झाडात घुसवली जातेय करणी (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 16 एप्रिल 2017

आपली कृत्यं-दुष्कृत्यं स्वतःऐवजी अन्य कुठंतरी लटकवणं ही माणसाची प्रवृत्तीच; मग ती अंधश्रद्धेपायी असेल किंवा आणखी कुठल्या कारणामुळं. कसली तरी बाधा, कुठली तरी करणी उतरवली गेल्याची हमी म्हणून अनेक बाबा मंडळी वेगवेगळ्या झाडांना वेठीला धरतात. त्यांच्या अंगांगाला जखमा करतात. त्यांच्या खोडांवर खिळे ठोकतात, दाभणं ठोकतात...त्या खिळ्यांना बाहुल्या ठोकतात...त्या बाहुल्या जाळतात...झाडं बिचारी हे सगळं निमूटपणे सहन करत राहतात...आणि खंगत खंगत मरून जातात...माणसातली कथित करणी अखी झाडाच्या प्राणात घुसवली जाते.

आपली कृत्यं-दुष्कृत्यं स्वतःऐवजी अन्य कुठंतरी लटकवणं ही माणसाची प्रवृत्तीच; मग ती अंधश्रद्धेपायी असेल किंवा आणखी कुठल्या कारणामुळं. कसली तरी बाधा, कुठली तरी करणी उतरवली गेल्याची हमी म्हणून अनेक बाबा मंडळी वेगवेगळ्या झाडांना वेठीला धरतात. त्यांच्या अंगांगाला जखमा करतात. त्यांच्या खोडांवर खिळे ठोकतात, दाभणं ठोकतात...त्या खिळ्यांना बाहुल्या ठोकतात...त्या बाहुल्या जाळतात...झाडं बिचारी हे सगळं निमूटपणे सहन करत राहतात...आणि खंगत खंगत मरून जातात...माणसातली कथित करणी अखी झाडाच्या प्राणात घुसवली जाते.

‘फिरस्ती’मध्ये मला माणसं जशी भेटत गेली, तशी अनेक झाडं आणि त्यांची जंगलंही भेटत गेली. खूप वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण झाडांना मी भेटलोय. अशा झाडावरची पुस्तकंही वाचलीयत. जादूटोणा करणारी झाडं हे त्यापैकी इंग्लिशमधलं एक पुस्तक. रात्री उजेड सोडणारी झाडं, अध्यात्मातली कोडी उलगडणारी झाडं, ध्यानधारणेसाठी निवडली जाणारी झाडं, उपयुक्ततेमुळंही अजरामर झालेली झाडं, हिंसक बनणारी झाडं, लाखो जिवांना आपल्या अंगा-खांद्यावर मुक्कामासाठी, घरटी बांधण्यासाठी जागा देणारी झाडं... मुळात सगळा निसर्गच धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्‍युलर असतो. आपल्या अंगावर मुंग्या आल्या, साप आले, विंचू आले, घुबड आलं, की चिमण्या आल्या याचा भेदभाव झाडं करत नाहीत. अंगावरच्या सालीपासून फुला-फळापर्यंत दान करून बसतात झाडं...पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध तपश्‍चर्येसाठी बसले म्हणून पिंपळाचा ‘बोधीवृक्ष’ झाला. सम्राट अशोकाच्या लेकरांनी तो श्रीलंकेत नेला. बोधीवृक्ष तिथं झपाट्यानं वाढला. तो पाहण्यासाठी मी मे महिन्यात श्रीलंकेत निघालोय. झाडांना देवादिकांत स्थान मिळालं. झाडांचे देव झाले. प्रत्येक देवाची आवडी-निवडीची झाडं ठरली. पूजे-अर्चेसाठी त्यांची पानं-फुलं ठरली. झाडांच्या अंगा-खांद्यावर वाढलेला माणूस नावाचा प्राणी अजूनही आपल्या ‘डीएनए’त झाड म्हणजे निसर्ग घेऊनच जगतोय.

ग्रामीण भागात, आदिवासी भागात झाडांचा वापर आपल्या नैमित्तिक गरजा भागवण्यासाठी होतो तसा झाडांना आणि स्वतःलाही शक्तिमान करण्यासाठी होतो. अनेक झाडावर मुंजे नेऊन बसवले जातात. काही झाडांवर नसलेले पिशाच्च किंवा आत्मेही बसवले जातात. काही झाडांवर सैतानाच्या टोळ्या बसवल्या जातात. काही झाडांवर नसलेल्या भुतांना लटकण्यासाठी जागा दिली जाते. काही झाडांवर पिशाच्चांना आपली खूण ठेवण्यासाठी जागाही दिल्या जातात.

