सिग्नलवरचा भारत (उत्तम कांबळे)

uttam kamble's article in saptarang
uttam kamble's article in saptarang

‘सिग्नलवरचे भिकारी’ हा घटक खरोखरच अभ्यास करण्याजोगा आहे. त्याला तेवढ्यापुरती भीक देऊन अथवा त्याच्याकडं नुसतं करुणेनं पाहून भागणार नाही. हा वंचित, उपेक्षित, दीन-दुःखी भारत जवळपास सगळ्याच शहरांमधल्या मोठमोठ्या सिग्नलवर आढळतो. विशेषतः लहान लहान भिकारी-मुलं संवेदनशील व्यक्तीचं लक्ष नक्कीच वेधून घेतात. डोळ्यांवर पट्टी ओढून घेतलेल्या शासनाचं आणि स्वतःच्याच वेगात धावणाऱ्या समाजाचं मात्र ‘सिग्नलवरच्या या भारता’कडं जसं जावं तसं लक्ष कधीच जात नाही.

कोणताही देश रस्त्यावरच्या सिग्नलवर बघता येतो, समजून घेता येतो, असं इंग्लिशमध्ये एक उपरोधिक वचन किंवा म्हण किंवा सुविचार आहे. आपण जेव्हा सिग्नलवर जातो, तेव्हा याची प्रचीती येतेच येते. सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या प्रकारच्या वेशभूषेतले, वयोगटातले, वर्गातले आणि वर्णातले लोक तिथं दिसतात. आपण जेव्हा सिग्नलवर पोचू तेव्हा तो मोकळाच असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं; पण ते तसं प्रत्येक वेळेला घडत नसतं. ट्रकला रिक्षा ओव्हरटेक करते, सायकलला बाइक ओव्हरटेक करते, मग एखादी चारचाकी येऊन या सगळ्यांना ओव्हरटेक करते. गंमत म्हणजे, हे सगळे मिळून चालणाऱ्याला ओव्हरटेक करतात. झेब्रा क्रॉसिंगचा आदर करणारे जसे असतात, तसे त्याच्या अंगावर आपली गाडी थांबवणारेही असतात. अशात मग कुणीतरी ढकलगाडा घेऊन येतो. तो काही सिग्नल पडण्याची वाट बघत नाही. मग कुणीतरी बैलगाडी आणतो. एवढंच काय, उंट-हत्तीही कधी कधी सिग्नलवर भेटतात. सिग्नल मार्केट करणारे, सिग्नलवरच गाड्यांची काच स्वच्छ करणारे, प्रियेसाठी मोगरा विकणारे आणखी वेगळे. खेळणी, उपयोगाची उपकरणं, रुमाल, पेन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू विकणारेही तिथं असतात. सिग्नलवर देश पाहता येतो तो असा. जो वेगात येतो तो बाजूच्याला ‘कशाला एवढ्या वेगात येता?’ असं विचारतो. सिग्नलवरच्या मोठ्या गर्दीतही हळूहळू आपलं वाहन दामटत झेब्रा क्रॉसिंगवर जाणारे वेगळे. या सर्व चक्रव्यूहात भीक मागणारे आणखी वेगळे...

देशातल्या कोणत्याही सिग्नलवर जा, भीक मागणारे हमखास दिसतील. आपलं व्यंग्य दाखवणारे, छाती-पोटाची हाडे दाखवणारे, जगातली सगळीच भूक आपल्या चेहऱ्यावर आणणारे आणि एवढं करूनही भीक मिळाली नाही म्हणून चारचाकीच्या काचेवर बुक्की मारणारे किंवा मागं जाऊन थुंकणारेही मी पाहत आलोय. अनेकदा या मजेशीर विद्रोहाचा बळी ठरलोय, भीक हमखास मिळवणाऱ्यांचा म्हणजेच तृतीयपंथींचा. पैसे मिळवण्यासाठी ते नेमकं काय करतात, हे सगळं इथं लिहिणं कदाचित उचित ठरणार नाही. ...तर सिग्नलवर भीक मागणाऱ्यांमध्ये लहान मुलं नेहमी लक्ष वेधून घेतात. निदान माझं तरी लक्ष वेधून घेतात. दोन लहान मुलं असतात. एकाच्या कडेवर दुसरं मूल विसावलेलं असतं. या मुलाच्या चेहऱ्यावरून, डोळ्यांतून, ओठांच्या छोट्या हालचालींतून फक्त भूक बाहेर पडत असते. कितीतरी दिवसांपासून ते तान्हुलं उपाशी असावं, असं सकृद्दर्शनी वाटतं. त्याच्या अंगातली हाडं, बरगड्या, खोल गेलेलं पोट आणि डोळेही हेच सांगत असतात. सिग्नलकडं बघत हिरव्या रंगाची प्रतीक्षा करणारा अनवधानानं हे दृश्‍य पाहतो. त्याची करुणा चटकन जागते. काही पैसे देऊन पुढच्यांना ओव्हरटेक करण्यासाठी तो निघून जातो.

लहान मुलांच्या पिळवणुकीविरुद्ध भारतात जेवढे कायदे आहेत तेवढे इतरत्र कुठंही नसतील. गंमत म्हणजे, एवढे कायदे असूनही भारतात जेवढी लहान मुलांची पिळवणूक होते, तेवढी इतरत्र कुठं होत नसावी. लहान मुलांची पिळवणूक, त्यांच्याकडून घेतले जाणारे कष्ट हे कुटुंबाच्या जगण्याशी जोडले गेलेले आहेत. जगण्यासाठी माणूस काय नाही करणार? तो कोवळं मूल सिग्नलवरच्या भारतात आणू शकतो. स्व-उद्धारासाठी त्याचा बळी देऊ शकतो, विक्री करू शकतो किंवा मुलगी नको म्हणून तिला गर्भाशयातच मारू शकतो. या सगळ्यामागं त्याची त्याची फसवी समर्थनं असतात.

