नवनवीन गात-ऐकत राहिलं पाहिजे (विजय कोपरकर)

नवनवीन गात-ऐकत राहिलं पाहिजे (विजय कोपरकर)

परिपक्वता आल्यावरच "विचार' सुरू होतो. खरंतर आपलं "मन' गात असतं, म्हणून आधी मनात गाणं समृद्ध व्हावं लागतं. "गळा' हे एक माध्यम आहे; मात्र गाणं गळ्यातून येताना एकाच वेळी डोक्‍यातून व हृदयातूनही ते यावं लागतं. गायनातलं तंत्र व विद्या शिकल्यानंतर अथवा अवगत केल्यानंतर "कला' हा खरा महत्त्वाचा भाग आहे. कारण, कला ही सौंदर्यदृष्टीनं व प्रतिभेनं सादर करावी लागते. कलाकार नुसता विद्वान असून भागत नाही. श्रोत्यांना त्याची कला भावली तरच त्याचं सार्थक होतं.

फार पूर्वीपासून आपलं संगीत हे मंदिरात ऐकायला मिळत असे. माझे वडील (गंगाधर कोपरकर) प्रसिद्ध कीर्तनकार होते; त्यामुळं घरात पेटी, तानपुरे होते. वडील गायनाचा रियाज करायचे. परिणामी, संगीताशी माझी नाळ आपसूकच जोडली गेली. पंडित विनायकराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या "विष्णू दिगंबर संगीत विद्यालया'त माझं आठव्या वर्षी शिक्षण सुरू झालं. सुरवातीला डॉ. सुधाताई पटवर्धन व नंतर डॉ. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडं मी नऊ-दहा वर्षं शिक्षण घेतलं. इथं माझी "संगीतविशारद' ते "ख्यालगायन' इथपर्यंतची तयारी झाली. या शिदोरीच्या जोरावर पंडित चंद्रकांत कामत माझ्याविषयी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याशी बोलले. एकदा पुण्यात मुरलीधर मंदिरात व उपाशी विठोबामंदिरात वसंतरावांचं गाणं होतं. वसंतरावांच्या मागं तानपुरासाथ करण्याचा योग मला प्रथमच आला. त्यांनी त्या वेळी गायलेले "छायानट' व "बागेश्री' हे राग मला अजून स्मरतात. त्यांच्या चतुरस्र आणि सुंदर गायकीनं मी भारावून गेलो. त्या वेळी त्यांचं "कट्यार काळजात घुसली' हे नाटक खूप जोरात होतं.

पुढं दोन वर्षांनी वसंतरावांनी "कट्यार'मधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ते कामत यांना म्हणाले ः ""तुमच्या त्या मुलाला गायन शिकायचं आहे ना? बोलवा त्याला...' आणि मग 1971 मध्ये माझं सांगीतिक शिक्षण त्यांच्याकडं सुरू झालं. आठवड्यातून तीन-चार दिवस ते स्वतंत्रपणे मला एकट्याला शिकवत असत. त्या वेळची शिक्षणपद्धती वेगळी होती. वसंतराव बाकासारख्या एका बैठकीवर अगदी वेळेवर स्थानापन्न झालेले असायचे. मी चटई टाकून बसायचो. तानपुरे जुळवून 15 मिनिटं माझं गायन झाल्यावर वसंतराव शिकवणं सुरू करायचे. मी 15 मिनिटं करत असलेल्या आधीच्या त्या गायनावरून ते माझ्या तयारीचा अंदाज घ्यायचे. पहिल्या तीन वर्षांत त्यांनी मला "यमन' हा एकमेव राग शिकवला. या रागात त्यांनी दोन-तीन वेगवेळ्या तालांतले ख्याल व चार-पाच बंदिशी माझ्याकडून पक्‍क्‍या करवून घेतल्या. "ये मोरा मन बांध लीनो इन जोगिया के साथ' हा पहिला ख्याल होता, तर "गगर ना भरन देत' ही मधुकर गोळवलकर यांची हिराबाई बडोदेकर गात असलेली द्रुत बंदिश. मला आता प्रश्न पडतो, की नऊ-दहा वर्षं सांगीतिक शिक्षण झाल्यावर तीन वर्षं एकच राग शिकण्याची किती विद्यार्थ्यांची तयारी असेल?

वसंतरावांनाही अमानअली खॉं यांनी केवळ "मारवा' या रागाची तालीम दिली, असं ऐकिवात आहे. पुढं मात्र वसंतरावांनी मला "बिहाग', "नंद', "अहीरभैरव', "भीमपलास', "बागेश्री', "रामकली', "नटभैरव' असे अनेक राग शिकवले. शिष्य किती राग शिकला याला महत्त्व नसतं. राग हे केवळ तंत्र आहे. आवाजाची साधना फार महत्त्वाची असते. आलाप, बोलअंग, तान, सरगम, बोलतान या सगळ्या अंगांचा पक्का रियाज झाला पाहिजे. हे सगळे ख्यालाचे अलंकार आहेत. या सगळ्या अंगांशिवाय ख्यालगायनाला परिपूर्णता येऊ शकत नाही. ख्याल एकांगी होता कामा नये. त्या वेळी रियाज करण्यासाठी आमच्या घरात पुरेशी जागा नव्हती. ज्येष्ठ तबलावादक रामदास पळसुले यांच्या जुन्या घरी मी रियाज करत असे.

