uttam kamble's article in saptarang
uttam kamble's article in saptarang

रांग (उत्तम कांबळे)

रांग मोठी मजेशीर गोष्ट असते. पैसे काढण्यासाठीच्या एटीएमसमोर लागलेल्या रांगेत अनेक जण अर्थतज्ज्ञ बनले होते. अनेक जण देशाच्या धोरणाचा, राजकारणाचा अंदाज घेत होते. अनेक जण कार्डाऐवजी आपला त्रागाच मशिनमध्ये घालून पैसे काढत होते. दोन हजारांची नोट बाहेर आली, की आनंद कमी आणि प्रश्‍न अधिक उपस्थित करत होते. रांगेतल्या दोघांची चर्चा मात्र राजकारणावर आली. चर्चा मोठ्या आवाजात पोचली, तेव्हा जुनं वाक्‍य कुणी तरी फेकलं, ‘‘अहो थोडी कळ धरा...’’ आता मात्र चर्चेतल्या एकानं फक्कडबाज उत्तर देऊन टाकलं, ‘‘अरे काय चाललंय, कळ धरा- कळ धरा. प्रत्येकाला पेनकिलर तर द्या, मग कळ धरता येईल. आधार कार्डावर सोय करा म्हणावं.’’

बऱ्याच दिवसांपूर्वी घरात चिकटवलेली मॅट खराब झाली म्हणून नवीन मॅट घेण्यासाठी मी आणि आबा थोरात फूलबाजारातल्या एका दुकानात गेलो. मॅट पसंत केली; पण डेबिट कार्डवरून पैसे घेण्यास दुकानदार तयार झाला नाही. ‘‘आमच्या मुख्य दुकानात जा, तिथं कार्ड चालेल,’’ असं सांगत त्यानं आम्हाला पिटाळलंच. मग आम्ही त्याच्या मुख्य दुकानात गेलो. मॅट पसंत केली. दर विचारून घेतला. डेबिट कार्डचा विषय काढला, तसं दुकानदार म्हणाला, ‘‘आम्ही कार्ड स्वीकारत नाही.’’ यावर मी म्हणालो, ‘‘तुमच्याच दुकानातल्या माणसानं आम्हाला इथं पाठवलंय.’’ यावर दुकानदार म्हणाला, ‘‘त्याला ठाऊक नाहीच, की कार्ड वापरल्यावर किती कर भरावा लागतो. माफ करा. रोख द्या, कार्ड नको.’’

रोकड नव्हती म्हणून मागं परतावं लागलं होतं. यावर एक मार्ग दुकानदारानं काढला. तो म्हणाला, ‘‘थोडे ॲडव्हान्स द्या. घरी जाऊन रोख जमा करा. तासा-दोन तासांत मटेरियल घेऊन कारागीर तुमच्या घरी येईल. काम झाल्यावर त्याला बाकीचे पैसे द्या.’’

पर्यायच नव्हता म्हणून दुकानदाराचे नियम मान्य केले. घराच्या आसपास दोन-तीन ठिकाणी एटीएमची केंद्रं होतं. एके ठिकाणी भली मोठी रांग होती. दुसऱ्या ठिकाणी गेलो. हे केंद्र बंद होतं. त्याच्याजवळच दुसरं केंद्र होतं. तेही बंद. मग आरटीओच्या मागं गेलो. तिथलं केंद्र सुरू होतं. गर्दीही तशी तुलनेनं जेमतेम म्हणजे वीस-पंचवीस जण रांगेत होते. सर्वांत शेवटी जाऊन थांबलो. हाताच्या इशाऱ्यावर सुरक्षारक्षक रांगेला शिस्त लावत होता आणि रांगही आज्ञाधारक होऊन इशारे झेलत होती. अशी शिस्त फार पूर्वी आठवलेशास्त्रींच्या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. झालंच तर ‘आणीबाणीच्या काळात शिस्तीमुळे राष्ट्र मोठं बनतं,’ असं सांगितलं जात होतं. रांग पुढं-पुढं सरकत होती. सुरक्षारक्षकाला विचारलं, ‘‘का हो शंभराच्या नोटा मिळतात का?’’ यावर करड्या आवाजात तो म्हणाला, ‘‘प्रत्येकाला सांगत बसलो, की घसा कोरडा होऊन जाईल माझा. किती जणांना किती वेळा सांगू की दोन हजार रुपयांची एकच नोट मिळते म्हणून. शिकलेले लोक आहात. सूचना वाचा. सगळं लिहिलंय.’’

