युवकांनो, तुम्ही नकार पचवायला शिका..!

डॉ. विद्याधर बापट
रविवार, 9 एप्रिल 2017

समाज आज पौगंडावस्थेतील मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे चक्रावून गेला आहे. मुलांत वाढत चाललेला क्रोध, कामभावनेची तीव्र ओढ आणि या दोन्हीचं विकृत व्यक्तीकरण, काळजी करण्यासारखं आहे. सर्रास धमक्‍या देणं, मागचा पुढचा विचार न करता, विरोध करणाऱ्या मुलांवर, मुलींवर शारीरिक हल्ले करणं, बेतालपणे मुलींशी वागणं, किंवा काही वेळा मुलींचंही बेताल वर्तन या सगळ्याच गोष्टी वाढत चालल्या आहेत. त्याकडं, त्याच्या कारणांकडं आणि उपायांकडं गांभीर्यानं पाहण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे... 

तरुणांमध्ये राग येण्याचं व तो हिंसक पद्धतीनं व्यक्त होण्याचं प्रमाण वाढतं असून, तशी अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाली. समाज परिवर्तनाच्या लाटेत तंत्रज्ञानाच्या अयोग्य वापराचाही वाटा आहे. सिनेमा, टीव्ही, इंटरनेटवरील हिंसेचं, लैंगिकतेचं अनिर्बंध उदात्तीकरण, आक्रमक आणि हिंसेच्या भावनेला खत पाणी घालणारे, मुलांना उत्तेजित करणारे व्हिडिओ गेम्स, मुलांकडं, त्यांच्या बिघडलेल्या मित्र-मैत्रिणींकडं होणारं पालकांचं अक्षम्य दुर्लक्ष, स्वत: पालकांचं बेताल वागणं, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद या सगळ्यांचाच असं घडण्यात वाटा आहे. सगळीच मुलं-मुली आणि पालक असे निश्‍चितच नाहीत. चांगली उदाहरणंच जास्त आहेत, मात्र आता ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडतंय ते कसं थांबवता येईल याचा विचार व्हावाच. 

या सगळ्या मुला-मुलींमध्ये अशीही काही मुलं आहेत ज्यांना भावनिक प्रश्‍न, अस्वस्थता, सदोष व्यक्तिमत्त्व असे काही प्रश्‍न आहेत. या सगळ्या अस्वस्थतेचं, नकारार्थीपणाचं व्हेंटिनेशन म्हणून त्यांच्यात नकारात्मक वृत्ती निर्माण झालीय आणि अशा कृती घडताहेत. आणि हा गट खूप मोठा आहे. त्यांना वेळेवर तज्ज्ञांची मदत मिळाली, ती आतून स्वस्थ झाल्यास ही मुलं बदलू शकतात. अर्थात तज्ज्ञांबरोबरच, पालक, शिक्षक यांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे. 

शारीरिक बदल समजून घ्या... 
पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूचा काही भाग, विशेषत: फ्रंटल कॉर्टेक्‍समध्ये (जिथं निर्णयक्षमता, भावनांवर नियंत्रण, विवेकशक्ती वापरणं, इम्पल्सवर ताबा अशा अनेक गोष्टी घडतात.) बदल होत असतो. नवनवीन चेतापेशी प्रचंड वेगात तयार होत असतात, त्यांच्यात बदल घडत असतात. अशा अवस्थेमध्ये मनःस्वास्थ्य ठीक नसेल, मूल्य ढासळली असतील, फॅन्टसीत वावरायची सवय असल्यास मुलांकडून अयोग्य निर्णय घेतले जाऊ शकतात. चुकीचं वागलं जाऊ शकतं. त्याचे दुष्परिणाम त्यांना, इतरांना आणि पर्यायाने पालकांना भोगावे लागतात. या वयातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. तसंच समोरच्याच्या भावना, कृती, चेहेऱ्यावरील हावभाव समजून घेण्यात मुलांची चूक होऊ शकते. प्रौढांमध्ये प्री-फ्रंटल कॉर्टेक्‍सचा वापर भावनांचं मूल्यमापन करताना होतो, तर मुलांमध्ये त्यापेक्षा जास्त अवलंबित्व अमिग्डलावर (प्रमस्तिक्ष खंड) असते. आणि मग पटकन भावनाधारित चुकीची प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते. अर्थात हे चुकीच्या वागण्याचं समर्थन निश्‍चितच नव्हे, मात्र आपला मुलगा किंवा मुलगी अशी का वागताहेत हे समजून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते. 

