क्षण ‘युरेका’चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

सेवेचा ‘आधार’
काही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं आणि गावातल्या इतर लोकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून त्यांना रांगेत उभं केलं होतं.

सेवेचा ‘आधार’
काही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं आणि गावातल्या इतर लोकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून त्यांना रांगेत उभं केलं होतं.

मी माझ्या ऑफिसमधून एका वर्गाला भेट देण्यासाठी चालले होते. त्यावेळी आधार कार्ड नोंदणीचे फॉर्म घेण्यासाठी गावातल्या स्त्री-पुरुषांची रांग लागली होती. रांग बरीच मोठी होती. त्या रांगेत हातात काठी घेतलेल्या आणि कमरेत वाकलेल्या वयस्कर आजी मला दिसल्या. त्यांचा रांगेतला नंबर पाहिल्यावर त्यांचा नंबर येण्यास खूप वेळ लागेल, असं मला दिसून आलं. मग मी त्या वर्गात न जाता आजींच्या जवळ गेले. ‘‘आजी, तुम्ही जरा माझ्या ऑफिसमध्ये येता का? माझं तुमच्याकडं छोटंसं काम आहे,’’ असं म्हणून मी आजींना माझ्याबरोबर येण्यास सांगितलं. आजी माझ्यामागं काठी टेकत-टेकत पायऱ्या चढून माझ्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा मी त्यांना बसण्यास खुर्ची दिली आणि त्या खुर्चीवर बसल्यावर त्यांना पिण्यास पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर आजी म्हणाल्या, ‘‘मॅडम, लवकर सांगा- तुमचं माझ्याकडं काय काम आहे? माझा रांगेतला नंबर येऊन जाईल. या सरकारनं काय फतवा काढलाय, आता या वयात मला रांगेत उभं राहायला व्हतंय का? तुम्हीच सांगा मॅडम.’’
तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आजी, तुम्ही माझ्या आजीसारख्याच आहात. तुम्हाला रांगेत उभं राहायला नको, म्हणून तर मी तुम्हाला इथं बोलावलं आहे.’’ त्यानंतर मी माझ्याकडच्या फॉर्मवर त्यांची माहिती विचारून भरून घेतली आणि त्यावर त्यांचा अंगठा घेतला. आजींना बरोबर घेऊन मी आधारकार्ड काढण्यासाठीच्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या साहेबांना सांगून आजींचं काम पहिलं करून घेतलं.

त्यावेळी आजींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान पाहून मला ‘युरेका’ सापडल्याचा आनंद झाला. नंतर मी समाधानानं माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. माझ्यामागं लगेचच त्या आजी काठी टेकत-टेकत ऑफिसमध्ये आल्या आणि मला हात जोडून म्हणाल्या, ‘‘मॅडम, आज लय भारी काम केलं तुम्ही माझं.’’ त्यावेळी आजींच्या चेहऱ्यावर त्यांचं काम पूर्ण झाल्याचा जो आनंद दिसला, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

नंतर मी शाळेत जाताना त्या आजी मला ज्या-ज्या वेळी भेटतात, तेव्हा मला आवाज देऊन थांबवतात आणि माझी मायेनं विचारपूस करतात. ‘‘मॅडम तुम्ही त्या दिवशी माझं लय भारी काम केलं. तुमच्यामुळं मला आधार कार्ड लवकर मिळालं,’’ असं नेहमी म्हणतात. त्यांची ही कृतज्ञतेची भावना पाहून मला एक वेगळी प्रेरणा मिळाली. तेव्हापासून मी मूर्तीतल्या देवाची पूजा न करता गोरगरिबांना आणि गरजूंना मदत करणं, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीस धावून जाणं आणि वयस्कर लोकांची सेवा करणं याची मला सवयच लागली. त्यामुळं केलेल्या सेवेचा आणि मदतीचा आनंद यामुळं जे आत्मिक समाधान मिळतं ते लाखमोलाचं आहे.

- अश्‍विनी साळवी, पुरंदर, जि. पुणे.


