बंदिशींच्या रचनांमध्ये विषयांचं नावीन्य हवं (विजय बक्षी)

vijay bakshi
vijay bakshi

पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा विषयांचं नावीन्य का असू नये?

माझा जन्म संगीताची परंपरा असलेल्या घरातला नाही. आई-वडील दोघं पुण्यात महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक होते; पण दोघांनाही संगीत या विषयाचं अतोनात प्रेम. वडिलांचा-दादांचा आवाज पातळ व गोड होता. आई हार्मोनिअम वाजवत असे. दादा "सुगंध' या टोपणनावानं कविता करत, तसंच मेळ्यांसाठी गीतं लिहीत असत. माझ्या थोरल्या भावानं पाच-सहा वर्षं भावे सरांकडं (समर्थ संगीत विद्यालय) हार्मोनिअमचं उत्तम शिक्षण घेतलं होतं. ते बघून मीही घरच्या हार्मोनिअमवर बोटं फिरवू लागलो आणि काही गाणी म्हणू लागलो. मी आठ वर्षांचा झाल्यावर "भारत गायन समाज' इथं प्रवेश घेतला. दांडेकर गुरुजींनी पहिलं "सा रे ग म' शिकवलं. त्या वेळी "समाजा'च्या जुन्या इमारतीत भरपूर मोकळी जागा होती. त्यामुळं क्‍लासच्या वेळेआधी जाऊन पळापळीचे खेळ खेळणं हेच गाण्यापेक्षाही मोठं आकर्षण होतं! "भारत गायन समाजा'त भोपे बंधू, अष्टेकर, वैद्य सरांकडं तीन-चार वर्षं शिक्षण घेतलं. ताला-सुरांची ओळख झाली. तिथं दर गुरुवारी संध्याकाळी तासभर एका कलाकाराचं गाणं ऐकायला मिळे. त्याच्या मागं तानपुऱ्याची साथ करायला मिळे. मा. कृष्णराव, राम मराठे आदी बुजुर्ग कलाकार तिथं येत असत. तळेगाव इथं शिकवणारे दत्तोपंत आगाशेबुवा पुण्यात "विष्णू दिगंबर संगीत विद्यालया'तही शिकवत असल्याचं मावसभाऊ सुरेश अंबिके याच्याकडून कळलं. आगाशेबुवांचे व आमचे घरगुती संबंध असल्यानं मी त्यांच्याकडं शिकू लागलो. त्यांचे गुरू विनायकराव पटवर्धन हे या विद्यालयाचे प्रमुख होते. काही वेळा विनायकरावसुद्धा आमचा वर्ग घेत. त्यांचं गाणंही खूप वेळा ऐकायला मिळे. दर गुरुपौर्णिमेला ते काही ना काही नवीन सादर करत असत. उंच पण मधुर स्वर, तालावरची हुकमत, तराण्याची विलक्षण तयारी हे सगळं माझ्यावर मनावर कायमचं ठसलं. मी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेचा विद्यार्थी. आमच्या शाळेत संगीत हा विषय सातवीपर्यंत शिकवण्यासाठी नागेशबुवा खळीकर होते. शाळा भरण्यापूर्वी रोज ध्वनिक्षेपकावरून मुलं प्रार्थना म्हणत. आठवड्याच्या सहा दिवशी वेगवेगळ्या सहा प्रार्थना म्हटल्या जात. पाचवी ते अकरावीपर्यंत म्हणजे सलग सात वर्षं प्रार्थना म्हणण्याचं भाग्य मला लाभलं. शाळेच्या बॅंडमध्ये मी बासरी वाजवत असे. शाळेतल्या देसाई सरांनी बासरीच्या बरोबर माऊथ ऑर्गन वाजवायचा - पुण्यातल्या अन्य शाळांमध्ये कुठंच नसणारा - प्रयोग केला. अर्थात त्यात मलाही माऊथ ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. स्नेहसंमेलन, काव्यगायन स्पर्धा इत्यादींमधून भाग घेत गेल्यामुळे माझा सभाधीटपणा वाढला. पुढं "संगीतविशारद' झाल्यावर आगाशेबुवांनी मोठ्या मनानं सांगितलं ः ""आता माझ्याकडच्या शिकवण्याच्या गोष्टी संपल्या. पुढचं शिक्षण दुसरीकडं घ्या.''
पुढं धुं. गो. मराठे सरांकडं शिक्षण सुरू केलं. ग्वाल्हेर घराण्याची वैशिष्ट्यं त्यांनी उलगडून दाखवली. झुमरा, तिलवाडा, आडा चौताल आदी तालांतल्या अनेक बंदिशी घटवून घेतल्या. हे शिक्षण सुरू असताना घरी रियाजही असायचा. दर रविवारी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत माझा मित्र विनायक फाटक तबलासाथीला व भाऊ अरुण हार्मोनिअमच्या साथीला असे. शिकवलेलं सगळं म्हणून बघायचं एवढाच हेतू. आमच्या वाड्यात अनंतबुवा मेहेंदळे आणि ल. पां. फाटक असे दोन कीर्तनकार होते. रियाज ऐकून ते सांगायचे ः ""आज "तोडी' जरा बेसुरा वाटला हं....', "आज "मालकंस' बरा झाला.' त्या वेळी प्रसारित झालेल्या "गीतरामायण' या अलौकिक कलाकृतीतली गीतंही मी म्हणत असे. एके वर्षी शेजारच्या वाड्यात या गीतांचा माझा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या वेळी पहिली बिदागी मिळाली...रुपये दोन! आकाशवाणीवर "बालोद्यान' कार्यक्रमात बालकलाकारांच्या संगीतसभेत प्रथमच मी राग भैरव गायलो होतो.