मीही आज्ञाधारक होऊन सूचना वाचू लागलो. शंभराच्या, पाचशेच्या नोटा मिळणार नाहीत. दोन हजारांची एक नोट मिळेल आणि खाली लिहिलं होतं- हुकमावरून.
‘हुकमावरून’ शब्द आता खूपच परिचित झाला आहे. देऊळ असो, धर्मशाळा असो, टपरी असो किंवा ‘येथे घाण करू नये,’ असं सांगणारी भिंत असो... हुकमावरून हा शब्द हमखास भेटतो. हुकूमशाही नसली, तरी ती पाळणारा अंश आपल्या डीएनएत असावा म्हणून की काय हा शब्द येत असावा. नोटांची सूचना लिहिलेल्या ठिकाणी आणखी एक फलक होता. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी डाव्या बाजूला स्वतंत्र रांग करावी. ही सूचना ऐकून आनंद झाला. एक तर अशा लोकांची रांग नव्हती. मी चटकन डाव्या बाजूला जाऊन थांबलो. आपल्या वयानं साठी गाठल्याचा खूप आनंद झाला. ज्येष्ठत्व रांगेत उपयोगी पडतं, असं वाटायला लागलं. पण, माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुरक्षारक्षक म्हणाला, ‘‘अहो, मुख्य रांगेत थांबा. फार गर्दी असेल तेव्हाच ही स्वतंत्र रांग करायची असते. आता काय काय सांगू... शहाण्या माणसांना कळत कसं नाही?’’
मी नम्रपणे म्हणालो, ‘‘तुम्ही जे सांगताय ते इथं लिहिलेलं नाहीय.’’

तो म्हणाला, ‘‘सगळंच लिहायचं म्हटलं तर भिंत पुरणार नाही आणि शहाण्यासाठी एवढं पुरेसं असतं...’’
मी वाद घातला नाही. ‘शहाणे, शहाणे’ असा शब्द वापरत तो आपल्या आयुष्यभर कमावलेल्या माझ्या शहाणपणावर पुन्हा शंका घेईल, याची भीती वाटली.
मी पुन्हा मुख्य रांगेत वळलो, तर कडेवर मूल घेतलेली तरुणी आणि तिच्यापुढं एका तरुणाची रांगेत भरती झाली होती. पुन्हा मी सर्वांत शेवटी.
माझ्या समोरची तरुणी आणि तिच्यासमोरचा तरुण परस्परांना ओळखत असावेत.
तरुण तिला म्हणाला, ‘‘बाळ कुणाचं आहे?’’
ती : ताईचं आहे.
तो : तू कशी काय रांगेत?
ती : जॉब सुटलाय, घरीच असते. आजोबा म्हणाले- तुला काम नाही; जा रांगेत. माझं जाऊ दे, तू किती दिवसांनी भेटलास. काय करतोयस?
तो : मी जॉब सोडलाय. पी. जी. होऊनही दहा हजारच मिळायचे. नोकरी दिली सोडून. आता एमपीएससीची तयारी करायची म्हणतोय.
ती : मीही तसा विचार करतेय. लग्न ठरत नाहीय. नोकरीही नाहीय. एक चान्स घे एमपीएससीसाठी असं घरचे म्हणताहेत.
रांगेतला हा तरुण बोलत बोलत पाठमोरा सरकत होता. त्याच्या शेजारचा एक माणूस दुसऱ्याला सांगू लागला, ‘‘परवा ना रांगेत उभ्या राहिलेल्या एक आजीबाई चक्कर येऊन पडल्या. पायाला दुखापत झाली त्यांच्या. रांगेतल्या काहींनी त्यांना दवाखान्यात नेलं. मग उशिरा तिचे नातेवाईक आले. एक जण रागावला आजीवर. मीही होतोच तिथं. नातेवाईक म्हणाला, ‘कसं, कुणी सांगितलं तुला रांगेत थांबायला. वाढवा झाला असता तर?’
आजीबाई हसत म्हणाली, ‘होईना का? पण तीस तारखेनंतर ‘अच्छे दिन’ येणार आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलंय. थोडी कळ सोसेन मी.’
आजीचं ऐकून साऱ्यांची बोलती बंद.’’
या दोघांचं बोलणं सुरू असतानाच एक महिला आली आणि थेट रांगेत समोर धुसली. रांग संतापली. एकाच वेळी सर्वांच्या ओठांवर एकच वाक्‍य- ‘अहो बाई, अहो मॅडम रांगेत थांबा ना! अहो, सिक्‍युरिटी गार्ड सांगा ना यांना...’
सिक्‍युरिटी गार्ड रांगेपासून दूर कानाला मोबाईल लावून बोलत होता, रांगेकडं पाठ करून.
रांगेत घुसलेली बाई रांगेपेक्षा मोठ्या आवाजात म्हणाली, ‘‘मी रांगेतच आहे. कुणाचा नंबर घेतलेला नाही. माझ्यापुढं आहे ना तो माझा भाऊ आहे. नंबर लावण्यासाठी त्याला पाठवला होता.’’
रांग चिडीचूप- अपराधीपणाची भावना तिच्या चेहऱ्यावर.

