सहकार क्षेत्राचा राजदूत

राज्य सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘सहकार परिषदे’च्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांचा आज (ता. १०ऑगस्ट) वाढदिवस. या दोन्हींचे औचित्य साधून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांविषयी...
anaskar
anaskarsakal

-सुशील जाधव

राजदूत म्हणजेच ब्रँड अॅम्बेसिडर. ही अशी व्यक्ती असते, की जी एखाद्या क्षेत्राचे सकारात्मक पद्धतीने प्रतिनिधित्व करते, त्या क्षेत्राविषयी सतत जागरूकता निर्माण करते, नकारात्मक वातावरण बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, त्या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी समर्पित होऊन योगदान देते, आणि हे सर्व करीत असताना सर्व नीतिमूल्यांचे काटेकोरपणे पालन करते. या व्याख्येमध्ये चपखल बसणारे आजच्या सहकार युगातील नाव म्हणजे विद्याधर अनास्कर. एखाद्या क्षेत्रात मनापासून आवडीने व निरपेक्षपणे कार्यरत राहिल्यास जनतेला व पर्यायाने राज्यकर्त्यांनाही त्याची दखल घ्यावी लागते. राज्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची केवळ गुणवत्तेवर नेमणूक करीत राज्य शासनाने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

अनास्कर यांचे आयुष्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतूनही अनुकूलता साकारण्याचे प्रेरक उदाहरण आहे. वडील खेडेगावात प्राथमिक शिक्षक होते. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे म्हणून ते पुण्यात आले; परंतु ज्याने घर द्यायचे कबूल केले, त्याने ऐनवेळी फसवणूक केली. धर्मशाळेत दिवस काढावे लागले. घर शोधत असतानाच वडिलांना एका अपघातात अपंगत्व आले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. त्यांनी पुण्यात ६-७ महिलांना एकत्र आणत १९६८मध्ये ‘लिज्जत पापड’ची शाखा नारायण पेठेतील निघोजकर मंगल कार्यालयात सुरू केली. विद्याधर त्यावेळी आपल्या बहिणीसोबत रोज वीस-वीस किलोंच्या पिठांचे पापड लाटायचे. संपूर्ण लिज्जत मंडळात सुरेख पापड लाटण्यात ते प्रसिद्ध होते. तासाला साठ म्हणजे मिनिटाला एक, असा त्यांच्या लाटण्याचा वेग होता. त्या कामात रात्र होत असे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता पापडांचे गठ्ठे मंडळात नेऊन द्यायचे. परत पीठ आणून सकाळी सहा वाजल्यापासून पापड लाटण्याचा कार्यक्रम सुरू... असा हा दिनक्रम असे. सहकारी तत्त्वावरील जी ‘लिज्जत पापड संस्था’ आधार ठरली, ती संस्था आणि त्यामागील सहकाराचे तत्त्व याविषयी अनास्करांच्या मनात नितांत आदराची भावना निर्माण झाली. त्यामुळे संधी मिळताच उद्यम विकास बँक व नंतर विद्या सहकारी बँकेच्या माध्यमातून तरुण वयातच विद्याधररावांनी सहकार क्षेत्रात सामाजिक भावनेने काम करण्यास सुरुवात केली.

anaskar
हेल्दी फूड : प्रथिने आवश्‍यकच

आपल्या आयुष्याच्या जडणघडणीचे सर्व श्रेय ते आईला देतात. त्यांची आई पुढे ‘लिज्जत’ची संचालिका झाली. आजही अनसूयाताई अनास्कर यांना ‘लिज्जत’च्या महिला विसरू शकत नाहीत. कर्करोगाचे निदान झाल्यावर शेवटच्या सहा महिन्यांत जिद्दीने दुसरी फळी तयार करणारी, ‘लिज्जत’मधून कष्टाने कमावलेले सर्व संपत्ती, साड्या इत्यादी वस्तू ‘लिज्जत’च्या भगिनींमध्ये वाटून टाकणारी, आपण गेल्यावर आपल्या कुटुंबात सदस्यांपैकी कोणीही ‘लिज्जत’मध्ये वारसा हक्काप्रमाणे कोणताही फायदा घेऊ नये, अशी शपथ देणारी माता दुर्मीळच आणि आईच्या इच्छेचे तंतोतंत पालन करणारा विद्याधररावांसारखा पुत्रही विरळाच.

anaskar
योगा लाइफस्टाइल : अष्टांग नमस्कार

‘...माझा धर्म सहकार’

अनास्कर यांनी प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षण पूर्ण केले. पाच पदव्या प्राप्त केल्या. सहकार क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. आज ते राज्य सहकारी बँकेचे जसे अध्यक्ष आहेत, ‘विद्या सहकारी’चे कार्यवाहक संचालक आहेत. बँकांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत; महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राज्य शासनाच्या सहकारविषयक अनेक समित्यांवर सदस्य आहेत. रिझर्व बँकेच्या स्थायी सल्लागार समितीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सदस्य आहेत. रिझर्व्ह बँकेने भारतातील नागरी सहकारी बँकांसाठी प्रत्येक राज्यात स्थापन केलेल्या कृती दलावर ते महाराष्ट्र, गुजरात राजस्थान व जम्मू कश्मीर राज्याचे प्रतिनिधित्व करतात. सहकारविषयक मागील तीस वर्षात त्यांनी विविध वृत्तपत्रांतून विपुल लिखाण केले आहे. या विषयावर त्यांची आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नुकतीच त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ‘माझी जात सहकार, माझा धर्म सहकार आणि माझी पक्षदेखील सहकार,’ ही अनास्कर यांनी बोलून दाखवलेली भावनाच त्यांच्या कार्याविषयी खूप काही सांगून जाते.

‘विद्वान सर्वत्र पूज्यते...’ या उक्तीनुसार राज्य सहकारी बँकेवर युतीच्या काळात झालेली त्यांची नेमणूक महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवली, हेच त्यांच्या निःपक्षपाती कामाचे सर्वात मोठे प्रशस्तिपत्रक आहे, असे ते मानतात. सहकार क्षेत्राला वाहिलेले एक ‘सहकार विद्यापीठ’ पुण्यामध्ये असावे, असा त्यांचा संकल्प आहे. तो येत्या काळात पूर्णत्वास जावो, यासाठीसुद्धा मी आजच्या या वाढदिनानिमित्ताने शुभेच्छा देतो.

anaskar
इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण

विठ्ठलभक्तीचा प्रत्यय

राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर बँकेत विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीची बँकेत स्थापना करण्यामागची कारणे अनास्करांना विचारली. त्यावर अनास्कर यांनी दिलेले उत्तर सर्वांनाच भारावून टाकणारे होते. ‘राज्य बँकेचा प्रत्येक पैसा हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्या शेतकऱ्यांपर्यंत जातो, त्या शेतकऱ्यांचा देव विठ्ठल आहे. या बँकेमध्ये आलेल्या प्रत्येक कर्जदाराला बँकेविषयी आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी दारातच विठ्ठल आहे. ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही राज्य बँकेचा सुमारे चाळीस हजार कोटींचा व्यवहार माझ्या एकट्याच्या हाती प्रशासक म्हणून दिला आहे, अशा वेळी माझ्या मनात तसूभरही मोह उत्पन्न होऊ नये ,याचीही जबाबदारी माझ्या विठ्ठलावर आहे...’

(लेखक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. पुणे’चे विभागीय व्यवस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com