
शिवसेना-भाजपची युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत 133 उमेदवार मैदानात असून, सर्वांत कमी सात सिल्लोड; तर सर्वाधिक 34 उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर एमआयएम-वंचितमध्ये पडलेल्या मिठाच्या खड्याने दोन्ही पक्षांसाठी लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण सध्या नाही. शिवसेना-भाजपची युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत 133 उमेदवार मैदानात असून, सर्वांत कमी सात सिल्लोड; तर सर्वाधिक 34 उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी काही ठिकाणी थेट, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी अशी लढत होत आहे. या विषयीचा हा आढावा -
औरंगाबाद पुर्व (विधानसभा मतदारसंघ)
औरंगाबाद पूर्वमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 34 उमेदवार आहेत. भाजपचे राज्यममंत्री अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी हे मागील निवडणुकी प्रमाणे पुन्हा मैदानात आहेत. तर कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला ही जागा आघाडीत समाजवादी पक्षाला सोडल्याने येथून समाजवादीकडून कलीम कुरैशी यांनी अर्ज भरला. मात्र समाजवादीने मुंबईत कॉंग्रेस विरोधात उमेदवार दिल्याने औरंगाबाद पुर्व मध्ये समाजवादीसोबत आघाडी तुटल्याची घोषणा करुन कॉंग्रेसने येथे अपक्ष युसुफ मुकाती यांना पुरस्कृत केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने येथे उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे वंचितची भूमिका येथे महत्वाची राहिल असे दिसते.
अतुल सावे (भाजप)
डॉ. गफ्फार कादरी (एमआयएम)
औरंगाबाद पश्चिम (विधानसभा मतदारसंघ)
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट हे तिसऱ्यांदा मैदानात आहेत. त्यांची लढत एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट, भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांच्यासोबत आहे. येथे चौरंगी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने येथे दुसऱ्या क्रमांकाची 71 हजार 239 मते मिळविली होती; मात्र आता दोन्ही पक्ष वेगळे झाल्याने दोघांच्या मत विभाजनाचा फायदा हा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस-रिपाइंचे (डी) रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाल्याने येथे कॉंग्रेस पक्षाने ऍड. विनोद माळी या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले आहे.
संजय शिरसाट (शिवसेना)
राजू शिंदे (अपक्ष- भाजप बंडखोर)
औरंगाबाद मध्य (विधानसभा मतदारसंघ)
औरंगाबाद मध्यमध्ये भाजपचे किशनंचद तनवाणी यांच्या माघारीने शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल; तर जावेद कुरैशी यांनी अर्ज मागे घेतल्याने एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांना दिलासा मिळाला. या दोघांसोबत राष्ट्रवादीचे कदीर मौलाना, वंचित आघाडीचे अमित भुईगळ अशी चौरंगी लढत आहे. येथे वंचित, राष्ट्रवादी, एमआयएम अशी मतविभागणी होऊ शकते. त्यामुळे त्याचा फायदा हा शिवसेनेच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
नासेर सिद्धिकी (एमआयएम)
सिल्लोड (विधानसभा मतदारसंघ)
सिल्लोडमध्ये कॉंग्रेसचा राजीनामा देऊन अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधले. इतकेच नव्हे, तर त्यांनी हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला मिळविण्यात यश मिळविले. शिवसेनेने त्यांना मैदानात उतरविले आहे. येथे भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी पुर्वी कॉंग्रेसचे असलेले प्रभाकर पालोदकर यांना अपक्ष मैदानात उतरविले. पालोदकर हे अपक्ष मैदानात असल्याने त्यांच्या जागी कॉंग्रेसने कैसर आझाद यांना तिकीट दिले. वंचित आघाडीचे दादाराव वानखेडे हे मैदानात आहेत.
अब्दुल सत्तार (शिवसेना)
प्रभाकर पालोदकर (अपक्ष)
कन्नड (विधानसभा मतदारसंघ)
कन्नडमध्ये शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत; तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला झटका देणारे हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून मैदानात आहेत. राष्ट्रवादीने येथे संतोष कोल्हे यांना तिकीट दिले; भाजपचे किशोर पवार यांनी बंडखोरी केल्याने येथील लढतीत चुरस वाढली आहे. वंचितचे महारू राठोड हे मैदानात असल्याने येथे बहुरंगी लढत होत आहे.
उदयसिंग राजपूत (शिवसेना)
हर्षवर्धन जाधव (अपक्ष)
फुलंब्री (विधानसभा मतदारसंघ)
फुलंब्रीत भाजपचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात यंदाही मागील निवडणुकीप्रमाणे थेट सामना होत आहे. 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या निकषावर मात करत हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा तिकीट मिळविले आहे. त्यामुळे बागडे-काळे यांच्यात लक्षवेधी लक्षत होत आहे. वंचित आघाडीकडून जगन्नाथ रिठे मैदानात आहेत.
हरिभाऊ बागडे (भाजप)
डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)
पैठण (विधानसभा मतदारसंघ)
पैठणमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे, राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे, वंचितचे विजय चव्हाण अशी लढत आहे. ग्रामीण मतदारसंघात एमआयएमने फक्त पैठण मतदारसंघातून लढत असून, येथे प्रल्हाद राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी ओवेसी यांनी सभासुद्धा घेतली. एबी फॉर्मच्या गोंधळाने राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
संदीपान भुमरे (शिवसेना)
गंगापुर (विधानसभा मतदारसंघ)
गंगापूरमध्ये प्रशांब बंब यांची लढत राष्ट्रवादीचे संतोष माने यांच्यासोबत होत आहे. वंचित आघाडीकडून अंकुश काळवणे यांना उमेदवारी मिळाली आहे. गंगापुर तालुका हा मराठा आंदोलनाचे केंद्र राहिला आहे. त्यामुळे येथे मराठा मतदार सुद्धा महत्वाचा मानला जातो. सध्या या मतदारसंघात माने-बंब अशी थेट लढत आहे.
प्रशांत बंब (भाजप)
संतोष माने (राष्ट्रवादी)
वैजापुर (विधानसभा मतदारसंघ)
वैजापूरमध्ये भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांना दिलासा मिळाला आहे. मागील वेळी विजयी झालेले आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. शिवसेनेचे प्रा. रमेश बोरणारे, राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर यांच्या याशिवाय वंचितचे प्रमोद नांगरे, मनसेचे संतोष जाधव हे ही रिंगणात आहेत.
अभय पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी)
प्रा. रमेश बोरनारे (शिवसेना)