सन 1983 मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे यांचं निधन झालं. त्या वेळी मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. सन 1984 मध्ये मी मुंबईला जितेंद्र अभिषेकी यांना भेटलो. माझी कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी न सांगता "मला तुमच्याकडं शिकायचं आहे' एवढंच मी अभिषेकीबुवांना सांगितलं. पहिल्या भेटीतच त्यांनी मला होकार दिला. ते त्या वेळी लवकरच पुण्याला राहायला येणार होते. हे माझं भाग्यच होतं. नाव, पैसा जरूर मिळवावा; परंतु विद्यार्थ्याकडं नम्रता नसेल तर विद्या मिळू शकत नाही. विद्येविषयी व गुरूंविषयी नम्रपणा व समर्पण असलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी एमई करत असतानाच अभिषेकीबुवांकडं शिकू लागलो. बुवांकडं सगळ्या शिष्यांची सकाळी व सायंकाळी एकत्रित चार तास तालीम चालायची. बुवा म्हणजे एक "म्युझिक इन्स्टिट्यूट' होती. असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडं शिकले. अनेक पारंपरिक रागांबरोबरच अनेक अनवट राग मी त्यांच्याकडं शिकलो. बुवांनी आम्हाला "भैरव', "बिहाग', "यमन', "बागेश्री', "जौनपुरी', "मालकंस' या पारंपरिक रागांव्यतिरिक्त "आनंदभैरव', "भटियारभैरव', "मालवी', "मालव', "त्रिवेणी', "हिंडोली', "प्रभातभैरव' यांसारखे अनवट व जोडरागही खूप शिकवले. याबरोबरच काही ठुमऱ्या व टप्पेही शिकवले. बुवा आम्हाला शिकवत असताना स्वतःदेखील कोल्हापूरला शिकायला जायचे. अल्लादिया खॉं यांचे नातू "बाबा' यांच्याकडं ते जायचे. त्यांच्याकडं बंदिशींचा खजिना होता. बुवा बंदिश जशी आहे तशी शिकून घ्यायचे व आम्हालाही शिकवायचे. या बंदिशींमधले वेगवेगळे राग आम्हाला ओळखायला सांगायचे. यामुळं रागमांडणीबरोबरच रागांची फोड कशी करावी, याचं पक्कं शिक्षण नकळत होत गेलं. अनवट व जोडराग कसे मांडावेत, याची पक्की तालीम मला मिळाली.

परिपक्वता आल्यावरच "विचार' सुरू होतो. खरंतर आपलं "मन' गात असतं, म्हणून आधी मनात गाणं समृद्ध व्हावं लागतं. "गळा' हे एक माध्यम आहे; मात्र गाणं गळ्यातून येताना एकाच वेळी डोक्‍यातून व हृदयातूनही ते यावं लागतं. गायनातलं तंत्र व विद्या शिकल्यानंतर अथवा अवगत केल्यानंतर "कला' हा खरा महत्त्वाचा भाग आहे. कारण, कला ही सौंदर्यदृष्टीनं व प्रतिभेनं सादर करावी लागते. कलाकार नुसता विद्वान असून भागत नाही. श्रोत्यांना त्याची कला भावली तरच त्याचं सार्थक होतं. गुरूनं रियाजाच्या वेळी शिकवलेला राग व मैफलीत सादर केलेला तोच राग यात यामुळंच फरक असतो. यामुळं गुरूच्या मागं तानपुऱ्यावर बसल्यावर या कलेची, त्याच्या सौंदर्यपूर्ण मांडणीची अनुभूती येऊ शकते. यादृष्टीनं गुरूचा सहवास फार महत्त्वाचा असतो.

या तीन मुख्य गुरूंव्यतिरिक्त जमशेटपूरचे पंडित चंद्रकांत आपटे यांच्याकडून त्यांच्या स्वरचित 100 बंदिशी मी शिकलो. पंडित बाळासाहेब पूँछवाले यांच्याकडून मी "टप्पा' हा गायनप्रकार शिकलो. वैद्य यांनी मला वझेबुवांच्या अनेक बंदिशी शिकवल्या. पंडित छोटा गंधर्व यांचे शिष्य डॉ. आबा गोडबोले यांच्याकडूनदेखील मी अनेक जोडराग शिकलो.