‘मिस्टर बीन’नं दिली लिफ्टची कल्पना
पा   लकांची सतत ओरड असते, की चित्रपट बघण्यापेक्षा पुस्तकं वाचा; पण बऱ्याच वेळा या चित्रपटांमधून आपल्याला शिकायलाही मिळत असतं. मी नुकताच ‘मिस्टर बीन्स हॉलिडे’ हा चित्रपट पाहिला. त्यात मिस्टर बीन महामार्गावर उभा असतो आणि शहराकडं जाण्यासाठी त्याला ‘लिफ्ट’ हवी असते, तेव्हा तो उजवा हात पुढं करून आणि अंगठा वर करून उभा राहतो. थोड्याच वेळात त्याच्यासाठी एक गाडी थांबते, असं दृश्‍य होतं. मला किंचित आश्‍चर्य वाटलं. लिफ्ट मागण्याची ही पद्धत मला तर नव्यानंच कळली.

त्यानंतरची गोष्ट. कुठल्याशा व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान संपायला बराच उशीर झाला. जवळपास रात्रीचे साडेनऊ वाजून गेले. बसस्टॉपवर पोचल्यावर कळलं, की शेवटची बस नुकतीच निघून गेली. ती थोडी निर्मनुष्य वस्ती असल्यानं रिक्षाही पटकन्‌ मिळेनात. काय करावं याचा विचार करत मी तिथंच थांबलो. मला लांबून एक कार येताना दिसली. अचानक मला ‘मिस्टर बीन’ चित्रपटातलं ते लिफ्ट मागण्याचं दृश्‍य आठवलं. मी लगेच उजवा हात पुढं करून अंगठा वर करून उभा राहिलो; पण तो गाडीवान काही थांबला नाही. मला आणखी एक गाडी येताना दिसली. आश्‍चर्य म्हणजे यावेळी गाडी थांबली. त्यातल्या चालकानं मला ‘कुठं जाणार’ म्हणून विचारलं. त्यानं मला जवळच्या बसस्टॉपवर सोडलं. तिथून मला घरी पोचता आलं. मनातल्या मनात मी ‘मिस्टर बीन’चे आभार मानले.

- आदित्य जवळकर, पुणे


‘आपले’पणाची गोष्ट
ए    का सामाजिक संस्थेचं आम्ही काम करतो. संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांची जबाबदारी माझ्यावर आहे. गेली २४ वर्षं सातत्यानं निरनिराळे उपक्रम यशस्वी होत आहेत. सुरवातीच्या काळात कार्यक्रमांत काही गोष्टींची कमतरता भासायची. कधी पारितोषिकांची संख्या कमी यायची, तर कधी प्रशस्तिपत्रकावर मान्यवरांच्या सह्या घ्यायच्या राहिलेल्या असायच्या. कधी एखादा निरोप ठराविक व्यक्तींना दिला गेला नसायचा. कार्यक्रम पार पडायचा; पण तो सुरळीत आणि यशस्वी न झाल्याची खंत असायची. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे यावर विचार केला, तेव्हा लक्षात आलं, की कोणताही कार्यक्रम ठरवताना त्याची तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी होणाऱ्या व्यक्ती, सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, अर्थसाह्य करणारे देणगीदार, जमा-खर्चाचं अंदाजपत्रक, त्यासाठी होणाऱ्या मीटिंग्ज, कामाची जबाबदारी आपण ज्यांच्यावर सोपवणार आहोत त्या व्यक्ती. सर्व कामांची नोंद आणि कार्यक्रमानंतर सर्वांना वैयक्तिक धन्यवाद देणं या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. हे सर्व केल्यानं प्रत्येक उपक्रम यशस्वी होऊ लागला. कामाचा आनंद मिळाला. म्हणजे व्यवस्थित नियोजनानं आयोजन यशस्वी होतं. अशातच राज मुछाल यांनी दिलेला सल्ला मला उपयोगी पडला. तो म्हणजे ‘हे मी करते- हा माझा कार्यक्रम आहे,’ असं न म्हणता ‘हे आपण करतो- हा आपला कार्यक्रम आहे,’ असं म्हटलं पाहिजे. मी आणि माझं नव्हे, तर ‘आपण’ आणि ‘आपले’ अशी भूमिका घेतली, तर उपक्रम यशस्वी होतात. आजपर्यंत अशा उपक्रमांचा आनंद आम्ही घेत आहोत. ‘मी’ आणि ‘माझे’ यांच्यामध्ये ‘ग’ची बाधा सुरू होते. सहकारी मित्रांमध्ये उगीचच असंतोष पसरतो. सर्वांच्या आवडीनिवडीचा विचार करून कामाची विभागणी केली, प्रत्येकाला कामाची जबाबदारी दिली, तर थोडी जबाबदारी पार पाडणाऱ्यालासुद्धा त्याचा आनंद मिळतो. सर्वांनी मिळून केलेलं असं काम यशस्वीरित्या पूर्ण होतं. ही ‘आपले’पणाची पद्धत वापरली, तर कोणताही कार्यक्रम परिपूर्ण होतो.