आकाशवाणीतर्फे युवकांसाठी दरवर्षी संगीतस्पर्धा घेतली जाते. तीतही मी त्या वेळी भाग घेतला होता. पहिल्या दोन वर्षी यश मिळालं नाही. त्या वर्षी माझं स्पर्धेतलं गाणं स्टाफ आर्टिस्ट आबासाहेब तुळशीबागवाले यांनी ऐकलं. त्यावर मला बोलावून त्यांनी विचारलं ः ""कुठं शिकतोस? मी सांगेन त्या गुरूंकडं शिकणार का?''
-मी होकार दिला. त्यांनी मला स्टुडिओत नेलं व म्हणाले ः ""हं...नमस्कार कर. हे तुझे आजपासून गुरू.'' ती व्यक्ती म्हणजे गुरुवर्य नवनीतभाई पटेल. दुसऱ्या दिवशी ते आमच्या घरी आले. आम्ही सर्व शिष्य त्यांना बापूजी म्हणायचो. त्यांनी लगेच शिकवायला सुरवात केली. "सा' कसा लावायचा, कोणत्या स्वरावर किती जोर द्यायचा. बंदिशीचं सादरीकरण, आलाप, विस्तार, नोम-तोम, सरगमचे असंख्य प्रकार अशा अनेकानेक बाबींवर त्यांनी माझ्यावर अपार मेहनत घेतली. पूर्वीच्या गुरूंनी पायाभरणी पक्की केली होती. बापूजींनी त्यावर कळस चढवला. ते स्वतः उत्तम तबलावादक व जलतरंगवादक होते; पण गायन-वादनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारकाईनं अभ्यासल्या होत्या. असंख्य बंदिशींचा संग्रह केला होता. प्रत्येक शिष्याच्या पात्रतेनुसार त्याला काय शिकवावं, याचा सूक्ष्म विचार ते करत असत. स्वभाव अबोल व मितभाषी. डोक्‍यात सतत संगीताचाच विचार. त्यांच्या कानाला सतत ट्रान्झिस्टर असे. ""तुम्ही सतत खूप ऐकलं पाहिजे,'' असं ते म्हणत. संगीतातली नवी दृष्टी त्यांच्यामुळं मला प्राप्त झाली. ते सांगायचे ः ""भावी काळात विद्यार्थ्यांना रियाजासाठी आठ-दहा तास देता येणार नाहीत. कमी वेळात त्यांना जास्त प्रगती करता आली पाहिजे.'' त्यादृष्टीनं त्यांनी खास क्‍लृप्त्या शोधून काढल्या होत्या. आजही मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो, तेव्हा त्याच गोष्टींचा वापर करतो. ""रोज थोडी तरी प्रगती आपल्या सादरीकरणात झाली पाहिजे,'' असं ते सांगत असत. बापूजींनी अनेक रागांमध्ये विविध बंदिशी बांधल्या. स्वतः उत्तम तबलावादक असल्यामुळं त्यांच्या बंदिशींमध्ये लयकारीचा आविष्कार आढळतो. याशिवाय बंदिशीत एखादी तिहाई गुंफण्याचं त्यांचं कसब अवर्णनीय होतं. एखादी बंदिश कसा जन्म घेते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या समवेत मला घेता आला. त्यामुळे बंदिशीमागची सौंदर्यतत्त्वं नकळत ज्ञात झाली. बापूजींच्या अमूल्य मार्गदर्शनामुळं आकाशवाणी युवा स्पर्धेत संपूर्ण भारतात मला प्रथम क्रमांक मिळाला. ग्वाल्हेर इथं अतिभव्य प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या "तानसेन संगीत समारोहा'त गायन सादर करण्याचं भाग्य त्यामुळं पुढच्या वर्षी लाभलं. - मी सुमारे 50 वर्षं आकाशवाणीच्या माध्यमातून विविध राग सादर करत आलो आहे. एकदा गायलेला राग पुन्हा गायला जाऊ नये, असा माझा कटाक्ष मी आकाशवाणीच्या कार्यक्रमांत बहुतांश पाळला आहे. आकाशवाणीचा "अ' दर्जाचा कलाकार झाल्यानं राष्ट्रीय कार्यक्रम, संगीतसंमेलन आदी कार्यक्रमांत मला कला सादर करता आली.

