पैसा फेको, देव देखो (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

कोणत्याही प्रसिद्ध धार्मिक स्थळी जा... तिथं सर्वसामान्यांची फरफट ठरलेलीच. शेकडो मैल अंतर कापून देवदर्शनाला येणाऱ्यांना देवाचिये दारी एक क्षणभरही निवांत उभं राहता येत नाही की त्याच्या पायी नीटपणे डोई ठेवता येत नाही. अशा धार्मिक स्थळी भाविकांमध्येही ‘खास’ आणि ‘आम’ असे भेदयुक्त प्रकार असतात आणि त्याची झळ ‘आम’ म्हणजेच सर्वसामान्य भाविकांना पोचत असते. गाभाऱ्यासमोर जाती गळून पडतात, असं म्हटलं जात असलं, तरी ‘व्हीआयपी’ आणि ‘नॉन व्हीआयपी’ अशा नवीनच ‘जाती’ या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. जिथं भक्तांनी देवाला श्रीमंत केलंय, तिथं हा नवा भेदाभेद हमखास दिसतो. 

कोणत्याही प्रसिद्ध धार्मिक स्थळी जा... तिथं सर्वसामान्यांची फरफट ठरलेलीच. शेकडो मैल अंतर कापून देवदर्शनाला येणाऱ्यांना देवाचिये दारी एक क्षणभरही निवांत उभं राहता येत नाही की त्याच्या पायी नीटपणे डोई ठेवता येत नाही. अशा धार्मिक स्थळी भाविकांमध्येही ‘खास’ आणि ‘आम’ असे भेदयुक्त प्रकार असतात आणि त्याची झळ ‘आम’ म्हणजेच सर्वसामान्य भाविकांना पोचत असते. गाभाऱ्यासमोर जाती गळून पडतात, असं म्हटलं जात असलं, तरी ‘व्हीआयपी’ आणि ‘नॉन व्हीआयपी’ अशा नवीनच ‘जाती’ या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. जिथं भक्तांनी देवाला श्रीमंत केलंय, तिथं हा नवा भेदाभेद हमखास दिसतो. 

स  हा जानेवारीला तुळजापूर पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दुपारी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो. तत्पूर्वी, महामुनी आणि शुभम कदम यांनी व्हीआयपी रांगेतून जाण्याचा प्रयत्न करता येईल का, यासाठी थोड्या हालचाली माझ्या परस्परच केल्याचं लक्षात आलं होतं. अर्थात, हे मला आवडलं नाही. एखादा भक्त व्हीआयपी आहे की नाही, हे ठरवण्याचे अधिकार कलेक्‍टर, प्रांत, तहसीलदार, नगराध्यक्ष, आमदार आदींकडं आहेत. देवापूर्वी ही साखळी यशस्वी झाली, की भक्ताला काही काळापुरतं तरी व्हीआयपी बनता येतं; पण महामुनीला काही यश आलं नाही. त्यानं व्हीआयपीऐवजी मुखदर्शन घेण्याचा निर्णय जाहीर केला. मुखदर्शन म्हणजे शंकराजवळ राहून घ्यावयाचं दर्शन. लांबूनच देवीला हात जोडायचे. धर्मदर्शनमध्ये जवळ जाऊन देवीचं दर्शन घेता येतं. व्हीआयपी वेगळे असतात. त्यांची रांग वेगळी असते. मुखदर्शनासाठीच जायचं म्हणून आम्ही रांगेत उभे राहिलो. ही रांगही मोठी होती. शेजारी अगदी चिकटून धर्मदर्शनाची आणि व्हीआयपीची रांग दुसरीकडून न दिसणारी...फारतर आपण गुप्तमार्ग म्हणू शकू. मुखदर्शनाच्या रांगेतून आम्ही एकेक पाऊल पुढं सरकत होतो. शेजारच्या धर्मदर्शनाच्या रांगेत खूप सामान्य माणसं होती. खेड्यापाड्यातून कुटुंबकबिल्यासह किंवा एकेकटीही आलेली. त्यांची रांगही मुंगीच्या पावलानंच पुढं जात होती. रांगेतले लोक बऱ्याच वेळेपासून उभे असावेत, असं त्यांच्या त्रासलेल्या चेहऱ्यावरून वाटत होतं. दोन रांगांमध्ये असलेल्या आडव्या पाइपाला हात लावून ते पाऊल टाकत होते. खरंतर पाऊल टाकत होते, असं म्हणण्याऐवजी ते सरकत होते, हलण्याचा प्रयत्न करत होते, असं म्हणणं अधिक वस्तुनिष्ठ ठरावं. माझ्या डाव्या बाजूला अर्थातच धर्मदर्शनच्या रांगेत एक पुरुष, त्याच्या मागं एक महिला, पुन्हा एक पुरुष उभा होता. आम्ही समोरच्या पुरुषाजवळ आलो तेव्हा सडपातळ अंगाचा, दाढी वाढलेला आणि विजारीतला भक्त जणू काही ओरडलाच ः ‘‘या, या...तुम्हीही पुढं या... आता काही राहिलं नाय बगा... पैसा फेको, देव देखो. आम्ही झक मारत कवरधरनं इथं थांबलोय आणि तुम्ही जा म्होरं म्होरं... आयला, कली आली म्हनत्याती ती हीच की...’’