- सीमा दाबके, पुणे


प्रवासातली ‘शिदोरी’
शा   सकीय सेवेत असताना माझी बदली उस्मानाबादला झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब पुण्याला ठेवून मी ‘अप-डाऊन’ करत असे. आठवड्याला साधारण रविवारी माझी पुण्याला चक्कर ठरलेली असायची.
एसटीनं प्रवास करणं मला आवडतं. गाडी बंद पडली, तर पर्यायी एसटीमध्ये बसवलं जातं, हे त्याचं एक कारण आणि ‘सुरक्षितता’ हे दुसरं कारण.
साधारण १७ वर्षांपूर्वीची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारी चार वाजता पुण्याहून उस्मानाबादला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. चार वाजले, तरी उन्हाचा चटका कमी नव्हता. खिडकीजवळची जागा मोठ्या प्रयासानं मिळवली होती. खिडकीतून आलेलं ऊन चेहऱ्यावर पडत होतं. ते सहन होत नव्हतं. माझ्या शेजारी बसलेल्या गृहस्थाच्या ते लक्षात आलं. त्यांनी स्वतःच्या पिशवीत असलेली लुंगी देऊन खिडकीत अडकवायला सांगितली. तसं केलं. उन्हाच्या ठिकाणी सावली आली. शेजाऱ्याचे आभार मानले.

रात्री नऊच्या सुमाराला एसटी बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावर बंद पडली. गाडीच्या इंजिनात दोष निघाल्यामुळं दुरुस्तीची शक्‍यता कमी होती. दुसऱ्या एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एक तास झाला. अंधारी रात्र. पोटात कावळे ओरडू लागले. आमच्या पुढच्या खिडकीशेजारी बसलेलं एक लहान मूल पाणी मागू लागलं. त्याला भूकही लागली असावी. माझ्या शेजारचे गृहस्थ तयारच होते. त्यांनी स्वतःकडचं पाणी त्या मुलाला दिलं. स्वतःकडची शिदोरी सोडली. मुलानं थोडं खाऊनही घेतलं. आता तो चांगला खेळू लागला. दरम्यान, दुसरी एसटी उपलब्ध झाली.  मी शेजाऱ्याला विचारलं ः ‘‘तुमच्याकडं या सर्व वस्तू कशा काय असतात?’’
‘‘मी नेहमी प्रवास करतो. शिदोरी, पाणी, लुंगी, छत्री नेहमी मी जवळ ठेवतो. आणीबाणीच्या काळात या वस्तू कधी उपयोगी पडतील, हे सांगता येत नाही. शिदोरीमुळं कुठंही आपल्या घरचं अन्न मिळतं. हॉटेलपेक्षा केव्हाही चांगलं. आपल्याजवळ असलेलं घरचं पाणी केव्हाही पिता येतं. बिसलेरी बाटलीतल्या पाण्याचा भरवसा नाही. लुंगीचा उपयोग अंथरूण-पांघरूण, मफलर, टॉवेल कसाही करता येतो. छत्रीचा उपयोग उन्हात-पावसात होतो. उन्हाळ्यात कधीही पाऊस येतो.’’
त्या दिवसापासून मी प्रवासाला जाताना शिदोरी-पाणी-लुंगी-छत्री आठवणीनं बरोबर घेतो.
- शिवलिंग राजमाने, पुणे

Web Title: ureka article in saptarang