नंबर लावण्याचा हा प्रकार काही नवा नाही. नंबरासाठी कुणी मजूर पाठवतं, कुणी मोलकरीण, कुणी ड्रायव्हर, तर कुणी म्हाताऱ्या-कोताऱ्यांना पाठवतं. पूर्वी ग्रामीण भागात बस पकडताना अशी गोष्ट घडायची. बसच्या बाहेरच थांबून अनेक प्रवासी खिडकीतून आत टोपी, रुमाल, पिशवी टाकायचे. बसमध्ये गेल्यावर त्या-त्या आसनावर बसायचे. जणू काही तत्काळ बुकिंग... काही वेळा एकाच आसनावर दोन-दोन वस्तू पडायच्या. मग वाद व्हायचा. टोपी अगोदर, पटका अगोदर की रुमाल अगोदर...

रांग हळूहळू पुढे सरकत होती. प्रत्येकाच्या मनात एकच धास्ती होती आणि ती म्हणजे आपला नंबर आला आणि ‘एटीएम’मधले पैसे संपले तर... काही जण ही भावना परस्परांना सांगायचे; तर काही जण तणावग्रस्त चेहऱ्यातून ती व्यक्त करायचे. ज्यांच्याकडं कार्ड आहे; पण ते त्यांना वापरता येत नाही अशांनी गल्लीतली चुणचुणीत पोरं आणली होती खाऊचे आमिष दाखवून; तर काहींनी बराच वेळ कार्ड काढून हातात ठेवलं होतं. काही जण आपला पिन नंबर पुन:पुन्हा आठवत होते.
रांगेतला एक जण म्हणाला, ‘‘आयला, आपला देश एकदम भारी हाय... पैसे असून आणि नसूनही खोळंबाच होतो...’’

मॅट बसवणारा माणूस घरी आला असेल का, याची काळजी करतच मीही मुंगीच्या पावलानं पुढं-पुढं सरकत होतो. रांगेत शेवटी येणारा प्रत्येक जण ‘एटीएम’मधून बाहेर पडणाऱ्या माणसाला विचारायचा, ‘‘काय हो शंभराच्या नोटा आहेत का?’’ कुपोषित कागदापासून तयार केलेली दोन हजारांची नोट हलवत तो कृतीतूनच उत्तर द्यायचा, ‘नाहीत...’
मग कोणी तरी म्हणायचा, ‘‘निम्मा दिवस रांगेत आणि निम्मा चेंज करण्यात. कलियुग आलंय दुसरं काय?’’
दुसरा लगेचच उत्तर द्यायचा, ‘‘थोडी कळ सोसा. सगळं चांगलं होणार आहे.’’

