विकत घ्यायचा निरोप! (उत्तम कांबळे)

विकत घ्यायचा निरोप! (उत्तम कांबळे)

एका गुरुजींच्या निरोप समारंभात एक रावसाहेब उशिरा आले. रावसाहेबांनी उशिराच यायचं असतं. त्यांना जागा देण्यासाठी गुरुजींच्या पत्नीला खाली लोकांत बसविण्यात आलं. नटूनथटून, दागिन्यांत मढून आलेल्या पत्नीला खूप वाईट वाटलं. मग एक शिक्षणाधिकारी आले. गुरुजी नम्रतेनं उठले. आपली खुर्ची त्यांना दिली; पण गुरुजींना कोणी खुर्ची देईना. ते खाली उतरून पत्नीजवळ बसले. मग सर्वांत महत्त्वाचा म्हणजे, पेन्शनचं काम करणारा अधिकारी आला. आता कुणाला उठवायचं? मग खास विषयावर बोलण्यासाठी जो वक्ता बोलावण्यात आला होता, त्यालाच गुरुजींनी नम्र विनंती केली. झालं, प्रमुख वक्ताही खाली उतरला.

हिवताप निर्मूलन नावाचा एक विभाग आहे. या विभागात आयुष्यभर तो कनिष्ठ लिपिकपदावर राहून निवृत्त होणार होता. आता हा विभाग म्हणजे सर्वांनीच दुर्लक्ष केलेला. रोग भरात होता तेव्हा हा विभागही भरात होता. रोग कोमात गेला म्हणून हा विभागही कोमात गेला. विभागातील कर्मचारी कमी झाले. जे उरले, त्यांना रोग्याऐवजी वेतनाची वाट पाहत राहावी लागते. पगार कधी होईल, याविषयी नेमकं भाष्य करणारी शक्ती अजून निर्माण झालेली नाही. नाशिकमध्ये आयुर्वेदिक कॉलेज आहे. तिथं गेल्या अनेक वर्षांपासून तीन-चार महिन्यांतून एकदा पगार होतोय. आपला देश मोठा असल्यानं आणि अलीकडं तो ऑनलाइन दौडत असल्यानं हे असं का, या प्रश्‍नांची उत्तर कुणाला सांगता येत नाहीत... तर हा लिपिक फार तर त्याला या लेखापुरतं वसंत म्हणू. त्याला माझ्या काही मित्रांनी गरिबांसाठी चालविलेल्या पतसंस्थेत कर्ज पाहिजे होतं. त्यासाठी मी गळ घालावी आणि कर्ज मिळवून द्यावं, अशी त्याची अपेक्षा होती. मी एकदा एकाला जामीन होऊन खूप मोठा पश्‍चात्ताप भोगला होता. कर्जदार बेपत्ता झाला आणि हप्तेवसुली माझ्याकडून झाली. ती भरण्याकरिता मी दुसरीकडं कर्ज काढलं. मी काही गळ टाकणार होतो अशातलं नाही. मी त्याला विचारलं ः ‘‘कर्ज कशासाठी काढतोस?’’ तो म्हणाला ः ‘‘रिटायर होणार आहे.’’ मग मी म्हणालो ः ‘‘त्यासाठी कर्ज कशाला?’’ तो म्हणाला ः ‘‘निरोप समारंभ होणार आहे.’’ मग मी पुन्हा विचारलं ः ‘‘त्यासाठी कशाला?’’ यावर तो हसत म्हणाला ः ‘‘काय आहे, आमच्याकडं रीत अशी आहे, की रिटायर होणाऱ्यानं स्टाफला, मित्रमंडळींना पार्टी द्यायची असते. शंभर-दीडशे लोक तरी असतात. हॉल, जेवण, पत्रिका, हात-तुरे दहाएक हजार तरी खर्च येतो. मला पीएफ मिळायला आणि पेन्शन मिळायला थोडा उशीर लागणार आहे. खरं सांगायचं तर पीएफला अगोदरच मोठी कात्री लागलीय... दोन वेळा सस्पेन्शन होतं. थोडा का असेना पीएफ मिळणारच; पण थोडा उशीर होईल.’’

