जळती हे जन न देखवे डोळा (उत्तम कांबळे)

जळती हे जन न देखवे डोळा (उत्तम कांबळे)

आपण कुरूप असावं किंवा व्हावं, असं स्वतःहून कुणालाच वाटत नाही. मात्र, काही अभागी मंडळींवर अशी वेळ येते. विशेषकरून वेगवेगळ्या कारणांमुळं आगीत सापडून बचावलेल्यांचं जीवन अनेक अर्थांनी दुःखद बनतं. जगण्याची दिशाच बदलून जाते...आधीचं रूप विद्रूप बनतं, कुरूपता येते... मानसिक धक्‍क्‍यातून सावरायला वेळ लागतो... समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.
समाजातल्या इतर प्रकारच्या वंचित, रुग्ण घटकांसाठी दिखाऊ का होईना पुनर्वसनयोजना आहेत... मात्र जळितग्रस्तांसाठी अशी कुठलीही योजनाच नाही. शिवाय, चंगळवादी व्यवस्थेत कुरूप माणूस आणि तोही आगीनं कुरूप केलेला माणूस स्वीकारण्याची मानसिकता कुणाचीच नसते. ही स्वीकारार्हता महिलांच्या बाबतीत तर फारच कठीण. नातलगही अशा वेळी पाठ फिरवतात.  

कधी कधी तरी अतिशय अचानकपणे, आकस्मिकपणे नेणिवेतून एखादी गोष्ट समोर येते. म्हणजे आठवते. ती आठवायला काही कारण नसतं; पण सहजपणे लक्षात येते. क्षणभरात निघूनही जाते. त्यातल्या काही गोष्टी आपण पकडून ठेवण्याचा आणि प्रसंगी त्यांना पकडून मागं मागं म्हणजे त्या जिथून आल्या, तिथं पोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपलं रूपांतर इतिहासात करतो. इतिहास ज्याला चिकटून बसला असेल, त्याला स्पर्श करून वर्तमानात येतो. यातून माझ्यासाठी तरी दोन गोष्टी चांगल्या होतात. एक म्हणजे, आपण क्षणात इतिहासात घुसतो आणि क्षणभरासाठी का होईना, पायाखालच्या वर्तमानाला पडलेल्या भेगाही विसरतो. असंच झालं... ३०-४० वर्षांपूर्वी कर्नाटकातल्या माझ्या एका मित्राच्या विधवा मावशीनं जाळून घेतलं होतं. खूप जळाली होती. खूप म्हणजे ७०-८० टक्‍क्‍यांच्या घरात. ती जगंल असं कुणालाच वाटत नव्हतं; पण ती जगली. खूप दिवस सरकारी दवाखान्यात राहिली. सुरवातीला रोज तिला भेटण्यासाठी नातेवाइकांचा गोतावळा जायचा. बहुतेक जण जळीत रुग्णांसाठी असलेल्या कक्षाबाहेर थांबायचा. डॉक्‍टर, परिचारिकांशी बोलायचा. परत जायचा. आत जाऊन जळीतग्रस्त महिला पाहण्याची, तिच्याशी बोलण्याची इच्छा कुणाला असायची नाही. त्यासाठीची क्षमताही नसायची. जळून कुरूप झालेला माणूस उघड्या डोळ्यांनी पाहणं खूप अवघड असतं. अशा रुग्णांना जीव लावून उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचा मला खूप अभिमान वाटतो. कुरूपतेला भेदून सुरूपतेला बोलावण्याचा, तिचं रोपण करण्याचा प्रयत्न ते करत असतात.