एकाच रागातल्या अनेक बंदिशी शिकल्यास त्या रागाचं एकूण स्वरूप व व्याप्ती समजू शकते. राग हा अमूर्त आहे. बंदिश व लय यामुळं रागाला मूर्त रूप येतं. सुरांनी व श्रुतींनी राग बनतो. बंदिशीनुसारसुद्धा (मध्यलय, द्रुत) रागाची मांडणी बदलते. यामुळं राग जरी एकच असला तरी सादरीकरणात एकसारखेपणा कधीच येत नाही. नुसत्या "यमन' या रागातल्या मी स्वतः 50 बंदिशी गातो. दिल्लीला एका खासगी संगीतमैफलीत माझा कार्यक्रम होता. मी तिथं पावणे दोन तास "यमन' गायलो. मध्यंतरानंतर पावणे दोन तास "भैरवी' गायली. या गायनाला मोठी दाद मिळाली. कोणत्याही रागाचं भरपूर "मटेरिअल' कलाकाराकडं असलं पाहिजे. अनेक देशांमध्येही माझ्या मैफली झाल्या. सन 2011 मध्ये मी अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. या कालावधीत माझ्या एकूण 32 मैफली झाल्या; परंतु त्या दौऱ्यात एकाही रागाची मी पुनरावृत्ती केली नाही. अशा दौऱ्यात आपल्याही तयारीचा कस लागत असतो. हे सगळं गुरुकृपेमुळंच शक्‍य आहे.

सध्या मैफलींऐवजी महोत्सव होत असल्यानं कलाकारांना एक तास मिळतो. त्यातली जेमतेम 40 मिनिटं राग व 20 मिनिटं भजन अथवा धून. कलाकारांनीदेखील ठराविक राग निवडलेले असतात (याला अनेक चांगल्या कलाकारांचे अपवाद निश्‍चितच आहेत), त्यासाठीच ते कलाकार लोकप्रिय असतात. रसिकांनाही सगळं काही परिचित असतं. बंदिशींचे बोलसुद्धा तेच असतात. कार्यक्रमाचं नावही त्यावरच आधारित असतं. यालाच टाळ्या मिळत राहतात. मग आपल्या संगीताचा अनमोल ठेवा अभ्यासायचा कुणी? व तो रसिकांपर्यंत उलगडून पोचवायचा कुणी? रसिकश्रोत्यांनी केवळ परिचयाचं संगीत ऐकण्याऐवजी बहुश्रुत होण्यासाठी नवीन नवीन ऐकलं पाहिजे. "वाचस्पती', "स्वानंदी', "पटमंजिरी', "त्रिवेणी', "अमृतवर्षिणी', "मधुरंजनी' ("पटदीप' रागातला "धैवत' काढल्यावर हा राग तयार होतो), "हरिकंस', "मनरंजनी', "कंसगंधार' असे असंख्य राग पूर्वजांनी, बुजुर्गांनी निर्माण केलेले आहेत. कलाकारांनी ते शिकले पाहिजेत व गायले पाहिजेत आणि श्रोत्यांनीही ते ऐकले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर आम्ही "सुश्रुत' नावाची एक संस्था स्थापन केली आहे. एकाच कलाकाराची तीन तासांची मैफल "सवाई स्मारका'त वर्षातून सात वेळा आयोजिली जाते. यातली एक मैफल नवोदित कलाकारांसाठी राखीव ठेवण्यात येते. तीत अनवट रागांच्या मैफलीचाही प्राधान्यानं समावेश असतो. संगीताच्या जाणिवा समृद्ध व्हाव्यात हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. "शुद्ध नाद' या संस्थेच्या मदतीनं "डॉ. वसंतराव देशपांडे कलामंच' या नावानं तरुण कलाकारांसाठी आम्ही एक व्यासपीठ निर्माण करत आहोत.

संगीतसाधनेबरोबरच मला अनेक नवीन रचना रचतानाही खूप आनंद वाटला. जिथं मला काही जुन्या रचना गाताना सोईच्या वाटल्या नाहीत, तिथं मी नवीन रचना रचल्या. उदाहरणार्थ ः "भिन्न षड्‌ज' रागातली "बीत गयी सगरी रैन', तसंच "किरवाणी', "चारुकेशी', "शिवरंजनी', "रागेश्री-कंस', "शुद्ध सोहनी' या रागांमधल्या रचना.

गेली 25 वर्षं ज्या रीतीनं मी शिकलो त्याच रीतीनं मी पुढच्या पिढीला शिक्षण देत आहे. गुरूंच्या व कलेच्या ऋणातून थोडं तरी उतराई व्हावं, ही भावना यामागं आहे. परदेशातलेही अनेक गुणी विद्यार्थी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत. आपलं शास्त्रीय संगीत हा आपल्या देशानं जगाला दिलेला मोठा ठेवा आहे. तो आपणच जपला पाहिजे आणि वाढवला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com