खरं तर रांग मोठी मजेशीर गोष्ट असते. आता सांगायचं झालं, तर मी ज्या रांगेत होतो तिथं अनेक जण रांगेत राहून अर्थतज्ज्ञ बनले होते. अनेक जण देशाच्या धोरणाचा, राजकारणाचा अंदाज घेत होते. अनेक जण कार्डाऐवजी आपला त्रागाच मशिनमध्ये घालून पैसे काढत होते. दोन हजारांची नोट बाहेर आली, की आनंद कमी आणि प्रश्‍न अधिक उपस्थित करीत होते. अनेक जण जुन्या नोटांच्या इतिहासात हरवले होते. जगातल्या सर्व गंभीर प्रश्‍नांवर रांगेत चर्चा होत होती. रांगेतल्या दोघांची चर्चा मात्र राजकारणावर आली. भाजपचं बरोबर आहे, विरोधक चुकतात असा चर्चेचा सूर होता. चर्चा मोठ्या आवाजात पोचली, तेव्हा तेच जुनं वाक्‍य कुणी तरी फेकलं, ‘‘अहो थोडी कळ धरा...’’
आता मात्र चर्चेतल्या एकानं फक्कडबाज उत्तर देऊन टाकलं, ‘‘अरे काय चाललंय, कळ धरा- कळ धरा. प्रत्येकाला पेनकिलर तर द्या, मग कळ धरता येईल. आधार कार्डावर सोय करा म्हणावं.’’
उत्तर ऐकून रांगेतले सर्वच जण मनसोक्त हसले. ताण कमी झाला. आपला नंबर येईपर्यंत तरी पैसे संपू नयेत, अशी एक सुप्त भावना प्रत्येकाच्या मनात होती.

माझ्यासमोर आता आठ-दहा लोकच होते. प्रत्येकानं दोन-तीन मिनिटं घेतली तरी अर्धा तास लागणारच होता. काळा पैसा बाहेर पडणार आणि तो पडलाच पाहिजे, अशी सर्वांचीच धारणा होती. पण, नव्या नोटा आल्यानंच तो बाहेर पडेल आणि नवा पैसा काळा होणारच नाही, याची गॅरंटी काय, असे प्रश्‍नही लोकांच्या ओठावर होते. बऱ्याच वर्षांनी सामान्यांच्या ओठांवर चलन, धोरण, विकास असे शब्द येत होते. मग मध्येच कुणीतरी म्हणाला, ‘‘अहो, ज्याच्याकडे काळा पैसा आहे त्याला तुरुंगात टाकावं. इथं आमची कशाला कोंडी?’’

कोंडी ऐकून मला एका गोष्ट आठवली. जंगलात पिसाळलेला म्हणजे माणसं खाणारा वाघ आला, की फॉरेस्ट खातं एक पिंजरा नेऊन जंगलात ठेवतं. पिंजऱ्यात एक शेळी किंवा बकरी असते. तिला खाण्यासाठी म्हणून वाघ पिंजऱ्यात शिरतो आणि अडकतो पिंजऱ्यात. वाघ पकडला म्हणून कुणाकुणाला तरी बक्षीस मिळतं. वाघ पकडला गेला हे खरंय; पण प्रत्येक वेळेला एका गरीब प्राण्याचा बळी जातो. मेलेल्या प्राण्याला कधीच कळत नाहीय की वाघ पकडण्यासाठी आपला बळी का दिला? गळाला गांडूळ चिकटवून मासे पकडतानाही असंच होतं. कुणास ठाऊक रांगेतल्या आणखी कुणाच्या मनात असा विचार आला असावा.

रांगेतून बाहेर पडताच समोर ग्रामीण भागातल्या मायलेकी दिसल्या. त्यातील माय मोठ्या उत्सुकतेनं आणि आशेनं म्हणाली, ‘‘भाऊ, शंभराच्या नोटा मिळतात का?’’ मी म्हणालो, ‘‘नाही.’’ तसं ती म्हणाली, ‘‘लयच कठीण झालंय... वंगाळ झालंय...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com