बापूजींच्या मार्गदर्शनामुळं मलाही बंदिशरचना करण्याची प्रेरणा मिळाली. "बंदिश-नवनीत' हे माझं पुस्तकही प्रसिद्ध झालं. सुमारे 250 बंदिशी गुरुकृपेनं बांधल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे वादनात विविध तालांचा वापर कलाकार करतात, त्यामानानं गायनात मात्र ठराविक तालच वापरले गेल्याचं दिसतं, म्हणून माझे मित्र अशोक श्री. रानडे यांच्या सहकार्यानं मी अप्रचलित तालांचा अभ्यास सुरू केला. रानडे हे गुरुवर्य सामंत यांचे शिष्य. चार ताल की सवारी, 5 1/2 तालांचा हेमंत, मत्तताल, 9 1/2 मात्रांचा आधा झपताल आदी अप्रचलित तालांत बंदिशींची रचना केली. पारंपरिक बंदिशी सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा विषयांचं नावीन्य असावं, असं मला वाटलं. हिंदी आणि ब्रज या भाषांखेरीज उर्दू शब्दही का घेऊ नयेत, अशा विचारानं मी काही बंदिशी तयार केल्या व रसिकांनी त्यांचं स्वागत केलं. उदाहरणार्थ ः ताजमहालाचं सौंदर्य दाखवणारी बंदिश मी राग "गावती'मध्ये बांधली, ती अशी ः