...तर मी सांगत होतो, की अशा रुग्णांना भेटण्यास नातेवाईकही टाळाटाळ करतात. पुढं तिला कुणी भेटतच नाही. मावशीचं असंच झालं. एक दिवस ती दवाखान्यातून गायब झाली. नातेवाइकांनी खूप शोधाशोध केली. पोलिसांत वर्दी दिली. सार्वजनिक ठिकाणी तिच्या जुन्या छायाचित्राचा वापर करून जाहिराती चिकटवल्या; पण तिचा ठावठिकाणा काही लागला नाही. ‘बरं झालं, कुरूपता आपोआप गेली. सुंठीवाचून खोकला गेला. नाहीतरी तिचं घरात आपण काय करणार होतो? छोटी मुलं-बाळं तिला पाहून घाबरली असती!’ असा विचार करणारा एक मतप्रवाह; तर दुसरा मतप्रवाह म्हणजे, ‘कसं का असंना; पण आपलं माणूस होतं.’ पहिल्यांदा काळाच्या जबड्यात तिचा पती गेला आणि आता तिची आकृती गेली. काळीकुट्ट बनली होती ती. पुढं पुढं तर तिची ओळखच लागायची नाही; पण ती जिवंत राहिली. मृत्यूच्या मानेवर बुक्की मारून तिनं त्याला परतवून लावलं होतं; पण तीही गायब झाली होती. म्हणावं तर वाईटच झालं, असं म्हणणारा एक वर्ग होता. मी मित्राला फोन केला. मावशीची विचारपूस केली; पण जुनंच उत्तर आलं ः ‘पत्ता नाही लागला तिचा.’

जळून वाचलेल्या माणसांचं म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं काय होतं, असा एक प्रश्‍न निर्माण झाला. रोज आपल्या समाजात किती माणसं जळत असतील आणि मृत्यूशी झगडत वाचलेले; पण कुरूप झालेले काय करत असतील, असा प्रश्‍न होता. एक मोठा गुंता म्हणजे हा प्रश्‍न होता. त्वचारोपणाची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. त्वचादान करण्यासाठीही लोक सहजपणे पुढं येत नाहीत. प्लास्टिक सर्जरीचा खर्च सगळ्यांनाच परवडत नाही. मग वाचलेले आणि कुरूप झालेले लोक काय करत असतील, हा प्रश्‍न होता. सविता मेहता नावाची एक माझी सहकारी होती. खूप अल्पकाळासाठी ती ‘सकाळ’मध्ये होती; पण ‘सकाळ’ सोडल्यानंतर ‘मी अशा कुरूप बनलेल्या किंवा बनवल्या गेलेल्या महिलांसाठी काम करणार,’ असं ती म्हणाली होती. २५ वर्षांनंतर मला पुसटसं आठवत होतं. वर्ध्यात गेल्यानंतर तिची शोधाशोध केली; पण ती पुण्याला स्थायिक झाल्याचं कळलं. तिचा नंबर मिळवला आणि संपर्क साधला. तिनं या क्षेत्रात बऱ्यापैकी अभ्यास केला होता. सर्व्हे केले होते. विशेषज्ञांकडून काही माहिती जमवली होती; पण काही कारणानं ती दुसऱ्याच क्षेत्रात स्थिरावली; पण तरीही अपघातानं कुरूप बनलेलं जग तिला खुणावतच होतं. याच विषयासंबंधीची उत्सुकता पाहून तिनं मला खूप माहिती ई-मेल केली. त्वचातज्ज्ञ डॉ. घोडके यांच्याशी बोललो. या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा या क्षेत्रात उतरू पाहणाऱ्या काही संस्थांशीही बोलणं झालं. चक्रावून सोडणारी माहिती पुढं येऊ लागली. करकचून टाकणारं एक संख्याशास्त्रही पुढं येऊ लागलं. प्रवासात म्हणजे फिरस्तीत जिथं जाईन तिथं मी या विषयाची माहिती मिळवत होतो; पण एक लक्षात आलं, की देशपातळीवरची माहिती खूप मोठ्या गांभीर्यानं कुणी जमवली नव्हती. छोटी मोठी कामं होत आहेत आणि हा विषयही ऐरणीवर येतो आहे, ही समाधानाची गोष्ट होती.

