बाराशे (उत्तम कांबळे)

बाराशे (उत्तम कांबळे)

वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळं. नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळं. कधी कधी याच्या उलटंही घडताना दिसतं. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळं तर असतेच; पण तिथल्या प्राण्या-पक्ष्यांमुळंही असते. तिथले काही प्राणी, काही पक्षी या गावाला नाव मिळवून देतात. त्या गावात पहिल्यांदाच जाणाऱ्यांचं ते आकर्षण बनतात. नाशिक शहराजवळच्या पळसे या गावातही असाच एक वैशिष्ट्यपूर्ण कुत्रा आहे...त्याचं नाव बाराशे/बाराश्‍या. त्याचं नेमकं कोणतं वैशिष्ट्य आहे, त्याचं असं ‘नामा’निराळा असण्यामागचं कारण काय आहे...?

काही गावं माणसांमुळं प्रसिद्ध होतात. काही माणसं गावामुळं ओळखली जातात. काही गावांची त्यांची त्यांची म्हणून वेगवेगळी वैशिष्ट्यं असतात. ती इतिहासातून, भूगोलातून, संस्कृतीतून किंवा देवा-धर्मातूनही तयार झालेली असतात. उदाहरणार्थ ः सिन्नर तालुक्‍यात वडांगळी इथं जावयाची धिंड काढली जाते. जळगाव जिल्ह्यात प्लेग नावाच्या भयानक रोगाचं मंदिर आहे. असंच खोकल्याचं मंदिर सोलापुरात आहे. कुठं देवाला ब्रॅंडी दिली जाते. कुठं पीरबाबा भुतं उतरवत असतो, तर कुठं आणखी काहीतरी असतं.

‘फिरस्ती’मध्ये ही सगळी गावं पाहता येतात. असं का घडलं असेल, असे प्रश्‍न तयार करून उत्तरंही शोधता येतात. खूप वर्षांपूर्वी ‘सकाळ’मध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गावांवर एक लेखमाला चालली होती. ‘प्रथा अशी न्यारी’ या नावानं... डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्याचं पुस्तकही प्रसिद्ध केलं होतं.

आजही प्रदेशानुसार अनेक गावं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी लौकिक पावली आहेत. मराठवाडा, विदर्भात संतांची अनेक गावं आहेत. नांदेडजवळ नरसी नामदेव हे नामदेवांचं जन्मस्थळ प्रसिद्ध आहे. शीख समाज या जन्मस्थळाचा विकास करतोय. पश्‍चिम महाराष्ट्रात काही गावं लष्करातल्या जवानांमुळं आणि शर्यतीच्या बैलांमुळं प्रसिद्ध आहेत. काही अंधश्रद्धांमुळं, तर काही शिक्षणात क्रांती केल्यामुळंही प्रसिद्ध आहेत. अनेक गावं प्राण्यांमुळं, पक्ष्यांमुळं प्रसिद्ध आहेत. मोरांमुळं मोरांच्या वाड्या जन्माला आल्या.

सापामुळं बत्तीस शिराळा, घोड्यांच्या बाजारामुळं सारंगखेडा, येवला...अशी अनेक गावं सांगता येतील. शिरपूर इथं लग्नात नाचणारे घोडे प्रसिद्ध आहेत. कोणत्याही गाण्यावर ते नाचतात. बाजेवर नाचतात. स्टुलावर दोन पाय ठेवून नाचतात. वाघांचा संचार असलेली गावं, अस्वल-रानडुकरांचा संचार असलेली गावं आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अशा अनेक गावांत मी जाऊन आलो आहे. भलेही ती राजकीय नकाशात दिसत नसतील; पण भूगोलात मात्र जरूर दिसतात.

