सुशीला (उत्तम कांबळे)

सुशीला (उत्तम कांबळे)

शब्दांचा प्रवास कुठून कसा होईल काही सांगता येत नाही. लोकजीवनात याचा रोकडा प्रत्यय येत असतो. एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतल्यानंतरही मूळ व्युत्पत्तीपर्यंत पोचता येईलच असंही नसतं. ‘सुशीला’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. मुलीला-महिलेला शोभून दिसणारं हे नाव एका खाद्यपदार्थालाही मिळालं आहे. ते कसं मिळालं? मुळात हा शब्द ‘सुशीला’ असाच उच्चारला जातो की अन्य कुठल्या प्रकारे? असे बरेच प्रश्‍न या खाद्यपदार्थानं माझ्या मनात निर्माण केले.  
समाधानकारक उत्तरं मिळाली, असं नाही. मात्र, त्यानिमित्तानं या अनोख्या खाद्यप्रकाराचा शोध लागला. तो चाखताही आला.

नऊ जानेवारीला सकाळी सकाळीच नळदुर्ग या भुईकोट किल्ल्यावर थडकलो. महाराष्ट्रातला हा एक सगळ्यांत मोठा भुईकोट किल्ला अजूनही बऱ्यापैकी आपलं अस्तित्व टिकवून असलेला. ‘नर आणि मादी’ धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याची डागडुजी आणि नूतनीकरण सध्या सुरू आहे. अर्थातच खासगीकरणातून. सरकार खंगलेलं असल्यानं खासगीकरणाच्या कुबड्या घेतल्याशिवाय ते चालूच शकत नाही. नूतनीकरण अद्याप पूर्ण व्हायचं आहे आणि ते कधी पूर्ण होणार कुणालाच ठाऊक नाही; पण तरीही किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ‘टोल’भैरव उभे आहेत. पाऊस नसल्यानं धबधबा गायब झालाय. धबधब्याची जागा बघितली खरी; पण ‘नर’ आणि ‘मादी’ अशी नावं त्याला का मिळाली असतील, याचा विचार करत बाहेर गेलो. एका छोट्या हॉटेलात चहा घेतला. लांब आकाराचे गुलाबजाम तिथं तयार होत होते. ‘मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी उस्मानाबादला मोर्चात चला,’ असं भिंतीवर म्हटलं होतं. बाहेर ‘हिंदुस्थानचा शहेनशहा टिपू सुलतान’ असं लिहिलेलं दुसरं एक होर्डिंग होतं. महाराष्ट्रात आता कोणत्याही मोठ्या गावात जा, गावाच्या शिवेपासून ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे मोर्चे याबाबतची पोस्टर दिसतात. जणू काही पोस्टरचेही मोर्चे... या मोर्चांचं आगामी काळात काय होणार, असा प्रश्‍न तयार झाला की निदान माझ्या मनात तरी शंकेची कसली तरी पाल चुकचुकते...

नळदुर्गहून तासाभराच्या अंतरावर उमरगा (ओमरगा) हे तालुक्‍याचं ठिकाण. भूकंपाचा एक धक्का बसला आणि गाव एका पहाटेत ग्लोबल झालं. त्यापूर्वी ग्लोबल झालेला एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणजे कॉम्रेड विठ्ठल सगर. रशियात साम्यवादी राजवट असताना तिथल्या सरकारच्या निमंत्रणावरून कॉम्रेड विठ्ठल काही दिवस रशियात राहून आलेले. कवी नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठेही असेच अभ्यासदौऱ्यासाठी गेलेले. कॉम्रेड विठ्ठल यांचं निधन दोन-तीन वर्षांपूर्वी झालं. त्यांचे पुत्र किरण यांनी वडिलांच्या स्मरणार्थ जागतिकीकरणावर व्याख्यान ठेवलेलं. ‘मी माझ्या संस्थेत शिक्षकभरतीच्या वेळी एक रुपयाही डोनेशन घेणार नाही’ किंवा ‘शिक्षकाच्या पगारातला एक रुपयाही वापरणार नाही,’ अशी प्रतिज्ञा तुळजापुरात तुळजाभवानीसमोर करणारे आणि १९८० च्या दशकात आमदार म्हणून काम करणारे आलुरे गुरुजी अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमानंतर सकाळी नऊ वाजता किरण मला घेण्यासाठी शासकीय विश्रामधामवर आला. मी त्याच्या घरी न्याहरीसाठी गेलो. तो म्हणाला ः ‘‘पोळीभाजी तयार आहे...चालेल का?’’ मी ‘हो’ म्हणून सांगितलं. यावर पुन्हा तो म्हणाला ः ‘‘सुशीलापण आहे. तुम्हाला चालत असेल तर करायला सांगतो.’’