बराच वेळ तो पुटपुटत होता. त्याचं बोलणं ऐकून मला दोन कारणांमुळं वाईट वाटलं. एक म्हणजे, मी व्हीआयपी रांगेत नसताना तो आमच्या रांगेवर चिडला होता. दुसरं म्हणजे, मी त्याच्याप्रमाणं धर्मदर्शनासाठी काही जाणार नव्हतो, तरी तो मला त्यांच्यातला समजून चिडला होता. काय बोलावं कळत नव्हतं. त्यातूनही मी म्हणालो , ‘‘दादा, माझी रांग वेगळी आहे. आम्ही मुखदर्शनासाठी निघालो आहोत.’’
यावर तो म्हणाला : ‘‘असू द्या. पैसेवाले कुठंबी थांबत्याती...’’
आमचा दोघांचा वाद वाढू नये म्हणून त्याच्या मागची महिला म्हणाली : ‘‘भाऊ, मनाला लावून घेऊ नका. सकाळधरनं रांगेत थांबून कावून गेलंय ते... तुमचं तुमचं चला... त्याच्याकडं, त्याच्या बोलण्याकडं लक्ष नका देऊ.’’
मी : ‘‘पण मावशी, आमची रांग व्हीआयपी नाहीय.’’
ती : ‘‘कळतं मला; पण याच्या डोसक्‍यात शिरत नाय. कुणी बी मागनं आलं आणि गेलं पुढं निघून तर याचं डोस्कं फिरतं... नाहीतर उभं राहून राहून पायाला कड येतोय की भाऊ... जा बाबा, तुझं तू पुढं.’’
महिला बोलल्यानंतर मग कुणीच काही बोललं नाही. खरंतर देवी आणि भक्त यांच्यात १५-२० फुटांचं अंतर होतं; पण गर्दी, व्हीआयपी, अतिव्हीआयपी यामुळं ते खूपच वाटत होतं. कुणाचा तरी जीव कावत होता. कावणं म्हणजे चिडणं... पश्‍चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात हा शब्द वापरतात. ‘कशाला कावतुयास?’ असं सहज कुणीतरी म्हणून जातं. 
चालता चालताच मनात अनेक प्रश्‍न घुमू लागले. एकतर या देवीच्या मंदिरात सर्वच जातींना प्रवेश आहे. गाभाऱ्यासमोर जाती गळून पडतात; पण आता नवी ‘जात’ जन्माला आली. व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी ही ती नवी जात. जिथं भक्तांनी देवाला श्रीमंत केलंय, तिथं हा नवा भेदाभेद हमखास दिसतो. सोय आणि आर्थिक लाभ ही दोन कारणं त्यामागं जशी आहेत, तसं भक्त आपली भौतिक जगातली प्रतिष्ठा घेऊनच देवासमोर जातो. प्रतिष्ठा विसरायला तो तयार नसतो. परिणामी, व्हीआयपीवाले बंदोबस्तातच झटकन आत जातात. सामान्य माणसाला काहीतरी वाटतं असेल, याचा विचार कुणाच्या गावीही नसतो. पंढरपुरात वारीच्या वेळी आपला नंबर लागण्याची शक्‍यता नसते म्हणून हजारो वारकरी चंद्रभागेत राहून कळसाला नमस्कार करतात. कळसात आपला सखा विठ्ठल पाहतात. व्हीआयपीवाले देवाजवळही पोझ देऊन आपले फोटो काढतात. दुसरीकडं ‘विठ्ठल...विठ्ठल दे दर्शन’ म्हणत फाटके-तुटके भक्त तासन्‌तास रांगेत खोळंबतात आणि झालंच तर तुळजापूरच्या भाषेत कावतात.
