क्षण ‘युरेका’चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नोंदींमुळं सुटलं व्यसन
गोष्ट साधी-सोपीच; पण माझ्या कॉफी पिण्यावर नियंत्रण आणणारी. मी चहा अजिबात पीत नाही. घरात नेसकॅफेच पिते.

नोंदींमुळं सुटलं व्यसन
गोष्ट साधी-सोपीच; पण माझ्या कॉफी पिण्यावर नियंत्रण आणणारी. मी चहा अजिबात पीत नाही. घरात नेसकॅफेच पिते.
सुरवातीला मी फक्त दोनच कॉफी घेत असे; पण १९८५मध्ये मी क्‍लास घेणं चालू केलं आणि हळूहळू माझं कॉफी पिण्याचं प्रमाण वाढत गेलं. कधी थंडी म्हणून, कधी घशाला बरं वाटतं म्हणून, कधी सुटीतलं रिकामपण म्हणून, तर कधी टेन्शन आलं म्हणून! माझं कॉफी पिणं व्यसनाकडं जाऊ लागलं. मी सहा-सात कप कॉफी पिऊ लागले- हे चांगलं नाही हे कळत असूनही! बाहेरगावी गेल्यावर मात्र मी फार कॉफी न पिता राहू शकत असे, त्यामुळं माझ्या कॉफी पिण्याच्या ‘व्यसना’ची फारशी कुणाला कल्पना नव्हती.
मी घरी कॉफी पिताना कप गच्च भरून घेते. मला कमी भरलेला कप आवडत नाही, म्हणून मी लहान आकाराचा कप आणला.
२००१मध्ये माझं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं. त्यावेळी चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, पापड, लोणची इत्यादी वर्ज्य करायला पाहिजे, असं मी एका पुस्तकात वाचलं. मी मसालेदार पदार्थ, पापड, लोणची खाल्ली नाहीत. थोडे दिवस कॉफी सोडली; पण मला कॉफी न पिता चैन पडेना.
नंतर मलाच एक उपाय सापडला. मी आहाराची डायरी लिहायला सुरवात केली. तीन कॉलम केले. १) सकाळचं जेवण, २) रात्रीचं जेवण, ३) कॉफी, फळं आणि इतर आहार.
कॉफी किती प्यायली याची नोंद ठेवल्यानं जास्त कॉफी प्यायल्यास माझी मलाच जाणीव होत असे. त्यामुळं माझ्या कॉफी पिण्यावर आपोआप मर्यादा आली. आता मी सकाळी दोन वेळा व दुपारी एक वेळा कॉफी पिते. तीही शंभर मिलीलिटरच्या कपातून आणि अगदी सौम्य. कधीतरी बाहेर गेल्यावर एखादा कप जास्त झाला, तरी अपराधी न वाटण्याएवढीच ही कॉफी. डायरीतल्या नोंदींनी ही सगळी किमया केली!

वासंती सिधये, पुणे


नियोजनामुळं गोष्टी सोप्या
म   ला गेल्या दहा वर्षांपासून फिरायला जाण्याची सवय आहे. माझ्याप्रमाणंच संध्याकाळी नियमित फिरायला येणाऱ्या मैत्रिणींचा एक ग्रुपच तयार झाला आहे. त्यामध्ये साहजिकच रोज कोणी काय केलं ते बोललं जातं. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं कोणी काय केलं याची चर्चा होते.
एक दिवस अशीच माझी एक जवळची मैत्रीण म्हणाली ः ‘‘तू रोज एका पदार्थाचं नाव सांगतेस; पण तुझ्या घरात तर लहान बाळ आहे. लग्नाचा सीझन असल्यामुळं पाहुण्यारावळ्यांचीही वर्दळ असते. तालुक्‍याचं ठिकाण असल्यानं कार्यालयात बसण्यापेक्षा मधल्या वेळी गावाकडचे लोक घरी येतात. हे सर्व सांभाळून तू उन्हाळी कामं कशी काय करतेस?’’ त्यावर मी तिला म्हणाले ः ‘‘हे सगळं करून वर आम्ही दुपारी तीन ते पाच विश्रांती घेतो.’’ तेव्हा तर ती आश्‍चर्यानं थक्कच झाली. मी तिला मग त्यामागचं रहस्य सांगून टाकलं.

मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते त्याच्यामागं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वेळेचं नियोजन. एकतर काही जास्तीचं काम करायचं असल्यास सकाळी उठल्यापासूनच डोक्‍यात असतं. त्यामुळं नेहमीपेक्षा काम एक तास तरी लवकर उरकते. हे दिवाळी, सणवार, उन्हाळी कामं या सगळ्याच वेळी असतं. थोडीशी पूर्वतयारी आणि नियोजन असेल, तर विश्रांती, फिरायला जाणं या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणंच होतात. संध्याकाळी पाच वाजता चहा घेऊन लगेच भाजी, कूकर लावणं सर्व उरकून फ्रेश होऊन मी जेव्हा सहा ते साडेसहाला फिरायला निघते, तेव्हा कुणी घोळका करून गप्पा मारत आहेत, कुणी दळण दळते आहे, कुणी भांडी घासते आहे, कुणाचं तरी चहापाणी नुकतंच झालं आहे, असं दिसतं. त्या सगळ्या जणींना माझा हेवा वाटतो. कारण त्या नियोजन न करता होईल तसं करतात. माझं उद्दिष्ट मोकळ्या हवेत फिरायला जाणं असल्यानं मी लवकरच आवरून घराबाहेर पडते.