मी म्हणालो ः ‘‘रिटायर होणाऱ्यांना इतरांनी निरोप आणि जमलंच तर पार्टी द्यायची असते. तू कशाला देतोस?’’
तो ः ‘‘आमच्या गव्हर्न्मेंट डिपार्टमेंटमध्ये तशी सिस्टीम आहे.’’
मी ः ‘‘असेलही; पण आपण नाही पाळायची.’’
तो ः ‘‘असं कसं होईल? आपण अनेकांची जेवणं घेतल्याली असत्यात. विशेष म्हणजे, आपली पेन्शनची, पीएफची, रजेची, ग्रॅच्युईटीची कागदपत्रं चालविणारे हेच असतात. त्यांचा हात ओला न करताच रिटायर कसं होता येईल? मोठ्या साहेबांना, रावसाहेबांना, भाऊसाहेबांना, अकाउंटवाल्याला, डिपार्टमेंट हेडला बोलवावं लागतं.’’
मी ः ‘‘मला काय पटत नाही. त्यांनी करायला पाहिजे हे सगळं.’’
तो ः ‘‘तेही करतात की. वर्गणी काढून हार-शाल आणतात. सुटकेस, ताट-तांब्या, वॉलपीस काय तरी देतात. आपल्यावर भाषणं करतात.’’
मी ः ‘‘पण मुख्य खर्च तर आपणच करतो. ज्याची नोकरी जाणार त्यानं नोकरी असलेल्यांना पार्टी द्यायची..?’’
वसंत माझा प्रत्येक मुद्दा खोडून काढत होता. सिस्टीममध्ये राहायचं असेल तर हे करावंच लागतं, हे समजावून सांगत होता. मी म्हणालो ः ‘‘मी पण सिस्टीममध्ये होतो; पण माझा भारी निरोप समारंभ झाला. आयुष्यभर लक्षात राहिलाय.’’ यावर त्याचं उत्तर ः ‘‘तुम्ही प्रायव्हेटमध्ये होता. गव्हर्न्मेंट कल्चर वेगळं असतं. खा आणि खाऊ घाला...द्या आणि घ्या...इज्जतीचा प्रश्‍न असतो,’’ वगैरे वगैरे...
रिटायरमेंटची पार्टी रिटायर होणाऱ्यानं द्यावी, कर्जबाजारी व्हावं हे काही शेवटपर्यंत मला पटलं नाही. महसूल, शिक्षण, पोलिस, बांधकाम खात्यांत रिटायरमेंट पार्ट्या किती रंगीत-संगीत होतात, हेही त्यानं खुलवून सांगितलं. सगळं काही पारदर्शी...
कर्जाबाबत काही डाळ शिजणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यानं काढता पाय घेतला; पण समारंभाचं निमंत्रण देऊन गेला. ‘जमलं तर लेख लिहा. समारंभात जोरदार भाषण करा,’ असंही सांगून गेला.

सायंकाळी एक शिक्षकमित्र आला. तो आणि मी सलाइनवर असलेल्या एका थिएटरमध्ये दर शुक्रवारी सिनेमा पाहायला जातो. दोन आठवडे खंड पडला होता. आल्या आल्या तो म्हणाला ः ‘‘एका शिक्षकाच्या कार्यक्रमात मला वक्ता म्हणून बोलावलं होतं.’’ ‘शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हाने’ असा काहीतरी विषय दिलेला होता. आता मीही लहानपणापासून हा विषय ऐकतोय, बोलतोय. स्वातंत्र्य साठी पार करून पुढं गेलं; पण हा विषय आणि आव्हानं वगैरे काही बदललं नाही. ...तर हा मित्र म्हणाला ः ‘‘समारंभ सुरू झाला आणि भाषणं करणाऱ्यांची म्हणजे निरोपाच्या शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या वाढली. शिक्षकांच्या मोजता येणार नाहीत एवढ्या संघटना आहेत. म्हणजे ‘आरपीआय’एवढ्या. प्रत्येक जण डायरेक्‍ट स्टेजवर यायचा.

माईकसमोर बसून भाषण ठोकायचा. भाषणं तर कसली...ज्यांना निरोप मिळतोय ना त्यानं पटसंख्या कमी होऊ दिली नाही, शाळेच्या आवारात चिंचेची दोन झाडं लावली, देणगीदाखल चार शहाबादी फरशा मिळवल्या, स्वच्छतागृहावर मुली-मुले, शिक्षक असं लिहिण्यासाठी देणगीदाखल रंग मिळवला वगैरे वगैरे... काही जण शिक्षक सुपरमॅन होता, असं समजून बोलायचे, तर काही जण हा जणू काही शेवटच्या प्रवासाला निघाला आहे किंवा त्याचा प्रवासच संपला आहे, अशा भावनेनं शोकसभेत शोभावं असं बोलत होते. प्रत्येक जण स्टेजवरच बसत होता. स्टेजवरच्या मोकळ्या खुर्च्या भरून गेल्या. मग एक रावसाहेब उशिरा आले. रावसाहेबांनी उशिराच यायचं असतं. त्यांना जागा देण्यासाठी गुरुजींच्या पत्नीला खाली लोकांत बसविण्यात आलं. नटूनथटून, दागिन्यांत मढून आलेल्या पत्नीला खूप वाईट वाटलं. मग एक शिक्षणाधिकारी आले. त्यांना कुठं जागा द्यायची? गुरुजी नम्रतेनं उठले. आपली खुर्ची त्यांना दिली; पण गुरुजींना कोणी खुर्ची देईना. ते खाली उतरून पत्नीजवळ बसले. त्यांचा चेहरा कुणी पाहायला तयार नव्हतं. मग सर्वांत महत्त्वाचा म्हणजे, पेन्शनचं काम करणारा अधिकारी आला. आता कुणाला उठवायचं? स्टेजवर बसलेले सारेच महत्त्वाचे. गुरुजींचे पुढारी. मग खास विषयावर बोलण्यासाठी जो वक्ता बोलावण्यात आला होता, त्याला म्हणजे मला गुरुजींनी नम्र विनंती केली. विशेष म्हणजे, सूत्रसंचालकही निर्लज्जपणे म्हणाला ः ‘‘प्रमुख वक्‍त्यांनी पेन्शनवाल्या साहेबांना जागा मोकळी करून द्यावी.’’ झालं, प्रमुख वक्ताही खाली उतरला.