आता तुळजापुरात व्हीआयपीची आणखी एक सोय केलीय ती म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतले जात नाहीत आणि जे लाखो रुपये मिळतात त्यातून देवस्थान समिती (शासकीय) काही करत नाही. कोट्यवधी रुपये या समितीकडं फक्त पडून आहेत. त्यावर व्याजही भरमसाट मिळतं. ‘व्याजाला सोकलं आणि कामाला मुकलं’ याप्रमाणं चाललंय. ट्रस्टमध्ये कुणी पुजारी प्रतिनिधी नाही. त्यावरूनही वाद आहेच. तुळजाभवानीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे बहुतेक सर्व जातीतले पुजारी देवीसाठी लाभले आहेत. खूप पूर्वी पुजाऱ्यांची घरं मर्यादित होती. काळाच्या ओघात लोकसंख्या वाढली, घरं वाढली आणि पुजारीही वाढले. प्रा. संभाजी भोसलेंशी बोललो. त्यांच्याकडं नेमकी माहिती नव्हती. अशी माहिती नसल्याचं कारण म्हणजे, पुजाऱ्यांची वाढती संख्या. याही स्थितीत वास्तवाच्या जवळपास जाणारा अंदाज व्यक्त करता येतो. ‘‘पूर्वी १६ भोपे होते. आता १०० झाले असावेत. पूर्वी मराठा पाळीकर १५० होते ते आता १४०० झाले असावेत. लिंगायत दोनाचे दहा, धनगर एकाचे पाच, उपाध्ये ८४ चे २००, गुजराती ब्राह्मण एकाचे पाच झाले असावेत.’’ अर्थात, हा अंदाज. अजून माहिती घेतली तर पुजाऱ्यांची एकूण संख्या दोन हजारांच्या आसपास जायला हरकत नाही. याशिवाय मूळ मंदिरापासून काही अंतरावर मातंगी देवी आहे. ती मांग समाजाची आणि तिचे पुजारी दोन-तीनशे...महार समाजाची आदिमाय-आदिशक्ती. तिचेही जवळपास एवढेच पुजारी. प्रत्येक पुजारी-कुटुंबाचा वार ठरलेला असतो. त्या दिवशी मंदिरात म्हणजे या दोन मंदिरांतली मिळकत त्यांची असते. दोन्ही मंदिरांत वर्षाला पाच-सहा लाख रुपये तरी जमा होत असावेत. अन्य पुजारीही परंपरेने विधी करतात.  त्यांचे भक्त, त्यांच्या पूजा आणि त्यांचं उत्पन्नही ठरलेलं असतं. या सगळ्यांकडूनही व्हीआयपी रांगेत भक्त पाठवले जातात.
बहुतेक नावाजलेल्या धर्मक्षेत्रांत पूजापाठ, सोहळे यांना इव्हेंटचे स्वरूप आलंय. काही धर्मस्थळं व्हीआयपीच्या तिकिटातून कोट्यवधी रुपये मिळवतात. पुन्हा प्रश्‍न हाच राहतो, की भक्तांमध्ये हा भेदाभेद करायचा का आणि करायचाच असेल तर त्याचं स्वरूप काय असायला पाहिजे. सामान्य भक्तांच्या रांगेत ताटकळत राहणारा भक्त कावेल, असं स्वरूप असायला हवं की सुलभता वाढवणारं? अलीकडं सगळेच जण; त्यातही राजकारणातले सगळेच टोपीधारी आणि साहेबांचे पट्टेवालेही स्वतःला व्हीआयपी समजू लागल्यानं पेच तयार होतोय. कुठल्याही माणसाकडं कुठल्या तरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कथित संस्था-संघटनेचं काहीतरी असतंच...व्हीआयपी ठरवण्यासाठी ते मिळवलेलं असतं. ‘सगळेच मोबाईलवर; जमिनीवर कुणीच नाही,’ अशी तऱ्हा... जाऊ द्या... त्या कावलेल्या भक्ताचं वाक्‍य अजून मनात घुमत राहिलंय ः पैसे फेको, देव देखो...

Web Title: Uttam kambale writer Firasti