परवा नाशिकपासून पंधराएक किलोमीटरवर असलेल्या विष्णुपंत गायखे यांच्या शेतावर गहू आणि हरभऱ्याच्या हुरडा-पार्टीसाठी गेलो होतो. आता हे गायखे म्हणजे गाईंना खाऊ घालून जगवणारे. आता त्यांच्याकडं गाई नाहीत; पण आडनाव गायखे पडलं. गावात गाईंचे काही मालक आहेत. ते झाले गायधनी... तर हे गायखे आपली ८३ वर्षांची; पण अजूनही धडधाकट असलेली आई आणि भावांसोबत शेती करतात. याच गायखेंना डॉ. रावसाहेब कसबे यांनी आत्मचरित्र लिहायला सांगितलंय आणि त्यांनी त्याची तयारी चालवलीय. काही मुद्दे त्यांनी आम्हाला सांगितले. शेजारी त्यांची आई होती. हरभरा आणि गव्हाच्या लोंब्या तिनंच मस्तपैकी भाजल्या होत्या. गावठी गुळाचे दोन-चार खडेही नातवाकडून मागवले होते. गायखे मुद्दे वाचत असताना एक-दोन मुद्द्यांवर लक्ष खिळून राहिलं. एक म्हणजे अगदीच बालपणी कोणत्या तरी आजारानं ते ‘मरण पावले’ म्हणून त्यांच्या आईनं दारणा नदीकाठावर त्यांचा छोटा मृतदेह ठेवला होता; पण नंतर ते जिवंत झाले. मोठे झाले. त्यांनी सात वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली.

गावकऱ्यांच्या मदतीनं गावात हायस्कूल, ग्रंथालय, पतसंस्था सुरू केली. पंढरीच्या वारीला नातेवाईक घेऊन जात नाहीत म्हणून त्यांनी लहानपणीच आत्महत्या करण्यासाठी डोहात उडी मारली होती. त्यातूनही त्यांना वाचवण्यात आलं. मग त्यांना रानात विशिष्ट वेळेला, विशिष्ट वाटेवरून जाणारा अजगर बघण्याची सवय लागली. असे हे विष्णुपंत (९३७३१९१३५८) एक प्रकारे अवलिया वाटणारे, जग फिरून आलेले, मोठमोठ्या लेखकांचा सहवास लाभलेले आणि स्वतःची एक टिपिकल ओळख तयार करणारे आहेत. 

बोलता बोलता ते म्हणाले - ‘‘आमच्या गावात एक ‘बाराशे’ आहे. त्यावरही थोडं लिहायचं आहे.’’

बाराशे या शब्दानं माझी उत्सुकता चाळवली. सहजच विचारलं तर ते म्हणाले - ‘‘गावठी कुत्रा आहे. अडीच-तीन वर्षांचा.’’
उत्सुकता आणखी चाळवली गेली. असा काय लागून गेला आहे तो कुत्रा, की तो गायखे यांच्या पळसे या गावाची, म्हणजेच पळशाची, ओळख होऊन बसलाय...? झालंच तर त्यांच्या आत्मचरित्रातही प्रवेश करू लागलाय?
गायखे हसतच म्हणाले - ‘‘त्याचं काय आहे, की गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो प्रत्येक अंत्ययात्रेबरोबर स्मशानात येतो. पिंडदानाच्या वेळीही येतो. काही कुठं मोठी धार्मिक कार्यं निघाली, तरीही त्या वेळी तो हजर असतो.’’

‘त्यात काय एवढं? खायला मिळत असंल म्हणून येत असंल,’ या माझ्या उत्तरावर त्यांचं प्रत्युत्तरही महत्त्वाचं होतं. ते म्हणाले - गावातलं कोणतंच कुत्रं एवढ्या वर्षांत स्मशानात आणि दहाव्याला कधी आलं नाही. पिंडदानाच्या वेळी अनेकदा कावळे सतावतात. रानमाळ कावळ्यांनी भरूनसुद्धा एक कावळा कुठं त्या वेळेला टपकत नाही. हा बाराश्‍या मात्र बिनबोलावता, न खुणावता हमखास येणार.’’

गायखे या बाराश्‍याचं बरंच कौतुक करत होते. गावात अनेक वेळा गर्दी होते; पण बाराश्‍या तिथं दिसत नाही. अंत्यसंस्काराच्या वेळीच गर्दीबरोबर चालत राहतो. परततो. अन्य कोणतीच कुत्री असं करत नाहीत. बाराश्‍या एखाद्या प्रौढासारखा गर्दीबरोबर चालत राहतो. कधी भुंकत नाही, की कुणाचा चावा घेत नाही. चोरी करून अन्न मिळवत नाही.