कार्यक्रम पुढं चालू राहिला आणि रिटायरवाल्या शिक्षकाला एका प्रश्‍नानं घेरलं. दोनशे माणसांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आणि पंचवीसशे रुपये भाड्याच्या सभागृहात साडेतीनशे लोक दिसू लागले. शिक्षक कुटुंबवत्सल असतात. ते कोणत्याही कार्यक्रमाला कुटुंबासह जातात. रिटायरवाल्या गुरुजींच्या डोक्‍यात हा विषय कसा काय आला नाही, हेच त्याला अनेक जण विचारू लागले.
सत्काराचा क्षण आला. गुरुजी सपत्निक स्टेजवर गेले. वर्गणी काढून आणलेली एक शाल, हार आणि पाचपन्नास कागदांच्या आवरणात बांधलेली एक भेटवस्तू घेऊन ते खाली उतरले.

मुख्य वक्‍त्याचं भाषण व्हायचं होतं. ते कुणाच्या लक्षातच नव्हतं आणि एवढ्या आनंददायी वातावरणात आव्हान वगैरे ऐकण्याची कुणाची इच्छा नव्हती. सूत्रसंचालकानं हातातला कागद पाहिला आणि तो म्हणाला ः ‘‘मित्रहो, कार्यक्रम लांबला आहे. पोटातले कावळे ओरडत आहेत, तेव्हा मुख्य वक्‍त्यांना विनंती, की त्यांनी दोन मिनिटांत आव्हानांवर म्हणजे शिक्षणासमोरच्या आव्हानांवर बोलावं.’’
वक्ता उठला नाही. आभार मानून घ्या, असं म्हणाला. आभार मानणं संपलं. स्टेज रिकामं होऊ लागलं. सूत्रसंचालकांनी राष्ट्रगीताची अचानक आठवण केली. ते संपलं. निरोप समारंभ संपला.’’
हे सारं सांगताना मित्राचा चेहरा त्रासिक झाला होता. तासाभराच्या भाषणाची तयारी करून गेला होता तो...
शिक्षकाच्या समारंभातच हे असं घडतं, असं कोणी समजू नये. बहुतेक सर्व निरोप समारंभाचा आता इव्हेंट झालाय. उद्यापासून हा माणूस आपल्याबरोबर काम करणार नाही. फक्त पेन्शनचा धनी असेल. सेलिब्रेट करून घ्या, असा हा विषय.

हे सारं लिहीत असताना मला तीसेक वर्षांपूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकातली कोल्हापुरात आयटीआयमध्ये झालेल्या निरोप समारंभाची गोष्ट आठवली. पेपरात बातम्या आल्या होत्या. माझ्या स्मरणानुसार ‘सकाळ’मध्येही बातमी होती. आदल्या दिवशी रिटायर झालेला एक शिपाई दुसऱ्या दिवशी पुन्हा नोकरीवर आला. मुख्याध्यापकांनी त्याला विचारलं ः (पूर्वी मुख्याध्यापक असायचे. आता केजीपासून पीजीपर्यंत सर्वजण ‘प्राचार्य’ असतात.) कामावर का आलास? तो नम्रपणे म्हणाला ः ‘‘पेन्शन चालू झाली म्हणजे पगारच चालू झाला म्हणा की! आता पगार घ्यायचं तर काम नको का करायला?’’ सारेच अवाक्‌ झाले. बरीच वर्षं म्हणजे शेवटच्या श्‍वासापर्यंत तो काम करत राहिला. आजूबाजूचे लोक त्याला वेडा म्हणायचे. खरंच अशा वेड्यांची संख्या वाढली तर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com