडोळे व अक्षय पत्के यांनी याआधीच तब्येतीच्या कारणामुळे बेस कॅम्प गाठले होते. ‘कॅम्प-३’ वर, ७३०० मीटर उंचीवर प्रसाद आता एकटाच होता. संपूर्ण मोहिमेची धुरा त्याच्या खांद्यावर होती. त्यात हवामानदेखील तासागणिक खराब होत होतं. बर्फवृष्टी इतकी होत होती की तंबूतून बाहेरदेखील पडता येत नव्हतं. सोबत असलेले अन्नपदार्थही संपत आले होते.

ऑक्सिजन सिलिंडर्सचं गणितही बिघडत चाललं होतं. त्यातच एकाच जागेवर, एकाच तंबूत अधिक वेळ बसून राहिल्यानं अती उंचीवरील जिवावर बेतणारे आजार उद्भवू शकले असते. अजून काही काळ असंच थांबलं तर काहीही घडू शकणार होतं. त्यामुळे शिखरचढाईचा शेवटचा प्रयत्न करावा की खाली परत जावं, असं द्वंद्व प्रसादच्या मनात सुरू होतं. त्यात संपूर्ण मोहिमेदरम्यान बेस कॅम्पवर, चढाईच्या वेळी सोबत असलेल्या, ‘कॅम्प-३’ वरदेखील शेजारच्याच तंबूत असलेल्या पश्चिम बंगालच्या राजीव भट्टाचार्य याचा अती उंचीवर होणाऱ्या त्रासामुळे मृत्यू झाला होता. त्यानं शेवटचा श्वास घेतला तेव्हा प्रसाद तिथंच होता. असा डोळ्यांदेखत झालेला मृत्यू मनावर खोल परिणाम करत असतो. प्रसंग बाका होता. मोहिमेचा नेता म्हणून अशा वेळी आपल्या गिर्यारोहकांशी सतत संपर्क ठेवणं हे माझं कामच होतं. मात्र, प्रत्येक कॉलमध्ये प्रसादचा आवाज आश्वासक होता. बिकट परिस्थितीतही तो ठाम होता.

प्रसादला शिखरचढाईचे जणू वेधच लागले होते. तरीही प्रसादनं भावनेच्या भरात येऊन त्याला असा कोणताही निर्णय घेऊ द्यायला माझं मन राजी नव्हतं. मी त्याला स्पष्ट सांगितलं : ‘तुझी शिखरचढाईची इच्छा मला कळू शकते. तू सर्व विचार करूनच चढाईचा निर्णय घेतला असशील. मात्र, हवामान तेवढं साथ देत नाहीये. त्यात तू सलग तीन दिवस अती उंचीवर आहेस. त्यामुळे शिखर चढाई करत असताना, कोणत्याही क्षणी तुझ्या मनात चढाई करण्याविषयी दुसरे विचार आले, धोका वाटला, तर असशील तिथून परत ये. मला प्रॉमिस कर.’

माझी कळकळ प्रसादनं ओळखली.

‘मामा, मी शिखरचढाई यशस्वी करेन याची मला पूर्ण खात्री आहे. तरीही तुम्ही सांगितल्यानुसार, मला कुठंही धोका जाणवला तर मी नक्की खाली परत येईन. मोहिमेला कोणतंही गालबोट लागू देणार नाही,’ प्रसादनं अत्यंत आत्मविश्वासानं मला त्याच्या भावना सांगितल्या. प्रसाद यशस्वी होणार हे मला तेव्हाच जाणवलं. अपेक्षेनुसार त्यानं १९ मे २०१६ रोजी तो ‘माऊंट धौलागिरी’ या जगातील सातव्या उंच शिखरावर पोहोचला व धौलागिरी शिखरमाथ्यावर चढाई करणारा पहिला ‘कॉस्ट अकाउंटंट’च नव्हे, तर पहिला भारतीय नागरिक ठरला.

प्रसादच्या या ‘धवल’ यशानं एक शिकवण अधोरेखित केली. ‘तुम्ही जर मानसिकदृष्ट्या कणखर असाल तर, तुमच्या क्षमतांवर तुमचा विश्वास असेल तर, असाध्य गोष्ट साध्य करता येते,’ ही ती शिकवण. ही शिकवण कोणत्याही वर्गात बसून अथवा व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून नव्हे, तर हिमालयातील माझ्या अनुभवांतून आली. या अनुभवांनीच माझं जीवन समृद्ध केलं. तुम्ही जेव्हा हिमालयात असता तेव्हा कळत-नकळत त्याचे संस्कार तुमच्यावर घडत असतात. गिर्यारोहण करताना अशाच संस्कारांची प्रचीती मला नेहमी येत असते.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com