बेळगाव जिल्ह्यात चिकोडीजवळ एक दर्गा आहे. भुताची बाधा झालेले लोक तिथं जातात. भूत जाईपर्यंत ते दर्ग्याभोवती फिरतात. नंतर तिथल्या झाडावर खिळे ठोकून आपल्यातलं भूत गेल्याची खात्री देतात. सगळी झाडं खालपासून वरपर्यंत खिळ्यांनी भरलेली आहेत म्हणजे जखमी झाली आहेत. पुढं जखमा वाढतात, कुजतात. झाडांचा एकेक अवयव गळायला लागतो, सडायला लागतो. मग दुसऱ्या झाडावर हाच प्रयोग. वड, बाभूळ, कडूलिंब ही जादूटोण्यासाठी हमखास जखमी केली जाणारी झाडं. चिकोडीजवळच हे होतंय असं नाही, तर तिकडं मराठवाडा-विदर्भाच्या बॉर्डरवर सैलानीबाबाजवळही होतं. मला ठाऊक असलेल्या शंभर जागा तरी मी सांगतो. जागांना तसा अर्थ नाही, तर तिथं काय होतं, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ईशान्येकडं गेलात तर अनेक झाडांना अर्थात मोठ्या झाडांना भेगा पाडून, ढापी करून, गुहा करून तिथं बसलेले कथित आध्यात्मिक लोक असतात. काही झाडं निशाण लटकवण्यासाठी, काही त्यातले औषधी गुण शोषून घेण्यासाठी वापरली जातात. झाडाचं अहित झाल्याशिवाय आपलं हित होत नाही, हे माणसाला कधीपासून कळलंय... त्यानुसार तो चालत राहिलाय.

पुण्यात होळकर पूल विश्रांतवाडीला जाताना लागतो. जुना पूल आहे. होळकर या नावानं गाजण्याऐवजी तो आता करणीसाठी गाजतोय. पुलाजवळ म्हसोबाचं छोटेखानी देऊळ आहे. इथं करणी उतरवणारा बाबा आहे. विद्यानगरीबरोबरच आता त्याच्यामुळंही हा भाग ओळखला जातोय. मी स्वतःही अनेकदा या पुलावरून गेलो-आलो असेन; पण करणी झालेले लोक आणि ती उतरवणारा बाबा कधी दिसला नाही. ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी विचार केला नसेल. जगरहाटी अशीच सुरू राहणार म्हणून सोडून दिलं असेल; पण भिकचंदनं ते सोडून दिलं नाही. पाहिलं आणि कॅमेऱ्यात टिपून ठेवलं. विद्यानगरीत, ज्ञानाच्या नगरीत हे कसं काय चालतं? असं त्याला वाटलं असावं, पण याच नगरीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली आणि कुटुंबनियोजनाबद्दल एकाला शिक्षाही झाली, हे विसरून चालणार नाही. जादू, चेटूक हे काही या शहराला नवं नाही. प्रसिद्ध इतिहाससंशोधक डी. डी. कोसंबी यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या ‘भारतीय इतिहासाचा अभ्यास’ (पान २८, २९) या ग्रंथातही तत्कालीन अंधश्रद्धांवर म्हणजे पुण्यातल्या अंधश्रद्धांवर उजेड आहे. विश्‍लेषण आहे. ...तर मुद्दा हा, की पुण्यातच हे का, या प्रश्‍नाला काही अर्थ नाही. जिथं जिथं माणूस आहे, तिथं तिथं हे घडत आलं आहे.

...तर पुन्हा होळकर पूल. इथला एक बाबा बाधा उतरवतो. पिशाच्च उतरवतो. करणी उतरवतो. ती उतरल्याची गॅरंटी-वॉरंटी म्हणून संबंधितांना झाडात खिळे ठोकायला लावतो. दाभण किंवा तीक्ष्ण खिळेही खोलवर ठोकले जातात. बाहुल्या लटकवून त्या जाळल्या जातात. या सगळ्यामुळं नसलेलं भूत जात असेल की नाही ठाऊक नाही; पण झाड जखमांनी भरतं. रोज नव्या जखमा आणि जुन्या चिघळत जाणाऱ्या...जखमांनी विव्हळणाऱ्या झाडानं बाहुली जळताना आग झेलायची. एवढे सगळे खिळे आपल्या शरीरात टिकवून ठेवायचे. परिणामी, झाड खंगतं आणि करणीच्या प्रकरणात मरून जातं. माणसातली कथित करणी झाडात घुसवली जाते. या प्रक्रियेला धर्म, देव, परंपरा आणि संस्कृती म्हणणारे महाभाग काही कमी नाहीत. ते मुके राहतात आणि बोलू पाहणारे अल्पसंख्य ठरतात. अनेक वर्षांपासून असं चाललंय. एकीकडं झाडाच्या संवर्धनाचे कार्यक्रम, वृक्षारोपणाची मोहीम चालवण्याचे कार्यक्रम, ‘एक झाड-एक मूल’ असले काहीतरी कार्यक्रम आणि दुसरीकडं झाडांना खलास करून माणसांचे विकार त्यात कोंबण्याचे कार्यक्रम...अनेक ठिकाणी अशी दृश्‍यं आहेत. त्यापैकी पुणं एक...अशी दृश्‍यं जेव्हा कमी होतील, तेव्हा माणूस विचारी आणि सुसंस्कृत झाला, असं म्हणता येईल. माणसाच्या डोळ्यांत वाढवला जाणारा अंधश्रद्धांचा मोतीबिंदू कधी संपणार, असाच प्रश्‍न झाडात ठोकल्या जाणाऱ्या असंख्य खिळ्यांमुळे तयार होतो. तसाच तो भिकचंदला पडला असावा. हा मजकूर लिहून मी नाशिकमध्ये दहीपुलाकडं निघालो. ‘पर्यावरण वाचवा’ असे असंख्य फलक घेऊन एका स्वयंघोषित महाराजांची मिरवणूक निघाली होती. पाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या मिरवणुकीत बहुतेक वाहनं वेगवेगळ्या झाडांच्या भल्यामोठ्या फांद्यांनी सजवली होती. फांद्यांनाच लटकलेला फलक ः ‘प्रदूषण थांबवा... जंगल वाढवा...’!

Web Title: uttam kamble's article in saptarang