#MokaleVha : बहीण नावाचं माहेरपण

ऊर्मिला देवेन | Sunday, 11 August 2019

जान्हवी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिन्यांवरून जरा खटकलं होत वहिनीसोबत तिचं. आई गेली, त्यामुळं रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी विचार करायची.

जान्हवी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिन्यांवरून जरा खटकलं होत वहिनीसोबत तिचं. आई गेली, त्यामुळं रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी विचार करायची. कधी ती स्वतःला बरोबर समजत होती. तर, कधी वहिनीला. वाहिनीनं आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे दागिने केले होते, जे तिला पटलं नव्हतंच. मग काही न बोलता तिनं वहिनीशी बोलणं बंदच केलं. रक्षाबंधन जवळ येत होता आणि जान्हवीची ओढ वाढत होती.

भावाकडं जावं आणि राहावं दोन दिवस असा विचार मनात सारखा येत होता. सकाळी नवऱ्यानं चहा मागितला आणि जान्हवीचा भडका उडाला. ‘घे ना समोर तर ठेवला आहे, हातातच द्यायचा का?’ अमित जरा दचकलाच आणि हळूच म्हणाला, ‘असा कधीही वनवास सुरू होतो माझा. बहीण नाही ना मला माहेरपणाला.’

आता जान्हवी गदकन हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली. अमितनं लागलीच तिच्या हातात ट्रेनचं तिकीट दिलं आणि म्हणाला, ‘तुझा सूर दोन दिवसांपासून मी ओळखला होता.

कालच बुक केलीत. जाऊन ये भावाकडे. सोडतो तुला उद्या स्टेशनवर.’

जान्हवी चाचरत म्हणाली, ‘तसं नाही, पण वहिनी?’ ‘जाऊदे, कधी तिलाही फिल कर की...’ आणि दोघंही हसले...

सकाळी जान्हवीनं तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी पोचली. घरच्या काळूनं तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या. वहिनीला क्षणभर कळलंच नाही की काळू एवढा भुंकून आणि आतबाहेर करत काय सांगतोय ते. शेवटी त्यानं वहिनीला घरातून पदर खेचून बाहेर आणलं आणि जान्हवी दारात होती. नणदेला एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला. तिच्यासाठी सासरची जवळची एकमात्र तीच होती. तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कडेवर उचलून नेलं तिनं. जान्हवी सहज वाहिनीच्या खोलीत शिरली, तर तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली. तिची खोली आज वाहिनीची होती. पेंटिंग न्याहाळता न्याहाळता वहिनीच्या कानांतल्या कुड्यांवर लक्ष गेलं तिचं. ‘वहिनी या आईच्या ना? या नाही मोडल्या तू?’

‘आईला खूप आवडायच्या या. माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या माझ्या पसंतीनं. आईने जाताना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून राहा, असे सांगून गेल्या. त्यांचा आशीर्वाद आहे यात.’ ‘पण, तू दागिने मोडून नवीन केलेस ना?’

‘हो, पण या नुकताच घेतल्या होत्या. तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या, की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून. पण, त्याआधीच... मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केले. अगदी तुला देण्यासाठी ठेवलेलेसुद्धा.’

तेवढ्यात राजन आला आणि जान्हवीला घरी बघून आनंदाने ओरडू लागला. ‘चला माझं माहेरपण आलं. ए बायको, चहा कर गं. जरा माहेरपण जगू दे आता. सारखी कटकट करत असते. आली आता माझी बहीण ऐकून घ्यायला माझं. थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो तिला आणि जान्हवी हिला ना ही सासरी असल्याचं फिल दे गं जरा. हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजूला केलंय हिनं.

जान्हवी खुदकन्‌ हसली, ‘नाही रे, तुझं माहेरपण आता मीच आहे हे कबूल. पण, तिचं हे सासर नाही राहिलं आता. तीच हे घर संसार नावाचा वटवृक्ष झालाय. ज्याच्या गर्द सावलीत आपण माझं-तुझं माहेरपण जगतो आणि ती अजूनही तुझं-माझं माहेरपण जपते..

भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं वहिनीनं. मग या रक्षाबंधनाला बहीण-भावातलं माहेरपण अनुभवाच. कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते.