का घडतं हे असं? (उत्तम कांबळे )

uttam kamble's article in saptarang
uttam kamble's article in saptarang

बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारित महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र बलात्कारित मुलीला सामाजिक न्याय देण्याच्या प्रक्रियेत कोणी सहसा पुढाकार घेत नाही. एक मोठा भूकंप व्हावा आणि बरंच काही उद्‌ध्वस्त व्हावं, असं काही तरी घडत जातं. एक अदृश्‍य का असेना; पण सामाजिक प्रश्‍न तयार होतो. जिचं शोषण झालं ती, तिच्यापोटी जन्माला आलेलं ते बाळ, हे सारे या चक्रव्यूहात अडकतात.

अखेर त्या अल्पवयीन मुलीनं स्वतःवर बलात्कार झाल्याची फिर्याद जेव्हा पोलिसांत नोंदवली, तेव्हा ती आई होणार होती.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि मुलीची रवानगी एका स्वयंसेवी संस्थेच्या आश्रमात केली. कुणाच्या तरी वासनेची शिकार बनून माता बनलेल्या, निराधार झालेल्या, तोंड लपवून जगू पाहणाऱ्या कुमारीमातांसाठी किंवा अविवाहित प्रौढ मातांसाठी हा आश्रम चालतो, त्याच ठिकाणी ही मुलगी आली. हायस्कूलमध्ये ती शिक्षण घेत होती आणि मध्येच हे प्रकरण उद्‌भवलं.
मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो निघाला एक पदवीधर तरुण. तो गजाआड झाला. ही इकडं आश्रमात बाळंत झाली. कुमारीमातेनं एका गोंडस मुलाला जन्म दिला.
पोलिसांतून हे प्रकरण न्यायालयात गेलं. तारखांवर तारखा सुरू झाल्या.

आरोपीचं वकीलपत्र घेतलेल्या वकिलानं आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. खूप कागदपत्रं चाळायला सुरवात केली. काही कागदपत्रं न्यायालयात पोचलेली, काही न पोचलेली, तर काही कुणी तरी मध्येच दाबलेली.
कागदपत्रं चाळता-चाळता दोन कागदांवर एकाऐवजी दोन पुरुषांची नावं आढळली. एक डॉक्‍टरांच्या कागदावर, तर दुसरं आश्रमातल्या कागदावर; पण त्यापैकी एकच नाव आरोपी म्हणून पुढं आलेलं होतं. दुसऱ्या नावाची कुणी चौकशीच केली नव्हती. तो माणूस विवाहित आणि दोन लेकरांचा बाप होता. मुलीमार्फत त्याची चौकशी सुरू झाली. शेवटी ते नाव त्या मुलीनंच डॉक्‍टरांना आणि आश्रमाला सांगितलं होतं.

चौकशी झाल्यानंतर चक्रावून टाकणारं प्रकरण उजेडात आलं. ते असं ः ही कुमारीमाता गावातल्याच एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. प्रियकराला नोकरी लागेपर्यंत ही सज्ञान होणार होती. त्यानंतर दोघं लग्न करणार होते. साऱ्या जगाला चुकवून सुरू असलेलं हे प्रेमप्रकरण गावातल्याच एकाच्या लक्षात आलं. गळ्यात गळा घालताना या दोघांना त्यानं पाहिलं आणि हा स्वतः या मुलीच्या मागं लागला. ‘गावभर तुझी बदनामी करेन, तुझ्या नातेवाइकांना सांगेन, तुझ्या शाळेत येऊन भांडाफोड करेन,’ अशा धमक्‍या देत तो या मुलीला वारंवार आपल्याकडे बोलवू लागला. शेवटी यानंच तिच्यावर बलात्कार केला. ‘हे प्रकरण उजेडात आणशील, तर तूच आयुष्यातून उठशील,’ असं सांगत त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं. वारंवार तो तिचा उपभोग घेऊ लागला. ही गोष्ट त्याच्या पत्नीला कळली. ती माहेरी निघून गेली. ही मुलगी शाळेच्या वाटेला लागायची आणि मध्येच तो तिला गाठून शेतात घेऊन जायचा. त्याच्यावर विश्‍वास ठेवत आणि लग्न होईल या आशेनं तीही त्याच्या प्रेमात पडली.

मुलीचं प्रेम पूर्वीच्या प्रियकरावरून हटलं आणि या दुसऱ्या पुरुषावर बसलं. दरम्यान, मुलीला दिवसही गेले. शरीरानं ही कथा कुटुंबापर्यंत पोचवली. आता या पहिल्या प्रियकराचा काटा कसा काढायचा, हा दुसऱ्या प्रियकरासमोर प्रश्‍न. ‘बलात्काराची फिर्याद दे ठोकून त्याच्याविरुद्ध आणि ये माझ्याकडं राहायला,’ असं सांगत त्यानं या मुलीला पोलिसांत जायला तयार केलं. मुलगी पोलिसांत गेली आणि कधीच शरीरसुख न घेतलेल्या या प्रियकराला अटक झाली. मुलीची रवानगी आश्रमात झाली. कारण दुसऱ्या प्रियकरानं तिला ठेवून घेण्यास नकार दिला. त्याला त्याचा संसार करायचा होता. ‘आपल्या संबंधांची वाच्यता झाल्यास वाईट परिणाम होतील. तुझे आई-वडीलही खलास होतील,’ अशी धमकीही त्यानं दिली. मुलगी पहिल्या प्रियकराविरुद्धच केस लढू लागली.

