बॉलिवूड आणि गुन्हेगारी जगत

वर्ष २००० मधली गोष्ट. दोन पोलिस अधिकारी हेडफोन्स आणि अन्य विविध उपकरणांनी सज्ज होऊन क्रॉफर्ड मार्केट पोलिस हेडक्वार्टर्समधील आपल्या खोल्यांत बसले होते.
dawood ibrahim and bharat shaha
dawood ibrahim and bharat shahasakal
Summary

वर्ष २००० मधली गोष्ट. दोन पोलिस अधिकारी हेडफोन्स आणि अन्य विविध उपकरणांनी सज्ज होऊन क्रॉफर्ड मार्केट पोलिस हेडक्वार्टर्समधील आपल्या खोल्यांत बसले होते.

- वेल्ली थेवर, saptrang@esakal.com

वर्ष २००० मधली गोष्ट. दोन पोलिस अधिकारी हेडफोन्स आणि अन्य विविध उपकरणांनी सज्ज होऊन क्रॉफर्ड मार्केट पोलिस हेडक्वार्टर्समधील आपल्या खोल्यांत बसले होते. प्रत्यक्ष पोलिसी तपासापेक्षा फोन टॅपिंग कितीतरी अधिक सोपं आहे, हे एव्हाना मुंबई पोलिसांना कळून चुकलं होतं, त्यामुळे कोणतीही पायपीट न करता भरपूर माहिती त्यांच्या पदरात पडत होती. परदेशी वास्तव्य असलेल्या; पण मुंबईला नियमित फोन करणाऱ्या माफिया सदस्यांच्या हालचालींवर त्यांची प्रामुख्याने नजर असे.

त्या वर्षातल्या २७ ऑक्टोबर या दिवशी छोटा शकीलचं फोनवरील संभाषण रेकॉर्ड करत असलेल्या इन्स्पेक्टरला त्याचं बोलणं ऐकून फारच आश्चर्य वाटलं. त्या बोलण्यात धमकीचा सूर मुळीच नव्हता. भरत शहा नावाच्या फिल्म फायनान्सरशी आणि नसीम रिझवी नावाच्या निर्मात्याशी तो काही धंद्याची बोलणी करत होता. उत्सुकतेने ते पुढील कॉल्सवर नजर ठेवून राहिले. त्या दिवसापासून ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांनी छोटा शकील आणि इतर बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक यांच्यातील एकूण ३२ संभाषणं रेकॉर्ड केली.

सहा महिन्यांनंतर ९ मार्च, २००१ रोजी बॉलिवूड आणि माफिया यांच्यातील या छुप्या स्नेहबंधाची फलश्रुती म्हणून ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा चित्रपट पडद्यावर झळकला; परंतु त्यापूर्वीच या चित्रपटाचा निर्माता नसीम रिझवी याला २००० या वर्षात १२ डिसेंबरला पोलिसांनी अटक केली होती आणि फिल्मजगतात अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून विख्यात असलेल्या भरत शहा यालाही ८ जानेवारीला (२००१) अटक झाली होती.

‘चोरी चोरी चुपके चुपके’संबंधित या घडामोडीने अख्ख्या बॉलिवूडला उलटंपालटं करून सोडलं. बॉलिवूड आणि भूमिगत गुन्हेगारी विश्व यांच्यातील साटंलोटं त्यामुळे चव्हाट्यावर आलं. भरत शहा आणि नसीम रिझवी या दोघांना मुंबई पोलिसांनी प्रथमच अत्यंत कठोर असा मोक्का कायदा लावला. या खटल्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना पैसा कसा आणि कुठून मिळतो, हेही उघड झालं आणि या व्यवसायाला बँकांनी वित्तपुरवठा करण्याची तीव्र निकडही अधोरेखित झाली. कालांतराने चित्रपट उद्योगसुद्धा बँकांकडून कर्ज मिळवण्यास पात्र ठरवणारा कायदाही अमलात आला.

आजवर इतर अनेक यंत्रणांना कधीच करता न आलेली कामगिरी फत्ते करण्यात ‘चोरी चोरी चुपके चुपके’संबंधित खटल्यामुळे मुंबई पोलिसांना अखेरीस यश मिळालं. त्यांनी उसंत म्हणून घेतली नाही. बॉलिवूड आणि माफिया यांच्यातील संबंध त्यांनी पूर्णतः संपुष्टात आणले. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या मार्च ९३ च्या त्या बॉम्बस्फोट मालिकेपासूनच मुंबई पोलिस अविरत प्रयत्न करत होते. माफियांबरोबर ज्यांची ज्यांची म्हणून घसट दिसून आली, ते सगळे त्यांच्या टाचेखाली आले. याची सुरुवात संजय दत्तपासून झाली. माफियांबरोबर स्नेहसंबंध राखल्याची फारच मोठी किंमत त्याला चुकती करावी लागली. बॉम्बस्फोट मालिकेच्या त्या खटल्यात संजय दत्त अडकला आणि त्याच्या आयुष्याने अत्यंत वेगळं वळण घेतलं. पुढची तब्बल वीस वर्षं कधी तुरुंगात, कधी बाहेर असंच आयुष्य त्याच्या वाट्याला आलं.