गायखे सांगत होते ते खरं होतं; पण अशी कुत्री मीही अनेकदा बघितली होती. खेड्यापाड्यातले लोक गावातून खंडोबासाठी चालत निघाले, की त्यांची कुत्रीही मंगसुळीपर्यंत (कर्नाटकातलं खंडोबाचं एक ठिकाण) जायची आणि परत यायची. अशा कुत्र्यांचं नावही बहुतेक वेळा खंड्या असंच असतं. सोबतची माणसं रात्री प्रवासात वाट चुकली, की हा खंड्या वाट दाखवतो, थेट खंडोबापर्यंत पोचवतो, असा समज आणि गैरसमज. बिरोबाच्या यात्रेला यात्रेकरूंबरोबर चालत जाणारीही कुत्री आहेत. एवढंच काय, नाशिकमध्ये गंगापूर रोडला नाना-नानी पार्कमध्ये, त्र्यंबकेश्‍वरला संत निवृत्तिनाथांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या दिंडीला हेमंत पाठक अन्नदान करतात. (पूर्वी शशिकांत जगताप करायचे. त्याच्यापूर्वी आणखी कुणी जाधव होते). या दिंडीबरोबरही एक कुत्रा येतो. पार त्र्यंबकेश्‍वरपर्यंत दिंडीबरोबर जातो. पुन्हा गावी परततो. पुन्हा दुसऱ्या वर्षी दिंडीत हजर. हा एकमेव कुत्रा असा आहे, की जो दिंड्या करतो. बुक्‍क्‍यानं तो माखलेला असतो.

...तर हा बाराशे. त्याच्या नावाची एक अशीच चित्तरकथा आहे. कोणत्या तरी कारणामुळं तो वाहनाखाली सापडला. जखमी झाला. आजारी पडला. गावातल्या एका तरुणानं त्याच्यावर औषधोपचार करायचं ठरवलं. स्वतःचे पैसे गुंतवले. थोडीफार वर्गणी काढली. कुत्र्यावर उपचार केले. त्याचा मागचा एक पाय अजूनही अधूच आहे; पण तो बऱ्यापैकी चालतोय, धावतोय, अंत्ययात्राही करतोय. गावठी कुत्र्यांना काही नावं असत नाहीत. त्यांचा सात-बारा असत नाही. माणसाचा पहिला मित्रप्राणी म्हणजे कुत्रा; पण गावात तो भटकत जगू लागला, की ‘गावठी’ हेच नाव त्याला मिळतं. जखमी कुत्र्यावर औषधोपचारांसाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल बाराशे रुपये खर्च झाले होते. कुत्रा जगवल्याचा आणि बक्कळ पैसा खर्च केल्याचा अभिमान उपचार करणाऱ्या तरुणाला होता. मोठ्या आनंदानं त्यानं कुत्र्याला नाव ठेवलं बाराश्‍या म्हणजे बाराशे... पुढं काही दिवसांनी उपचारकर्ता मरण पावला. त्याच्या अंत्ययात्रेलाही बाराश्‍या गेला होता, असं म्हणतात.
बाराश्‍याला थेट पाहण्याची माझीही उत्सुकता वाढली. गावात फिरत तिथल्या तरुणाच्या मदतीनं त्याला शोधलंच. एका दुकानाजवळ तो बसला होता. त्याचा फोटो काढला. कुणीतरी त्याच्यासमोर बिस्किटाचा पुडा उलटा केला. त्यातलं एक घेऊन तो चालू लागला. एव्हाना गर्दी वाढली होती.

मोबाईलमधून कॅमेऱ्याचे फ्लॅश पडत होते. बाराश्‍या बावचळला नाही. घाबरला नाही. गर्दीकडं दुर्लक्ष करून तो मोठ्या आत्मविश्‍वासानं चालू लागला. कुठं जाणार होता, कुठं बसणार होता कळत नव्हतं... एक मात्र खरं, की वेगवेगळ्या कारणांमुळं प्रसिद्ध असलेल्या पळशाला तोही चिकटला होता. प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव, ‘भारत ज्ञानविज्ञाना’ची चळवळ चालवणारं गाव, माजी पंतप्रधान राजीव गांधींना भेटण्यासाठी जाणारं गाव, युरोपला जाऊन येणारं गाव, छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाचा जागर करणारं गाव, नाशिक-पुणे महामार्गासाठी आपल्या शरीराचा एकेक तुकडा देणारं गाव, महानगराच्या कुशीत असूनही आपलं गावपण टिकवणारं गाव आता बाराश्‍याबरोबरही जोडलं गेलं आहे...दोघांचा जणू सहप्रवास सुरू आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com