सुशीला हे नाव ऐकून मला आश्‍चर्य वाटलं. महाराष्ट्रात अन्नपदार्थांना बऱ्याच ठिकाणी अशी चित्रविचित्र नावं आहेत. उदाहरणार्थ ः नागपूरमध्ये काही हॉटेलांत डॉ. भा. ल. भोळे यांच्यासोबत गेलो होतो. तेव्हा वेटरनं विचारलं ः ‘‘सुंदरी चाहिए क्‍या?’’ वजडीला तिथं ‘सुंदरी डिश’ म्हणतात. सुशीलाविषयी मला आश्‍चर्य वाटायला लागलं. थोडीफार न्याहरी झाल्यावर मी संकोच न करता
‘‘होय, मला सुशीलाही पाहिजे,’’ असं सांगितलं. उमरग्यातच एका डी. एड. कॉलेजमध्ये विज्ञान हा विषय शिकवणारी अवंती ही किरणची पत्नी. तिला खूपच आनंद झाला. सुशीलाच्या तयारीसाठी ती लागली. बाहेर हॉलमध्ये तिची सासू म्हणजे कॉ. विठ्ठल यांची पत्नी सविता होत्या. त्या सुशीलाची माहिती देऊ लागल्या. थोड्याच वेळात एका डिशमध्ये सुशीला दाखल झाली. शुभ्र चिरमुऱ्यांपासून बनवलेला हा पदार्थ म्हणजे पोह्याची छोटी किंवा मोठी बहीण वाटावी. सुशीलाचा आस्वाद घेत असताना अवंती, किरण आणि सविता हे सगळेच एकापाठोपाठ एक माहिती सांगत होते.

चिरमुऱ्यांपासून (चुरमुरे किंवा मुरमुरे किंवा कुरकुरेही) बनवलेला हा एक रुचकर पदार्थ. प्रामुख्यानं तो कर्नाटकातून आला आणि सीमाभागातही आहारात उतरला. काही छोट्या हॉटेलांतही तो तयार होतो; पण प्रामुख्यानं घरातच तो नाश्‍त्याच्या वेळी बनवला जातो. भट्टीतून किंवा दुकानातून ३०-४० रुपये किलो दरानं मिळणारे चिरमुरे आणायचे. ते सुपात घालून निवडायचे. पाखडायचे. त्यातल्या साळी आणि खर काढून स्वच्छ करायचे. चाळणीत घालून वरून पाणी सोडायचं. फार ओले करायचे नाहीत. हातावर दाब देऊन पाणी काढायचं. मग जाड कढईत तेल तापवायचं. कांदा आणि मिरची बारीक वरून टाकायची. शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ बारीक करून टाकायची. सोईपुरतं मीठ, कढीलिंबाची दोन-तीन पानं घालून फोडणी द्यायची. चिरमुरे उबवायचे. मग काही जण कोथिंबीर, खोबरं किसून बारीक करून ते वरून टाकतात. सुशीला झाली तयार! छानपैकी तिचा आस्वाद घेतला.