नव्वदचं दशक हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वांत वैभवशाली आणि सर्वांत दुर्दैवी दशक ठरलं. या दशकाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरसिंह राव यांनी लाल फितीच्या राक्षसमिठीतून अर्थव्यवस्थेची सुटका केली होती. या काळात बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट अतिशय कौशल्याने बनवले जात होते आणि दणदणीत यश मिळवत होते. याच दशकात तीनही खानांचं युग सुरू झालं, अनेक नवे चेहरेही या दशकात आले आणि त्यांनी चित्रपटसृष्टीला नवी टवटवी आणली.

जो जीता वोही सिकंदर, लम्हे, माचिस, बाजीगर, खलनायक, मोहरा, हम है राही प्यार के, कभी हां कभी ना, अकेले हम अकेले तुम, अंदाज अपना अपना, गुप्त, परदेस, विरासत, दिल से, गुलाम, चाची ४२०, सरफरोश, बॉर्डर, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी, दामिनी, बेटा, घायल, हम आप के है कौन, दिल, वास्तव... एक की दोन, असे कितीतरी वेगवेगळे, सुंदर आणि यशस्वी चित्रपट या काळातच आले.

पण, दैवदुर्विलास असा की, या चित्रपटांचं यशच त्यांच्या अंगावर उलटलं. या यशामुळे दुबई आणि कराचीस्थित भाईलोकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बॉलिवूडच्या लोकांनी आपला पुरेपूर वापर करून घेतला आणि ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर आपल्याला वाऱ्यावर सोडलं, अशी त्यांची भावना झाली. तोवर दाऊदने आपला सगळा कारभार आपला उजवा हात छोटा शकील आणि भाऊ अनीस इब्राहिम यांच्या हाती सोपवला होता. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध ताऱ्यांशी आणि तारकांशी दाऊदचे अत्यंत मधुर संबंध होते. या वैयक्तिक स्नेहबंधाचं ओझं छोटा शकील आणि अनीस यांच्या मनावर नव्हतं. याशिवाय अबू सालेमसारखे इतर नवागत होतेच. ते सारे बेमुर्वत आणि बेफाम बनले.

नव्वदच्या दशकात गुन्हेगारीविश्वातही बरीच घुसळण होत होती. नरसिंह राव यांनी केलेल्या उदारीकरणानंतर स्मगलिंग उतरणीला लागलं होतं. जमिनी आणि घरांच्या किमती अल्पकाळ कृत्रिमरीत्या फुगल्या होत्या आणि परत कोसळून पूर्ववत झाल्या होत्या. बॉलिवूड हे एकच काय ते चराऊ कुरण बहरलेलं होतं. त्याला लक्ष्य करणं अगदीच सोपं होतं. बॉलिवूडच्या अर्थपुरवठ्यात तोवर माफियांनी शिरकाव केलेलाच होता; पण त्यांना आणखी हाव सुटली होती. अबू सालेम म्हणजे एखाद्या काचसामानाच्या दुकानात शिरलेला बेदरकार रेडाच जणू. कोणत्याही परिस्थितीत, वाटेल ती किंमत मोजून सालेमला आपला वाटा मिळवायचाच असे.

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या ‘खलनायक’च्या दणदणीत यशामुळे सुभाष घईंची तिजोरी तुडुंब भरली होती, त्यांनाच अबू सालेमने आपलं पहिलं लक्ष्य बनवलं. नंतर त्यांनी ‘परदेस’ बनवला तेव्हा अबू सालेमला त्याच्या विदेशी प्रदर्शनाचे हक्क हवे होते. आपण अगोदरच हे हक्क विकले असल्याचं घईंनी त्याला सांगितलं. मग अबू सालेमने घईंकडे या चित्रपटाची प्रिंट मागितली. त्या चित्रपटाच्या चोरट्या प्रती तयार करून त्याला त्या विकायच्या होत्या. घईंनी ही गोष्ट हसण्यावारी नेली. अबू सालेमकडे आझमगडहून आलेली नेमबाज पोरं होती. केवळ पाच हजार रुपयांना एक खून असा त्यांचा दर होता. घईंना धडा शिकवण्यासाठी अबूने ही पोरं त्यांच्या अंगावर धाडली. पण मुंबई पोलिस याबाबत सतर्क होते. त्यांनी हा बनाव निष्फळ ठरवला आणि त्या मुलांना अटक केली; पण अबू सालेमचा रणगाडा सुसाट सुटला होता.