...तर या लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते; पण तशी ती कधी होत नाही. भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांची भिक्षेकरी-घरं महाराष्ट्रात आहेत; पण एकही भिकारी तिथं दिसत नाही. कधी कुठल्या भिकाऱ्यावर कारवाई झाल्याचं कुणी ऐकलेलं नसतं. सगळे भिकारी खुलेआम शासनाला आणि समाजालाही दिसतात. शासन गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी ओढून घेतं. गांधारीचं एक बरं होतं, की पट्टीमागं तेज निर्माण व्हायचं. शासनाच्या पट्टीमागं असं तेजबीज काही तयार होत नाही. झालंच तर बेजबाबदारपणा, ढोंग आणि विकृतीच तयार होते. शासनाला कागदापलीकडं जाऊन काहीच करायचं नसतं. हे सगळे उद्याचे भावी नागरिक...हे सगळे सिग्नलवर कोरड्यानं स्वतःची पाठ आणि पोट फोडून घेणारे... हे सगळे मुलं भाड्यानं आणणारे आणि विशेष म्हणजे, भिकेसाठी विशिष्ट तासाकरिता मुलं भाड्यानं देणारे...मुलांना सतत गुंगीची औषधं देणारे... असे हे सगळे भारतीय ‘इंडिया’त कधीच जाऊ शकत नाहीत. ‘इंडिया’त कुणाला आणि कसंही घुसता येत नाही. विकासासाठीचा पासवर्ड लागतो. तो वापरल्याशिवाय ‘खुल जा सिम सिम’प्रमाणे इंडियाचा दरवाजा कसा उघडणार? धावणाऱ्या, धावत-धावत महासत्ता बनू पाहणाऱ्या, ऑनलाइनवर झेंडा फडकवणाऱ्या ‘इंडिया’त आपली भूक, आपली स्वप्नं यांसह जमिनीला चिकटलेले, सरपटणारे प्राणी इतरांना दिसायचं कारण नाही. हे सगळे ‘इंडिया’त गेले, की विकासाचा असमतोल होतो आणि झालंच तर विकेंद्रीकरण होतं. स्वाभाविकच हे सगळे ‘आउट ऑफ कव्हरेज’ राहतात.

छोट्या भिकाऱ्यांना पकडून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी खूप मोठे अधिकार बालकल्याण, पोलिस, एनजीओ आदींना देण्यात आलेले आहेत. काही एनजीओंकडं प्रदर्शनीय मुलं त्यांच्या त्यांच्या अनुदानासाठी असतात. सिग्नलवरचा पोलिस कधी या मुलांना हुसकत नाही. हुसकलं तर ती दुसऱ्या सिग्नलवर जातात. दानधर्म करणारे करुण दृश्‍याचे बळी ठरतात. एकूण काय, हे चक्र कायम राहतं. भिकेचा व्यवसाय होतो. भिकेचे दर महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढतात. आमच्या लहानपणी ‘एक-दोन पैसा द्या धर्माला’ असं गाणं म्हणत भिकारी यायचे. त्या वेळी एक-दोन पैशाची नाणीही असायची. आता आपण खूप पुढं गेलो. नाणी गेली. करन्सी प्लास्टिकच्या कार्डात बंद होत आहे. कोणताही भिकारी आता सुट्या पैशात भीक मागत नाही. ते म्हणतात ः ‘चहाला देता का आठ-दहा रुपये’, ‘माझं पाकीट मारलंय; देता का वीस रुपये’, ‘यात्रेला जायचंय; देता का पन्नास रुपये...’ भीक देणारे प्रसंगी उपरोधानं हसतात. भिकाऱ्यांचं बरोबर आहे. चहासाठी आठ-दहा रुपयेच लागतात. ‘महागाई केवढी वाढलीय,’ असं पुटपुटत ते निघून जातात. महागाईचा निर्देशांक कसा काढायचा असतो, हे भिकारीच सांगतील आता.

मध्यंतरी आंध्र प्रदेशात बड्या परदेशी पाहुण्यांना आपल्याकडचे भिकारी दिसू नयेत म्हणून एक शक्कल लढवली गेली होती. विशिष्ट रक्कम देऊन म्हणजे पगारच देऊन त्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. भिकारी थोडे खूश झाले. श्रीमंत पाहुण्यांना इंडियात भिकारी न दिसल्याचा आनंदही झाला असावा; पण पाहुणे जसे विमानातून उडाले, तसा सिग्नलभोवती पुन्हा हा भारत तयार झाला. पगार घेऊन घरी बसायला कुणीही भिकारी तयार झाला नाही. शासन त्यांना रोज दोनशे रुपये द्यायचं आणि यांना पाचशेच्या पुढं भीक मिळायची. शासन आपली पिळवणूक करतेय, असं भिकाऱ्यांना वाटलं. काही असो. काही दिवसांकरता भिकारी दडवण्यात आंध्रला यश आलं होतं. हे इतरत्र कुठं घडलं नाही. काठी टेकवत टेकवत का होईना; पण सिग्नलवरचा भारत एकेक पाऊल पुढं टाकतोय... या पावलाला ना प्रतिष्ठा, ना विकासाचा स्पर्श...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com