आस भेटीची (वा. ना. उत्पात)

वा. ना. उत्पात, संतसाहित्याचे अभ्यासक
रविवार, 2 जुलै 2017

विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजला जातो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहत असताना त्यांची परमभक्त राधा त्यांच्या दर्शनाला आली. श्रीकृष्ण रुक्‍मिणीच्या महालात बसले होते. त्यावेळी राधा आली. तिची एका निरागस कृती रुक्‍मिणीला सहन झाली नाही. रुक्‍मिणीनं द्वारका सोडली आणि ती पंढरपूरमध्ये तपश्‍चर्या करू लागली. भगवान श्रीकृष्ण गाईगोपाळ घेऊन तिच्या शोधार्थ पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीवर गाईगोपाळांना सोडलं, म्हणून त्या परिसराला गोपाळपूर असं नाव पडलं. त्यानंतर श्रीकृष्ण चंद्रभागेच्या काठावरील खडकावर गेले.

विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजला जातो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहत असताना त्यांची परमभक्त राधा त्यांच्या दर्शनाला आली. श्रीकृष्ण रुक्‍मिणीच्या महालात बसले होते. त्यावेळी राधा आली. तिची एका निरागस कृती रुक्‍मिणीला सहन झाली नाही. रुक्‍मिणीनं द्वारका सोडली आणि ती पंढरपूरमध्ये तपश्‍चर्या करू लागली. भगवान श्रीकृष्ण गाईगोपाळ घेऊन तिच्या शोधार्थ पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीवर गाईगोपाळांना सोडलं, म्हणून त्या परिसराला गोपाळपूर असं नाव पडलं. त्यानंतर श्रीकृष्ण चंद्रभागेच्या काठावरील खडकावर गेले. त्यांनी जेवण केलं, तेव्हा त्या खडकावर पदचिन्ह उमटलं, म्हणून त्या जागेला विष्णूपद असं म्हटलं जातं. तिथून श्रीकृष्ण रुक्‍मिणीला भेटण्याऐवजी पुंडलिकाला भेटायला गेले. पुंडलिक तिथं आईवडिलांची सेवा करत होता. तिथं जवळ जात श्रीकृष्णानं पुंडलिकाला बोलावलं. मात्र, ‘मी आईवडिलांची सेवा करत आहे,’ असं सांगून त्यानं एक वीट फेकली आणि त्यावर उभं राहण्यास सांगितलं. त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण अठ्ठावीस युगं उभा राहिला.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

असं संत नामदेवरायांनी आरतीत वर्णन केलं आहे. त्या विटेवर आजही विठ्ठल उभा आहे. विठ्ठलाचं दुसरं नाव पांडुरंगही आहे. ‘पांडूर अंग’ असा त्याचा अर्थ होतो. तो जर काळा आहे, तर तो पांडुरंग कसा, असा प्रश्न पडतो. त्याचं कारण भगवान श्रीकृष्णाला भेटायला शंकर आले होते. शंकराचा रंग पांढरा त्यामुळं विष्णू आणि शंकर यांच्या विलिनीत्वाचं प्रतीक म्हणजे पांडुरंग हे नाव विठ्ठलानं धारण केलं. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. शैव आणि वैष्णव यांचं ऐक्‍य या नावातून सिद्ध होते. त्यामुळं दोन्ही प्रकारचे भक्त पंढरीत दर्शनासाठी येतात. पंढरपूरची वारी हजारो वर्षांपासून सुरू आहे. जगत्‌गुरू शंकराचार्य अडीच हजार वर्षांपूर्वी पंढरीस आले होते. त्यावेळी त्यांनी पांडुरंग स्तोत्र लिहिलं आहे. ज्ञानेश्वर महाराज यांच्या आईवडिलांनीही वारी केली. ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, सावता माळी यांच्यासह समकालीन संतांनीही वारीची परंपरा कायम ठेवली. अनेकांनी आपल्या अभंगांतून पंढरीचं माहात्म्य वर्णन केलं. सर्व जाती-धर्मांतले लोक चालत पंढरीत येतात. विठ्ठलावर नितांत श्रद्धा असल्यानं प्रत्येक वारकरी आषाढी एकादशीला दर्शनाला येतो. पांडुरंग पिता आणि रुक्‍मिणी माता अशी त्यांची भावना असते. लेकरानं जसं आईकडं जावे, तशा भक्तिभावानं वारकरी पांडुरंगाकडं चालत येतात.

एक धरिला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती

ही वारकऱ्यांची धारणा आहे. पांडुरंगाच्या स्मरणानं वारकऱ्यांच्या मनामध्ये भक्तीभाव निर्माण होतो.
रूप पाहता लोचनी,
सुख झाले हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा

असं ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाचं वर्णन करतात. पांडुरंगाच्या दर्शनानं त्रीविध तापाची निवृत्ती होते, असं संत मंडळी सांगतात.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।

पांडुरंगाच्या दरवाज्यातून जरी त्याचं दर्शन घेतलं, तरी चारी मुक्ती प्राप्त होतात.
पंढरीत कोणत्याही कर्मकांडाला थारा नाही. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि विठोबाचं दर्शन घेऊन परत फिरायचं, असा वारीचा साधा नेम आहे. गळ्यात तुळशीची माळ घालावी, दररोज हरिपाठ वाचावा, जयजय रामकृष्ण हरी असा जप जपावा. विठ्ठलप्राप्तीसाठी इतका साधा सोपा आचार वारकरी संप्रदायाशिवाय दुसऱ्या अन्य कोणत्याही पंथात नाही.

(शब्दांकन : शंकर टेमघरे)

Web Title: v n utpat write pandharpur wari article in saptarang

टॅग्स