रोजच्या रोज तो बॉलिवूडमधल्या या ना त्या असामीला फोन करे. राजीव रॉय नावाचे एक निर्माता होते. त्यांनी ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात तुफान चाललेला ‘त्रिदेव’ बनवला होता आणि नंतर २००४ मध्ये असाच गाजलेला ‘मोहरा’ बनवला होता. त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न होताच त्यांनी सरळ आपलं चंबूगबाळं आवरलं आणि कुटुंबासह भारत सोडून परदेशचा रस्ता पकडला. अबूचं पुढचं लक्ष्य बनले टी-सीरिजचे गुलशनकुमार. असंख्य लोकप्रिय गाणी सादर करून त्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पुष्कळ माया जमवली होती. त्यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. आलेली धमकी गुलशनकुमार यांनी मुळीच गंभीरपणे घेतली नाही आणि त्याची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली. दिवसाउजेडी त्यांची अत्यंत निष्ठुरपणे हत्या करण्यात आली. गुलशनकुमारांच्या या हत्येमुळे खुद्द बॉलिवूडमध्ये असलेली दुश्मनीही उघडी पडली. कारण नदीम-श्रावण या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील नदीम याच्यावरच या खुनाची सुपारी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. नदीम याने लगेच देश सोडून पलायन केलं.

गुलशनकुमार यांच्या हत्येनंतर बॉलिवूडभर पसरलेली भयग्रस्तता स्पष्ट जाणवत होती. अगदी २००० सालापर्यंत धमक्यांचा सिलसिला सुरूच होता. राकेश रोशन यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा एक प्रयत्नही झाला. मोटासायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांचा हल्ला सुरू होताच प्रसंगावधान राखत प्रचंड वेगाने गाडी हाकून राकेश रोशन यांच्या ड्रायव्हरने त्यांचे प्राण वाचवले, तरीही राकेश रोशन यांच्या बाहूच्या मांसल भागात एक गोळी घुसून खोलवर आत शिरलीच.

केवळ एक मिलिमीटर इतक्या अंतराने त्यांचं हृदय बचावलं. हृतिक रोशन नायक असलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची घोषणा राकेश यांनी केली त्या वेळी सालेमने त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या चित्रपटाच्या विदेशी प्रदर्शनाचे हक्क मिळवण्याच्या सालेमच्या प्रयत्नांकडेही राकेश यांनी दुर्लक्ष केलं होतं व त्यानंतर खंडणीची रक्कम कमी करून मागितली तरी त्याकडे काणाडोळा केला होता. यामुळेच या हल्ल्याला खरी चिथावणी मिळाली.

निर्मात्यांबरोबरच अगदी वितरकांनाही या माफियांनी सोडलं नाही. प्रथम गेएटी-गॅलक्सी चित्रपटगृह संकुलाजवळ अनिल थाडानी यांच्यावर आणि त्यानंतर त्या वेळी ॲडलॅब फिल्म्सचे मालक असलेल्या मनमोहन शेट्टी यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला.

बॉलिवूडच्या बड्या असामींनी सुरक्षारक्षक नेमले. त्यांच्यापैकी काही जणांना पोलिस संरक्षणही पुरवण्यात आलं. चित्रपट निर्मितीअंतर्गत प्रत्येक बाबीत गुन्हेगारीजगताचा हस्तक्षेप सुरूच होता. त्यांना आपल्या पसंतीच्याच नायिका चित्रपटात हव्या असत. आपण अर्थपुरवठा करत असलेल्या चित्रपटाच्या करारावर निमूटपणे सह्या करण्याची धमकी ते मोठमोठ्या चित्रपट ताऱ्यांना देत असत. आपली आज्ञा अव्हेरणाऱ्या निर्मात्यांना ते ठार करू लागले होते. एक आर्थिक व्यवहार मनाजोगा झाला नाही म्हणून मुकेश दुग्गल यांना ठार करण्यात आलं.

अनीस इब्राहिम यानेच मनीषा कोईरालाचा सेक्रेटरी अजित दीवानी याची हत्या केली होती, अशी माहिती अबू सालेमने नंतर दिली.

बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने १९९५ ते २००५ हे दशक अत्यंत तणावाचं गेलं; पण हाही काळ निघून गेला. गमतीची गोष्ट अशी की, आता कुणी माफिया बॉलिवूडवर मात करत नाही, तर अशी मात देणारी संस्था दक्षिणेत बहरलीय. सध्या दक्षिणेकडची चित्रपटसृष्टी एकाहून एक हिट चित्रपट निर्माण करत आहे आणि वेगाने बॉलिवूडपेक्षा प्रबळ बनत आहे.

(वेल्ली थेवर या ज्येष्ठ पत्रकार असून, मुंबईतील गुन्हेगारी विश्व आणि मुंबई शहर या विषयांवर लेखन करतात.)

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com