शाने ताजमहल मन को लुभाए मुहब्बत की निशानी जग में सब चरचा करे।
अचरज ये पूरी दुनिया में संगेमरमर का रूप सुहाना देख के पूनम शरम करे।
ग्वाल्हेर घराण्याची गायकी मी जरी सुरवातीला शिकलो, तरी बापूजींनी अनेक घराण्यांची वैशिष्ट्यं मला उलगडून दाखवली व शिकवली. कदाचित त्यामुळं माझ्यावर ज्या दोन महान गायकांचा जबरदस्त प्रभाव पडला ते दोन बुजुर्ग गायक म्हणजे बडे गुलाम अली खॉं आणि अमीर खॉं. बापूजींच्या निधनानंतर या दोघांनाच गुरुस्थानी मानून त्यांच्या गायकीचा मी अभ्यास केला. अमीर खॉं यांची धीरगंभीर, संथ आलापी, स्वरलगाव, विलक्षण सरगम, गमकेच्या ताना आदी वैशिष्ट्यांनी मी प्रचंड प्रभावित झालो. त्यामुळेच, जरी मी बबनराव कुलकर्णी यांच्याकडं ठुमरीगायन शिकलो होतो तरी, "यापुढं मैफलीत फक्त रागगायनच सादर करायचं' असा निश्‍चय मी केला. त्यामुळे रागगायनावर लक्ष पूर्णतः केंद्रित करता आलं आणि अर्थात कार्यक्रम मिळण्याचं प्रमाण खूपच कमी झालं! पहिला राग गायल्यावर ठुमरी, नाट्यगीत, अभंग गावा अशी आयोजकांची/रसिकांची अपेक्षा असते. या गायनप्रकारांविषयी मला पूर्ण आदर आहे, आस्था आहे; पण माझा हा निर्णय म्हणजे माझ्यापुरता मी घेतलेला वसा होता. आपल्या सादरीकरणात विविधता यावी यासाठी पारंपरिक रागांसमवेतच अप्रचलित राग सादर करावेत, या कल्पनेतून मी अप्रचलित रागांचा अभ्यास सुरू केला. असे अनेक रंजक; पण अप्रचलित राग मैफलीतून मी मांडले. काही राग फक्त वाद्यांवरच ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ ः "हेमावती', "दीपावली,' "श्‍यामश्री', "पलास-काफी', "पलासीबहार', "श्रीकल्याण' आदी. अशा रागांत बंदिशी बांधून हे राग रसिकांसमोर मी मांडले. काव्यरचनेचा गुण कदाचित वडिलांकडून आलेला असल्यानं शब्दांची उणीव कधीच भासली नाही. आज सुमारे 150 बंदिशींची शब्दरचना योग्य रागांत गुंफली जाण्याची वाट पाहत माझ्या संग्रहात आहे. जोगन विठामाई या मुखेड (येवला) इथल्या एक तपस्विनी होत्या. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीत 52 गीतं गुरुकृपेनं माझ्याकडून लिहिली गेली, तसंच शेगावच्या श्रीगजाननमहाराजांचं जीवन 21 गीतांमधून मला मांडता आलं.
बंदिशरचनांबरोबरच काही नव्या रागस्वरूपांची रूपं डोळ्यासमोर येऊ लागली. त्यावरही अभ्यास करून मी अनेक नवीन रागांच्या निर्मितीचा प्रयत्न केला; त्यापैकी काही रागांची नावं ः "रागेश्री मल्हार', "प्रज्ञावती', "विजयानंद', "क्षितिजा', "शोभा सारंग', "धैवती', "धनदीप', "पिलू बिहाग', "चारुश्रृता' आदी. गुणिजन व रसिकांनी या रागांचाही रसिकतेनं आस्वाद-आनंद घेतला. नवरागनिर्मितीच्या प्रक्रियेत मूर्च्छना या तत्त्वाचाही उपयोग करता येतो, असं मला जाणवलं. स्वरसमूहातील मूळ "सा'ची जागा दुसऱ्या स्वरावर नेल्यास इतर स्वरांच्याही जागा बदलतात. या क्रियेला "मूर्च्छना-क्रिया' असं ढोबळपणे म्हणता येईल. ही क्रिया चटकन करता यावी यासाठी मी व माझा भाचा नरेंद्र पानसे अशा दोघांनी मिळून saRas हे ऍप तयार केलं आहे. त्याची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=air.Saras
अशी आहे.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात सभाधीटपणा व सफाईदारपणा यावा म्हणून मी तीन-चार महिन्यांतून एक छोटेखानी मैफल ठरवतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर चर्चा करतो. झपताल महोत्सव, एकताल महोत्सव, अनवट ताल, स्वरचित बंदिशी, जुगलगायन, "तोडी' प्रकार, "सारंग' प्रकार आदी विषय घेऊन मी मैफली केल्या आहेत. अमीर खॉं यांनी "मेरुखंड' पद्धतीचा वापर रियाजात व सादरीकरणात मोठ्या प्रमाणावर केला. त्याची ओळख करून देण्यासाठी मी अनेक ठिकाणी सप्रयोग व्याख्यानं दिली. "मेरुखंड' पद्धतीची ओळख करून देणारं "स्वरधनू' (swarDhanu) हे ऍपही आम्ही तयार केलं आहे. त्याची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=air.SwarDhanu
अशी आहे. -मेरुखंड पद्धतीनं रियाज केल्यास गायन, वादन, सादरीकरण खूपच आकर्षक व वैविध्यपूर्ण होतं, म्हणून मी विद्यार्थ्यांना शिकवताना मेरुखंड पद्धत कटाक्षानं वापरतो. विद्यार्थ्यांना स्वयंनिर्मितीचा आनंद त्यातून घेता येतो.
सुमारे 40 वर्षं संगीत-अध्यापनाचं कार्य सुरू आहे. गोव्यातले दामोदर चारी व रुपेश गावस हे दोघं माझे विद्यार्थी. त्यांच्या योगदानामुळं फोंडा (गोवा) इथं "श्रुतिसुधा' ही संगीतोत्तेजक संस्था स्थापन करण्यात आली आहे. हृषीकेश बडवे, पुष्कर गाडगीळ, डॉ. शुभांगी बहुलीकर, चारुदत्त आफळे, विजय जगताप, महेश पाटणकर, प्राची जठार, श्रुती वझे आदी अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलं. आज या क्षेत्रात ते जोमानं वाटचाल करत आहेत. सांगीतिक वाटचालीत अनेक गुणिजनांचे आशीर्वाद व माया मला मिळाली. ज्येष्ठ हार्मोनिअमवादक तुळशीदास बोरकर यांच्यासारख्या अलौकिक कलाकाराचा स्नेह मिळाला. पत्नी सुषमा हिची तर बहुमोल साथ मिळाल्यानंच ही वाटचाल सुसंवादी व सुरेल झाली. रसिकांच्या शुभाशीर्वादामुळं आणि गुरुजनांच्या कृपेमुळं अनेक पुरस्कार, मान-सन्मान मिळाले.

मी आता वयाची एक्काहत्तरी पूर्ण केली आहे. आता फक्त एकच इच्छा आहे व ती म्हणजे, आरोग्य उत्तम राहून संगीतशारदेच्या चरणी अखेरच्या श्वासापर्यंत सेवा घडत राहावी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com