वकिलानं अशी कागदपत्रं सादर केली, ज्यावर या मुलीचा भोग घेणाऱ्याचं नाव मुलीनंच सांगितलं होतं. न्यायालयासमोर कागद आले खरे; पण दुसऱ्या प्रियकराविरुद्ध ठोस काही पुरावा नव्हता. शेवटी हा दुसरा आरोपी, कुमारीमाता आणि तिचं बाळ या तिघांचीही डीएनए चाचणी घेण्याची मागणी वकिलानं केली. चाचणी झाली खरी; पण बराच कालावधीही लागला. दरम्यान, आपल्याला जबरदस्तीनं माता बनवणाऱ्याविरुद्ध ही मुलगी चिडलेलीही होती. डीएनएचे रिपोर्ट आले. या मुलीला जे बाळ झालं, ते या दुसऱ्या आरोपीमुळंच, हे सिद्ध झालं. आता बलात्कार, अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचं शारीरिक शोषण वगैरे प्रश्‍नांवर न्यायालयाला निकाल द्यायचा आहे. तो कधी आणि कसा लागेल, हे अद्याप जाहीर व्हायचं आहे.

डीएनए चाचणीनंतर एक झालं आणि ते म्हणजे, दुसऱ्या आरोपीला अटक झाली आणि पहिला जामिनावर सुटला, निर्दोष नव्हे. त्याच्याविरुद्ध असलेल्या आरोपांचाही निकाल लागणार आहे. एका महत्त्वाच्या परीक्षेसाठी तो बाहेर आला. परीक्षा उत्तीर्णही झाला; पण निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्याला नोकरीत जाता येणार नाही आणि निकाल लागल्यानंतर नोकरी मिळेल की नाही, याची खात्री नाही. प्रकरण पुढं कसं वळण घेणार याविषयी कुणाला काही ठाऊक नाही. बाळ आणि त्याला जन्मास घालणारा बाप याचं नातं मात्र शोधण्यात यश आलंय. ही कुमारीमाता आश्रमात, आरोपी तुरुंगात आणि कुमारीमातेचं तोंड चुकवत आई-वडील गावात आणि पहिला प्रियकर लज्जेखातर गाव सोडून शहरात, असा हा प्रकार आहे.

चक्रावून टाकणारी ही कथा सांगताना महिला वकिलाच्याही डोळ्यांत पाणी येत होतं. बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारीत महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. बलात्काराच्या प्रत्येक घटनेविरुद्ध मोर्चा निघेलंच असं नाही. बलात्कारीत महिला समाजमनावरून जणू काही अदृश्‍य होऊन जाते. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र बलात्कारीत मुलीला सामाजिक न्याय देण्याच्या प्रक्रियेत कोणी सहसा पुढाकार घेत नाही. पहिल्या प्रियकरालाच आरोपी करण्यात या मुलीला भाग पाडण्यात आलं आणि भोग घेणारा सटकून गेला. पहिल्या प्रियकराला उद्या कदाचित निर्दोष सोडलंही जाईल; पण तुरुंगात राहून काळवंडलेल्या त्याच्या चेहऱ्याचं काय होणार, याविषयी कुणीच काही सांगू शकत नाही. नाही म्हटलं, तरी आपल्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान असलेल्या मुलीला त्यानं प्रेमात अडकवलंच होतं. दुसरा प्रियकर तर वयानं मुलीपेक्षा अडीचपट मोठा. समजा उद्या त्याला जन्मठेप झाली, तर त्याच्या छोट्या लेकरासह त्याच्या पत्नीचं, कुटुंबाचं काय होणार, हेही कुणी सांगू शकत नाही. अपराध्यांना वाचवण्याचा किंवा त्यांना सहानुभूती, दयामाया दाखवण्याचा प्रश्‍नच नाही. ते शिक्षेलाच पात्र असतात, दयेला नाही. एक मोठा भूकंप व्हावा आणि बरंच काही उद्‌ध्वस्त व्हावं असं काही तरी घडत जातं. एक अदृश्‍य का असेना; पण सामाजिक प्रश्‍न तयार होतो. जिचं शोषण झालं ती, तिच्या पोटी जन्माला आलेलं ते बाळ, हे सारे या चक्रव्यूहात अडकतात. बलात्कारीत महिलेचं प्रतिष्ठेसह पुनर्वसन ही कल्पना दूरच राहते. हे सारं थांबवायचं असेल, तर वाढता वासनांधपणा आणि या साऱ्या विकृती यांच्या जन्मस्थानालाच हात घालावा लागेल. त्यासाठी अर्थातच समाजासह सर्वच जबाबदार घटकांचा पुढाकार हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com