मिशन एव्हरेस्ट : हवामानात स्वागतार्ह सुधारणा!

उमेश झिरपे
शनिवार, 13 मे 2017

गौतम घोष यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचा मृतदेह अजूनही "एव्हरेस्ट' समिट मार्गावर आहे. यावर्षी त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार एव्हरेस्ट बेस कॅम्पवर मृतदेह शोधून काढण्याच्या उद्देशाने आले आहेत.

एव्हरेस्ट समीटच्या वेदर विंडो बद्दल अजून स्पष्टता नसली तरी बाल्कनी पर्यंतचा रूट मात्र ओपन आहे. मुख्य म्हणजे शनिवारी हवामानात स्वागतार्ह अशी सुधारणा झाला. बर्फवृष्टी अगदी कमी झाली. 14 तारखेच्या पूर्वसंध्येला हवामानाच्या आघाडीवरील हा बदल नक्कीच सुखद आहे. त्यामुळे "वेदर विंडो'चे चित्र स्पष्ट होऊ शकेल. 

दरम्यान, आज एका काहीशा गंभीर विषयावर संवाद साधतो आहे. कितीही सोईसुविधा झाल्या तरी "माउंट एव्हरेस्ट' नवरील चढाई आजही वाटते तेवढी सोपी नक्कीच नाही. साधारणतः दहापैकी एकाचा मृत्यू या चढाईच्या दरम्यान होतो असे इतिहास सांगतो. यावर्षी देखील वातावरणाशी समरस होण्यासाठी एव्हरेस्ट जवळीच नुप्त्से नावाच्या शिखरावर चढाई करत असताना सुप्रसिध्द गिर्यारोहक ऊली स्टेक यांचा मृत्यू झाला. मी व माझा संघ त्याला भेटलो होतो, त्याच्या अचानक मृत्यूने आम्हाला खूप धक्का बसला. असाच धक्का गेल्यावर्षी शिखर चढाईच्या वेळी झालेल्या मोहिमेदरम्यान घडलेल्या घटनेमुळे बसला होता. 

जसे महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहकांची एक परंपरा आहे तसाच इतिहास बंगालमधील गिर्यारोहकांचा आहे. 2014 साली मी जेव्हा एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी नेपाळमध्ये आलो होतो, तेव्हा बंगाल मधील चार जणांचा - परेश नाथ, गौतम घोष, सुभाष पॉल व सुनिता हजारा यांचा संघ माझ्या सोबत बेस कॅम्पला होता. त्यावर्षी खुंबू आईसफॉलमध्ये प्रचंड मोठा हिमप्रपात झाला व तब्बल 18 शेर्पांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यावर्षी मोहीमच रद्द करण्यात आली. 1920 पासून एव्हरेस्ट शिखरावर चढण्यासाठी मोहिमा आखल्या जात आहेत, तब्बल 94 वर्षांनतर पहिल्यांदा मोहीम रद्द झाली. त्यामुळे 2014 साली मोहिमेसाठी परमीटची मुदत 2 वर्षांनी वाढवली. 2015 साली नेपाळमधील प्रलयकारी भूकंपामुळे त्यावर्षी देखील वर मोहीम आखल्या गेल्या नाहीत. 

2014 ला माझ्यासोबत जो बंगालचा संघ होता तो शेवटी 2016 ला पुन्हा एकदा निर्धाराने नेपाळमध्ये दाखल झाला. वेदर विंडो मिळाल्यानंतर बंगालच्या चौघांनीही समीटसाठी आगेकूच केली. दरम्यान, संघातील गौतम घोष व सुभाष पॉल यांनी समिट पूर्ण केले, तर परेश नाथ व सुनिता हजारा यांचे समिट बाकी होते. त्यांना या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे शेर्पा साथीदार काही कारणांमुळे त्यांना सोडून खाली परतले. त्यामुळे या गिर्यारोहकांच्या सोबतीचे सामान वाढले. याचा परिणाम त्यांच्या मोहिमेवर झाला व गौतम घोष व परेश नाथ यांचा ऑक्‍सिजन कमी पडल्यामुळे अपघात होऊन बेपत्ता झाले. सुभाष पॉल हे कॅम्प 4 ते कॅम्प च्या परतीच्या मार्गावर ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडले. तर सुनिता हझारा यांना ब्रिटीश गिर्यारोहक लेस्ली बिन्स यांनी अपघाती स्थितीत बघितले. एव्हरेस्ट अगदी 500 मीटरवर असताना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न बाजूला ठेऊन ते सुनिता यांना खाली घेऊन परतले. यात सुनिता यांचा जीव वाचला परंतु परेश नाथ व गौतम घोष हे बेपत्ताच राहिले. काही काळाने परेश नाथ यांचा मृतदेह साउथ कोलजवळ सापडला, मात्र गौतम घोष अद्याप बेपत्ताच आहेत. 

आता वर्ष होऊन गेले आहे. गौतम घोष यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचा मृतदेह अजूनही "एव्हरेस्ट' समिट मार्गावर आहे. यावर्षी त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार एव्हरेस्ट बेस कॅम्पवर मृतदेह शोधून काढण्याच्या उद्देशाने आले आहेत. सुदैवाने यावर्षी रूट ओपन करणाऱ्या शेर्पाच्या संघाला मृतदेह बाल्कनीजवळ दिसला आहे. आता तो फक्त खाली घेऊन येणे महत्वाचे आहे. घोष यांच्या आप्तेष्टांसोबत संवाद झाला. मी या शोधमोहिमेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. आम्ही जेव्हा एव्हरेस्ट समिटसाठी जाऊ तेव्हा, परत येताना गोपाल घोष यांचा मृतदेह घेऊन परत यायचे ठरविले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची जी हानी झाली आहे, ती नक्कीच भरून निघणारी नाही, परंतु त्यांचा मृतदेह अनंतात विलीन झाल्यावर कुटुंबाला मानसिक स्थिरता लाभेल, यासाठी आम्ही सर्वोतपरी मदत करण्याचे ठरवले आहे. 
(क्रमशः)

Web Title: Umesh Zirpe writes about Mission Everest