यामुळं मोकळ्या हवेत शेतात जाऊन शांतपणे जरा वेळ बसता येतं आणि दिवसभराचा शीण निघून जातो. डोक्‍यात काही टेन्शन असेल, तर ते दूर होतं. बाहेरच्या लोकांत मिसळणं होतं. घरापासून थोडा वेळ दूर गेल्यानं घरात परत आल्यावर कामाला उत्साह येतो. अशा प्रकारे नियोजनाचं महत्त्व जीवनात खूप आहे.

- वर्षा कोहिनकर, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे


एक धडा मोलाचा
चा   र भिंतीच्या शाळेत मिळणाऱ्या ज्ञानाइतकंच व्यवहारात अनुभवांच्या चटक्‍यांनी मिळणारं व्यवहारज्ञान महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा धडा वयाच्या एकविसाव्या वर्षी मला एका प्रसंगातून मिळाला.
माझे वडील (आत्माराम साठे), आई (इंदू साठे) आणि मी असे तिघं जण धुळ्याहून महाराष्ट्र एक्‍स्प्रेसनं सायंकाळी पुण्याला जाण्यासाठी निघालो. १९७२च्या देशव्यापी संपामुळं रेल्वेगाड्या अनियमित होत्या. धावतपळतच आम्ही तिघं रेल्वेच्या गच्च भरलेल्या डब्यात शिरायला लागलो. वडील शेजारच्या आरएमएसच्या डब्यात सामान ठेवण्यासाठी गेल्याचं गर्दीमुळं आम्हा दोघींना कळलंच नाही.
गाडी सुरू झाली. दाराजवळचे लोक ओरडू लागले ः ‘‘तुमचा माणूस खाली राहिला आहे. गाडीची साखळी ओढा.’’ आई आणि माझा पहिलाच रेल्वेप्रवास असल्यानं साखळी कुठं असते, हेही माहीत नव्हतं. एवढ्या वेळात गाडीनं चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचा अंधार पसरू लागला. मनात भीती आणि शंका थैमान घालू लागल्या. अवतीभोवतीची अनोळखी गर्दी, अंगावर दागिने, त्यात जवळ तिकिटं नाहीत. त्यामुळं चिंता वाढायला लागली.
प्रत्येक स्टेशनवरून अनाऊन्समेंट ऐकू येत होती- ‘इंदू आणि सुधा साठे यांनी उतरून घ्यावं. पुढील स्टेशनवर वडील येतील.’ काय निर्णय घ्यावा? अपरात्री निर्मनुष्य स्टेशनवर उतरावं का?
माझ्या पर्समध्ये जेमतेम पन्नास रुपये होते. एक जवान आमच्या गाडीत होता. तो सुटीवर घरी चालला होता. त्यानं तिकीट तपासनीसाला आमची अडचण सांगितली आणि वाटेत कुठंही न उतरता सकाळी पुणे स्टेशनवर उतरून वडिलांची वाट पाहण्याचा मौलिक सल्ला दिला.
कशीबशी रात्र गेली. सकाळी संकटकाळी धावून येणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणं त्या जवानानं नाश्‍त्यासाठी वडापाव आणून दिला. खूप वाईट वाटत होतं.
२४ तासांनी वडील पुण्याला आले अन्‌ आमच्या जीवात जीव आला.
तेव्हापासून आजपर्यंत एक धडा कायमचा शिकले, तो म्हणजे प्रवासात स्वतःजवळच नव्हे, तर मुलांकडंही पुरेसे पैसे प्रत्येकानं ठेवलेच पाहिजेत.
सर्वांनी थोडी दक्षता घेतल्यास आमच्यासारखी फजितीची वेळ येणार नाही.

- सुधा सहस्रबुद्धे, पुणे


कुत्सित हास्यावर मात
सा   धारण चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही काही मित्रमैत्रिणी पिकनिकला गेलो होतो. खूप मजा केली. संध्याकाळी असंच गंमत म्हणून सगळ्यांनी मिळून नाचगाण्यांची मैफीलच जमवली. दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गेले; पण मला मात्र सतत असं जाणवायला लागलं, की काही जणांनी आपल्या नृत्याची चेष्टा केली आणि अजूनही करतायेत. त्यांचे हावभाव आणि कृत्सितपणानं हसणं मला सतत जिव्हारी लागू लागलं. मात्र, ही गोष्ट मी मनाला लावून न घेता जे लोक मला हसत होते, त्यांना ‘धडा’ शिकवायचा ठरवलं आणि तेही स्वतःमध्ये बदल करून.
म्हणतात ना इच्छा असेल, तर मार्ग नक्कीच मिळतो. त्याचप्रमाणं काही दिवसांतच मला माझ्या काही मैत्रिणींसोबत नृत्याचा स्टेज शो करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. खूप मेहनत केली; त्यानंतरही काही शो झाले आणि जे लोक माझ्यावर हसत होते, त्यांच्याकडूनच कौतुकाची आणि शाबासकीची थाप मिळायला लागली. इतकंच नव्हे, तर त्यांच्या या कुत्सित हास्याचा मला खूपच फायदा झाला. माझा आत्मविश्‍वास वाढला. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याएवढं माझं स्टेज डेअरिंग वाढलं.  आज मला खूप आनंद होतो, की मी नकारात्मक विचार न करता; तसंच कुणालाही न दुखावता स्वतःमध्येच बदल करून अशा लोकांना धडा शिकवू शकले.

- सोनाली गावडे, नवी मुंबई

Web Title: ureka article in saptarang