‘व्यायामात सातत्य आवश्‍यक’ (विद्युत जामवाल)

‘व्यायामात सातत्य आवश्‍यक’ (विद्युत जामवाल)

दिवसांतून किती वेळा व्यायाम करावा, आहार कोणता आणि तो किती वेळा घ्यावा, हे ज्याचं त्यानं आपल्या शरीररचनेनुसार ठरवायचं असतं. मला कित्येक तरुण फिटनेसबाबत विचारतात. मी त्यांना हेच सांगतो, की तुम्ही सतत व्यायाम करा. दिवसातून एकदा तरी व्यायाम केलाच पाहिजे. केवळ दहा दिवस किंवा एक महिना वर्कआऊट करून उपयोगाचं नाही. वर्कआऊटमध्ये सातत्य हवं.

सध्या फिटनेसचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. प्रत्येकाला आता फिट अँड फाईन राहावं असं वाटत आहे आणि ते साहजिकच आहे. आपलं आरोग्य आपणच चांगलं राखलं पाहिजे. ते आपल्याच हातात असतं आणि त्याकरिता व्यायाम करणं आवश्‍यक आहे. आता व्यायाम करायचा म्हटलं, तर तो किती आणि कसा करावा हे प्रत्येकानं ठरवायचं असतं- कारण प्रत्येकाची शरीररचना वेगळी आहे. प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी आहे. त्यामुळं दिवसांतून किती वेळा व्यायाम करावा, आहार कोणता आणि तो किती वेळा घ्यावा हे ज्याचं त्यानं आपल्या शरीररचनेनुसार ठरवायचं आहे. मी जिथं जिथं जातो तिथं तिथं मला कित्येक तरुण फिटनेसबाबत विचारतात. मी त्यांना हेच सांगतो, की तुम्ही सतत व्यायाम करा. दिवसातून एकदा तरी व्यायाम केलाच पाहिजे. केवळ दहा दिवस किंवा एक महिना वर्कआऊट करून उपयोगाचं नाही. त्यानं काही लगेच आपले शरीर पीळदार बनत नाही, तर त्याकरिता सहा महिने किंवा एक वर्ष वर्कआऊट करणे आवश्‍यक आहे. वर्कआऊटमध्ये सातत्य हवं. हल्ली सगळ्यांनाच सर्व काही झटपट आणि पटापट हवं असतं. पंधरा दिवसांत शरीर पीळदार बनेल असं सगळ्यांना वाटत असतं; परंतु तसं काहीही होत नाही. आपण पंधरा दिवसांत एखादा भाषासुद्धा शिकू शकत नाही- मग शरीराचं तर काय? कोणत्याही प्रकारची घाई किंवा आटापिटा न करता आपल्याला अर्थात आपल्या शरीराला सूट होईल असाच व्यायाम केला पाहिजे. 

शरीराला साजेसा व्यायाम  
काही जण विविध मासिकं किंवा यूट्युबवरचे व्हिडिओ पाहून व्यायाम प्रकार करत असतात किंवा खाण्यापिण्याच्या वेळा ठरवत असतात; पण त्या सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे, की व्यायाम मग तो योगा असो, की अन्य काहीही व्यायामाचा प्रकार असो- तो करताना आपल्या शरीराला कोणता व्यायाम प्रकार योग्य आहे, ते प्रथम पाहिलं पाहिजे आणि नंतरच तो किती तास आणि किती वेळा करावा हे ठरवलं पाहिजे. अमुक एकानं सांगितलं आणि मी केलं असं होता कामा नये. त्यानं आपल्याला धोकादेखील उत्पन्न होऊ शकतो. कुणाला जिमची आवड असते, कुणाला मार्शल आर्टची आवड असते, कुणाला डान्सची आवड किंवा जिम्नॅस्टिक्‍सची आवड असते, तर कुणाला धावण्याची. व्यायामाचे तसे विविध प्रकार आहेत; परंतु ज्यांना ज्यांना जे जमतं ते त्यानं त्यानं केलं पाहिजे. 

एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून व्यायामाचा सल्ला घेतला किंवा डाएट प्लॅन तयार करून घेतला, की आपल्यासाठीही ते सोयीस्कर असतं. शरीर हेल्दी राहिलं, तर तुम्ही पुढील कामं सुरळीतपणे करू शकता. मी दररोज तासन्‌तास व्यायाम करतो आणि भरपूर खातो. माझ्यासारखं सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. त्यामुळं तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य तो व्यायाम आणि योग्य तो आहार केला पाहिजे. कधी कधी कुणी सांगतं, की साखर कमी खावी, मीठ कमी खावं वगैरे वगैरे. मात्र, मी सांगीन की सगळं खा; पण त्याचं प्रमाण ठरवा. गुलाबजाम खायला आवडतात, म्हणून पाच-सात खाल्ले असं करू नका. प्रत्येक पदार्थ आवडीनं खा आणि त्याचं निश्‍चित प्रमाण ठरवा. खातानाही आपलं आपल्यावर नियंत्रण हवं. भरपूर खा आणि तेवढेच वर्कआऊट करा आणि भरपूर पाणी प्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. डाएट म्हणजे खाणं सोडून वजन कमी करणं नव्हे. जेवणाचं प्रमाण अधिकच कमी केल्यास अशक्तपणा जाणवू शकतो. वजन वाढवताना किंवा कमी करतानाही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अगदी एका महिन्यात पाच ते सहा किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. घरगुती पदार्थ खाण्याकडं माझा अधिक कल असतो. घरातलं पौष्टिक अन्न अधिक हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय, फिटनेसाठी जिमबरोबरच योगासनंही फायदेशीर ठरतात. योगाचे विविध प्रकार आहेत आणि त्यातले आपल्याला सोयीस्कर वाटतील असे प्रकार करायला हरकत नाही. दररोज सकाळी उठून धावणं किंवा चालणं; तसंच योगा करणं आपल्या आरोग्याला खूप चांगलं असतं. त्यामुळं दिवसभर आपण तरतरीत आणि फ्रेश राहतो. 

मार्शल आर्टमुळं ओळख
मी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून मार्शल आर्ट शिकत आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी केरळमध्ये मार्शल आर्ट कलारिपट्टूचं ट्रेनिंग घेतलं आहे. मार्शल आर्टमुळंच माझ्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. त्याचं असं झालं, की दिग्दर्शक निशिकांत कामत ‘फोर्स’ चित्रपटासाठी ऑडिशन्स घेत होते, तेव्हा मी इथं नव्हतो. माझ्या एका मित्रानं मला या ऑडिशन्सबाबत कल्पना दिली, तेव्हा मी मार्शल आर्टवरची छोटीशी फिल्म करत होतो. माझं एकूणच मार्शल आर्ट पाहून आणि इच्छाशक्ती पाहून मला काम मिळालं. तेव्हापासून मी हिंदी चित्रपटामध्ये काम करत आहे. मार्शल आर्टमुळं आणि दररोजच्या वर्कआऊटमुळं मला माझा फिटनेस योग्य राखता आला आहे आणि एकूणच माझी शरीरयष्टी पाहून मला भूमिका ऑफर होत आहेत. आता ‘जंगली’ चित्रपटातली माझी भूमिका माझी पर्सनॅलिटी पाहूनच मिळाली आहे. त्याकरिता मला खूप मेहनत घ्यावी लागली. या चित्रपटात वेगळी ॲक्‍शन आहे आणि काही स्टंट्‌स स्वत: केले आहेत. विशेष म्हणजे हत्तीबरोबर माझे काही थरारक सीन्स आहेत. या चित्रपटात भोला नावाचा एक हत्ती माझा मित्र आहे आणि त्या अनुषंगानं कथा गुंफण्यात आली आहे. सांगायचा मुद्दा असा, की मार्शल आर्टमुळंच मला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला. आत्ताही मी तितकीच मेहनत घेतो. दररोज वर्कआऊट करतो. त्यामुळं तुम्हीही व्यायामाचं महत्त्व आता ओळखा आणि वर्कआऊट करा...तंदुरुस्त राहा.

(शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com