पाल्यांमधील धोक्‍याची लक्षणे 
एक लक्षात घेऊया हिंसाचार म्हणजे फक्त मारामारी करणं नाही. यात धमकी देणं, मुलींची छेड काढणं, बलात्कारासारखी पाशवी कृत्य, जबरी चोरी, दारूपासून ड्रग्सपर्यंतची व्यसनं, जुगार हे सर्व आलं. लक्ष ठेवायला हवं की मुलांमध्ये पुढील लक्षणं दिसताहेत का? 

 • इतरांना धमक्‍या देणं, धमक्‍यांचे फोन करणं. इजा करू शकतील अशी हत्यारं बाळगणं. 
 • हत्यारांविषयी विलक्षण आकर्षण. 
 • घरच्या, सोसायटीच्या, शाळेच्या किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची प्रवृत्ती. 
 • तंबाखू, दारू, ड्रग्ज इत्यादींचे व्यसन, व्यसनी मित्रमैत्रिणी असणे. 
 • पोर्न फिल्म पाहाणं. 
 • अचानक व सतत मूडमध्ये बदल. 
 • लहान गोष्टींवरून विनाकारण चिडचिड करणं. 
 • उलट उत्तरं देणं. 
 • हिंसेचे विचार सतत बोलून दाखवणं. ते विशिष्ट व्यक्ती, गट, समाजाविषयी असू शकतील. 
 • मृत्यूविषयी बोलत राहाणं. 
 • शाळेत, सोसायटीत, घरी सतत मारामारी करणं. पाळीव किंवा रस्त्यावरील प्राण्यांना त्रास देणं. 
 • घरापासून लांब लांब राहाण्याची प्रवृत्ती. सातत्यानं मित्र-मैत्रिणींबरोबर नाइट औटला जाणं. 
 • जेवणाच्या, झोपण्याच्या सवयींत बदल. 
 • हिंसक व्हिडिओ, गेम्सचं व्यसन. 
 • टीका सहन न होणं, आक्रमक होणं. 
 • अतिहळवं होणं, रडणं. 
 • आपण कोणीतरी विशेष आहोत आणि इतरांनी आपल्या म्हणण्याप्रमाणंच वागलं पाहिजे, असा पवित्रा. 
 • मुली, स्त्रियांविषयी बीभत्स बोलणे. 
 • एखादी मुलगी आपली मालमत्ता असल्यासारखी बोलणं, वर्तन करणं. 
 • शाळेत, क्‍लासमध्ये सातत्याने अनुपस्थिती आणि निराशाजनक मार्क्‍स. 

पालकांची मदत

 • मुळात आपलं वर्तन चांगलं ठेवणं, आपण मुलांसाठी रोल मॉडेल बनणं महत्त्वाचं आहे. लहानपणापासून मुलांना घरात प्रेम, विश्‍वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावा. 
 • घरातील व्यक्तींचं वर्तन व्यवस्थित असूनही बाहेरील प्रभावांमुळं मुलांचं वर्तन बदलू शकतं. पाल्याशी नातं इतकं विश्‍वासाचं हवं की, त्यानं पालकांशी मोकळेपणानं त्यांच्या समस्या सांगाव्यात. ते भावनिक असल्यास वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यावी. 
 • मुलांसमोर वादविवाद, भांडणं टाळावीत. 
 • मुलं बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्या सवयी याची त्यांच्या नकळत चौकशी करावी. 
 • मुलांना दिले जाणारे पैसे अवाजवी नाहीत आणि त्याचा योग्य विनियोग होतोय, याकडं लक्ष द्यावं. पोलिसिंग मात्र नको. 
 • घरामध्ये हिंसा व सेक्‍स असणाऱ्या गोष्टी मुलांसमोर पाहू नयेत. इंटरनेटच्या काही साईट्‌स ब्लॉक कराव्यात. 
 • मुलांना लहानपणापासून तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर शिकवावा. त्याचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न करावा. 
 • मुलांची नकारार्थी ऊर्जा भरपूर व्यायाम आणि कलांद्वारे नियंत्रित करण्याकडं लक्ष द्यावं. 
 • मुलांशी मैत्री करावी. आपल्या सहवासात त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रयत्न करावा. मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं. आपलं म्हणणं ऐकलं जातंय याचा त्यांना विश्‍वास वाटू द्या. 