रेवा इथल्या वैद्यकीय महाविद्यालयानं जमवलेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१६ पर्यंत दोन हजार ४९९ जळीत रुग्णांचा अभ्यास झाला. त्यात महिला ६६, तर पुरुष ३८ टक्के होते. हे सगळे २५ वर्षांच्या आसपास होते. आगीचा (म्हणजे स्टोव्ह किंवा गॅस) भडका उडून जळालेल्यांचं प्रमाण ८० टक्के होतं. आणखी स्पष्टच सांगायचं तर २८ टक्‍क्‍यांत स्टोव्ह, २७ टक्‍क्‍यांत रॉकेलचा दिवा, ४२ टक्‍क्‍यांत रसायनं, रॉकेलचे स्टोव्ह १० टक्‍क्‍यांत होते. अर्थात, हा सगळा अंदाज आहे. अशा घटनांमध्ये जास्तीत जास्त शरीर जळणाऱ्यांमध्ये महिला अधिक आहेत. अभ्यासासाठी घेतलेल्या दोन हजार ४९९ रुग्णांत एक हजार ६६० म्हणजे ६६ टक्के महिला आहेत. त्यातही ग्रामीण भागातल्या ७१ टक्के आहेत आणि त्यातही जळालेल्या किंवा जाळल्या गेलेल्या किंवा आग लावून घेण्यास भाग पडलेल्या ५४ टक्के महिला स्वतःच्या स्वयंपाकघरातच जखमी झालेल्या होत्या.
दरवर्षी भारतात अंदाजे ३५ लाख लोक जळतात. त्यातले तीन लाख मृत्युमुखी पडतात. जळणाऱ्यांची ही एकंदर संख्या पाहता ती चार छोट्या राष्ट्रांच्या लोकसंख्येइतकी भरते!

आकड्यांचा खेळ वेगवेगळ्या प्रकारे कितीही वाढवता येतो; पण निष्कर्ष मात्र तेच निघतात. जळीतग्रस्तांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ती महिलांची. स्वयंपाकघरातच त्या बळी पडल्या. नोकऱ्या करणाऱ्या पाच टक्के आणि बाकीच्या घर सांभाळणाऱ्या आहेत. आगीनंतर दुसरा एक प्रवास सुरू असतो. तोही आगीप्रमाणेच होरपळवणारा असतो. बहुतेक प्रकरणं कोणत्या तरी कलहातून होतात. त्यातही मोठ्या प्रमाणात विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुषांच्या बाबतीत असतात. महिलेला थेट कुणीतरी जाळतं, या जळण्याला अपघात म्हणून सिद्ध करणं आणि अशा प्रकरणात बाई विरुद्ध बाई अशी एक कृत्रिम लढाई तयार करणं हेही घडत असतं. कुणाच्या तरी रागामुळं, कलहामुळं जळालेल्या महिला जेव्हा मृत्यूच्या दारात उभ्या राहून कायद्यापुढं जबाब देतात, तेव्हा त्या बहुतेक वेळा खोटंच बोलतात. ‘आपल्या मरणानंतर आपल्या मुलांचं वाईट व्हायला नको. अजून कुणीतरी अशा चक्रात अडकायला नको,’ या भावनेनं त्या स्वतःच स्वतःच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारतात. खूप कमी महिला आग खेळवणाऱ्यांचं नाव धीटपणे घेतात; पण बहुतेक प्रकरणांत आरोपी सुटतात किंवा मुळात ते सापडतच नाहीत.