प्रवासात सुशीलाची एकसारखी आठवण होऊ लागली. अनेकांशी बोलत राहिलो. ‘सुशीला’ हा शब्द या पदार्थाशी कसा काय जोडला गेला, मूळ शब्द काय असेल, हे कुणाला सांगता येईना. शब्दकोश चाळला तर त्यात ‘चांगल्या शीलाचा,’ ‘सुशील’ एवढाच अर्थ होता. चिरमुऱ्यापासून तयार होणाऱ्या अन्य पदार्थांची नावं पाहू लागलो; पण त्यात सुशीला हा शब्द नव्हता. ‘संकेश्‍वरचे चिरमुरे खूप प्रसिद्ध आहेत. ते अमेरिकेतही जातात,’ असं बेळगावचे प्रा. घाटगे यांनी सांगितलं. तुळजापूरला प्रा. संभाजी भोसलेला विचारलं. त्यानं ‘आळीव सुशीला’ हा शब्द एसएमएस केला. हा शब्द घेऊन पदार्थांपर्यंत पोचता येत नव्हतं. धारवाडला माझी एक मैत्रीण आहे, सुकन्या. ती कानडीची प्रोफेसर होती. आता निवृत्त झालीय. तिला या पदार्थाची माहिती देताच ती म्हणाली ः ‘‘या पदार्थाला सुस्ला म्हणतात.’’ विशेषतः उत्तर कर्नाटकात हा शब्द आहे. आंध्रच्या बॉर्डरला किंवा बेल्लारी आदी भागात ‘ओगरने’ असा शब्द आहे. मग मी विचारलं ‘सुस्ला’ या शब्दाची व्युत्पत्ती काय? ती म्हणाली ः ‘‘बघून सांगते.’’ मात्र, हा लेख लिहीपर्यंत तिनं काही सांगितलं नाही. ‘सुस्ला ते सुशीला’ असा एक अपभ्रंशाचा प्रवास असू शकतो. सुस्लाचं सुशीला होऊ शकतं. खूप आनंद वाटतो असं काही समजलं की...
...तर अवंती सगर (मो. ९४०३२९२८१९) सुशीलाचं माहात्म्य सांगत होती. हा पदार्थ गरिबांसाठी खूपच उपयुक्त आहे. अर्ध्या किलो चिरमुऱ्यात चारजण भरपेट न्याहरी करू शकतात. विशेष म्हणजे, पूर्वतयारी जोरात असेल तर १५ मिनिटांतच हा पदार्थ तयार होतो. डिशमध्ये ठेवल्यावर तो खूप सुंदर दिसतो. बऱ्यापैकी कॅलरीज्‌ असतात. तो कितीही खाल्ला तरी पित्त होत नाही. साइड इफेक्‍ट होत नाहीत. पचायला खूपच हलका. तो चर्वण करताना खूप लाळ तयार होते. चवदार लागतो हा पदार्थ. आजारी माणसं, म्हातारी माणसं ‘जिभेला चव नाही, थोडं सुशीला कर’ अशी फर्माईश करतात. मस्तपैकी आस्वाद घेतात. लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो. तो जास्त चावण्याची गरज नसते. म्हाताऱ्याकोताऱ्यांना शेंगदाणे फोडण्याचा त्रास होत असेल, तर त्यांचं कूट करूनही टाकता येतं. सगळ्याच कुटुंबांना परवडणारा, झटपट होणारा आणि ऊर्जा देणारा हा पदार्थ आहे. वेगवेगळे समाज वेगवेगळ्या पद्धतीनंही ते बनवतात. त्यांचे चिरमुरेही वेगळे असू शकतात. पूर्वी भोई समाज, मुस्लिम समाज चिरमुऱ्याचे कारखाने चालवायचे. चिरमुरे खूपच भाजून स्वच्छ केले, की त्यातला अन्नांश कमी होऊ शकतो. सिंधी, मारवाडी, गुजराती समाज खूप पॉलिश करून बनवलेले चिरमुरे खाण्यास प्राधान्य देतो. काही असो, खिचडीसारखी ताकद त्यात असते.

नाशिकमध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी या सुशीलाविषयी माहिती घेतली; पण कुणी तयार करताना आढळलं नाही. ‘आपली आई असा पदार्थ तयार करते,’ असं पूजा बडेर या युवा लेखिकेनं सांगितलं. तांदळाचा प्रवास भात, खिचडी, खीर, भाकरी इथंपर्यंतच येऊन ठेपला आहे. चिरमुरा मात्र लाडू, भडंग, चिवडा, भेळ असा प्रवास करत सुशीलापर्यंत पोचला आहे. असो. इति सुशीलापुराण...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com