तज्ज्ञांची मदत 
गरज भासल्यास औषधोपचाराबरोबरच वेगवेगळ्या थेरपींद्वारे तज्ज्ञ मदत करू शकतात. सीबीटी व इतर थेरपी विचार व कृती करण्याच्या पद्धतीत बदल करतात. हे प्रकरण किती बिघडली आहे, यावरही अवलंबून असतं. रिलॅक्‍सेशन थेरपी, रागावर नियंत्रण आणण्याच्या पद्धती, नकारात्मक विचारसरणी बदलून सकारात्मक विचारसरणी प्रस्थापित व्हायला मदत होऊ शकते. स्वप्नाऐवजी वास्तवात जगायला शिकवलं जातं. मुख्य म्हणजे, भावनिक समस्येमुळं असं काही घडत असल्यास मुळात ती समस्या सोडवणं महत्त्वाचं, 'राग' ही प्रतिक्रिया असते. असुरक्षितता, अस्वस्थता, भीती, अपराध ही प्राथमिक भावना असते. ती रागाच्या किंवा हिंसात्मक वागणुकीच्या मुळाशी असू शकतात. 

मुलांनी लक्षात ठेवावं... 

 • राग नैसर्गिक भावना आहे. ती दाबून ठेवू नये, मात्र हिंसात्मक पद्धतीनं व्यक्त करू नये. सुसंस्कृतपणे आपलं म्हणणं व्यक्त करता येणं महत्त्वाचं आहे. राग आक्रमक पद्धतीनं व्यक्त झाल्यास स्वतःचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक नुकसानच होतं. 
 • इतरांना शारीरिक, मानसिक त्रास दिल्यानं तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही. 
 • परिस्थिती तुम्हाला हवी तशीच नसते, मात्र तुमची प्रतिक्रिया तुमच्याच हातात असते. तुम्ही स्वतःच्या रागाचं व्यवस्थापन निश्‍चित करू शकता. 
 • अतिराग तुमच्या करिअरचं आणि आयुष्याचं कधीही भरून न निघणारं नुकसान करू शकतो. कुटुंबीयांची सामाजिक प्रतिमा मलिन करू शकतो. 
 • तुम्ही व्यसनाच्या आहारी गेला असल्यास त्वरित तज्ज्ञांची मदत घ्या. व्यसनामुळं राग येतो, हिंसात्मक कृती घडते. असे होत असल्यास तुम्हाला तज्ज्ञांच्या, ज्येष्ठांच्या मदतीची गरज आहे. 
 • तुम्हाला सतत अस्वस्थ किंवा हतबल वाटतं का? विनाकारण राग येतो का? रागामुळं तुमची मैत्री, नाती तुटताहेत का? रागामुळं कायदे मोडले जातायत का? इतरांना शारीरिक दुखापत करावीशी वाटते का? 
 • या परिस्थितीत मदत मागण्यात कमीपणा मानू नका. योग्य उपायांनी, अतिरागाच्या, हिंसात्मक वृत्ती आणि कृतीच्या दुष्टचक्रातून तुम्ही सुटू शकाल. 

शैक्षणिक, सामाजिक संस्थांची जबाबदारी 
या फोफावत चाललेल्या विषवल्लीचे परिणाम पुढील काळात संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. त्यासाठीच शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांनी निकोप मानसिक विकास, रागाचं व एकूणच नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन यासाठी उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्यासाठी मुले व पालकांसाठी तज्ज्ञांची व्याख्यानं, कार्यशाळा, स्व-मदत गट अशा प्रकारचे उपाय योजण्याची गरज आहे. शांत, स्वस्थ, कणखर आणि चांगली मूल्यं असणारा समाज घडवण्याच्या दिशेनं ते एक महत्त्वाचं पाऊल ठरंल. 

'विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिक दृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना, स्पर्धात्मक वातावरणाचा ताण, अपेक्षेप्रमाणं सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब, खरं सुख भौतिक सुखातच असून, मी ते मिळवीनच, दिलं तर सरळ नाहीतर ओरबाडून, त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं, इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं...' अशी मानसिकता दुर्दैवाने आज अनेक मुलांची झाली आहे. क्रोधातून त्यांच्यातल्या काही जणांच्या हातून घडणारे गुन्हेही वाढले आहेत. सगळ्यांच्याच हातून टोकाच्या गोष्टी घडताहेत असं नाही, पण एकूणच मुलांमध्ये अति राग येण्याचं व तो चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरिक सुखाची व्याख्या चुकतेय. आनंद व मनःशांतीसाठी रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं, हे म्हणूनच समजून घ्यायला हवं.

(लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Vidyadhar Bapat writes about how to handle rejection