उत्तरांच्या शोधात निघालेली 'प्रश्‍नचिन्हे'!

pramod kalbande
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मतीन भोसले यांच्या 'प्रश्‍नचिन्ह' आश्रमशाळेतून शिकून जीवनाच्या नव्या लढाईसाठी सज्ज झालेले फासेपारधी समाजाचे विक्रम भोसले, शिवा पवार, गोपाल पवार, अतुल पवार, आशीष चव्हाण, शार्देश पवार, मलिंदा पवार आणि योगेश पवार हे विद्यार्थी.

मतीन भोसले यांच्या 'प्रश्‍नचिन्ह' आश्रमशाळेतून शिकून जीवनाच्या नव्या लढाईसाठी सज्ज झालेले फासेपारधी समाजाचे विक्रम भोसले, शिवा पवार, गोपाल पवार, अतुल पवार, आशीष चव्हाण, शार्देश पवार, मलिंदा पवार आणि योगेश पवार हे विद्यार्थी.
स्वतःच्या पोटची दोन मुले सांभाळताना अनेक पालकांची मोठी कसरत होते. अशात तब्बल साडेचारशेवर बालके सुमारे आठ वर्षे पोसणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी मतीन भोसलेच हवा असतो. केवळ बालकांचे भरणपोषणच नव्हे, तर त्यांना उत्तम शिक्षणही मतीन भोसले यांनी उपलब्ध करून दिले. फासेपारधी समाजाच्या कित्येक पिढ्या आजवर गारद झाल्या. परंतु, पुढच्या कित्येक पिढ्यांचा 'सत्यानाश' होण्यापासून वाचविण्याचे काम मतीन अविरत करताहेत. असंख्य अडथळे, जीवघेणे हल्ले, प्रचंड पीडा सहन करून एखाद्या उत्तुंग पर्वतासारखे अढळ राहता येणे एखाद्या मतीनलाच शक्‍य आहे. मतीनच्या खडतर तपश्‍चर्येची फळे आता नजरेच्या टप्प्यात येऊ लागली आहेत. संघर्ष संपला नाहीच. तो यापुढेही सुरूच राहणार आहे. परंतु, या संघर्षाला आनंदाने कवेत घेण्याचे बळ मतीनच्या अंगात पुन्हा एकदा नव्याने संचारले आहे.
मतीनने भीक मागणाऱ्या, चोरी करणाऱ्या, शिकार करणाऱ्या फासेपारधी बालकांची स्वबळावर 'प्रश्‍नचिन्ह' नामक आश्रमशाळा सुरू केली. त्यासाठी लोकांकडे झोळी पसरून मदतीची याचनाही केली, हे आता सर्वांनाच माहीत आहे. रविवारी मतीनच्या याच आश्रमशाळेचा आठवा वर्धापनदिन साजरा झाला. कौस्तुभ आमटे, शीतल आमटे यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मतीनच्या आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. हे विद्यार्थी पाहिल्यावर आणि त्यांना भेटल्यावर मतीनने किती महान काम आरंभले याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
विक्रम बाशिद भोसले आईवडिलांसोबत रेल्वेस्टेशन, सिग्नलवर भीक मागायचा, चोरी करायचा. त्याच्या वाडवडिलांचाही हाच धंदा. मतीनने त्याला भीक मागताना उचलून आणले. आश्रमशाळेत ठेवले, शिकविले. तो दहावी झाला. पुढे बारावीत प्रवेश करून दिला. त्याने 70 टक्के गुण मिळविले. ही टक्केवारी इतरांसाठी कमी असेलही; परंतु भीक मागणाऱ्या, चोरी करणाऱ्या बालकासाठी ती खचितच मोठी आहे. योगाभ्यासात त्याने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. शिवा सनीसाहेब पवार हा धुळे जिल्ह्यातील फासेपारधी समाजाचाच मुलगा. मतीनने त्याला शाळेत आणले आणि त्याचे जीवनच बदलून गेले. दहावीत 79 टक्के गुण त्याने मिळविले. आता तो बारावीत आहे. इंग्रजी साहित्यात पदवी घेऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार त्याने केला आहे. गोपाल प्रकाश पवार दहावीत 79 टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण झाला. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे किशोर महाराज शिंदे यांच्याकडे तो कीर्तन शिकत आहे. मतीनने त्याला वाशीम जिल्ह्यातील खापरी खंडाळा गावातून आणले. तोही भीक मागणाऱ्या, शिकार करणाऱ्या कुटुंबातच जन्मला. आता भले मोठे स्वप्न उराशी बाळगून आहे. अतुल रंगराव पवार चोरी करण्यात पारंगत झाला होता. डाव नाही साधला तर रस्त्यावर लोकांपुढे हात पसरायचा. खर्रा, तंबाखू खायचा. त्याचे जगणेच भिकारडे झाले होते. लोकांची हिडीसफिडीस त्याच्या वाट्याला यायची. परंतु, 'बाळा, तू काय करतोस रे... माझ्या शाळेत येशील का?' या मतीनच्या जिव्हाळ्याच्या शब्दांनी त्याचे आयुष्यच पार बदलून गेले. मतीनच्या शाळेत तो शिकला. पुढे बारावी झाला. आळंदीला तो आता संगीताचे धडे गिरवत आहे. त्याचे ध्येयही अफलातून आहे. त्याला शिकून अधिकारी तर व्हायचेच, सोबत मृदंगाचार्यही व्हायचे आहे. आशीष चव्हाण आपबिती सांगतो, तेव्हा त्याचा कंठ दाटून येतो. त्याच्या फासेपारधी बेड्यावर वीज नाही. डोक्‍यावर धड छप्पर नाही. दोन वेळेच्या जेवणाची सोय नाही. अनेक दिवस आणि रात्री उपाशी काढाव्या लागल्या. मतीनने त्याच्या जीवनाची दशाच बदलून टाकली. आशीषने दहावीत 60 टक्के तर बारावीत 80 टक्के कमावले. आता पुण्यात तो पुढील शिक्षण घेत आहे. त्याचा बेडा ते पुणे हा प्रवास थक्क करणाराच आहे. शार्देश पवार तर पुरता दारूच्या आहारी गेला होता. स्वतःच्या जगण्याचे भानही त्याला उरले नव्हते. सर्वच प्रकारच्या व्यसनांनी तो पछाडला. पण, मतीनच्या भेटीने तो पार बदलून गेला. सनदी अधिकारी बनण्याचा विडा त्याने उचलला. त्यासाठी तो जोमात तयारीला लागला आहे. असाच एक मलिंदा पवार. पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच 'यूपीएससी'च्या तयारीला लागला. दहावीत 70 टक्के आणि बारावीत 72 टक्के कमावलेला हा मुलगा कधी काळी मुंबईला भीक मागायचा, हे सांगितल्यावरही कुणालाही खरे वाटणार नाही. परंतु, मतीनच्या नजरेत तो पडला आणि त्याचा कायापालट झाला. असाच एक योगेश पवार बारावीत 85 टक्के गुण घेऊन अनुदानित आश्रमशाळेतून राज्यात दुसरा आला. आता जळगावला तो पदवी करतो. परंतु, पहिल्याच वर्षाला त्याने 'एमपीएससी' आणि 'यूपीएससी'चा अभ्यासक्रम समजून घेतला. 'आयएएस' अधिकारी व्हायचेच, हा चंग त्याने बांधला. असे असंख्य विद्यार्थी आहेत, ज्यांचे जीवनच एकप्रकारे शाप झाले होते, त्यांच्यासाठी मतीन भोसले नावाचा एक 'मसिहा' अवतरला आणि त्यांच्या जीवनाला अर्थ प्रदान केला. लोकबिरादरी प्रकल्प, आनंदवन, मैत्र मांदियाळी अशा अनेक समाजसंस्थांनी मतीनच्या या लढ्याला पाठबळ दिले. शून्यातून विश्‍व निर्माण करायला निघालेली विक्रम, शिवा, गोपाल, अतुल, आशीष, शार्देश, मलिंदा, योगेश यांच्यासारखी असंख्य बालके पाहिल्यावर मतीनच्याच नव्हे, तर आपल्यातही नवे बळ संचारल्याशिवाय राहणार नाही. मतीनने निर्माण केलेल्या 'प्रश्‍नचिन्ह'चे उत्तर आपण त्याला देऊ शकलो तर त्याच्या या लढ्याला आणखीच बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.
(मो. 9850209945)
(लेखक सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे सहयोगी संपादक आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttarachya shodhat nighaleli prashnchinhe