जळितातून वाचणाऱ्यांचं प्रमाणही नवनव्या तंत्रज्ञानामुळं वाढत आहे; पण या सगळ्यांनी तोपर्यंत खूप मोठी किंमत चुकवलेली असते. बहुतेक जण कायमस्वरूपी कुरूप होतात. ‘झटपट सुंदर बनवतो,’ असा दावा करणारं कोणतंही मलम त्यांना उपयोगी पडत नाही. चेहरा दाखवण्याची सोय राहत नाही. कारण, तो पाहण्यासाठी कुणीच उत्सुक नसतात. जवळचे नातेवाईकही असे कुरूप चेहरे पाहून दूर जातात किंवा असे चेहरे आपल्या पर्यावरणात येणार नाहीत, याची काळजी घेतात. कुरूप चेहऱ्याची व्यक्ती एकाकी पडते. ज्यांच्यासाठी जगावं ते दूर जातात. स्वतःची मुलं-बाळंही अनेकदा शत्रुपक्षात शिरतात. माहेर तुटलेलं असतं. नवरा नव्यानं विवाहबद्ध होतो. जळाल्यानंतर त्वचेला जसा काळाकुट्ट, करपल्यानंतर व्यक्त होणारा रंग आलेला असतो, तसाच अगदी तसाच रंग, तिच्या समोरच्या वातावरणाला आलेला असतो. करपलेल्या वर्तमानाची काळीकुट्ट छाया भविष्यावर पडते. भूतकाळ सरकलेला असतो आणि उरलेल्या दोन काळांची पाठ काटेरी, विषारी झालेली असते. अशा स्थितीत मग बऱ्याच महिला (पुरुष अपवादात्मक) आपणच ज्याच्या थोबाडीत मारलं त्या मृत्यूची आळवणी करून त्याला बोलावतात. त्यानं गुडघ्यात मान घातली की त्या स्वतःच मृत्यूच्या जबड्यात उड्या मारतात. आत्महत्या करतात. व्यवस्थेवरच्या तळहातावर लिहिलं गेलेलं स्वतःचं नाव स्वतःच पुसून टाकतात. अर्थात, या कृतीची नोंद घेतली जात नाही. त्यासाठी कुठं फोल्डर नाही किंवा ते उघडण्यासाठी कुठं पासवर्ड नाहीय.
प्रश्‍न एकच, तो म्हणजे जळीतग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस योजना सरकारी दफ्तरातून आलेली नाही. कुष्ठरोगी, क्षयरोगी, अपंग, अंध, विकलांग, एड्‌सग्रस्त यांच्यावर उपचार करण्यासाठी किंवा पुनर्वसनासाठी निदान दिखाऊ योजना तरी आहेत; पण जळीतग्रस्तांसाठी तसं काहीच नाहीय. सौंदर्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि ते मोजण्यासाठी वेगवेगळ्या पट्ट्या तयार करणाऱ्या चंगळवादी व्यवस्थेत कुरूप माणूस आणि तोही आगीनं कुरूप केलेला माणूस स्वीकारण्याची मानसिकता नाही. महिलांच्या बाबतीत तर फारच कठीण. सुंदर महिला अनेकदा असुंदर पुरुषाशी लग्न करते. उदाहरणार्थ ः गोरी काळ्याशी लग्न करते; पण गोरा काळी बायको पसंत करण्याची शक्‍यता अपवादात्मकच असते. माणसाची आकृती अनित्य असते; पण या अनित्यतेवर माणूस प्रेम करतो आणि नित्य असणाऱ्या मूल्याकडं पाठ फिरवतो. ही जगरहाटीच झाली आहे. जळीतग्रस्त महिला एकत्र येत नाहीत. आपलं गाऱ्हाणं ओरडून सांगत नाहीत. आपली संघटना करून समाज आणि शासनावर दबाव आणत नाहीत. हे सगळं करण्यासाठी आहे तो चेहरा घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं आणि त्यासाठीची हिंमत त्यांनी गमावलेली असते. अर्थात, व्यवस्थाच त्याला कारणीभूत असते.

नांदेडमध्ये १९ फेब्रुवारीच्या सकाळी नाशिकला जाणाऱ्या तपोवन एक्‍स्प्रेसमध्ये बसत असताना एक तरुण धावत आला. एक पोस्टर रेल्वेच्या डब्यावर चिकटवून गेला. उत्सुकता म्हणून मी डब्यात चढता चढता खाली उतरलो. त्या पोस्टरवर एका पुरुषाचं भलंमोठं छायाचित्र होतं आणि त्यावर लिहिलं होतं ‘हरवला आहे’! आणि मग तोच खाली नेहमीचा मजकू ः ‘रागावणार नाही, परत ये... आई आजारी आहे, परत ये...’ माझ्या मनात सहजच प्रश्‍न निर्माण झाला. माझ्या मित्राच्या मावशीचं असं पोस्टर झालेलं होतं का...? पोस्टर पाहून डब्यात चढलो, तर आत वॉश बेसिनच्या तळाशी अचानक आलेले दोन उंदीर पाहून दोन युवती (ज्यांनी स्वतःचा चेहरा जाणीवपूर्वक झाकून घेतलेला होता) ‘चूहा आ गया’ असं म्हणत धावतच आपलं आसन शोधत गेल्या. रेल्वेत बसता बसता हे सगळं जळितांचं जग नजरेसमोर तरळू लागलं. अनेक जण भीक मागत फिरतात, हेही ऐकलं होतं. गाडी सुरू झाली. जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचा अभंग पुसटसा आठवू लागला, त्यात थोडा बदल केला ः जळती हे जन। न देखवे डोळा। म्हणौनी कळवळा। येतो आम्हा ।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com