Vidhan Sabha 2019 : पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं!

टीम ई-सकाळ
Monday, 14 October 2019

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढतींकडे लक्ष लागले आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं पाहूया!

जाणून घ्या औरंगाबादमधील 09 मतदारसंघाची राजकीय गणितं !

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
कोथरूड मतदारसंघातून भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अनपेक्षितपणे उमेदवारी दिली आहे. सुरवातीच्या दोन-तीन दिवसांनंतर पक्षांतर्गत "शांतता' निर्माण करण्यात भाजपचे नेतृत्त्व यशस्वी ठरले आहे. तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवार उभा न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याची चाल रचली आहे. आघाडीचे कार्यकर्तेही या मतदारसंघात मनसेच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. भाजपनेही येथील प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली आहे. कोथरूडमध्ये "आप'ने डॉ. अभिजीत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील लढत आता तिरंगी झाली आहे.

चंद्रकांत पाटील भाजप
Image result for Chandrakant patil

किशोर शिंदे (मनसे)

Image result for kishor shinde

कसबा विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघातून विद्यमान खासदार गिरीश बापट पाचवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे येथे वर्चस्व आहे, असे समजले जात असले तरी, कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे आणि मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवार आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. टिळक याच मतदारसंघातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. शिंदे यांनी पक्षातंर्गत स्पर्धेत मात करून उमेदवारी खेचून आणली. मात्र, शिवसेनेने प्रयत्न करूनही येथील बंडखोर उमेदवार धनवडे यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. तर मनसेने येथे शहराध्यक्ष शिंदे यांना उतरविले आहे. त्यामुळे कसब्यातील चौरंगी लढत चुरशीची झाली आहे. 

मुक्ता टिळक (भाजप)

Image result for Mukta Tilak

अरविंद शिंदे (काँग्रेस)

Image result for arvind shinde congress pune

पर्वती विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघातून भाजपच्या शहराध्यक्ष आणि या पूर्वी दोन वेळा निवडून गेलेल्या माधुरी मिसाळ आता तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्‍विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. दोन महिलांमधील लढत चुरशीची झाली आहे. "आप'ने या मतदारसंघात संदीप सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे. परंतु, गेल्या तीन निवडणुकांपासून येथील गणिते बदलेली आहेत. आता राष्ट्रवादीने जोर लावला आहे तर, वरचष्मा ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

माधुरी मिसाळ (भाजप)

Image result for madhuri misal

अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

Image result for ashwini kadam

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
राखीव असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे रिंगणात आहेत. या पूर्वी त्यांनी एकदा या मतदारसंघातून विजयी झाल्यावर ते गृहराज्यमंत्री झाले होते. परंतु, गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप कांबळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे कांबळे मंत्री झाले. परंतु, शेवटच्या सहा महिन्यांत त्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्यात आला. तसेच त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना भाजपने आता उमेदवारी दिली आहे. सुनील हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. एमआयएमने येथे हिना मोमीन तर वंचित बहुजन आघाडीने लक्ष्मण आरडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होईल. 

सुनील कांबळे (भाजप)

Image result for sunil kamble BJP

रमेश बागवे (काँग्रेस)

Image result for RAmesh bagve

हडपसर विधानसभा मतदारसंघ
भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या योगेश टिळेकर यांच्यासमोर आव्हान आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांचे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा मतदारसंघ या पूर्वी बालेकिल्ला होता. परंतु, गेल्या निवडणुकीत येथे बदल झाला. याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि नगरसेवक वसंत मोरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली आहे. परिणामी या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. टिळेकर यांच्याविरुद्ध एकच उमेदवार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. परंतु, तो येथे यशस्वी झालेला नाही. बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने नेटाने प्रयत्न सुरू केले असून भाजपचाही शिस्तबद्ध प्रचार येथे सुरू आहे.

योगेश टिळेकर (भाजप)

Image result for योगेश टिळेकर

वसंत मोरे (मनसे)

Image result for vasant more

चेतन तुपे (राष्ट्रवादी)

Image result for chetan tupe

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ
भाजपचे विद्यमान आमदार जगदिश मुळीक यांच्यासमोर राष्ट्रवादीने सुनील टिंगरे या युवा नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपचे गणेश धमाले निवडणूक रिंगणात आहेत. जगदिश यांचे धाकटे बंधू योगेश हे महापालिकेच्या स्थायी समितीचे गेल्यावेळी अध्यक्ष होते. त्या पदाचा वापर त्यांनी मतदारसंघासाठी पुरेपूर केला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला येथून लक्षणीय मते मिळाली होती. तर सुनील टिंगरे गेल्यावेळेस शिवसेनेकडून लढताना या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यंदा नेटाने ते लढत आहेत. त्यामुळे येथील निवडणूक मतविभागनीमुळे चुरशीची झाली आहे. 

जगदीश मुळीक (भाजप)

Image result for jagdish mulik

सुनील टिंगरे (राष्ट्रवादी)

Image result for sunil tingre

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आता तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने सचिन दोडके या युवा नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात चांगले प्राबल्य आहे. परंतु, गेल्या दोन निवडणुकांत त्यांना थोडक्‍यात पराभव स्वीकारावा लागला. खासदार सुप्रिया सुळे यांचा या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्याच्या बळावर राष्ट्रवादीने नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरी आणि ग्रामीण, असे दोन्ही मतदारसंघात यंदा अन्य उमेदवार असले तरी, थेट लढत होणार असल्यामुळे त्या बद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

भिमराव तापकीर (भाजप)

Image result for bhimrao tapkir

सचिन दोडके (राष्ट्रवादी)

Image result for sachin dodke

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
भाजपने यंदा येथे युवा नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. तर, कॉंग्रेसने येथून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मनसेने सुहास निम्हण तर, 'आप'ने शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांना रिंगणात उतरविले आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार विजय काळे यांना बदलून सिद्धार्थ यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना माजी खासदार अनिल शिरोळे यांचा वारसा आहे. हा मतदारसंघ काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथील परंपरागत मतदारांवर कॉंग्रेसची भिस्त आहे. तर भाजपच्या कमिटेड व्होटर्सवर शिरोळे अवलंबून आहेत. शहरातील सर्वात युवा उमेदवार सिद्धार्थ आहेत. येथे मनसे आणि 'आप'ला मानणारे मतदार आहेत. त्यामुळे मतविभागनी कशी होते, याकडे लक्ष लागले आहे. अन्‌ त्यावरच येथील निकाल अवलंबून असेल.

सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

Related image

दत्ता बहिरट (काँग्रेस)

Related image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Pune City Eight constituencies analysis